Thursday, April 13, 2017

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन दिला.
लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे.
पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले.
आपल्या घरात एका पुर्वास्पृश्य मुलीला स्वातंत्र्यवीरांनी स्वत:च्या मुलीप्रमाणे संगोपन करुन तिचे पालन पोषण केले. रत्नागिरीतल्या शाळांत अचानक पणे जाऊन सर्व स्पृष्यास्पृश्य मुलांना सरमिसळ बसवले का नही ते पहात. व त्यात कुचराई करणाऱ्या सवर्ण शिक्षकांविरुध्द तक्रार करुन त्यांच्यावर कारवाई करवुन आणत. लहानपणापासुन असे सरमिसळ बसवले नाही तर नव्या पिढ्यांच्या मनातली अस्पृश्यतेची भावना कदापि जाणार नाही असे सांगुन त्यांनी हे घडते का नाही यावर खूप कटाक्ष ठेवला. पुर्वास्पृश्यांना स्तोत्रे शिकवणे, जानवी देणे हे तर या कार्यक्रमाचा भाग होतेच. रत्नागिरीत मंदिरे सर्व हिंदुंना उघडुन देण्यात त्यांचा भर होताच. या शिवाय सर्व हिंदुंना अगदी गाभाऱ्यापर्यंत प्रवेश असेल असे पतितपावन मंदिरही त्यांनी बांधवले.
अस्पृश्य वस्तीत जाऊन चहा फराळ चे कार्यक्रम, हळदिकुंकुवाला पुर्वास्पृष्य वस्तीतील स्त्रियांना घरी बोलावुन आपल्या पत्नीच्या हस्ते सौभाग्यवाण देण हि कार्ये सावरकर करत, समस्त सनातनी मंडळी अगदी संतापुन गेली होती, अनेक खेकटी ते उभी करुन शासनाकडे तक्रारी करत. पण स्वातंत्र्यवीर डगमगणाऱ्यातले नव्हते. त्यांच्या स्थानबध्दतेच्या काळात रत्नागिरीत जी क्रांतीकारी समाजसुधारणा झाली त्याने अनेक पुढारी विस्मय चकित झाले. थक्क होऊन गेले. त्यांच्या कार्याचे महत्व जाणणाऱ्यात महर्षी वि.रा.शिंदे, कोल्हापुरचे क्षात्र जगत गुरु , शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच जण होते.
हे सर्व वचुन जितक्या पटकन संपते त्याच्या कित्येक पट जिकिरीचे आणि कटकटीचे काम होते. प्रचंड विरोध सोसत , नेटाने हे काम सावरकर करत असत. सावरकरांचे समाजकार्य म्हणजे वातानुकुल खोलित बसून केलेले लिखाण नसून गोरगरिब पुर्वास्पृश्य बांधवात प्रत्यक्ष मिसळुन त्यांच्या पाठिवर मायेचा हात फिरवत केलेल काम होते. यास म्हणतात कर्ते सुधारक, आधी केले मग सांगितले.
या आणि अशा अजुन अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आणि आदर्श ठेवण्यासारख्या व कालानुरुप आचरणात आणण्यासारख्या आहेत. समाजसुधारणेचे हे व्रत अखंड तेरा वर्षे रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात सुरु होते.
Image may contain: 3 people
Kirtan by person from
पतितपावन मंदिर ,ex-untouchable community, a milestone in social
reform, Patitpavan Mandir, Ratnagiri, 1932
 — at Patitpavan Mandir, Ratnagiri, 1932.

Image may contain: 8 people
मालवणची पूर्वास्पृश्य परिषद इ.स.१९२९ अध्यक्ष स्वा.वीर सावरकर :- पूर्वास्पृश्यांना यज्ञोपवित धारण विधी, मागे सावरकरांच्या कल्पनेतून साकारलेला कुंडलिनी कृपाणांकित हिंदूध्वज


Wednesday, April 12, 2017

सावरकर आणि राजकिय पक्ष

हिंदुमहासभा प्रवेश हा सावरकरांच्या चरित्रातला केवळ एक टप्पा होता. केवळ अन्य चांगला पर्याय नसल्याने ते निरुपायाने हिंदुमहासभेत गेले, आणि तीवर आपला इतका मोठा ठसा उमटवला की सावरकर आणि हिंदुमहासभा हे अद्वैत वाटु लागले. सन १९३८ ते सन १९४३ अशा केवळ सहा वर्षांच्या कारकिर्दित एका लहानशा मृतप्राय पक्षाला अत्यंत बलाढ्य अशा आणि १८८५ ते १९३८ अशा साठ वर्षे आधीच तळागाळात पोचलेल्या कॉंग्रेसारख्या, सर्व प्रकारची साधनसामुग्री व संपत्ती असलेल्या राजकिय पक्षाला, तो पर्यंतच्या आयुष्यात जी काय लोकप्रियता मिळाली ती पणाला लावुन आव्हान देण्याचा प्रयत्न करणे हाच मोठा भीमपराक्रम होता. सावरकरांच्या जागी सर्वसामान्य खचलेला नेता असता तर कॉंग्रेस ला आणि गांधी-नेहरु जोडगोळीला शरण जाऊन कॉंग्रेसमध्ये जाऊन लोकप्रियतेचा स्वस्त मार्ग निवडुन, स्वत:च्या तत्वांशी तडजोड करुन पैसा, मानमरातब व सत्ता मिळवता झाला असता. पण लोकहितासाठी लोकप्रियतेचा मी बळी देतोय अस स्पष्ट सांगुनच त्यांनी आपले मार्ग निवडले.
सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे अशी अपेक्षा सुभाषचंद्र बोस यांच्या सह अनेकांनी जाहिर पणे व्यक्त केली. परंतु कॉंग्रेस हि निर्भेळ राष्ट्रवादी नसल्याने, हिंदुत्व या मुद्द्यावर कॉंग्रेसशी मतभेद असल्याने व गांधींच्या अहिंसा , ब्रह्मचर्य , मुस्लिम तुष्टीकरण या गांधीगोंधळात फसलेल्या कॉंग्रेसमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही हे सावरकरांनी स्पष्ट केले. 
Image may contain: text
आधी लोकशाही स्वराज्य पक्षात व नंतर हिंदुमहासभा या पक्षात सावरकरांनी प्रवेश केला. सावरकर  कॉंग्रेसमध्ये येतील हि अपेक्षा ठेऊन सुरुवातीला त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करणारी कॉंग्रेस सावरकर कॉंग्रेस मध्ये येत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर त्यांचा निषेध करु लागली. केवळ सत्कारावर बहिष्कार एवढेच स्वरुप न राहता सत्कार सभा उधळुन लावणे, सभांवर चिखलफेक करणे, दगडफेक करणे इ. प्रकार त्यांनी सुरु केले.
No automatic alt text available.
सोलापुरात तर याचा कडेलोट होऊन सावरकरांचा सत्कार करणाऱ्यांवर हल्ले केले गेले , काहींची डोकी फुटली सुमारे १८-२० कॉंंग्रेसी अहिंसक (!) गुंडांना अटक होऊन शिक्षा झाल्या.
पुढे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर लखनौ येथे सावरकर त्यांच्याबरोबर अंदमानात असलेल्या काकोरी कटातले प्रमुख क्रांतीकारक श्री. शचिंद्रनाथ संन्याल यांना भेटले. त्यावेळी समाजवादी गटाचे नेते आचार्य नरेंद्र देव हे सुध्दा सावरकरांना भेटण्यास आले. त्यांनी सवरकरांना प्रश्न केला कि आज हिंदुसभेत तालुकदार, धनिक हे प्रामुख्याने असताना महासभेला प्रगतीकारक संस्था बनवण्याचा तुमचा हेतु कसा साध्य होणार? यास सावरकरांनी उत्तर दिले, "मी नुकताच हिंदुसभेत आलो आहे.येताक्षणीच महासभेचे ध्येय बदलुन पुर्ण स्वातंत्र्याचे ध्येय करवले. पुढे मी काय करतो ते आपण धीर धरा आणि पहा. महासभा पुर्ण पालटुन तिला प्रगत आणि जिवंत करण्याचा माझा संकल्प आहे."
याच महासभेत पुढे बॅ. निर्मलचंद्र चटर्जी व श्यामाप्रसाद मुखर्जी यांना सामिल करुन घेण्यात सावरकरांना यश आले. आशुतोष लाहिरी, भाई परमानंद, राशबेहारी बोस या क्रांतीकारकांना सुध्दा हिंदुमहासभेत आवरकरांनी आणले. एका मृतप्राय अशा राजकिय संस्थेला केवळ सहा वर्षात , अपुरी साधनांनिशी एक लहानसा का होईना पण हिंदुंहिताचा दबावगट म्हणून उभे करण्यात सावरकरांना यश आले. 
सावरकर १९३८ ते १९४३ अध्यक्ष राहून दैनंदिन सक्रिय राजकारणातून प्रकृतीच्या कारणाने निवृत्त झाले. स्वातंत्र्यानंतर मात्र हिंदुत्व, हिंदुहित वा हिंदु हा शब्दच नको इ. प्रकारच्या सावरकरांबरोबरच्या मतभेदातून हिंदुमहासभेचे अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी गोळवलकरांबरोबर हातमिळवणी करुन १९५१ साली हिंदुमहासभेतून फुटुन बाहेर पडुन जनसंघ हा स्वतंत्र पक्ष सुरु केला. हा पक्ष १९७७ पर्यंत अस्तित्वात राहिला तो फारसा मोठा झाला नाही पण संघाचा सक्रिय पाठिंबा असल्याने क्रमाक्रमाने कॉंग्रेस ऐवजी फक्त हिंदुमहासभेचीच जागा व्यापत गेला. १९५१ च्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत हिंदुमहासभेचे चार , जनसंघाचे तीन आणि रामराज्यपरिषद या अन्य एका हिंदुत्ववादी पक्षाचे तीन असे एकुण दहा खासदार हिंदु पक्षाचे होते. तर कॉंग्रेसचे तीनशे चौसष्ट खासदार होते.
१९७१ सालापर्यंत हिंदुमहासभेची जागा संपुर्णपणे व्यापुन व अन्य काही हिंदुत्ववादी नसलेल्या पक्षांशी आघाडी करुन जनसंघाची खासदार संख्या बावीस या अंकापर्यंत पोचु शकले होते.तर कॉंग्रेस खासदारांची संख्या तीनशे बावन्न होती. हिंदुमहासभेचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले.
१९७७ साली जनसंघ जनता पक्षात विलिन झाला. १९८४ ला भारतीय जनसंघाने गांधीवादी समाजवाद या नावाने दोन खासदार या संख्येवर नव्याने सुरुवात केली.एकुण हिंदुमहासभा नष्ट झाल्याचा आनंद जर संघपरिवाराला मिळत असेल ती १९८९ पर्यंत संघाने राजकारणात फार काही प्रगती केली अस मानता येत नाही. हिंदु शब्दाचा त्याग करुन मुसलमानांची मते मिळवण्यासाठी हिंदुसभा मोडीत काढून जनसंघ स्थापन करुन राजकारण करणाऱ्या संघपरिवाराला आधी गंगाजल आणि नंतर रामजन्मभूमि आंदोलनाचाच आधार घ्यावा लागला हा इतिहास आहे. गांधीवादी समाजवाद व नंतर एकात्मिक मानवतावाद हे भाजपाचे मधले दोन टप्पे.
१९२५ पासुन एवढी मोठी संघटना असलेल्या रा.स्व. संघाला १९५१ ते १९९१ अशा चाळीस वर्षात मिळालेले हे प्रचंड (?) यश आणि केवळ सहा वर्ष निव्वळ स्वत:च्या वैयक्तिक करिष्म्यावर मृतवत हिंदुसभेला उभे करण्यातले सावरकरांचे अपयश (?) यात कोणाला आनंद वाटत असेल तर ते तसा मानण्यास स्वतंत्र आहेत.
© चंद्रशेखर साने
Image may contain: textNo automatic alt text available.

