Friday, August 28, 2009

सक्तीची भाषा समजत नसते

माझ्या परिचयाचे एक गुजराथी गृहस्थ आहेत. माझे मराठीत आणि त्यांचे गुजराथी मिश्रित मराठीत बोलणे चालते.असेच एकदा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, "मुंबईत प्रत्येकाला गुजराथी आलीच पाहीजे."
मी त्यांना विनोदाने म्हणालो," तुमच्या वाक्यात चुका आहेत. मुख्य म्हणजे त्यातील "च" काढून टाका. तो आमचा आहे."

त्यावर ते गृहस्थही हसले.पण त्यांच्य चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते.मी स्पष्टिकरण करीत म्हटले," गुजराथमध्ये गुजराथी आलेच पाहिजे किंवा महाराष्ट्रात मराठी आलेच पाहीजे असे म्हणणे ठीक आहे.पण तोही भाषिक दुराभिमान म्हणून नाही तर साध्या व्यवहाराच्या सोयीच्या दृष्टीने ! अनेक वर्षे एकाच प्रांतात राहिल्यावर प्रांतिक भाषा सहजच येऊ लागते. पण मुंबईतील लोकांचे गुजराथीवाचून काहिही अडणार नाही. त्यांच्यावर सक्ती तर करताच येणार नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. सर्व व्यवहार मराठीतूनच व अपवादात्मक परिस्थितीत हिंदीतून व्हावेत."

ते गृहस्थ म्हणाले," रागावू नका अण तुम्ही गुजराथी भाषेचा द्वेष करता का?"

मी उद्गारलो ," यात द्वेषाचा प्रश्न आलाच कुठे? मुंबईत गुजराथी बरेच आहेत म्हणून गुजराथी भाषेच्या सक्तीची गरज आहे असे म्हणता त्या न्यायाने वडोदऱ्यात मराठीची सक्ती करायची का?"

यावर त्यांच्या कडे उत्तर नव्हते. नंतर आमच्या बोलण्याची गाडी अन्य विषयाकडे वळली. परंतु या गुजराथी माणसाच्या अशा विचाराचे मला आश्चर्य वाटले नाही त्याहून जास्त दुसऱ्या एका मराठी भाषिकाचे बोलणे ऐकून वाटले.

आपण म्हणजे असेच !

हे मराठी गृहस्थही माझ्या बऱ्याच वर्षांच्या परिचयाचे आहेत. बोलता बोलता ते एकदा फटकन उद्‌गारले," आपल्या मराठी लोकांना दुसऱ्यांच्या भाषा शिकायला नको असतात. आता हेच बघाना! मुंबईतील गुजराथी लोकांना मराठी येते पण आपल्याला मात्र गुजराथी येत नाही."

मी त्यांना सबुरीचा सल्ला देत म्हटले, " असा ठाम निष्कर्ष काढु नका.मुंबईत ज्या ज्या लोकांचा गुजराथी लोकांशी संबंध येतो त्यांना उत्तम गुजराथी बोलता येते.दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई गुजरात मधे नसून महाराष्ट्रात आहे आणि गुजराथी लोक येथे आले आहेत.त्यांना मराठी भाषा येणे अगदी साहजिक आहे. आपणासही त्यांची भाषा आली तर वाईट नाही. पण जर आली नाही तर मराठी लोकांना दुसरी भाषा शिकायलाच नको असते असा ठपका ठेवणे अन्यायकारक आहे.
"मला तुमचे म्हणणे पटत नाही " ते अट्टहासपूर्वक म्हणाले.
"थांबा माझे बोलणे पूर्ण झालेले नाही. मी तुम्हाला असे विचारतो की जे मराठी वडोदऱ्यात आहेत त्यांना गुजराथी येतेच ना? ते काही बोलण्याच्या आत मी पुढचा प्रश्न विचारला, "वडोदऱ्यातील कमीत कमी शेकडा नव्वद टक्के मराठी लोकांना गुजराथी येते.पण तेथील किती गुजराथ्यांना मराठी येते?
यावर ते निरुत्तर झाले तेव्हा मीच पुढे म्हणालो, "वडोदऱ्यात ज्या गुजराथी लोकांचा मराठी माणसांशी संबंध येतो त्यांनाच फारतर मराठी येईल. पण इतरांकडून तशी अपेक्षा करता येणार नाही. त्यांच्यावर मराठीची सक्ती करणेही अन्यायाचे होईल. त्याचप्रमाणे मुंबईतही सर्व मराठी बांधवांना गुजराथी आलेच पाहिजे अशी अपेक्षा करता येणार नाही वा तशी सक्तीही करता येणार नाही."

