Wednesday, December 21, 2016

मराठे शाहिची १२८ वर्षे

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अधिकृत काळ म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकापासून ( १६७४) ते पेशवाईच्या अंतापर्यंत म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह करुन ब्रिटीशांची तैनाती फौज स्वीकारली तोपर्यंत १८०२ पर्यंत. १८१८ ची लढाई हि केवळ एक दिवा विझतानाची फडफड होती,सेनापती बापु गोखले यांचा आदरच आहे पण... खरा शेवट १८०२ ला दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटीशांचे मांडलिकत्व स्वीकारले तेव्हाच झाला.
या १२८ वर्षात अनेक चढ उतार व संकटे आली. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या संकटात, महाराष्ट्र धर्माला जागून मराठी हिंदुंनी २७ वर्षे कडवी झुंज देऊन औरंग्याला गाडला.
बाजीरावांनी भारतभर मुलुखगिरी केली तर नानासाहेब पेशव्यांच्या काळात, रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी हिंदुंनी पार अटकेपर्यंत झेंडे रोवले.
पुढे पानीपतचे संकट आले. मराठी हिंदुंची अपार हानी झाली, पण तो जेत्यांना जिंकणारा पराभव होता. त्यानंतर काही काळातच थोरल्या माधवराव पेशव्यांनी हा पानीपतचा पराभव धुवुन काढला.
सवाई माधधवरावांच्या काळात खर्डयाला निजामाला धुळ चारली तो मराठी हिंदुंच्या ताकदीचा सर्वोच्च बिंदु समजला जातो. नंतर मात्र उतरती कळा लागली.
पेशवाई हि राजकिय दृष्ट्या प्रगत असली तरी सामाजिक दृष्ट्या मात्र अप्रगत होती. याचा अर्थ असा नाही की सर्व काळ ती पोथी निष्ठ व अप्रगत होती, एकुण समाजात जेवढी परंपरागत सामाजिक गुलामी होती तितकीच पेशवाईत होती. पेशव्यांनी ती कमी केली नाही तशी वाढवली पण नाही.
चिमाजी अप्पा व थोरले माधवराव हे वैयक्तिक पातळीवर नैतिक सामर्थ्य असणारे व शूर पेशवे पण अल्पायु. थोरले माधवराव क्षयाने गेले नसते तर त्यांनी कदाचित काही सुधारणावादी योजना आखण्याला वाव दिला असता. पण त्या जरतर च्या गोष्टी.
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशव्यांचे व एकुण सर्वच समाजाचे लाजिरवाणे अध:पतन झाले होते. हे अध:पतन थांबवणारी संत परंपराही खंडीत झाली होती. हे अध:पतन चारित्र्याच्या दृष्टीनेच केवळ नाही तर राष्ट्रिय दृष्टीकोनातून होते. परिणामी ब्रिटीशांचे फावले. ब्रिटीशांच्या राष्ट्रिय नैतिक सामर्थ्यापुढे भारतीय समाजाचे राष्ट्र म्हणून ढासळलेले नैतिक अधिष्ठान फार मोठे कारण आहे, केवळ लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे नाहीत, हे कारण नव्हते.
शिवाजी महाराजांच्या काळात हे नैतिक अधिष्ठान अत्युच्च पातळीवर होते म्हणून ते राष्ट्रनिर्माते होते.
अशा प्रकारे मराठा साम्राज्य त्यातील गुणदोषांसहित १२८ वर्षे टिकले.यावेळी राष्ट्रवादाची रितसर मांडणी हिंदुस्थानात नसली तरी या साम्राज्यात राष्ट्रीय दृष्टीकोन व भारतीय सीमांविषयी जाणीव पुरेपुर होती. पण ब्रिटीश राष्ट्राच्या शक्तीसमोर ते निर्बल ठरले.
आजही हिंदु एकता व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हे दोनच गुणच सध्याचे हिंदवी स्वातंत्र्य बळकट करतील. जातीविद्वेष हा सध्या प्रस्थापित असलेल्या हिंदवी राष्ट्राचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रत्येक हिंदुने याविरुध्द लढणे हे कर्तव्य आहे.
-चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...