No automatic alt text available.

हिंदुत्ववाद आणि हिंदुधर्मवाद

हिंदुत्व हि राजकीय आणि इहवादी संकल्पना आहे. हिंदुत्व आणि हिंदुधर्म अथवा हिंदुइझम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोहत्याबंदी हिंदुधर्माचा भाग असू शकेल मात्र हिंदुत्वाचा तो भाग नाही. हिंदुधर्माच्या अभिमानात कदाचीत गोहत्या, मुर्तीपुजा, आरती, जन्म पुनर्जन्म, उपासना येत असेल, हिंदुत्वाच्या अभिमानासाठी मात्र या गोष्टी पाळण्याची अट लागु नाही. एखादा बुध्दीवादी किंवा नास्तिक सुध्दा हिंदुत्वाचा अभिमानी असू शकतो. हिंदु समाजाचे न्याय्य हक्क जोपासणे आणि ऐहिक हित जपण हाच हिंदुत्वाचा अर्थ आहे. पारलौकिक बाबींसाठी हिंदुत्व नाही. हिंदुधर्मातील मूल्यांची चिंता हिंदुत्व करत नाही, पण ज्या हिंदुंना हिंदुधर्मातील मूल्ये पाळायची इच्छा असेल आणि जर अन्य लोकांकडून त्यावर आक्रमण होत असेल आणि ते नैसर्गिक हक्कांवर आक्रमण असेल तर तिथे हिंदुत्व नक्कीच दखल घेते.
हिंदु धर्म व हिंदुत्व यातील शब्दसाधर्म्यामुळे खूप घोळ झालेत. अगदी न रुचणार सांगायचे तर संघ व गांधी यांच्यात समानता आहे तिचे नाव हिंदु धर्माचा अभिमान हे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हा हिंदुसमाजाचा स्वाभिमान व इहवादी दृष्टीकोन आहे.
संघाला गांधींचे हिंदुपण सावरकरांच्या हिंदु पणा पेक्षा जास्त जवळ वाटत. मुस्लीमांचे तुष्टीकरण हा भाग सोडला तर गांधीजींचे रामराज्य, गोरक्षण, स्वदेशीे संघाला मान्य आहे. गांधी आणि सावरकर दोन्ही स्वदेशी चे पुरस्कर्ते पण सावरकरांचे स्वदेशीला यंत्रयुगाचा स्वीकार मान्य आहे तर गांधींच स्वदेशी यंत्रयुगाचा धिक्कार आणि मानवी श्रम वापरण्यावर भर देत. संघ स्वदेशीचा पुरस्कार करणारी शाखा उघडतो पण प्रत्यक्ष सत्तेत मात्र जागतिकीकरणालाच महत्व देतोय, तिथे तो गांधींपासून लांब गेलाय.
सावरकरांची पारतंत्र्यातली सशस्त्र क्रांती व समर्थ भारत हे संघाला तत्वत: मान्य आहे, पण संघ संघश: सशस्त्र क्रांतीत पण नव्हता आणि सत्याग्रहात पण नव्हता. संघ स्वयंसेवक वैयक्तिक रित्या स्वातंत्र्य लढ्यात असतील ते असतील.
सत्याग्रह , अहिंसेचा अतिरेक याविषयी संघ गांधींपासून दुर आहे.
दोन्ही बाजूंनी जे जे रुचेल ते ते घेतल जात. जे संघाच तेच इतरांच, एरवी सावरकर या नावाचा द्वेष करणारे सावरकरांचा बुध्दीवाद आणि गायीविषयीची भूमिका हटकुन संघपरीवाराच्या तोंडावर मारतात. इथे सावरकरांच नाव घेणारे सावरकरांच हिंदुत्व सुध्दा इहवादी आणि बुध्दीवादी आहे हे सोयीस्कर पणे विसरतात. दोन्ही बाजू विविध विचारसरणीच्या लोआकांच्या मार्गदर्सनातील आपल्या मूळ मूळ प्रेरणेला आणि राजकारणाला अनुकूल अशा गोष्टींचा फक्त स्वीकार करत असतो. इतर गोष्टींवर मौन बाळगण पसंत करतो.
सारांशाने व स्थुलमानाने जिथे जिथे हिंदुधर्माच्या अंतर्गत प्रश्न येतात तिथे तिथे संघ हा सनातनी गांधींच्या जवळ जातो आणि जिथे जिथे हिंदुधर्माबाहेरच्यांशी संवाद साधायचा मार्ग असतो वा हिंदुधर्माबाह्य राष्ट्रीय प्रश्न सोडवायचे असतात तिथे तिथे संघ सावरकरांच्या हिंदुत्वाच्या जवळ जातो.
© चंद्रशेखर साने

Sunday, April 9, 2017

सावरकरांचे अन्य क्रांतीकारकांशी संबंध व उत्तर प्रदेश दौरासावरकर ब्रिटीशांबरोबर झालेल्या तहातील सर्व अटींतुन मुक्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. राजकारणात त्यांच्या समवेत अंदमानातच जमठेपीची शिक्षा भगणारे भाई परमानंद व आशुतोष लाहीरी हिंदुमहासभेचेच राजकारण करण्यात सामिल झाले.
सेनापती बापट हे सुध्दा पुन: सावरकरांसमवेत काही सार्वजनिक कामात भाग घेत. त्यांनी हिंदुसभेत प्रत्यक्ष प्रवेश केला नाही तरी हिंदुसभेच्या लढ्यात ते भाग घेत असत.
राशबेहारी बोस यांनी सावरकरांशी पत्रव्यवहार सुरु ठेवला व त्यांच्या सुचनेवरुन जपान मध्ये हिंदुमहासभेची शाखा सुरु केली.

सावरकरांची मुक्तता झाल्यावर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. यावेळी सावरकर १८५७ च्या उठावातील क्रांतीकारकांपासून भगतसिंगा पर्यंत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व क्रांतीकारकांच्या नावाचा प्रकट उच्चार करुन लोकांना त्यांचा जयजयकार करन्यास उद्युक्त करत. आपल्या सहकारी, अनुयायी व अन्य क्रांतीकारकांवर सावरकर लेख लिहित व त्यांचा गौरव करीत. त्यातील काही लेखांचा संग्रह पुस्तक तेजस्वी तारे नावे प्रकशित आहे. थोडक्यात सावरकरांनी अन्य क्रांतीकारकांशी नंतर संबंध ठेवले नाहित वा अन्य क्रांतीकारकांनी सावरकरांशी संबंध ठेवले नाहीत हा काही लोकांचा केवळ अपप्रचार आहे.

