Wednesday, September 23, 2009

सांख्य मतं आणि आधुनिक विज्ञान

सांख्य मतं आणि आधुनिक विज्ञान - सॄष्टी रचनेविषयी एक तुलना
.
सांख्याची सृष्टी आरंभ आणि रचनेविषयी मतं आणि आधुनिक विज्ञानाशी तुलना करण्याच्या या प्रयत्नाचा उद्देश प्राचीन ॠषींना सर्व आधुनिक विज्ञान माहीत होते असे म्हणण्याचा अजिबात नाही हे आरंभिच स्पष्ट करतो. विज्ञान अधिक व्यापक आहे व ते अधिकाधीक प्रगत होत जाणार आहे. अनेक साधनांची उपलब्धता या प्रगतीला वेगवान करणार आहे. पण आपणास आश्चर्य वाटावयास लावतं ते हे की जड साधनांची कमतरता असतानाही आपल्या प्राचीन ॠषीं आणि तत्वज्ञांनी केवळ पंचेंद्रीयांच्या सहाय्याने पण आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर सॄष्टीच्या उत्पत्ती व रचनेविषयी जी मांडणी केली ती आधुनिक शास्त्रांच्या बरीच जवळ येऊन पोचते.
.
उदाहरण म्हणून सांख्यांचा सत्कार्य वाद व त्यावर आधारीत असलेली सॄष्टीरचना व उत्पत्तीची मांडणी आणि आजच्या विज्ञानातील अणुरचना ,मूलद्रव्ये व त्यातून अनेकविध रूपात निर्माण झालेली सॄष्टी यांची तुलना मनोरंजक ठरेल. सांख्यांचा मूल सिद्धांत असा आहे की या सॄष्टीत नविन असे काहीही उत्पन्न होत नाही.कारण अभावापासून म्हण्जे शून्यापासून फक्त अभाव किंवा शून्यच उत्पन्न होऊ शकेल .म्हणून जगात दिसणार्‍या,उत्पन्न झालेल्या वस्तूंत म्हणजे कार्यात जे गुण दिसतात ते मूळ कारणात अस्तित्वात असल्याच पाहिजेत.हे मत निश्चितपणे न्यायशास्त्राची पुढची पायरी आहे.कारण नैयायिकांच्या मते एका पदार्थाचा नाश होऊन अन्य पदार्थ निर्माण होतो. उदा.बीजाचा नाश होऊन अंकुर आणि अंकुराचा नाश होऊन झाड तयार होते.पण सांख्य मताप्रमाणे अस होत नसून मूळ बिजात असलेल्या द्रव्यांचा हवा आणि पाणि यांच्या संयोगातून अंकुर तयार होतो. शेंगदाण्यातून तेल निघते वाळूतून तेल निघत नाही.याचा अर्थ कारणात असलेले गुणच कार्यात दिसतात,स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत. थॊडक्यात कार्यात जे काही गुण दिसतात ते मूळ कारणातही कोणत्या ना कोणत्या रूपात असलेच पाहीजेत यासच सत्कार्यवाद असं म्हणतात. अर्वाचीन विज्ञानातही कोणत्याही पदार्थाची कितीही रूपांतर झाली तरी सर्व सॄष्टीतील एकंदर द्रव्ये आणि कर्मशक्ती यांची बेरीज कायम राहते.उदा. ऊदबत्तीच जे वजन असत ते ती जळल्यावर राख आणि धुर आणि अन्य सूक्षद्रव्य यांच्या एकत्रित वजना समानच रहात. या मूळ वस्तुमानाच्या सिद्धांताशी सांख्यांचा सत्कार्यवाद मिळताजुळता आहे. हा सत्कार्यवाद सिद्ध झाला असता सॄष्टी शून्यातून निर्माण झाली हा सिद्धांत आपोआपच नष्ट होतो.आज सॄष्टी ज्या अनंत रूपात विकसित झाली आहे त्यामध्ये विविध रूप गुण आकार आहेत पण सत्कार्यवादाप्रमाणे हे सर्व पदार्थ एकाच मूळ द्रव्यापासून विकसित झाले आहेत. वैषेशिकांनीही परमाणू हे जगाचे कारण मानलं पण त्यांना अणूचे द्वयणूक,त्र्यणूक कसे झाले ते सांगता आले नाही. आधुनिक रसायनशास्त्राने शस्त्रशुद्ध पॄथक्करणातून शंभराहून अधिक मूलद्रव्ये शोधून काढली आहेत पण या सर्व मूलद्रव्यांचीही मूळ एकाचएक पदार्थातून निर्मिती झाली असा सिद्धांत आहे. मात्र या सर्व पदार्थातील मूलद्रव्य जरी एकच असलं तरी यात गुण मात्र एकच नसणार कारण सत्कार्यवादाप्रमाणे एकाच गुणापासून भिन्न गुण निर्माण होणे शक्य नाही.पदार्थातील मूलद्रव्य एकच असले तरी विविध गुण आकार ,गंध,काठीण्य एकाच हे एकाच गुणातून निर्माण होणे शक्य नाही. म्हणून सांख्यांनी या एकाच द्रव्याला म्हणजेच प्रकॄती मध्ये तीन गुणांची सिद्धता केली.कारण कोणताही पदार्थ हा अशुध्दतेतून शुद्धावस्थेकडे ,अपूर्णतेतून पूर्णतेकडे जात असतो.तेव्हा तम आणि सत्व हे दोन गुण सिद्ध झाले.