मग मराठी का नको?

गेल्या वर्षी रा.स्व.संघाने कोणत्यातरी सहाय्यक निधीसाठी पत्रक काढले होते. नेहमीप्रमाणे संघाचे एक कार्यकर्ते पत्रक घेऊन आले.सहाय्यक निधी विषयी माहिती देऊन त्यांनी मला पत्रक वाचण्याची विनंती केली. मी पत्रक वाचू लागलो.पत्रक हिंदीमधे होते. ते वाचल्यावर सहज मागील बाजू पाहिली आणि चकीत झालो.पण काही न बोलता त्यांना प्रथम पावती फाडण्यास सांगितली. काम झाल्यावर ते उठून जाऊ लागले. मी त्यांना म्हणालो, "काही वेळ थांबा.तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या हिंदी भाषेतील आवाहनापाठी गुजराथी मधेही आवाहनाचा मजकूर छापला आहे त्याचे कारण काय? गुजराथी बांधवांना हिंदी येत नाही का? "
ते म्हणाले,"तसे नाही पण....."
त्यांना अडवून मी माझा प्रश्न पूर्ण केला," तसे नाही तर मराठीमध्येही का आवाहन केले नाही ?" ( हे पत्रक बहुदा महाराष्ट्राच्या दुष्काळ निधी साठी व मुंबई शहरासाठी काढले होते.)
त्यांनी माझे बोलणे हसण्यावारी नेले व मलाच विचारले," यात काय बिघडले? अशा वादांनी कार्य अडते."

उलट कार्य अडतेच

मी त्यांना अडवले व म्हणालो, "तुम्ही चुकीचे बोलत आहात.तुमचे कार्य मी अडवलेले नाही. पण मला वाईट वाटते ते संघासारख्या स्वत:ला राष्ट्रिय म्हणवणाऱ्या संघटनेने मुंबई शहरात सहाय्य निधी साठी आवाहन केले ते हिंदी आणि गुजराथीतून! मग मग मराठीवर अन्याय होतो असे मराठी लोकांना वाटले तर त्यांचा दोष काय? हे पत्रक तर अगदी जाणूनबुजून काढल्यासारखे वाटते. एकतर केवळ हिंदीतून पत्रक काढायचे किंवा गुजराथीही हवी असेल तर मराठीतूनही काढले गेले पाहिजे होते. येथे तर सरळसरळ मराठीस हद्दपार केलेले दिसते."
"असे घडले आहे खरे" असे म्हणून ते निघून गेले. खरे तर अशा घोडचुकांनीच इतर प्रांतात कार्य अडले असते. पण मीही त्यंच्यासारखाच मराठी ! त्यामुळे "कार्य" अडले नाही इतकेच.

अनेक भाषा येणे हा सद्‌गुणच आहे. ती गोष्ट अभिमानास्पदही आहे.आज अनेक भारतीय परप्रांतीय भाषा आवडीने शिकतात. जर्मन, रशियन, फ्रेंच इ. भाषाही शिकतात. रशियन लोक मराठी शिकू लागले आहेत तर जर्मनीत संस्कृतचा अभ्यास होतो. पण त्यात सक्ती नसते. हटवादी पणा आला की सर्व बिघडते. महाराष्ट्रात राहून मराठीचा द्वेष, बंगालात राहून बंगाली चा द्वेष आणि भारतात राहून हिंदीचा द्वेष या गोष्टी भाषिक दुराभिमान दर्शवतात.