राजकारणात आल्यावर लगेचच सावरकरांनी महाराष्ट्र आणि भारत भर दौरे केले.
यातील एक महत्वाचा दौरा उत्तर प्रदेश चा. १ एप्रिल १९३८ ला सावरकर उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर निघाले, तो सर्व वृत्तांत खूप मोठा आहे पण त्यातील काही ठळक घटना.
या दौऱ्यात सावरकरांनी त्यांच्या १८५७ चे सममर या जगभर गाजलेल्या ग्रंथात उल्लेख झालेली ठिकाणे म्हणजे झाशी, कानपुर, बिठुर इ. प्रत्यक्ष पाहिली.प्रत्येक ठिकाणी त्यांनी या वीरांना मौनाद्वारे श्रध्दांजली वाहिली तेव्हा वातावरण भारुन जात असे.
दि. ४ एप्रिल १९३८ ला सावरकर फैजाबाद ला पोचले. या ठिकाणि त्यांचा भव्य सत्कार झाला.फैजाबाद रेल्वे स्थानकापासुन त्यांची सजवलेल्या मार्गावरुन भव्य मिरवणुक निघाली.
मिरवणुकीची सांगता तेथील संस्कृत महाविद्यालयात झाली. तिथे त्यांना संस्कृत भाषेत मानपत्र देऊन गौरवण्यात आले. फैजाबाद मधली सभा संपवुन जात असतानाच अयोध्येचे पन्नास ब्राह्मण संस्कृत वेदमंत्रांचा घोष करत सावरकरांना सामोरे गेले व त्यांनी सावरकरांना रामजन्मभूमि पहाण्याचे आमंत्रण दिले. तथापि पुढचे कार्यक्रम आधीच ठरल्याने पुढील भेटीत रामजन्मभूमिला येण्याचे आश्वासन देउन सावरकर पुढील कार्यक्रमास निघाले. जर त्यांनी रामजन्मभूमिला भेट दिली असती तर आजच्या काळाच्या परिप्रेक्षात ती भेट नक्कीच संस्मरणीय ठरली असती.
यापुढे सावरकर लखनौ भेटीसाठी निघाले. त्यांना लखनौला नेण्यासाठी त्याअंच्या बरोबर लंडनला असलेले अभिनव भारताचे सदस्य व सावरक्रांचे अनुयायी प्रा. महेशचरणसिंग बाराबंकीला आले. यांना स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुले बराच त्य्रास झाला होता. तीस वर्षांनी होत आलेल्या भेटीमुळे दोघांचीही हृदये भरुन आली. लखनौच्या कान्यकुब्ज महाविद्यालयात नागरीक व विद्यर्थ्यांसमोर सावरकरांनी केलेल्या भाषणाने व मार्गदर्षनाने वातावरण भारुन गेले . इतके की कान्यकुब्ज महाविद्यालयाचे संस्थापक श्री. मिश्र यांनी तिथल्या तिथे हिंदुंसाठी सैनिकी महाविद्यालय सुरु करण्याचा संकल्प सोडला.


यानंतर लखनौ मध्ये सावरकरांची एक भव्य मिरवणुक निघाली. सावरकरांना आठ घोडे जुंपलेल्या घोडागाडित बसवुन गाडीपुढे शंभर शस्त्र व कृपाणधारी शीखांचे पथक सत श्री अकाल चा घोष करत पुढे चालत होते. मागोमाग वेदमंत्रांचा घोष करणारे ब्रह्मवृंद चालत होते. पाठोपाठ कुंडलिनी कृपाणांकित ध्वज धारी असे शंभर एक स्वयंसेवक, निरनिराळे कवायती करणारे आखाडे असा सगळा थाट होता. उत्साह प्रचंड असून सुमारे तीन मैलांच्या या मिरवणुकीय किमान एक लाख लोक दुतर्फा उभे होते.दि. ६ एप्रिलला सावरकर अंदमानात सहकष्टभोगी असलेले काकोरी कटातले प्रमुख क्रांतीकारक शचिंद्र नाथ संन्याल यांच्या घरी भेटीस गेले. त्यांच्या घरी सावरकरांना भेटण्यास समाजवादी गटाचे आचार्य नरेंद्र देव आले व समाजवाद्यांतर्फे तेथे सावरकरांचा सत्कार केला गेला.. या ठिकाणि राजकिय चर्चा होऊन हिंदु मुस्लिम प्रश्नाबाबत सावरकरांनी हिंदुमहासभेची भूमिका देव व संन्याल यांना समजाऊन दिली.याच दौर्यात सावरकरांची भेट गोविंद वल्लभ पंत आदी विविध पक्षांच्या नेत्यांशीही झाल्या. सर्वपक्षिय मतभेद बाजुला सारुन झालेला असा हा दौरा होता. सव पक्षांनी उत्तर प्रदेश च्या दौऱ्यात सावरकरांचा सन्मान व गौरव केला.यानंतर सावरकर आग्रा येथे ताजमहाल व आग्रयाचा गड पहाण्यास गेले. दिवाणे खास मध्ये शिवजी महाराजांनी औरंगजेबाला मारण्याचा डाव कसा होता हे सावरकरांनी उपस्थितांना प्रत्यक्ष अंतरे उभे राहुन दाखवला. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने लांब उभे केल्याने राजांचा डाव फसला अशी एक बाजु सांगितली जाते. सावरकरांनि प्रत्यक्ष तिथे उबे राहुण सर्वंच्या मन:चक्षुंपुढे चित्र उभे करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.हा दौरा अधिकाधीक गाजत गेल्याने येथुन सावरकरांना उ.प्र. मधील हरिद्वारादी ठिकाणांहुन सावरकरांना भेटीची व्याख्यानांची आमंत्रणे येऊ लगली परंतु या सात दिवसंच्या प्रवासाने सावरकर थकल्याने व चार दिवसांवरच मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष या नात्याने सहभाग व भाषण करावयाचे असल्याने सावरकर आग्र्याहुन ९ एप्रिलला परत मुंबईकडे रवाना झाले.

..............................


सावरकर कॉंग्रेसमध्ये का गेले नाहीत?

स्वातंत्र्य पुर्व काळात लंडनमध्ये असलेल्या भारतीयांमध्ये दोन तट पडले होते. यांच्यात वादविवाद होत असत. एका गटाचे नेते होते गांधी तर दुसऱ्याचे सावरकर. वादात ज्याची बाजू पटत असे त्याच्या बाजूने जमलेले तरुण जाऊन बसत. हे सर्व तरुण म्हणजे हिंदुस्थानातून उच्च शिक्षणासाठी आलेला बुध्दीमान तरुण वर्ग होता. त्यांच्या समोर बुवाबाजी व महात्मेगिरीची लटपटपंची चालणेच शक्य नव्हते. हळु हळु सावरकरांच्या बाजूला बसणाऱ्यांची संख्या वाढु लागली व एक दिवस असा आला की एका बाजूला गांधी एकटे व दुसऱ्या बाजूला सावरकर आणि त्यांच्या प्रभावळीतले तरुण. त्यानंतर गांधींनी इंडीया हाऊस मध्ये जाणे सोडले व "मारो काटो का पंथ" या नावे क्रांतीकारकांवर टिका करणारे एक राजनिष्ठ पुस्तक लिहिले. त्याच्या प्रस्तावनेत गांधी लिहितात, लंडनमधले इंडीया हाऊस मधले ब्रिटीशांविरुध्द पसरलेले विषारी वातावरण पाहुन मी दचकलो आणि तेथुन मागे फिरलो.
दुर्दैवाने पुढे सावरकर पकडले गेले आणि अभिनव भारत संस्था उध्द्वस्त झाली. सावरकरांना कठोरातली कठोर अशी काळ्या पाण्याची दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावली गेली.
अंदमानात ११ वर्षे व रत्नागिरीत तीन वर्षे असा तुरुंगवास सावरकरांना घडला.
नंतर सावरकर व ब्रिटीश सरकार यंच्यातील तहाद्वारे सावरकरांची पाच वर्षे राजकारणात भाग न घेण्याच्या व रत्नागिरी न सोडण्याच्या अटींवर त्यांना तुरुंगातुन मुक्त केले गेले. १९२४ ते १९३७ असा दिर्घ काळ रत्नागिरीत स्थानबध्द असा काळ व्यतित झाला. गुप्तहेर हे आयुष्यभर सावलीसारखे मागे होतेच.
रत्नगिरीतून सावरकरांची संपुर्ण मुक्तता झाल्यानंतर प्रथम लोकशाही स्वराज्य पक्षात व नंतर हिंदुमहासभेत गेले. त्यापुर्वी त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे असा आग्रह करणारे नेते होते सुभाषचंद्र बोस, वीर नरिमन, डॉ.ना.भा.खरे, सर मानवेंद्रनाथ रॉय इ.इ.
गांधीजींच्या नेतृत्वाखालील चाललेल्या गांधी गोंधळात सावरकरांनी दुरदृष्टीने न जाणेच पसंत केले.
यानंतर लवकरच हे सर्व वर उल्लेख केलेले व सावरकरांना कॉंग्रेस मध्ये या असा आग्रह करणारे हे नेते म्हणजे बोस, डॉ.खरे, रॉय व वीर नरिमन या सर्वांना शिस्तभंगाच्या नावे कॉंग्रेस मधुन निष्कासित केले गेले.
आपल्या आधी १९२० ते १९३७ अशी सतरा वर्षे प्रस्थापित झालेल्या गांधींच्या नेतृत्खावाली सावरकर रहाणे म्हणजे एका म्यानात दोन तलवारी सारखेच होऊन वरील नेत्यांप्रमाणेच सावरकरांचीही गत झाली असती हे उघड आहे.
कॉंग्रेस जर निर्भेळ राष्ट्रवादी असती तर मी कॉंग्रेस मध्येच गेलो असतो, पण ती तशी राहिली नाही व एक व्यक्ती एक मत या लोकशाही तत्ववार चालत नाही या कारणा मुळेच सावरकरांनी कायम कॉंग्रेसचा विरोध केला.

