Saturday, April 8, 2017

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सचिव बाळाराव

कै. बाळाराव उर्फ शांताराम शिवराम सावरकर हे १९५० ते १९६६ अशी सोळा वर्षे सावरकरांचे स्वीय सचिव ( Personal secretary) म्हणून काम पहात असत. बाळाराव सावरकर हे सावरकरांचे नात्यातले नव्हेत तर केवळ आडनाव बंधु, त्यांचे नाते गुरु शिष्याचे. बाळाराव हे चित्पावन नसून कऱ्हाडे ब्राह्मण होते.
स्वातंत्र्य वीर सावरकरांचे धाकटे बंधु बाळाराव उर्फ डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्याशी त्यांच्या नामसाधर्म्याची गल्लत करु नये.
बाळारावांची आणि माझी ओळख खूप पुर्वीपासुनची. सुमारे दहा वर्षे म्हणजे सन १९८६-८७ ते पुढे बाळाराव जाईपर्यंत ती टिकली. मी पुण्यात आल्यानंतर माझ्या कडे आल्याशिवाय बाळाराव पुण्यातून कधीच परस्पर परत गेले नाहीत. सावरकर साहित्याच्या निमित्ताने आमची गाढ ओळख व वयाने ते माझ्याहून खूपच मोठे असले तरी आमची मैत्रीही झाली.
त्यांच्या सावरकरांच्या सहवासातल्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळत. बऱ्याचशा त्यांनी पुस्तकात लिहुन ठेवल्याच आहेत.
बाळाराव सावरकरांचे काम करत मात्र त्या बदल्यात सावरकर बाळारावांना काहीही वेतन देत नसत. सावरकरांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी लोकांकडुन त्यांना काही रुपये कृतज्ञता निधी म्हणून अधुन मधुन मिळत असे. त्यांची सर्व मालमत्ता शासनाकडुन जप्त झाली होती ती त्यांना कधीच परत मिळाली नाही. उपजिविकेचे अन्य साधन नव्हते. त्यांना कृतज्ञता निधी म्हणून जो मिळाला तो रु. १४०००/- होता. हि रक्कम म्हणजे लाखो रुपये नव्हेत. त्याशिवाय अधुन मधुन रु. १००-२००/- ते रु. ५००/- चा निधी त्यांना अर्पण केला जाई. एकुणच टाटा , बिर्ला, आगाखान सारख्या भांडवलदारांशी वा श्रीमंतांशी फारसा घरोबा नसल्याने व वकिली करुन लाखो रु. मिळवून पार्ट टाईम राजकारण व समाजकारण करत नसल्याने आर्थिक परिस्थिती तत्कालिन सर्व नेत्यांशी तुलना करता यथातथाच राहिली. मात्र त्यांना लाखो रुपये मिळत नसले तरी स्वत:ची व कुटुंबाची उपजिविका करण्या इतपत रक्कम त्यांना समाजाकडुन नक्कीच मिळे. या पैशांतुनच त्यांनी मुंबईत स्वत:चे घर बांधल, आजही ते मुंबईत शिवाजी उद्यान, दादर परिसरात " सावरकर सदन" नावाने प्रसिध्द आहे.
सावरकर काटकसरी व हिशेबी स्वभावाचे असल्याने या पैशात एवढा स्वत:चा संसार व सार्वजनिक व्याप संभाळणे शक्य झाले. वैयक्तिक स्वार्थ किंवा पैसाअडका जमवायचा असता तर त्यांन रोखु शकणारे कोणीच नव्हते.
याच काळात सावरकरांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आपले खर्च आवरते घेतले. आधीचे सचिव श्री. अ.स.भिडे यांनी पगार वाढ मागितली असता ती सावरकरांनी नाकारली. भिडे यांना परवडणे शक्य नसल्याने त्यांनी त्यागपत्र दिले व स्वत:चे साप्ताहीक सुरु केले. अर्थात भिडे यांना सावरकर सदनच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या, मृत्युपत्रात त्या तशाच त्यांच्याकडे पुढे चालु राहिल्या. सावरकरांना तपकिर ओढायचा नाद / व्यसन होते. निवृत्तीच्या निर्णयानंतर त्यांनी कटाक्षाने हे व्यसन हळु हळु आटोक्यात आणून पुर्ण बंद केले. हिशेबीपणा आणि कुटुंबात एकमेकांशी सुध्दा कठोर आर्थिक शिस्त हा कदाचित कोकणस्थी गुण सावरकरांच्यात आला असावा. इतरांना जे विचित्र व्यवहार वाटतात ते कोकणस्थांच्यात सहजभावाने असु शकतात. असे कंजुष व हिशेबी असणारे कोकणस्थ समाजकार्यात सहज पणेच दानशूर असल्याचे आढळुन येतील.