या वरील तिनही उदाहरणामध्ये मी भाषिक दुराभिमान दाखवत नव्हतो. या तिन्ही प्रकारात आलेल्या हट्टी भाषेमुळे निर्माण होणारा भाषिकवाद दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

प्रथम प्रकाशन:

साप्ताहिक मार्मिक
१२ जुलै १९८७

Thursday, August 27, 2009

हव्यास !

देसाई ऍंड कं.च्या ऑफिस मध्ये बसून काम करता करता सबनीसांचे विचारचक्र चालू होते.आपण असे का केले? सबनीसांचे विचार घाण्याच्या बैलाप्रमाणे पुन: पुन: याच प्रश्नाशी येऊन थांबत होते.या प्रश्नाचे उत्तर मिळणे अशक्य आहे हे सुद्धा सबनीसांना समजून चुकले होते.नेहमीच्या सवयीने ते काम करीत होते एवढेच! कामात चुका झाल्या तरीही त्यांच्या दॄष्टीने काहीच फरक पडत नव्हता.मेलेले कोंबडे आगीला भीत नाही म्हणतात ना तसे.

सबनीसांची मन:स्थिती आज सकाळपासूनच ठीक नव्हती.आधीच मुंबईतील गिरगावच्या चाळीतील वातावरण.त्यात सकाळी सकाळीच त्यांच्या बायकोचे,कुंदाचे व त्यांचे कशावरून तरी बिनसले आणि तिचा भोंगा सुरू झाला. नेहमीप्रमाणेच सबनीस ओठ आवळून गप्प झाले.पण कुंदा शेवटी त्यांच्या काकांचा उद्धार करू लागली आणि सबनीस वैतागले.काका म्हणजे त्यांच्या कंपनीचे मालक देसाई! ते त्यांचे सख्खे काका नव्हते.त्यांचे व सबनीसांचे नाते तसे दूरचेच. देसाई सबनीसांच्या वडीलांचे मावसभाऊ! तसे पाहता देसाईंचे त्यांच्यावर फार उपकार होते.नुसते उपकारच नाहीत तर सबनीसांचे सारे आयुष्यच त्यांनी उभारून दिले होते.

सबनीस आयुष्यात तसे दुर्दैवीच होते.आई-वडील लहानपणीच गेलेले.भाऊ-बहीण कोणीच नव्हते.जे थोडेफार नातेवाईक होते त्यांना सबनीसांची जबाबदारी नको होती.पण त्याचवेळी कसे कोण जाणे पण देसाईंना पत्ता लागला आणि त्यांनी या पोरक्या पोराला आपल्या घरी आणले.सबनीसांना त्यांनी सख्ख्या मुलासारखे वागवले.शिक्षण दिले, त्यांचे लग्न करून दिले आणि नंतर खटपट करून पैसा खर्चून गिरगावातल्या चाळीत का होईना पण जागा घेऊन दिली.या काळात कोण कोणाचे एवढे करतो?पण देसाईंचे मनच उदार आणि उमदे! त्यात त्यांना आर्थिक दॄष्ट्याही काही कमी नव्हते. केमिकल्स सप्लायरचा त्यांचा मोठा धंदा होता. मुख्य ऑफिस मुंबईला आणि त्यांच्या शाखा महाराष्ट्रात चारपाच मुख्य शहरातून होत्या. देसाई ऍंड कं.ला बाजारात पत होती. सबनीसांनी या सर्वांचे चीज केले. धोपट मार्गाने जाऊन बी.एस.सी.झाले आणि काकांना त्यांच्या धंद्यात मदत करू लागले. सबनीसांचा वंश सावरल्याचे समाधान देसाईंना मिळाले.