© चंद्रशेखर साने

Saturday, April 8, 2017

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सचिव बाळाराव

कै. बाळाराव उर्फ शांताराम शिवराम सावरकर हे १९५० ते १९६६ अशी सोळा वर्षे सावरकरांचे स्वीय सचिव ( Personal secretary) म्हणून काम पहात असत. बाळाराव सावरकर हे सावरकरांचे नात्यातले नव्हेत तर केवळ आडनाव बंधु, त्यांचे नाते गुरु शिष्याचे. बाळाराव हे चित्पावन नसून कऱ्हाडे ब्राह्मण होते.
स्वातंत्र्य वीर सावरकरांचे धाकटे बंधु बाळाराव उर्फ डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्याशी त्यांच्या नामसाधर्म्याची गल्लत करु नये.
बाळारावांची आणि माझी ओळख खूप पुर्वीपासुनची. सुमारे दहा वर्षे म्हणजे सन १९८६-८७ ते पुढे बाळाराव जाईपर्यंत ती टिकली. मी पुण्यात आल्यानंतर माझ्या कडे आल्याशिवाय बाळाराव पुण्यातून कधीच परस्पर परत गेले नाहीत. सावरकर साहित्याच्या निमित्ताने आमची गाढ ओळख व वयाने ते माझ्याहून खूपच मोठे असले तरी आमची मैत्रीही झाली.
त्यांच्या सावरकरांच्या सहवासातल्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळत. बऱ्याचशा त्यांनी पुस्तकात लिहुन ठेवल्याच आहेत.
बाळाराव सावरकरांचे काम करत मात्र त्या बदल्यात सावरकर बाळारावांना काहीही वेतन देत नसत. सावरकरांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी लोकांकडुन त्यांना काही रुपये कृतज्ञता निधी म्हणून अधुन मधुन मिळत असे. त्यांची सर्व मालमत्ता शासनाकडुन जप्त झाली होती ती त्यांना कधीच परत मिळाली नाही. उपजिविकेचे अन्य साधन नव्हते. त्यांना कृतज्ञता निधी म्हणून जो मिळाला तो रु. १४०००/- होता. हि रक्कम म्हणजे लाखो रुपये नव्हेत. त्याशिवाय अधुन मधुन रु. १००-२००/- ते रु. ५००/- चा निधी त्यांना अर्पण केला जाई. एकुणच टाटा , बिर्ला, आगाखान सारख्या भांडवलदारांशी वा श्रीमंतांशी फारसा घरोबा नसल्याने व वकिली करुन लाखो रु. मिळवून पार्ट टाईम राजकारण व समाजकारण करत नसल्याने आर्थिक परिस्थिती तत्कालिन सर्व नेत्यांशी तुलना करता यथातथाच राहिली. मात्र त्यांना लाखो रुपये मिळत नसले तरी स्वत:ची व कुटुंबाची उपजिविका करण्या इतपत रक्कम त्यांना समाजाकडुन नक्कीच मिळे. या पैशांतुनच त्यांनी मुंबईत स्वत:चे घर बांधल, आजही ते मुंबईत शिवाजी उद्यान, दादर परिसरात " सावरकर सदन" नावाने प्रसिध्द आहे.
सावरकर काटकसरी व हिशेबी स्वभावाचे असल्याने या पैशात एवढा स्वत:चा संसार व सार्वजनिक व्याप संभाळणे शक्य झाले. वैयक्तिक स्वार्थ किंवा पैसाअडका जमवायचा असता तर त्यांन रोखु शकणारे कोणीच नव्हते.
याच काळात सावरकरांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आपले खर्च आवरते घेतले. आधीचे सचिव श्री. अ.स.भिडे यांनी पगार वाढ मागितली असता ती सावरकरांनी नाकारली. भिडे यांना परवडणे शक्य नसल्याने त्यांनी त्यागपत्र दिले व स्वत:चे साप्ताहीक सुरु केले. अर्थात भिडे यांना सावरकर सदनच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या, मृत्युपत्रात त्या तशाच त्यांच्याकडे पुढे चालु राहिल्या. सावरकरांना तपकिर ओढायचा नाद / व्यसन होते. निवृत्तीच्या निर्णयानंतर त्यांनी कटाक्षाने हे व्यसन हळु हळु आटोक्यात आणून पुर्ण बंद केले. हिशेबीपणा आणि कुटुंबात एकमेकांशी सुध्दा कठोर आर्थिक शिस्त हा कदाचित कोकणस्थी गुण सावरकरांच्यात आला असावा. इतरांना जे विचित्र व्यवहार वाटतात ते कोकणस्थांच्यात सहजभावाने असु शकतात. असे कंजुष व हिशेबी असणारे कोकणस्थ समाजकार्यात सहज पणेच दानशूर असल्याचे आढळुन येतील.
अगदी माझे वैयक्तिक बोलायच तर मी किरकोळ कारणासाठी ५-५० रु. वडीलांना दिले तर ते मला मी नको नको म्हणत असतानही आवर्जुन परत करतातच. सक्तीने. मी एकुलता एक आहे आणि वाटीतल ताटात आणि ताटातल वाटीत अशी स्थिती असूनही हे असे आहे.
कित्येक व्यापारी समाजात, बाप मुलाला किंवा भावाला कर्ज देतो पण काटेकोर व्याज आकारुन. कोकणस्थात इतके टोक नसले तरी आर्थिक हिशेबाला कोकणस्थ पक्के आणि इतराच्या विनोदाचा विषय ही. असो.
याच गुणामुळे सार्वजनिक कामातही अर्थातच सावरकरांचे सर्व व्यवहार चोख आणि सचोटीचे होते.
सावरकर सदन हे राहते घर आणि थोडीशी रोकड, पत्नी, सुनांचे काही स्त्रीधन (दागिने) आणि किरकोळ गुंतवणुकी सोडल्या तर सावरकरांची स्वत:ची अशी कोणतीही मोठी इस्टेट वयाच्या अंतिम ८३ व्ह्या वयापर्यंत होऊ शकली नाही. आपल्या मुलाबाळांसाठी फार मोठी मालमत्ता त्यांना जमवता आली नाही वा मागे ठेवता आली नाही. सर्वसाधारण खाऊन पिऊन सुखी असलेले मध्यम वर्गिय़ कुटुंब इतकीच त्यांच्या हयातीत व मृत्युसमयीची आर्थिक परिस्थिती होती. त्यांच्या समग्र सावरकर साहित्यात छापल्या गेलेल्या मृत्युपत्रात त्यांनी वाटप केलेल्या संपत्तीवरुन एक सर्वसामान्य मध्यमवर्गिय ही त्यांची स्थिती सहजच कळुन येते.
तर, बाळाराव सावरकरांचे ओळखीचे, नात्यातले व सावरकरांच्या आसपासचे लोक म्हणत, बाळ तु कशाला सावरकरांकडे नोकरी करतोस? याच वेळासाठी तुला अन्यत्र चांगला पैसा देणारी नोकरी मिळू शकते. सावरकर कंजुस आहेत तुला येथे काही भवितव्य नाही, पैसा मिळणार नाही. बाळाराव उत्तर देत मी सावरकरांकडे आदरापोटी येतो, पैशासाठी येतच नाही.
त्याव्यतिरिक्त बाळाराव प्र.के.अत्रे यांच्याकडे "मराठा"त पत्रकार म्हणून काम करत. बाळारावांनी मला सांगितले की मराठातल्या कामाची वेळ आणि सावरकरांनी काही बोलावणे आले तर सावरकरांचे काम आधी करायचे नंतर मराठा चे असे अत्र्यांनी त्यांना कायमचे सांगुन ठेवले होते. सावरकरांचे बोलावणे आले आहे म्हटल्यावर अत्रे त्यांना कधीच अडवत नसत, लगेच सुट्टी देत असत. बाळारावांनी स्वत:चे अपुरे शिक्षण रात्रशाळेत शिकुन पुर्ण केले.
अशा प्रकारे बाळारावांनी सावरकरांचे काम सोळा वर्षे विनामूल्य केले. आजुबाजुचे विघ्नसंतोषी लोक नाना तोंडांनी बोलत, बाळारावांना हसत, पण बाळारावांनी निष्ठा सोडली नाही.
१९६६ मध्ये सावरकर गेले. मृत्युपत्रात त्यांनी आपल्या लेखनाचे सर्व अधिकार स्वत:च्या मुलांबाळांच्या नावे नाही, तर बाळारावांच्या नावे केले. त्या पुस्तकांच्या विक्रीतून होणारे उत्पन्न, मानधन सर्व बाळारावांना मिळत असे. बाळारावांनी "वीर सावरकर प्रकाशन" हि संस्था काढुन पुढचे सर्व आयुष्य सावरकरांच्या पुस्तकांचे प्रकाशन , प्रचार व विक्री यात घालवले. या विक्रीतून आलेल्या पैशांवरच त्यांचा संसार , उपजिविका आणि सार्वजनिक कामं चालत होती.
हे सर्व सांगुन बाळारावांनी मला विचारले, आता मला सांग शेखर, तात्यांनी मला काही मोबदला दिला का मोफत काम कम करुन घेतल?
© चंद्रशेखर साने