अगदी माझे वैयक्तिक बोलायच तर मी किरकोळ कारणासाठी ५-५० रु. वडीलांना दिले तर ते मला मी नको नको म्हणत असतानही आवर्जुन परत करतातच. सक्तीने. मी एकुलता एक आहे आणि वाटीतल ताटात आणि ताटातल वाटीत अशी स्थिती असूनही हे असे आहे.
कित्येक व्यापारी समाजात, बाप मुलाला किंवा भावाला कर्ज देतो पण काटेकोर व्याज आकारुन. कोकणस्थात इतके टोक नसले तरी आर्थिक हिशेबाला कोकणस्थ पक्के आणि इतराच्या विनोदाचा विषय ही. असो.
याच गुणामुळे सार्वजनिक कामातही अर्थातच सावरकरांचे सर्व व्यवहार चोख आणि सचोटीचे होते.
सावरकर सदन हे राहते घर आणि थोडीशी रोकड, पत्नी, सुनांचे काही स्त्रीधन (दागिने) आणि किरकोळ गुंतवणुकी सोडल्या तर सावरकरांची स्वत:ची अशी कोणतीही मोठी इस्टेट वयाच्या अंतिम ८३ व्ह्या वयापर्यंत होऊ शकली नाही. आपल्या मुलाबाळांसाठी फार मोठी मालमत्ता त्यांना जमवता आली नाही वा मागे ठेवता आली नाही. सर्वसाधारण खाऊन पिऊन सुखी असलेले मध्यम वर्गिय़ कुटुंब इतकीच त्यांच्या हयातीत व मृत्युसमयीची आर्थिक परिस्थिती होती. त्यांच्या समग्र सावरकर साहित्यात छापल्या गेलेल्या मृत्युपत्रात त्यांनी वाटप केलेल्या संपत्तीवरुन एक सर्वसामान्य मध्यमवर्गिय ही त्यांची स्थिती सहजच कळुन येते.
तर, बाळाराव सावरकरांचे ओळखीचे, नात्यातले व सावरकरांच्या आसपासचे लोक म्हणत, बाळ तु कशाला सावरकरांकडे नोकरी करतोस? याच वेळासाठी तुला अन्यत्र चांगला पैसा देणारी नोकरी मिळू शकते. सावरकर कंजुस आहेत तुला येथे काही भवितव्य नाही, पैसा मिळणार नाही. बाळाराव उत्तर देत मी सावरकरांकडे आदरापोटी येतो, पैशासाठी येतच नाही.
त्याव्यतिरिक्त बाळाराव प्र.के.अत्रे यांच्याकडे "मराठा"त पत्रकार म्हणून काम करत. बाळारावांनी मला सांगितले की मराठातल्या कामाची वेळ आणि सावरकरांनी काही बोलावणे आले तर सावरकरांचे काम आधी करायचे नंतर मराठा चे असे अत्र्यांनी त्यांना कायमचे सांगुन ठेवले होते. सावरकरांचे बोलावणे आले आहे म्हटल्यावर अत्रे त्यांना कधीच अडवत नसत, लगेच सुट्टी देत असत. बाळारावांनी स्वत:चे अपुरे शिक्षण रात्रशाळेत शिकुन पुर्ण केले.
अशा प्रकारे बाळारावांनी सावरकरांचे काम सोळा वर्षे विनामूल्य केले. आजुबाजुचे विघ्नसंतोषी लोक नाना तोंडांनी बोलत, बाळारावांना हसत, पण बाळारावांनी निष्ठा सोडली नाही.
१९६६ मध्ये सावरकर गेले. मृत्युपत्रात त्यांनी आपल्या लेखनाचे सर्व अधिकार स्वत:च्या मुलांबाळांच्या नावे नाही, तर बाळारावांच्या नावे केले. त्या पुस्तकांच्या विक्रीतून होणारे उत्पन्न, मानधन सर्व बाळारावांना मिळत असे. बाळारावांनी "वीर सावरकर प्रकाशन" हि संस्था काढुन पुढचे सर्व आयुष्य सावरकरांच्या पुस्तकांचे प्रकाशन , प्रचार व विक्री यात घालवले. या विक्रीतून आलेल्या पैशांवरच त्यांचा संसार , उपजिविका आणि सार्वजनिक कामं चालत होती.
हे सर्व सांगुन बाळारावांनी मला विचारले, आता मला सांग शेखर, तात्यांनी मला काही मोबदला दिला का मोफत काम कम करुन घेतल?
© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...