पण हा सर्व इतिहास माहीत असूनही कुंदा काकांचा द्वेषच करीत असे.तिचा स्वभावही हातात दोन रूपये असले तर त्यावर वीस रूपये उधारी करणाऱ्यातील होता.सुरूवातीला ती सबनीसांना म्हणालीही होती ,"तुमचा पगार आपल्याला दोन दिवसही पुरणार नाही.माझ्या माहेरी आमचा रोजचा खर्चच तुमच्या महिन्याच्या पगारएवढा असे."

सबनीस त्यावर म्हणाले ,"माझे आतापर्यंत सर्व काही काकांनी केले आहे. आताही ते मला पुरेसा पैसा देत आहेत.मी काही त्यांच्याकडे अधिक मागणार नाही."

"पण मला एवढ्यात संसार करणे जमणार नाही."कुंदा म्हणाली होती.
"तुझ्या माहेरीही आता पूर्वीसारखी स्थिती नाहीच.पूर्वी तुमची श्रीमंती ऊतु जात असली तरी गेली सहा वर्षे तुझ्या माहेरची स्थिती...."

"तुम्ही मला हिणवता आहात?"एकदम उसळून कुंदा म्हणाली,"आता अशी स्थिती असली तरी आमचे घराणे पूर्वी पिढीजात श्रीमंत होते."

"पण आता नाही ना?तुला त्या स्थितीचीही सवय झालीच होती तर आताच तुझा एवढा अट्टाहास का?"

"म्हणूनच मला सासर श्रीमंत हवे होते."

"पण जे नाही त्याचा हव्यास का? "सबनीस तिची समजूत घालत म्हणाले,"सत्य परिस्थिती तुला मान्य केलीच पाहीजे.तुझ्या उधळेपणाला थोडा आळा घाल."

"काय बाई माझं नशीब कुठे माझे......" रागाच्या भरात कुंदा बोलून गेली होती,

या क्षणीही सबनीसांचा चेहरा शरमेने काळाठीक्कर पडला.(त्यामुळे त्यांचा मूळचा रंग अधिक गडद झाला.) पण कुंदा म्हणाली ते खरेच होते.सबनीसांचे मित्रमंडळ उघडपणे सबनीस दांपत्याला अमावस्या पौर्णिमेचा मिलाफ म्हणत असे.
नशिबाने खुडल्या गेलेल्या कुंदाच्या आशाआकांक्षेचे भूत होऊन तेच त्यांच्या घराला ग्रासून टाकत होते.दहा-बारा वर्षे तिने कशीतरी काढली.त्या अवधित तिलाही देसाईंच्या उदारपणाचा पुरेपूर प्रत्यय आला. सबनीसांच्या कोणत्याही घरगुती वा आर्थिक अडचणीमध्ये देसाई त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असत.पण कुंदाची हाव फारच मोठी होती. तिची नजर देसाई ऍंड कं.च्या पार्टनर्शिप कडे होती.सतत आपली तुलना देसाई कुटुंबाशी करीत राहिल्या मुळे तिला त्यांचे उपकारकर्ते असूनही देसायांचाच मत्सर वाटू लागला.त्याचवेळी त्यांचा एकुलताएक मुलगा बारावी पास झाला.त्या उत्साहात आपल्या स्वभावाप्रमाणे मोठ समारंभ करून तिने दिड-दोन हजाराचा खुर्दा केला.पण तिच्या महत्वाकांक्षेप्रमाणे त्याला त्याच्या गुणांच्या आधारावर मेडीकल ला प्रवेश मिळाला नाही आणि सबनीस त्याच्या गुणांची कमतरता पैशाची बेरीज करून भरू शकले नाहीत.तेव्हा कुंदा ‘माझ्या मुलाच्या आयुष्याची तुम्ही नासाडी केलीत’ असे सबनीसांना म्हणू लागली.तिची मते त्या मुलाच्याही डोक्यात शिरली.आपली कमतरता झाकायला त्याला ती बरी वाटली आणि तोही बापावर राग काढीत हिंडु लागला.सबनीसांचे मत वेगळे होते.त्यांच्या मते आपल्या मुलाने बी.एस्‌.सी. ,पुढे एम्‌.एस्‌.सी.व्हायला हरकत नव्हती.पुढे आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना आपल्या मुलाच्या मदतीने काकांसारखाच स्वतंत्र व्यवसाय सुरू करता आला असता आणि त्यासाठी काकांनीही मदत केली असती.आता उगाच पात्रता नसताना त्याला मेडीकलला प्रवेश घ्यायला लावायचा आणि तेही तेवढा पैसा नसताना-हे व्यवहार्य वाटत नव्हते.पण कुंदाला ते पटले नाही.तिला पटवून घ्यायचे नव्हतेच आणि एक दिवस या साऱ्याचा स्फोट झाला होता.