पहिली गरज नास्तिकांच्या प्रबोधनाची

वरवरचा विचार करणाऱ्यांना प्रश्न पडु शकेल की मी फेसबुकवर फार कमी कालावधीत हिंदुत्ववादी लिखाण टाकतो नंतर गोहत्याबंदी विरोधी पण टाकतो. एका बाजुने नास्तिक मताचा प्रसार करतो तर दुसरी कडे आस्तिकांची बाजू घेतो.
एकिकडे उपयुक्ततावादा सारख्या रुक्ष, कठोर आणि परखड तत्वज्ञान सांगणाऱ्या सावरकरांना मानतो आणि भावना आणि श्रध्दांनाही महत्व देणाऱ्या पोस्ट टाकतो. स्वत: मी देवळात जात नाही, मुर्तीपुजा करण्यात रस नाही पण काही लिखाणात मात्र मी मुर्तीपुजेवर श्रध्दा असणाऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वाचकांपैकी एक दोन मित्रांना हा विरोधाभास वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वर वर पाहिल तर काहिंना हा माझ्यातला परस्परविरोध किंवा अंतर्विरोध वाटु शकेल हे मान्य. पण माझी सुचना अशी आहे की जर त्यांनी सूक्ष्मतेने पाहिले तर माझ्या लेखनाच्या मागे त्यांना एक विशिष्ट सूत्र सापडेल.
हे सूत्र आहे तारतम्य नावाचे. मी नास्तिकांना पण समजून घेऊ शकतो कारण मी स्वत:च नास्तिकतेकडे झुकलेलो आहे. पण मी आस्तिकांनाही समजून घेऊ शकतो कारण माणसाच्या मन, बुध्दी अहंकार व पंचकर्मेंद्रिये -ज्ञानेंद्रियांच्या मर्यादांची पण मला पुर्ण जाणीव आहे.
नास्तिकांना वाटते आस्तिकांना प्रश्नच पडत नाहीत, ते सगळ्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवतात. पण प्रश्न पडत नाहीत असा माणूस सहसा नसतो. प्रत्येक आस्तिकाला प्रश्न पडत असतात आणि प्रत्येक नास्तिकाला तर प्रश्न पडणे हाच श्वास वाटतो. प्रत्येक गोष्टीत का आणि कस हे विचरल्यावाचुन माणूस ज्ञानच मिळवु शकत नाही. फरक असा असतो की आस्तिकांचे प्रश्न श्रध्देच्या कक्षेत फिरतात. नास्तिकांचे प्रश्न प्रचलित ज्ञात विज्ञानाच्या चौकटीत असणारे असतात. आस्तिक श्रध्दा दुखावली म्हणून चिडतात, तर नास्तिक यांना कसे शब्दात पकडु आणि फक्त स्वत:लाच विज्ञान कळत अशा आविर्भावात वागतात .
श्रध्दा ही पारलौकिक बाब वाटली तरी प्रत्यक्षात इहवादीच असते बरेचदा. रोजच आयुष्य जगताना आपल मन ताजतवान ठेवण्याला ती बळ देत असते.
  • श्रध्दा ही माणसाच्या पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये , मन, बुध्दी आणि अहंकार यांना लक्ष्मण रेषा घालुन देते. आकाशाला गवसणी घालण्याची आपल्याला बुध्दीमत्ता आहे अशा अहंकारापासून माणसाला मुक्ती देते. आणि आपल्या मर्यादेत आहे त्या जगाला धीट पणे सामोरे जाण्याची शिकवण देते.
मी दोन्हीचा समन्वय करण्याचा प्रयत्न करतो. मी तारतम्य शोधतो. नास्तिक समजतात तेवढ्या प्रमाणात आस्तिक भोळे व दुधखुळे नसतात आणि अवैज्ञानिक नसतात आणि आस्तिक समजतात तितके नास्तिक अनैतिकही नसतात आणि केवळ सापेक्षतेनेच बुध्दीवादी असतात.
ज्यांना माझ्या पोस्टस मध्ये विरोधाभास वाटतो त्यांनी केवळ बहिरंग परिक्षण न करता माझ्या पोस्टसच अंतरंग समजुन घेतल तर त्यात तारतम्य असल्याचे त्यांना आढळून येईल अशी मला आशा आहे.
हिंदुंच्या धार्मिक प्रबोधनाबाबत माझ म्हणण पुढील प्रमाणे आहे,
  • "कार्यकारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव" (दोन्ही निकषांची एकाच वेळी पुर्तता) हि कै. श्री. नरेंद्र दाभोळकरांची अंधश्रध्देची व्याख्या मला निर्विवाद पणे मान्य असुन या व्याख्येबाहेर जाऊन हिंदुंच्या ज्या श्रध्दांवर प्रहार होतील ते ते हिंदुंच्या देवाधर्मावरचे आक्रमण आहे अशी माझी भूमिका प्रथमपासुनची आहे. हे लक्षात घेतले तर माझ्या पोस्ट्स नी कोणालाही धक्का बसणार नाही. अनेक श्रध्दा मला पण मान्य नाहीत पण मी त्यावर आक्रमण करणार नाही. श्रध्दांचा विनाश करुन नास्तिकतेची स्थापना करणे हे माझे लक्ष्य असू शकत नाही. अध्यात्म , धर्म हे जस वैयक्तिक आहे तस त्याच नाण्याची दुसरी बाजू नास्तिकता हाही तुमचा वैयक्तिक भाग आहे, तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक हा तुमचा आंतरीक मामला आहे त्यात विशेष मिरवण्यासारख काही नाही. मी वा तुम्हीआस्तिक असाल वा नास्तिक असाल दोन्ही खाजगी बाबी आहेत.
व्याख्या दाभोळकरांची असली तरी त्यांचे नाव घेणाऱ्या व्यक्ती , त्यांचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती स्वत: मात्र या व्याख्ये पलिकडे जाऊन त्यांनी घालुन दिलेली प्रबोधनाची मर्यादा ओलांडुन आणि केवळ हिंदु धर्माच्याच धार्मिक भावनांवर हल्ले करत असतात किंवा खुसपट काढत असतात. माझा विरोध तिथेच सुरु होतो. दाभोलकर पण आपल्या आमचा देवाधर्माला विरोध नाही हे आवर्जुन सांगत असत. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या नौयायांकडून वा नाव घेणाऱ्यांकडुन देवाला आणि धर्मालाच विरोध करणे सुरु असते. प्रत्येक हिंदु सणात यांना खुसपट दिसते, पर्यावरण हानी दिसते. हिंदुंचा तेजोभंग करुन जी पोकळी निर्माण होईल ती बुध्दीवाद वा नास्तिकतेने नाही तर इतर धर्माचा प्रभावाने भरुन निघेल हे या मुर्खांच्या लक्षात तरी येत नाही किंवा तसे व्हावे हाच त्यांचा हेतु असेल अशीही शंका येते.
निरुपद्रवी धर्मभावनांशी खेळु नका, प्रबोधन करा पण जस इतर धर्मियांचे प्रबोधन करताना जशी समंजस व नरमाईची भाषा असते तशीच हिंदुंबाबतही ठेवा. हिंदु श्रध्दाळुंची खिल्ली उडवणे, त्यांना मुर्खात काढणे चालु राहिले तर ते प्रबोधन नसुन त्यांचा अजेंडा वेगळाच असल्याचा लोकांचा संशय पक्का होईल. त्यातुन हिंदुंचे प्रबोधन होण्या ऐवजी हिंदु जमातवाद वाढेल आणि त्याची जबाबदारी तथाकथित बुध्दीवादाचा ठेका घेतलाय असे समजणाऱ्या वर्गावर जाईल.

© चंद्रशेखर साने

Thursday, April 6, 2017

शाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती

शाकाहार का मांसाहार हा संस्कृती विरुध्द प्रकृती असा संघर्ष आहे. त्याचा श्रध्दा वा अंधश्रध्देशी संबंध फारसा जोडता येत नाही.
आपण जगताना अनेक सूक्ष्म जीव मरतातच कि किंवा वनस्पतींची पण हत्या शाकाहार करताना होतेच की असा मांसाहार करणाऱ्यांचा स्वसमर्थनार्थ युक्तीवाद असतो. अशा युक्तीवादात "हेतु" चा विचार केला जात नाही. त्या व्यतिरिक्त मांसाहार असल्याने जगात वनस्पती जन्य अन्नपुरवठा पुरेसा होतो, मंसाहारी लोक शाकाहारी बनले तर अन्नधान्याचा तुटवडा पडेल असाही एक युक्तीवाद केला जातो.
गताना नकळत मारले जाणारे सूक्ष्म जीव, औषधी कारणांसाठी होणारी प्राणीहत्या आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केलेल्या हत्या यात एकत्रित पणे कशा पहाता येतील?
अन्न धान्याचा तुटवडा पडेल हाही एक चुकीचा युक्तीवाद आहे, मागणी तसा पुरवठा या न्यायाने अन्न धान्याचे उत्पादन वाढवता येऊ शकते. हा एक हयपोथेटिकल दावा आहे.
शेतीचे द्न्यान नसताना गुहेत वल्कले नेसुन शिकार करणारा मानव व आता सुसंस्कृत झालेला मानव यात आपण काय निवडायचे तो विचार प्रत्येकाने करावा. राज्यघटना हि पण संस्कृतीच आहे अराजक हे स्वाभाविक आहे, मग कशाची निवड करायची? संस्कृतीची का प्रकृतीची? परत पशुत्व स्वीकारायचे का प्राकृतिक आहे म्हणून? कारण माणूस हा स्वभावत: पशुच आहे, संस्कृती त्यास मानवता शिकवते.
वि.का. राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात आदीमाणूस हा लैंगिक बाबतीत पण पशिवत होता व नंतर हळु हळु त्यास नाती समजुन येऊ लागली व विवाहसंस्थेचा उदय होऊन सांस्कृतिक विजाअस कसाअ झला त्याच इतिहास मांडला आहे. नाव जरी भारतीय विवाहसंस्थेचा असे असले तरी तो अर्थातच सर्वच जगाचा इतिहास आहे.
शाकाहार व मांसाहार हा अर्थातच वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे, पण अन्य जीवांची हत्या शक्य तेवढी टाळून जर माणसाला जगता येईल तर ते जास्त माणुसकीला धरुन होईल.
कोरड विज्ञान आणि भावना यात भावनिक विचार पण तितकाच महत्वाचा आहे. उपयुक्तता हे तत्व किती ताणायचे याचे तारतम्य हवे. एखाद्या गायीने आयुष्यभर दुध-दुभते दिले असेल, बैलाने सेवा केली असेल आणि आपल्याकडे त्यांना त्यांच्या म्हातारपणी पोसण्याची संपन्नाता असेल तोवर कृतज्ञताभाव दाखवणे हि संस्कइती आहे, नुसता स्वार्थ काय कामाचा? आपण माणूस आहोत का यंत्रमानव?
अईवडील म्हातारे झाले म्हणून वृध्दाश्रमात (त्यांचीच इच्छा असेल तर गोष्ट वेगळी) टाकणे हे म्हातारे झाले म्हणून आयुष्यभर दुधदुभते देणाऱ्या पशुधनाला कसायाला विकणे सारखेच वाटते. बुध्दीवादाचा अतिरेक मला अमान्य आहे. मात्र युध्दकालिन वा दुष्कळ वा अत्यंत आपद्‌कालिन परिस्थितीत स्वत:ला जगवणे हेच माणसाचे कर्तव्य असेल. तेवढे तारतम्य संस्कृती रक्षकांना नसते असे मानण्याचे कारण नाही. अपवादात्मक उदाहरणे म्हणजे सरसकट व्यवहार नाही.
मात्र यात शाकाहारींची संस्कृती श्रेष्ठ व मांसाहारींची कनिष्ठ असा विचार केला तर मात्र संघर्षाला सुरुवात होईल. तात्विक युक्तीवाद ठिक आहेत पण व्यवहारात मात्र व्यक्ती स्वातंत्र्य देणे हेच योग्य आहे.
टिप: मी शाकहारी आहे, पण काही दोन ते तीन प्रसंगी मांसाहाराची चव घेतली होती. खास असा प्रेमात पडलो नाही. नंतर गेली पंचवीस वर्षे तरी मांसाहाराची, हत्येची कल्पनाच नकोशी वाटु लागली आहे.
© चंद्रशेखर साने

