Wednesday, September 23, 2009

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...

.
लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळे , नागवेकर व सहकारी यांनी गायलेले हे काव्य ऐकताना मनात एक शांत भाव दाटुन येतो. या गाण्याचे शब्द मला ऐकु येतात ते असे,
.
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळेही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळामोती येतावळी काळी वो माय... ॥ धृ ॥
मी काळी, कांचोळी काळी
कासकासोनि ते काळी वो माय
बुंथ काळी ... ॥ १ ॥
एकली पाण्याला, नव जाय साजणी
सवे पाठवा मुर्ती सावळी वो माय
बुंथ काळी... ॥ २ ॥
विष्णुदासनाम्याची, स्वामिनी काळी
कृष्णमूर्ती बहु काळी वो माय
बुंथ काळी.... ॥ ३ ॥.
विष्णुदासनामा हे एकनाथांच्या काळचे ! संत नामदेव महाराज वेगळे !! विष्णुदास म्हणजे विठ्ठलाचे दास. कृष्णाचे काळे रुप संतांना प्रिय होते. काळा रंग म्हणजे सर्व रंगांचे एकत्रीकरण. डांबर काळे असते त्यापासून सर्व रंग निर्माण करतात. सर्व मूळ रंग एकत्र केले की पुन: काळा रंग तयार होतो. यमुनेचे जळ काळे, घागर काळी. जे आणायचे ते काळे ज्यातून आणायचे ते काळे, जो आणतो आहे तोही आता काळाच. आता एवढे झाल्यावर वरपांगी रुप तरी वेगळे कशाला? त्यामुळे वस्त्रे ,अलंकार हे ही सर्व काळेच भासत आहेत. असे असताना परत ‘एकले न जाता मुर्ती दुजी’ बरोबर कशाला? त्याचे कारण जरी सर्वत्र एक रंग झाला तरी भक्तिचा आनंद हवा असेल तर पुन: द्वैत हवेच. या साजणीने कृष्णाला नव्यानेच समर्पित केले आहे. त्याच्या बरोबर एकरुपता असली तरी त्याला सतत बरोबर तर ठेवायचे आहे.. मुंगी स्वत: साखर झाली तर तिला साखरेची गोडी कशी कळणार म्हणून साखरेपासून भिन्न अशी मुंगी होऊन साखर खाण्याचा आनंद ही हवा आहे. काळ्या फळ्यावर काळ्या खडूची रेषा कधी दिसेल का? म्हणून काळ्या रंगावर पांढरा खडू उत्तम. मनात अद्वैताची भावना राखायची पण बाह्यत: मात्र द्वैत ठेवायचे. मुर्ती बरोबर घ्यायची. अद्वैतातून विष्णुदासनामा विशिष्टाद्वैताकडे वळतात पुन:!
.
या विठ्ठलाचे दुसरे नाव पांडुरंग ! म्हणजे पंढुर रंगाचा किंवा श्वेत वर्णी. पांढऱ्या वर्णातही सर्व रंग असतातच. काळा व श्वेत असे दोन विरुद्ध रंग दिसले तरी गुणात्मकरित्या दोन्ही एकसारखेच.
.
ईश्वराशी एकरुप झाल्याची अनुभूती असलेले बरेच संतकाव्य आहे. ‘अवघा रंग एक झाला’ किंवा ‘पाया पडु गेले तव पाऊलचि ना दिसे...समोर की पाठीमोरा न कळे’ हि काही मोजकी उदाहरणे. हे सर्व संत प्रत्यक्षानुभूतीने जगले आपण केवळ शब्दालंकारांचे धनी !

6 comments:

क्रांति said...

khoop surekh gane upalabdh karun dilyabaddal dhanyvad! apla rasagrahanatmak lekh pan avadala.

vrinda said...

खुप सुन्दर !!! हे गाणं मागच्याच आठवड्यात रेडियो वर ऐकले. मला काहीच शब्द कळले नव्हते. इथं वाचल्यावर अर्थ आणि शब्द कळले. आभारी आहे !!
वृंदा परांजपे

Asha Joglekar said...

बुंथ कि गुंज . गुंज एकी कडून काळी असते . बुंथ म्हणजे मला माहीत नाही काय ते ।

HAREKRISHNAJI said...

http://www.harekrishnaji.blogspot.in/#!http://harekrishnaji.blogspot.com/2010/09/blog-post_23.html

UV Sat said...

हा शब्द 'गुंथ' असू शकतो. ज्ञानेश्वरांच्या "खोळ गुंथी घेऊनी खुणाची पालवी" ह्यातील 'गुंथी' चा अर्थ शेवाळकरांनी कपाळावर लावलेले गंध असा सांगितला अाहे.

Unknown said...

मला पण "गुंथ" वाटायचे पण ते बुंथ ऐकू एते UV Sat प्रमाणे गंध म्हणून आणि बिलवर म्हणजे आरसा धरले तर अर्थ जुळतो , पण बुंथ (ओढणी ) आणि त्याला जडवलेले बिलवर जास्त भावतात . मोत्याची एकावली असे मला वाटायचे ,पण एतावली म्हणजे काय ?
कासे कासोनी नाही तर कासे कासोले ते काळी ओ माय, असावे असे वाटते .

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...