ती तावाताचाने म्हणाली,"मला आता हा दरिद्रीपणा सहन होणार नाही.मी हप्त्याने बऱ्याच वस्तूंची ऑर्डर दिली आहे.पहिल्या प्रथम तीन हजार रूपये भरायचे आहेत."

"अग पण मला न विचारता....."

"तुम्हाला काय विचारायचे?आता कॄपा करून घरात येणाऱ्या वस्तु परत पाठवायला लावू नका."

यावर सबनीस काहीच बोलले नाहीत.पण तिचे डोळे पाहून आता आपणास काहीतरी करणे भागच आहे हे त्यांना पटले आणि त्या दिवशी मेल्या मनाने ऑफिसचे व्यवहार करताना देसाईंनी त्यांना हाक मारली होती.तो दिवस सबनीसांना आजही आठवत होता.देसाईंनी हाक मारताच सबनीस त्यांच्या जवळ गेले.आपल्या बाजूला उभ्या असलेल्या एका रूबाबदार माणसाची देसाईंनी सबनीसांशी ऒळख करून दिली होती.

"हा माझा पुतण्या रमाकांत-रमाकांत सबनीस ! याच्यावर विसंबून मी कधीही कोठेही दौऱ्यावर जाऊ शकतो."देसाई त्यांची प्रशंसा करत म्हणाले,"आणि रमाकांत हे मि.अहलुवालिया! आपल्याला रॉ मटेरिअल सप्लाय करणाऱ्या एस्‌.के.एल्‌.चे नवे मॅनेजर!"

"ग्लॅड टु मीट यु मि.सबनीस."

"आय ऍम टू मि.अहलुवालिया."

"रमाकांत तू यांच्या बरोबर जा.ऑर्डरच देऊन ये.आणि हो,आपल्या नागपूर शाखेकडे वीस हजारांचा ड्राफ्ट पाठवायचा आहे ते काम परतल्यावर न विसरता कर."

सबनीस अह्लुवालियांबरोबर निघाले.जाताना अहलुवालिया आपल्या मटेरिअलची माहीती देत होते.बोलता बोलता मंद हसत ते म्हणाले," मि.सबनीस,आमच्याकडे दोन प्रकारचा माल विकला जातो."

"दोन प्रकारचा?" सबनीसांना उलगडा झाला नाही.

"मि.सबनीस ,हे अगदी उघड गुपित आहे.एक माल चंगल्या दर्जाचा असतो.दुसरा कमिशन देऊन विकतो.म्हणजे आमचाही फायदा आणि...ऑर्डर देणाऱ्याचाही फायदा!" क्षणभर थांबून मंद हसत अहलुवालिया म्हणाले, ,"प्लीज,गैरसमज करुन घेऊ नका सबनीससाहेब! बोलण्याच्या ओघात आले म्हणून सांगीतले. तुमच्या बाबतीत ही गोष्ट शक्य नाही. नाही का?"

