रावणाला धर्म समजवणाऱ्या बिभिषणाला रावण संतापुन म्हणाला "राक्षसाणां परोधर्मा परदारा विघर्षण्म् " धर्म - अधर्म कसला सांगतोस, परस्त्रियांना पळवणे हाच राक्षसांचा परमधर्म. झाडाच्या आड दडुन बाण सोडणाऱ्या रामाला वाली म्हणतो, मी पशु आहे, भावाला युद्धात पराभूत करुन त्याच्या पत्नीवर हक्क प्रस्थापित करणे हाच आमचा धर्म. मात्र त्यावर रामाने तु पशु आहेस म्हणून झाडामागून लपुन बाण मारुन मी मृगया केली हा युक्तीवाद त्याला मान्य नाही , त्यावेळी त्यास मानवी नीतीनियम स्वत:ला लागु करायचे आहेत. राम-वाली संवादात रामाने केलेल्या नीतीवादाच्या युक्तीवादात वाली निरुत्तर झाला आणि डोळ्यात अश्रु आणुन त्याने प्राण सोडले. रामाने स्वत: राज्य घेतले नाही सुग्रीवाला राज्य परत दिले आणि वालीच्या पुत्राला अंगदाला युवराज्याभिषेक करवला. सोन्याच्या लंकेचा मोह धरला नाही, "प्रासाद इथे भव्य परि भारी आईची झोपडी प्यारी" असे म्हणत अयोध्येस परतला. हनुमंताला भक्तीशिवाय काहीच दिले नाही, सीतेने अर्पण केलेला रत्नहार एक एक रत्न फोडून राम आहे का शोधत मारुतीने फेकुन दिला. लक्ष्मण व सितेने रामासोबत वनवास पत्करला. आयुष्यभर साथ देणाऱ्या सीतेचा (स्त्री-पत्नी)लोकांच्या शब्दासाठी आणि कालपुरुषाला दिलेल्या शब्दासाठी लक्ष्मणाचा (पुरुष-बंधु) रामाने त्याग केला आणि स्वत: व्रतस्थ जीवन जगुन शरयुत आत्मसमर्पण केले.
दुर्योधन म्हणतो धर्म काय आणि अधर्म काय हे मला चांगल कळत पण मला धर्म धरवत नाही आणि अधर्म सोडवत नाही.
शरण आलेल्या शत्रूला मारायचे नाही, धर्मयुद्ध, हातात सापडलेल्या शत्रुला बावळट कल्पनांच्या आहारी जाऊन सोडून द्यायचे इ . नीतीकल्पनांनी भारतीय इतिहासात पराभवांचे इतिहास गेले. श्रीकृष्ण हा उपयुक्ततावादाचा पहिला आचार्य. वेळ पडली तर कालयवनासमोरुन भरधाव पळ काढून झोपलेल्या मुचुकुंदाच्या गुहेत लपणारा, जरासंधाच्या द्वारकेवरच्या स्वाऱ्यांपासून पळुन जाऊन रणछोड हि उपाधी पत्करणारा, भीष्माला त्याच्याच कडे जाऊन त्यास मारण्याचा उपाय विचारण्याचा सल्ला देणारा, शंभर अपराध सहन करुन शेवटी यज्ञभूमिवर शिशुपाला चा वध करणारा, युद्धाचा बोल पांडवांवर येऊ नये म्हणून केवळ पाच गावे द्या म्हणून चलाख शिष्टाई करणारा, कंसमामाचा वध करुन भावंडांच्या हत्येचा सूड घेणारा, न धरि शस्त्र करी ची प्रतिज्ञा मोडून रथाचे निखळलेले चाक हातात घेऊन अनावर झालेल्या भीष्मावर चालुन जाणारा श्रीकृष्ण, गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाची मांडी फोडवणारा भगवान श्रीकृष्ण हिच आपली राजनीती असली पाहिजे. पण अहिंसा आणि सद्गुण विकृतीला बळी पडून आपण आपले स्वातंत्र्य गमावले आणि ८०० वर्षे पारतंत्र्यात गेलो.
रामायण महाभारतात अनेक नीती कल्पनांची उकल आहे. वरवरची घटना पाहुन , एक एक घटना स्वतंत्र करुन महाकाव्याची संगती लावता येत नाही, संपुर्ण काळाच्या परिघात प्रदक्षिणा घालून त्यांची संगती लावावी लागते.
अन्याय करणारे स्वत:च्या सोयीचे तत्वज्ञान निर्माण करुन स्वत:च्या अन्यायांचे समर्थन करत असतात. आणि अशा तत्वज्ञानाला कोत्या बुद्धीने विचार करणारे बळी पडत असतात आणि रावण-वाली--शूर्पणखा-दुर्योधन-कर्ण-कैकेयी- महिषासूर हे सर्व त्यांच्या दृष्टीने शोषित ठरतात व हेतुत: लोकांचा बुद्धीभेद करत६ असतात. न बुद्धीभेदं जनयेद !