तमाकडून सत्वाकडे जाण्याच्या संक्रमणावस्थेतील रज हा गुण सिद्ध होतो.अशा रितीने एकाच पदार्थाची आणि त्रिगुणात्मक प्रकॄतीची सिद्धता झाली. सॄष्टी आरंभापूर्वी हे तीन गुण साम्यावस्थेत असतात. या त्रिगुणात्मक प्रकॄतीतील गुणांत असमानता येऊ लागली की सॄष्टीच्या आरंभाला सुरूवात होऊन विविध रूपं आणि गुणयुक्त पदार्थ आकारात येऊ लागतात.सॄष्टीच्या विनाशानंतर हे गुण पुन्हा साम्यावस्थेत येतात असा सांख्यांचा सिद्धांत आहे.सर्व पदार्थांत सत्व,रज आणि तम गुणांचे मिश्रण असतेच.त्यांच्या मिश्रणाचे प्रमाण जसे जसे भिन्न प्रमाणात होते तसे तसे नवे नवे पदार्थ आणि गुण दॄष्टीस पडू लागतात जे मूलत: एकाच पदार्थातून आणि तीन गुणांतून निर्माण होत असतात.
.
सांख्यांच्या या सॄष्टीरचनेविषयक माहितीनंतर आपण आधुनिक रसायन शास्त्राकडे लक्ष देऊ. अणु किंवा ऍटम हा रसायन शास्त्राचा पाया आहे. रसायन शास्त्राचाच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचा पाया आहे.रसायन शास्त्राने सूक्ष्म अभ्यास करून अणुची रचना कशी असते ते शोधून काढले. अणु हा मूळ पायाभूत तीन घटकांनी बनलेला असतो. ते घटक म्हणजे न्युट्रॉन्स,प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स! हे तीनही घटक सांख्यांनी सिद्ध केलेल्या त्रिगुणांप्रमाणेच तीन भिन्न गुणांचे बनलेले आहेत.इलेक्ट्रॉन्स हे ॠण विद्युतभारीत,प्रोटॉन्स हे धन विद्युतभारीत तर न्युट्रॉन्स हे कोणत्याही विद्युत भारविरहीत असतात.शास्त्रज्ञांनी जी शंभराहून अधिक मूलद्रव्ये शोधून काढली,ती एका विशिष्ट चौकटीत मांडली जिला पिरीऑडीक टेबल म्हणतात.त्याची मांडणी अशी आहे की त्यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूतील प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्या संख्येत असमानता आहे.ही असमानताच या मूलद्रव्यांच्या वेगळेपणाला कारणीभूत झाली आहे. प्रत्येक अणू हा स्थिर होण्याची धडपड करत असतो.जेव्हा प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स समसंख्येत असतात तेव्हा तो अणू धन आणि ॠण विद्युतभारविरहीत होऊन स्थिर होतो. यावरून असं दिसतं की न्युट्रॉन जो भाररहीत आहे,तो सांख्यांच्या सत्व गुणाशी साधर्म्य दाखवतो. इलेक्ट्रॉन जो सतत चंचल आहे आणि अणुकेंद्रातील न्युट्रॉन्स आणि प्रोटॉन्सच्या भोवती कक्षेत पण कोणत्याही दिशेत फिरतो तो तमोगुणाशी सारखेपणा दाखवतो तर प्रोटॉन जो धनभारीत आहे तो रजोगुणाशी संबंध दाखवतो. थोडक्यात या तिघांची अणुतील अंतर्गत समसंख्या अणुला स्थिर बनवते. हि संख्या विषम झाली तर इतर अस्थिर अणुंशी बॉन्डींग करून नव्या भासणार्या गुणांचा रूपांतरीत नवा पदार्थ तयार करते.उदा.सोडीयम क्लोराइड . एकाच मूलद्रव्यातील अणूरचनेतील प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स ची असमान संख्या भिन्न भिन्न मूलद्रव्ये तयार करते. न्युक्लीअर केमिस्ट्री अजूनही सूक्ष्म आहे.जसे हायड्रोजन च्या अणूची भिन्न रचना किंवा ऍन्टी मॅटर्स हे अपवाद.पण या अपवादांशी आपल्याला आत्ता कर्तव्य नाही.विज्ञान अजूनही प्रगत होईल आणि नवनवे निष्कर्षही निघतील.पण कोणतीही सूक्ष्मदर्शका सारखी भौतिक साधन नसतानाही भारतीय तत्वज्ञांनी केवळ बुद्धिच्या आणि प्रतिभेच्या बळावर न्युक्लिअर केमिस्ट्रितील तत्वांशी मोठया प्रमाणात मिळताजुळता सिद्धांत मांडला होता तोही उण्यापुर्या ३००० वर्षांपूर्वी. त्याचप्रमाणे विज्ञान हे जडाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे तर सांख्य किंवा तत्वज्ञानं ही जडापलिकडील तत्वांचा शोध घेणारी असल्यानं जडाचा अभ्यास हा दुय्यम स्वरूपात आला आहे.
.
प्रथम प्रकाशन
मनशक्ती डिसेंबर २००८

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...