एकिकडे उपयुक्ततावादा सारख्या रुक्ष, कठोर आणि परखड तत्वज्ञान सांगणाऱ्या सावरकरांना मानतो आणि भावना आणि श्रध्दांनाही महत्व देणाऱ्या पोस्ट टाकतो. स्वत: मी देवळात जात नाही, मुर्तीपुजा करण्यात रस नाही पण काही लिखाणात मात्र मी मुर्तीपुजेवर श्रध्दा असणाऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वाचकांपैकी एक दोन मित्रांना हा विरोधाभास वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वर वर पाहिल तर काहिंना हा माझ्यातला परस्परविरोध किंवा अंतर्विरोध वाटु शकेल हे मान्य. पण माझी सुचना अशी आहे की जर त्यांनी सूक्ष्मतेने पाहिले तर माझ्या लेखनाच्या मागे त्यांना एक विशिष्ट सूत्र सापडेल.
हे सूत्र आहे तारतम्य नावाचे. मी नास्तिकांना पण समजून घेऊ शकतो कारण मी स्वत:च नास्तिकतेकडे झुकलेलो आहे. पण मी आस्तिकांनाही समजून घेऊ शकतो कारण माणसाच्या मन, बुध्दी अहंकार व पंचकर्मेंद्रिये -ज्ञानेंद्रियांच्या मर्यादांची पण मला पुर्ण जाणीव आहे.
नास्तिकांना वाटते आस्तिकांना प्रश्नच पडत नाहीत, ते सगळ्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवतात. पण प्रश्न पडत नाहीत असा माणूस सहसा नसतो. प्रत्येक आस्तिकाला प्रश्न पडत असतात आणि प्रत्येक नास्तिकाला तर प्रश्न पडणे हाच श्वास वाटतो. प्रत्येक गोष्टीत का आणि कस हे विचरल्यावाचुन माणूस ज्ञानच मिळवु शकत नाही. फरक असा असतो की आस्तिकांचे प्रश्न श्रध्देच्या कक्षेत फिरतात. नास्तिकांचे प्रश्न प्रचलित ज्ञात विज्ञानाच्या चौकटीत असणारे असतात. आस्तिक श्रध्दा दुखावली म्हणून चिडतात, तर नास्तिक यांना कसे शब्दात पकडु आणि फक्त स्वत:लाच विज्ञान कळत अशा आविर्भावात वागतात .
श्रध्दा ही पारलौकिक बाब वाटली तरी प्रत्यक्षात इहवादीच असते बरेचदा. रोजच आयुष्य जगताना आपल मन ताजतवान ठेवण्याला ती बळ देत असते.
- श्रध्दा ही माणसाच्या पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये , मन, बुध्दी आणि अहंकार यांना लक्ष्मण रेषा घालुन देते. आकाशाला गवसणी घालण्याची आपल्याला बुध्दीमत्ता आहे अशा अहंकारापासून माणसाला मुक्ती देते. आणि आपल्या मर्यादेत आहे त्या जगाला धीट पणे सामोरे जाण्याची शिकवण देते.
ज्यांना माझ्या पोस्टस मध्ये विरोधाभास वाटतो त्यांनी केवळ बहिरंग परिक्षण न करता माझ्या पोस्टसच अंतरंग समजुन घेतल तर त्यात तारतम्य असल्याचे त्यांना आढळून येईल अशी मला आशा आहे.
हिंदुंच्या धार्मिक प्रबोधनाबाबत माझ म्हणण पुढील प्रमाणे आहे,
- "कार्यकारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव" (दोन्ही निकषांची एकाच वेळी पुर्तता) हि कै. श्री. नरेंद्र दाभोळकरांची अंधश्रध्देची व्याख्या मला निर्विवाद पणे मान्य असुन या व्याख्येबाहेर जाऊन हिंदुंच्या ज्या श्रध्दांवर प्रहार होतील ते ते हिंदुंच्या देवाधर्मावरचे आक्रमण आहे अशी माझी भूमिका प्रथमपासुनची आहे. हे लक्षात घेतले तर माझ्या पोस्ट्स नी कोणालाही धक्का बसणार नाही. अनेक श्रध्दा मला पण मान्य नाहीत पण मी त्यावर आक्रमण करणार नाही. श्रध्दांचा विनाश करुन नास्तिकतेची स्थापना करणे हे माझे लक्ष्य असू शकत नाही. अध्यात्म , धर्म हे जस वैयक्तिक आहे तस त्याच नाण्याची दुसरी बाजू नास्तिकता हाही तुमचा वैयक्तिक भाग आहे, तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक हा तुमचा आंतरीक मामला आहे त्यात विशेष मिरवण्यासारख काही नाही. मी वा तुम्हीआस्तिक असाल वा नास्तिक असाल दोन्ही खाजगी बाबी आहेत.
निरुपद्रवी धर्मभावनांशी खेळु नका, प्रबोधन करा पण जस इतर धर्मियांचे प्रबोधन करताना जशी समंजस व नरमाईची भाषा असते तशीच हिंदुंबाबतही ठेवा. हिंदु श्रध्दाळुंची खिल्ली उडवणे, त्यांना मुर्खात काढणे चालु राहिले तर ते प्रबोधन नसुन त्यांचा अजेंडा वेगळाच असल्याचा लोकांचा संशय पक्का होईल. त्यातुन हिंदुंचे प्रबोधन होण्या ऐवजी हिंदु जमातवाद वाढेल आणि त्याची जबाबदारी तथाकथित बुध्दीवादाचा ठेका घेतलाय असे समजणाऱ्या वर्गावर जाईल.
© चंद्रशेखर साने
No comments:
Post a Comment