Wednesday, April 5, 2017

सावरकरांचे चारित्र्य : समज-अपसमजकोणत्याही महान व्यक्तीच्या खाजगी चारित्र्याविषयी, त्यांच्या वर्तनाचा राष्ट्रिय हितावर दुष्परिणाम झाल्याचा पुरावा सापडत नाही तोपर्यंत इतिहासकाराने टिकाटिप्पणी करु नये. चरित्रकारांना मात्र चरित्रात त्या कथित कथांची दखल घ्यावी लागते. पाश्चिमात्य चरित्रकार खूप मोकळेपणे या विषयाची चर्चा करतात. त्याने कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत किंवा नाही टिकाकारांनाही ते एक विरोधासाठी उपलब्ध झालेले शस्त्र वाटत नाही. थोर/महान/इतिहासावर ठसा उमटवणार्‍या व्यक्ती तीव्र कामवर्तनाच्या असल्या किंवा समलैंगिक प्रवृत्तीच्या असल्या तरी पाश्चिमात्य जगात त्यांचे मोठेपण कमी होत नाहि. कामवासना हि सर्व जीवांची मूलभूत प्रेरणा असते. महात्मा गांधी यांच्या सत्याच्या प्रयोगात त्यांनी निर्भयपणे त्यांच्या खाजगी आयुष्याची चर्चा केली आहे. सेनापती बापट यांची रशियन मैत्रिण होती. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मन स्त्री शी विवाह केला होता तर रासबेहारी बोस यांनी जपानी स्त्री शी विवाह केला. मात्र ते रितसर विवाह होते. त्यामुळे त्याविषयी कसलेच लोकापवाद नाहीत. नेहरुंच्या आयुष्यातील स्त्रियांविषयीही बरेच बोलले जाते. त्याचप्रमाणे सावरकरांच्या आयुष्यातील स्त्रियांपासून त्यांच्या समलैंगिकते विषयी एका परकिय लेखकद्वयीच्या निराधार उल्लेखावरुन बोलले जाते.

सावरकर दोन अटींवर दोन जन्मठेपींच्या शिक्षेतून सुटले. एक रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही व राजकारणात पाच वर्षे भाग घेणार नाही या त्या दोन अटी होत्या. हि बंदी पुढे सतत २ - २ वर्षांसाठी वाढवण्यात आली. ब्रिटीशांना सावरकरांची सतत भीती वाटत असून सावरकरांवर रत्नागिरीतील या स्थानबद्धतेत अत्यंत कडक नजर ठेवली जात असे. आपल्यावर अटक वॉरंट निघाले आहे हे माहित असूनही पॅरीस हून लंडनला जाण्याचा निर्घणय सावरकरांनी घेतल्याने सावरकरांना अंदमानात खितपत पडावे लागून त्यांच्या क्रांतीकारी चळवळीची वाताहत झाली. याच अटींचा दुसरा भाग होता सावरकरांना अभिनव भारतच्या कटाविषयी व सहकाऱ्यांविषयीची गुप्त माहिती विचारली जाऊ नये व सावरकरांकडून ती सांगितली जाणार नाही.

पॅरिसहुन लंडनला जाण्याचा निर्णय हा बुद्धी व भावना यांच्यातला खेळ होता असे सावरकरांनी नमूद केले आहे. स्थानबद्धतेत परत ती चूक होऊन तुरुंगवास होऊ नये यासाठी सावरकर आपले क्रांतीकार्य अतिशय गुप्तपणे करत असत जेणेकरुन इंग्रजांना कोणताही पुरावा त्यांना अटकाव करण्यासाठी राहू नये.

सावरकरांनी आपल्यावर अटक वॉरंट निघाले आहे हे माहित असतानाही लंडनला परतण्याचा निर्णय अशाच प्रकारच्या भावनिक उमाळ्याने घेतला. आपले भाऊ व सहकारी अटकेत अत्यंत भयानक छळ सोसत असताना आपण मागे राहीलो हे त्यांना असह्य झाले. शिवाय लोक काय विचार करतील हि शंका ही त्यांच्या मनाला आलीच.नुसती शंकाच नाही तर नाशिकच्या काही सहकार्‍यांच्या मनात त्यांच्याविषयी किंतु निर्माण झाला होता. नेत्याने स्वत:च उडी मारली की तो पराक्रमी अन्यथा भित्रा असे खरे तर नसते.

भारताच्या इतिहासातील बहुतेक लढायात मुख्य सेनापती पडला की सैन्यात पळापळ होऊन पराभवाला सामोरे जावे लागल्याचे चित्र वारंवार दिसते.परंतु त्या काळात किंवा आज सावरकरांनी स्वत: काय केले हा प्रश्न विरोधक विचारतात त्याला एक प्रकारचे भावनिक उत्तर सावरकरांनी आपल्या या लंडनमध्ये परतण्याच्या निर्णयाने दिले आहे. लाला हरदयाळ,कामा बाई , व्हि.व्हि.एस.अय्यर यांच्या सारखे सहकारी काकुळतेने लंडनला परतु नका असे सांगत असतानाही आपण क्रांतीकार्यात मागे राहू नये अशा भावनेने सावरकरांनी हा आत्मघातक धोका पत्करला. हि चूक पुढच्या आयुष्यात मात्र त्यांनी केली नाही. त्यांनी अंदमानातून सुटल्यावर अनेक उलाढाली केल्या पण ते गुप्तचरांशी पाचपेच खेळताना सतत सावध असत असे श्री.य.दी.फडके यांनी नोंदवून ठेवले आहे. त्या वेळी ही सावरकर लंडनला आपल्या मार्गारेट नामक गौरकाय प्रेयसीला भेटण्यासाठी परतले असा प्रवाद निर्माण झाला होता. तथापि या सर्वात कोणतेही तथ्य नसल्याचे सर्व संशोधकांनी लिहून ठेवले आहे.

पुढे अंदमानात बंदिपालाने कशाला मार्सेलिसला पळून जाण्याचा प्रयत्न केलात असा प्रश्न विचारला असता उत्तर देताना स्वत: सावरकरांनीच , "मी जाणून बुजुन अटक ओढावून घेतली ते माझे मी कर्तव्यच समजलो व मार्सेलिसला सुटुन जाण्याचा प्रयत्न करणे हेही माझे कर्तव्यच होते" असे सांगितले. (माझी जन्मठेप) देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्रासाअत पडणे हे ही कर्तव्यच आणि पुन्हा शत्रूच्या अहतुन सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करणे हे ही कर्तव्यच.

स्थानबद्धतेच्या काळात सावरकर शत्रूच्या सीमेवर जात हल्ला करत आणि शत्रू जागा होण्याच्या आतच पटकन आपल्या सीमारेषेचे आत परतत कित्येकदा ते सीमा पार करुनही शत्रूच्या सीमेत घुसुन हल्ला करत पण परत ब्रिटीशांच्या तावडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची दक्षता घेत असत असे वर्णन कै.य.दी.फडके यांनी केले आहे.

ब्रिटीश गुप्तचरांचे अहवाल हॉटसन-गोगटे, वीर वामनराव चव्हाण ,लॅमिंग्टन रोड गोळीबार या सर्व प्रकरणात यात सावरकरांचा हात व प्रेरणा आहे पण आमच्या कडे पुरावा नाही, मात्र ब्रिटीश राजवटीला हे गृहस्थ अत्यंत धोकादायक असून त्यांच्या वरील स्थानबद्धता उठवू नये असाच अंतिम निर्णय देणारे असत.
दर दोन वर्षांनी असा घटनाक्रम होत असे व सावरकरांची स्थानबद्धतेची मर्यादा वाढत असे. यासंबंधी एका अहवालात पोलिस अधिक्षकांनी His Moral character is very Bad" अशी टिप्पणी केली असून दुसर्‍या एका अहवालात "या कारणाने रत्नागिरीच्या ब्राह्मणांनी सावरकरांना शेजारच्या खेड्यात राहणे भाग पाडले आहे असे म्हटले आहे."

हि माहिती य.दी.फडके यांनी शोध सावरकरांच्या या त्यांच्या संशोधनपर पुस्तकात दिलेली असून त्याचा आज गैरवापर करुन सावरकरांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. य.दी.फडके यांच्या संशोधनाचा अर्धवट वापर एक शस्त्र म्हणून वापरुन य.दी.फडके व अन्य विचारवंत साक्षेपी लेखकांच्या या प्रकरणातील अन्य विचारांचा व पुराव्यांच्या त्रोटकपणा व अनिश्चितता या विषयक लेखन हे अपप्रचारक सोयीस्कर पणे दुर्लक्षित करत असतात, कारण त्यांचे हेतु शुद्ध नाहीत.