सबनीसांच्या चेहेऱ्यावर चलबिचल दिसू लागली. मग थोडया वेळाने ते संथ स्वरात म्हणाले," मि.अहलुवालिया ,माझ्याविषयीही ते सहज शक्य आहे.मीही माणूसच आहे."

"इट्‌स एक्स्पेक्टेड सबनीससाहेब. तुम्ही मराठी मेंटॅलिटीचे नाही हे मी तुमच्या चेहेऱ्यावरुनच ओळखले. बाय द वे! तुमचा निर्णय चांगला आहे.आपण एकमेकांना सहकार्य करु."

आताही त्या आठवणीने सबनीस कासावीस झाले. तो दिवस उगवलाच नसता तर बरे झाले असते. पण त्यावेळी तरी आपण करतो आहोत ते योग्य की अयोग्य याचा निर्णय करायच्या पलिकडे गेलो होतो, हे त्यांना मनाशी मान्य करावेच लागले. नाही म्हणायला पहिल्यांदा कुंदाला पैसे देताना त्यांना थोडे धडधडत होते पण तिने हे पैसे कोठून आले याची एका शब्दानेही चौकशी केली नाही. नंतरही कधी या पैशाचा उगम शोधायचा प्रयत्न केला नाही. दिवस जात राहीले. पैसा येत असूनही तो पुरत नव्हता. पैसा साठवून ठेवायची कुवत कुंदात नव्हती. तिच्या उधळपट्टीविषयी शेजारी पाजारी, नातेवाईक चर्चा करीत. सबनीसांनी आपल्या एका जिवलग मित्राला बोलताबोलता कुंदाचा हा स्वभाव सांगीतला. तेव्हा त्याने उत्तर दिले की, कुंदावहिनी अपुऱ्या राहीलेल्या आपल्या महत्वाकांक्षा पुऱ्या करायचा हा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. स्वत:चा मोठेपणा मिरवण्यासाठी स्वत:चे गुण दाखवून मोठेपणा मिळवण्यापेक्षा पैशाने मोठेपणा गाजवण्याची त्यांची वृत्ती आहे.सबनीसांना ते मनोमन पटले होते. देसाईंनीही सबनीसांना एकदा याविषयी सुचनले होते. पण सबनीस आपल्या बायकोच्यापुढे काहीच बोलू शकणार नव्हते हे त्यांनाही माहीत होते. कुंदाच्या या वागण्याचा मुलावरही वाईट परिणाम होत होता. या साऱ्यांचा शेवट काय हे सबनीसांना कळेनासे झाले होते. पण आपल्या कृत्याचे परिणाम काय होणार आहेत ते त्यांना स्पष्टपणे माहित होते.
आणि परवाच देसाईंनी सबनीसांना बोलून दाखवले,

"रमाकांत, यावर्षी आपल्याला प्रॉफिट कमी झालेला दिसून येतो आहे.पण त्याचे कारण मात्र कळत नाही." देसाई म्हणत होते, "मात्र मी ते शोधून काढल्याशिवाय राहणार नाही."

"पण कारण तर काही दिसत नाही." सबनीस गुळमुळीतपणाने म्हणाले.

"नाही खरे! पण आपल्या मालाच्या क्वालिटीविषयी तक्रारी आहेत आणि हिशोबातही बरीच तफावत आहे. तू आणि जगदिश नेहमी हे काम पहाता, तेव्हा तुला याविषयी काय वाटते?"

"सर्व अकाउंट्‌स पुन: बारकाईने पाहीले पाहिजेत."

"ठीक आहे. तू ये परवा रात्री, आपण ते काम करून टाकू."

आणि तो आजचा दिवस होता. त्यामुळे सबनीसांची मन:स्थिती चांगली असणे शक्यच नव्हते. ते उदासपणे स्वत:शीच हसले. काकांकडे जातांना हे आपण सारे का केले याचा शोध घेण्याचा पुन: निष्फळ प्रयत्न करु लागले. विचारांच्या नादात आपण केव्हा काकांसमोर येऊन उभे राहिलो ते त्यांना कळले नाही. पण तेथे फक्त काका नव्हते. देसाई ऍंड कंपनीचे पार्टनर्स तेथे उपस्थित होते.