कै. श्री. .दी.फडके गुप्तचर अधिकार्‍यांच्या या टिप्पण्णी विषयी लिहितात,
" तात्यांसंबंधीचे आरोप कितपत खरे होते किंवा खोटे होते हे निश्चित दुजोरा देणार्‍या पुराव्यां अभावी सांगणे कठीण आहे. एकतर चारित्र्यहनन करण्यासाठी पुढार्‍यांच्या लैंगिक जीवनाची अशी खाजगी कुजबुज आणि सुरस ,चमत्कारिक गोष्टी सांगण्याचीआपल्याकडे अनेकांना खोड असते. राजकिय विरोधक नेहमीच अशा खमंग कथा पदरचा मालमसाला मिसळून सांगतात. त्यात तथ्य किती व कल्पनाविलास किती हे ठरवणे जिकीरीचे असते."

सावरकरांच्या समाजकार्याने चिडलेल्या लोकांनी सावरकरांच्या कार्याल मर्यादा याव्यात म्हणून अशा प्रकारे त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करणे हि सुध्दा एक शक्यता संभवते.

नेत्याने जर अशी उडी घेतली तर संघटनेचे नुकसान होते. सावरकरांची शक्ती हि त्यांचे प्रभावी व्यक्तीमत्व, अप्रतिम वक्तृत्व , धारदर लेखन हि होती. त्याद्वारे अनेक लोकांना त्यांनी आपल्या क्रांतीकार्याशी जोडले. नंतरच्या आयुष्यातही त्यांनी वेगवेगळी आंदोलने केली. क्रांतीकारकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रेरणा दिल्या काही प्रसंगी तुरुंगवासही भोगला पण सहसा आपल्याविरुद्ध पुरावे न राहू देण्याची काळजी घेतली.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्वत:च काश्मिर मुक्ती लढ्यासाठी शेख अब्दुल्लांच्या तुरुंगात जाऊन फसले व त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला तेव्हाही सावरकरांनी असाच विचार मांडलेला आहे तो त्यांच्या अनुभवातून आलेला होता.हैदराबाद (भागानगरच्या ) लढ्यात सावरकरांनी निजामाच्या तुरुंगात जाऊन पडण्याची चूक केली नाही. मात्र भागानगरच्या ब्रिटीशांविरुध्दच्या लढ्यात त्यांना गया स्थानकावर अटक झाली व आठ दिवस त्यांना तुरुंगात पडावे लगले होते.

सावरकरांनी लंडनला परतण्यात भावनिकतेला किंवा टिकेला शरण जाऊन चूक केली त्याचा उच्चार त्यांनी सुटका झाल्यावर पुढे लाला हरदयाळ यांच्या चरित्रावर व्याख्यान देताना केला , अध्यक्षपदी त्यांचे लंडनमधील सहकारी सेनापती बापट होते.

यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, " मी जे बोलणार आहे ती कल्पित कादंबरी नाही. त्यात चूक झाली तर त्यात सुधारणा करणारे व भर घालणारे बापट येथे आले आहेत. नाशिकच्या खटल्यामधे माझे बंधु ,मित्र,माझ्याबरोबर ज्यांनी शपथा घेतल्या त्यांचे हाल होत होते.हे जेव्हा कळून आले तेव्हा माझ्या मनाला स्वस्थ बसावे हे योग्य कि अयोग्य असे वाटु लागले. हरदयाळ याने मला सांगितले की मी पॅरिस मधुन गेलो तर चळवळ मरेल...माझी बुद्धी (ही)मला सांगत होती की मी चुकतो आहे. मी निश्चय केला काय होईल ते होईल,लंडनमध्ये जायचेच. पं.श्यामजी कृष्न वर्मा म्हणाले लंडनमधे काहि व्हायचे नाही ते (ब्रिटीश) कायदा पाळतील. मी म्हणालो की इंग्रज माणसे त्यांच्या साम्राज्यावर संकट आले की ते लोकांना फाशी दिल्याशिवाय रहाणार नाहित...माझा धाकटा भाऊ व मामेभाऊ पकडले गेले त्यात त्यांचे (confession) व्हावे म्हणून त्यांचेवर अत्याचार चालला आहे असे वाचले.पंडितजींच्या म्हणण्याप्रमाणे ते माझे एक्स्ट्रॅडिक्शन करणार नाहित तर मी जातो असे मी म्हणत होतो. मला पकडून घ्यायचे होते.हरदयाळने डोळ्यात पाणी आणून सांगितले तू जाऊ नको,माझ्या बरोबर रहा....मला ते पटले नाही..श्यामजींच्या कल्पना खुळया ठरल्या, सर्व (संघटनेची) वाताहत झाली. "

सावरकरांचे मामेभाऊ व अभिनव भारत चे इतिहासकार वि.म.भट यांनी म्हटले आहे की, "त्यांना (सावरकरांना) दुर्बुद्धी होऊन ते लंडनला परतले."
http://www.savarkar.org/…/pdfs/mr/abhinav_bharat_mr_v001.pdf

या वर य.दी.फडके टिप्पणी करतात सावरकरांचे लंडनला परतण्यामागे बंधु व सहकारी व अनुयायांवरचे प्रेम समजण्यासारखे असले तरी त्यांनी हाती घेतलेल्या चळवळीला ते मारक ठरले हि वस्तुस्थिती आहे.
हे सर्व सांगण्याचे कारण सावरकर क्रांतीकार्यात मागे रहात नसून भावनेच्या आहारी जाऊन व लोकांनी भित्रे म्हणू नये या कारणाने संकटात स्वत:हून पडले. क्रांतीकार्यात कृतीशील रहाण्याएवढे , बंधुप्रेम ,मित्रप्रेम जाणण्याएवढे कृतज्ञ व चारित्र्यवान होते.

सावरकरांवर त्यांच्या अतिरिक्त कामवर्तनाविषयक आरोपांविषयी त्यांचे चरित्रकार शि. ल. करंदिकर लिहितात ते य.दी.फडके यांनी नोंदवले आहे,

"अशा भानगडींचा गाजावाजा केला जातो आणि अशा क्षुद्र मुंद्यांवर लक्ष देऊन थोरथोर माणसांच्या कतृत्व कलंकित करण्याचा उपद्व्याप केला जातो हि गोष्ट सामाजिक मन:प्रवृत्तीचे गमक या दृष्टीने फार अनिष्ट आहे. आपल्या या परतंत्र देशांत राजकारणी कतृत्ववान माणसांची अतिशय वाण आहे्. त्यांच्या कतृत्वाचा विचार करतांना कांहीतरी आगंतुक भानगडी पुढ ढकलून, त्या कतृत्वाकडे कानाडोळा करण्याला चांगलीं विचारवंत माणसेही प्रवृत्त होतात, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. राजकारणी नेत्यांना जी मान्ययता मिळते ती त्यांच्या राजकीय शहाणपणामुळ मिळते. ते वसिष्ठ – वामदेवाचे अवतार आहेत या बुद्धीने कोणी त्यांना आदरणीय समजत नाही. राजकिय शहाणपण असूनही एकादा नेता प्रति – शुकाचार्य असेल तर त्यामुळ त्याच्या विषयींचा लोकांचा आदर ‘ अधिकस्य याधिकं फलं ’ या न्यायान वाढेल, ही गोष्ट खरी ; पण, राजकारणी शहाणपणाची कसोटी गौण लेखून, भलत्याच गोष्टींवर भर देण्यात येऊ लागला म्हणजे तो प्रकार विवेकहीनतेच्या सदरांत जमा होऊं लागतो !
http://www.savarkar.org/…/pdfs/mr/savarkar_biography_mr_v00…

सावरकर क्रांतीकार्यात पडले ते सर्व ऐहिक सुखांना तिलांजली देण्याची तयारी ठेवूनच.अंदमानात असताना सावरकरांवर करडी नजर असे. अंदमानातील कैद्यांना एकमेकांना भेटणे,बोलणे, पत्र लिहिणे यांचीही परवानगी नसे.

सावरकरांसारखे राजकैदी हे अन्य राजबंद्यांसाठी आदर्श होते याची जाणीव स्वत: सावरकरांना होती. त्यांच्या हक्कांसाठी ते लढत होते. उल्हासकर दत्त सारखे क्रांतीकारी आपल्या आत्मचरित्रात त्यांनाच आपला नेता किंवा क्रांतीकार्याचे प्रतिनिधी मानत होते असा उल्लेख माझी जन्मठेप मधे आहे.

अंदमानात काही वर्षांनी कुटुंबियांना आणण्याची व त्यांच्या बरोबर रह्जाण्याची परवानगी मिळत असे, सावरकरांना आपली पत्नीही पुढेमागे अंदमानात आपल्याबरोबर राहू शकेल अशी आशा होती. सावरकरांच्या कवितांमधुन श्रुंगारीक काव्ये आहेत. अशा परिस्थितीत समलैंगिकता सारख्या गोष्टीत वा मनोवृत्तीत सावरकर अडकले असतील अस वाटत नाही व तसा कोणताही पुरावा नाही.

अंदमानातील खोल निराशेतून बाहेर पडण्यास सावरकर वेदान्त व राजयोगाचा आधार घेत होते. कुंडलिनी जागृतीचा अनुभवही त्यांना अंदमानात आला असे त्यांनी नमूद केले आहे.सुटुन आल्यावर सावरकरांना मुलेबाळे होऊन त्यांचा संसार फुलला.