"बैस रमाकांत!" देसाई थकल्या सुरात म्हणाले. इतर सर्वजण दुखावलेल्या नजरांनी सबनीसांकडे पहात होते.

"तू असे का केलेस, रमाकांत?" देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.

"मी कुठे काय? काही नाही."

"बस्‌! आम्हाला सारे काही कळले आहे. तुझे खोटे हिशोब, कमिशन खाणे सारे सारे. अरे, ज्या घरात तुला....." देसाई कडाडले. पण त्यांनी वाक्य अर्धवटच सोडून दिले. सबनीस कोणाच्याही नजरेला नजर न देता खालि पहात राहिले.

"अरे, तुला काय कमी पडले होते. पैसा मिळवायचे इतर मार्ग नव्हते का? आपले बोलणे सुद्धा व्हायचे. मी तुला स्पष्ट सांगीतले की, तुला स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल तरी सांग. मी तुला अडवणार नाही.मदतच करीन. असे असूनहि ही काय दुर्बुद्धी सुचली?"

सबनीसांच्या तोंशून शब्दच फुटत नव्हता. नुसतेच भ्रमिष्टाप्रमाणे ‘चुकले....चुकले...’ म्हणत राहिले.

"तुला माहीत आहे?, देसाई पुढे म्हणाले, " आपल्या साऱ्या व्यवसायात ही गोष्ट पसरली आहे. साऱ्या घरात पसरली आहे. प्रत्येकजण ऎकल्यावर धक्का बसून पहात रहातो,मग म्हणतो, काय रमाकांतने असे केले. छे छे, अगदी अशक्य! - साऱ्यांचा विश्वास मातीमोल केलास तू."

"आम्ही अर्थातच शक्यतोवर ही पोलीस केस करणार नाही." देसाई ऍंड कंपनीचे एक उद्‌गारले, "पण तू पुढे काय करायचे ठरवले आहेस?"

सबनीस अस्पष्ट स्वरात म्हणाले, "मी एक पोरका पोर म्हणून मुंबईत आलो, आता एक कृतघ्न चोर म्हणून मुंबई सोडून परागंदा होणार!"

यापुढे सबनीस काहीच बोलू शकले नाहीत. त्यांचे डोळे भरुन आले. त्यात त्यांना उध्वस्त झालेले आपले घरकुल दिसत होते आणि सबनीसांचा वंश सावरण्यात आपण अपयशी ठरल्याची काकांच्या चेहऱ्यावरची खंत तेवढी दिसत होती. हे दृश्यही अस्पष्ट होत नाहीसे झाले.

प्रथम प्रकाशन:

"साप्ताहिक विवेक दिवाळी १९८७"
प्रथम क्रमांक कथा

महान द्रष्टे सावरकर : काल,आज आणि उद्या

देशाच्या इतिहासामध्ये अनेक राजकारणी,नेते, देशभक्त होत असतात परंतु त्यांच्यामध्ये राष्ट्रहिताचा, केवळ वर्तमानाच्याच नव्हे तर भविष्याच्या दृष्टीनेही विचार करणारे फारच थोडे असतात. अशा द्रष्ट्या नेत्यांमध्ये स्वा.सावरकर अग्रगण्य होते.

स्वा.सावरकरांचा इतिहासाचा अभ्यास सखोल होता.इतिहास म्हणजे गत पिढ्यांचे सामुहीक अनुभव! त्यांचा साठा ज्या समाजापाशी असतो त्यांनी पुन्हा ‘पहिले पाढे पढ पंचानन्न’ करणे म्हणजे अक्षम्य चूक ठरते.