तथापि स्वातंत्र्यानंतर दोन ब्रिटिश लेखकांनी लिहिलेल्या "फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट" मध्ये सावरकर समलैंगिक असल्याचा उल्लेख आला. पाश्चिमात्य जगात या गोष्टींना फारसे महत्व दिले जात नाही. त्यांना त्या स्वाभाविक वाटतात. त्यांच्या चारित्र्य , नितीमत्ता याविषयी कल्पना आपल्याहून काहिशा भिन्न आहेत. अशी प्रकरणे व उल्लेख वारंवार हे परदेशी लेखक करत असतात असा अनुभव सर्वांनाच आहे. अहिवचरित्राविषयीही असे प्रवाद परकिय लेखक निर्माण करुन भारतीय समाजमन ढवळून काढतात व क्षुब्ध करत असतात. सावरकरांबाबतही त्यांनी तोच प्रयत्न केला. सावरकरांबाबत या आरोपांना तथ्य नसल्याने किंमत देण्याचे कारण नाही. पण हिंदुत्व विचारांचे सर्वात मोठे आव्हान समोर आहे असे समजणार्‍या राजकारणी लोकांनी हे मुद्दे पुन: आपल्या हस्तकांद्वारे उकरुन काढायचा प्रयत्न सुरु केला आहे. तथापि या सर्वाला वस्तुस्थितीचा आधार नाही व पुरावेही नाहित. राजकिय विरोधक व शत्रू पक्षाने ऐकिव माहिती एवढाच आधार घेऊन समलैंगतेचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सावरकरांविषयीचा आदर -प्रेम - भक्ती किंवा त्यांच मोठेपण व थोरपण या गोष्टींवर अवलंबुन नाही तर त्यांच्या स्वातंत्र्यप्रेमात, देशभक्तीत, राष्ट्रहिताच्या विचारात, त्यागात, महान प्रतिभेत आणि अनेक अन्य सद्गुणांच्या विविध पैलुंमधे आहे. त्यांच्या विचारांना विरोध केला तर त्यास उत्तर देता येईल अपप्रचार व निराधार आरोप व खाजगी जीवनावर चिखल फेक याला अजिबात महत्व नाही.

सावरकरांचे तुरुंगातील वर्तन नेत्याला साजेसे असेच होते. सावरकरांविषयीचा आदर सर्व सह-बंदिवान क्रांतीकारकांच्या मनातून ढळला नाही. सावरकरांनी तुरुंगातून सुटल्यावर "माझी जन्मठेप" लिहिले. त्याचप्रमाणे विविध प्रांतांमधुन वेगवेगळ्या वेळी सावरकरांच्या बंदिवासाच्याच कालावधीत अंदमानात आलेले सुमारे २०० क्रांतीकारक होते. अंदमानच्या कोठडीतील अत्यंत अमानुष अशा छळांमुळे काही जण मोडून पडल्यासारखे झाले होते. काही जणांनी आत्महत्या केल्या. पहिली आत्महत्या क्रांतीकारक इंदुभूषण रॉय यांची. काही जणांना अनन्वित छळामुळे वेड लागले. अशा व अन्य काही क्रांतीकारकांनीही आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. बारिंद्र घोष (अरविंद घोष यांचे बंधु), भाई परमानंद, उल्लासकर दत्त,उपेंद्रनाथ बंदोपाध्याय यासारख्यांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. अन्य काही जणांची मने एकमेकांविषयी कलुषित झाली होती. पण सावरकरांविषयी तसे घडले नाही.कोणीही सावरकरांच्या चारित्र्याविषयी ,वर्तनाविषयी वावगे लिहिलेले नाही. उल्लासकर दत्त यांना सावरकर आपल्या बाजूने लढणारे आपले प्रतिनिधी वाटत होते. भाई परमानंद यांनी सावरकर बंधु हे अंदमानातील असंतोषाला जबाबदार असल्याचे बंदिपालाला वाटत असल्याचे नमूद करुन "माझी जन्मठेप" ला दुजोरा दिलेला आहे. सावरकर बंधु तुरुंगतील अन्य क्रांतीकारकांना मिळत असलेल्या सवलतींना वंचित रहात असल्याचे बारिंद्र नाथ घोष नमुद करतात. सावरकर अंदमानातून सुटल्यावर कोणीही त्यांच्या वर्तनासंबंधी आक्षेपार्ह लिहिलेले नाही. रत्नागिरिला सावरकर स्थानब्वद्ध असताना अंदमानात असलेले सह क्रांतीकारी श्री.नानी गोपाळ, लंडनमधील सहकारी व्हि.व्हि.एस्‌. अय्यर,शचींद्र संन्याल आदी मंडळी त्यांना आदराने भेटुन गेली तर भाई परमानंद, आशुतोष लाहिरि यांच्यासारखे काही जण हिंदुसभेत सावरकरांचे सहकारी म्हणून सामिल झाले. सावरकरांच्या पंजाब दौर्‍यात त्यांचे लंडनमधील एकेकाळचे सहकारी व पंजाबचे राज्यपाल झालेले शिकंदर हयातखान यांनी सावरकरांची हत्तीवरुन मिरवणुक काढली. सेनापती बापट सुद्धा सावरकरांबरोबर वेगवेगळ्या प्रसंगी उपस्थित राहीले. कोणालाही सावरकरांचे कोणतेही वर्तन वा चारित्र्य आक्षेपार्ह वाटत नव्हते. बॅ. असफ अल्ली सावरकरांमध्ये शिवाजी आणि मॅझिनी सारखी पात्रता होती हे १९४६ ला सुध्दा लिहित होते.

अंदमानातून सुटल्यानंतर रत्नागिरित स्थानबद्धतेत असताना सावरकरांचे वर्तन आक्षेपार्ह होते यसविषयी काही गुप्तचरांनी केलेली नोंद हि पुराव्यावाचून व सावरकरांच्या सुधारणावादी कार्यक्रमाणी चिडलेल्या काही सनातनी वृत्तीच्या सवर्ण लोकांनी केलेल्या आरोपांवर आधारित आहे. य.दी.फडके हे सावरकरांविषयी बरेचदा आकसाने लिहित असले तरी त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नंतर एका मराठी लेखकाने काल्पनिक कथांमधे रत्नागिरीत इंग्रजांनी सावरकरांवर ज्या दोन महिला गुप्तचर नेमल्या होत्या त्या सावरकरांवर लुब्ध झाल्या व त्यांना समर्पित झाल्याचा उल्लेख केला आहे. व त्यांची कामभावना तीव्र असल्याचा व ते स्त्रियांविषयी जास्तच प्रेमळ असल्याचा उल्लेख केला आहे. हे सर्व काल्पनिक व नाव न घेता लिहिलेल्या कथेचा भाग आहे. अन्य एका प्रख्यात मराठी लेखकाने त्याची दखल घेऊन कडक टिका केली व त्या कथेला उलट नसती प्रसिद्धी मिळवुन दिली. तसे परत होऊ नये म्हणून मी त्या कथेचे नाव व संबंधित लेखकांची नावे येथे देत नाही.

मुंबईत आल्यावर सावरकर अनेकांना भेटत असत पण काही वेळा महत्वाच्या लोकांनाही भेट नाकारत असत असा काही (धनंजय कीर यांसह ) जणांचा आरोप होता. पण आवरकरांचे स्वीय सचिव कै.बाळाराव सावरकर लिहितात की आधी वेळ ठरवली व भेट घेतली नाही असे कधीही घडले नाही. दुपारी २ ते ४ हि वेळ सावरकरांनी त्यांच्या भेटिसाठी येणार्‍या स्त्रियांसाठी ,स्त्री कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवलेली असे. आधी वेळ ठरवून नंतर सावरकरांनी ती पाळली नाही असा कोणाचाही आरोप नाही. इतर वेळी काही जण अचानक वेळ न ठरवत भेटायला आल्यास त्यांना सावरकरांनी भेट नाकारली होती हे मात्र खरे . अशा लोकांमध्ये भारताचे लष्कर प्रमुख मेजर जनरल करिअप्पा, गोळवलकर गुरुजी असेही लोक होते. त्यांनीही याचा विषाद न मानता नंतर वेळ ठरवून सावरकरंची भेट घेतली. सुभाषचंद्र बोस यांना मात्र ते अचानक येऊनही त्यांचे महत्व ओळखून सावरकर भेटले. एवढेच नव्हे तर चर्चा अपूर्ण राहिल्याने दुसर्‍या दिवशीही भेटले. दोन दिवस मिळून तब्बल सहा तास दोघांची चर्चा झाली.

अंदमानातील एकलकोंडीमुळे सावरकरांचा असा स्वभाव झाला होता असाच सर्वांचा अभिप्राय आहे. या सर्वात सावरकरांचे वर्तन आक्षेपार्ह असे म्हणता येत नाही. बहुतेक सर्व नेत्यांवर अशी चिखलफेक होते. जास्त करुन विरोधकांकडून होते, यातून कोणीच सुटलेले नाही. अन्य काही नेत्यांच्या धोरणांवर राष्ट्रहिताच्या दृष्टीने वाईट परिणाम झाल्याचे बोलले जाते, सावरकरांबाबत तर तसेही कधी घडले नाही. श्यामजी कृष्ण वर्मा हे लंडनमधे सावरकर एका गौरकाय मुलीच्या प्रेमात पडले आहेत अशा वार्ता ऐकून चिंतीत झाले, कारण सावरकरांवर लंडनमधील इंडिया हाऊसची जाबबदारी सोडून पॅरिसला जाण्याच्या विचारात ते होते.क्रांतीकारी ग्यानचंद वर्मा यांना याचा पाठपुरावा करायला सांगितला. सर्व तपास झाल्यावर वर्मांनी निर्वाळा दिला, "सावरकरांना जर सर्वात प्रिय स्त्री कोणी असेल तर ती फक्त त्यांची जन्मभूमी भारतमाताच आहे !"

संदर्भ:

माझी जन्मठेप - स्वा.सावरकर
शोध सावरकरांचा- य.दि.फडके
सावरकर चरित्र-शि.ल.करंदिकर
Tale of my Exile- Barindra Ghosh
Twelve Years of Prison Life -Ullaskar Dutt
The Story of my Life - Bhaai Paramaanand

 © चंद्रशेखर साने

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...