१९१० चे सावरकरांचे अटकेनंतरचे छायाचित्र


अहिंसा, ह्रदयपरिवर्तन इ. उपायांनी युद्धे जिंकता येत नाहित आणि भारताच्या स्वातंत्र्याला सशस्त्र क्रांतीवाचून पर्याय नाही असा इतिहासाभ्यासक सावरकरांचा ठाम विश्वास होता.त्यांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ व ‘मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना’ म्हणजे क्रांतीकारकांच्या तीन पिढ्यांची गीता झाली होती. आझाद हिंद सेनेच्या पुढे सुभाषबाबूंनी केलेल्या भाषणांमधील उतारेच्या उतारे १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथामधील असत. मॅझिनीच्या चरित्राच्या प्रस्तावनेत सावरकर लिहीतात, ‘मोठमोठ्या क्रांत्या या तत्वांनीच घडवून आणलेल्या असतात पण तलवारीवाचून तत्वांचा विजय होत नाही व म्हणूनच इटलीने तलवार उपसली.’

इंग्रजांना अहिंसक चळवळींपेक्षा सशस्त्र क्रांतीकारकांचीच अधिक भीती वाटत असे.तत्कालिन पंतप्रधान ऍटली यांचे वक्तव्य म्हणजे सावरकरांच्या धोरणाला मिळालेली पोच आहे. ऍटली म्हणतात,‘ महायुद्धानंतर ब्रिटीश सैंन्य हिंदुस्थानावर जास्त पाठवणे शक्य होणार नाही व देशी सैंन्यावरील आमची पकड सुटली आहे.’

यावरुन स्पष्ट आहे की सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणामुळे व आझाद सेनेच्या सशस्त्र क्रांतीमुळे इंग्रजांची भारतावरील पकड सुटली व त्यांना स्वातंत्र्य देणे भाग पडले. सावरकरांनी १९३७ सालापासून राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदुंचे सैनिकीकरण हे धोरण स्वीकारुन आणि लेखण्या मोडा व बंदुका घ्या असा संदेश देऊन सैंन्यातील हिंदुंची संख्या तीसावरुन साठ टक्क्यांवर नेण्यात यश मिळवले. परंतु अनेकांना त्यांचे हे धोरण समजलेच नाही काहींना समजूनही त्यांनी तेथे दुर्लक्ष केले व सावरकरांना रिक्रुटवीर म्हणून हिणवण्यात धन्यता मानली.परंतु इंग्रजांना मात्र सावरकर आपल्या महायुद्धात झालेल्या अडचणींचा लाभ उठवत असल्याची पूर्ण जाणीव होती. पण त्यांना निरुपायाने सावरकरांचे सहकार्य घ्यावेच लागले.

सुभाष बाबू सावरकर भेट


सावरकरांच्या धोरणाचा परिणाम म्हणूनच सैंन्यातील हिंदुंची संख्य़ा साठ टक्क्यांवर गेली. तसे न होते तर स्वातंत्र्य मिळवण्यास विलंब झाला असताच पण त्यावाचून हिंदुस्थानचे अधिक तुकडे पडले असते. स्वत: सुभाषचंद्र बोस यांनीच रंगुन आकाशवाणीवरुन जाहीर आभार मानले व मान्य केले की त्यांच्यामुळेच आझाद हिंद सेनेला स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्दीष्टासाठी अधिकाधीक देशभक्त सैनिक मिळू शकले.


यातून सावरकरांचा द्रष्टेपणा सिद्ध होतो. पण असे असूनही आजही आपण रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळवल्याचा घोष करतो. अनेक स्वकीयांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करतो. सावरकरांची भूमिका मात्र सर्वांना यथायोग्य श्रेय देणारी होती. त्यांनी सशस्त्र क्रांती व अहिंसक चळवळ यांना यथायोग्य श्रेय देऊन म्हटले, मला सत्तेची हाव नाही. मातृभूमि तीन-चतुर्थांश का होईना याची देही याची डोळा स्वतंत्र झाली यातच आम्ही कृतार्थ झालो.

स्वातंत्र्य मिळाल्यावर ते जीवापाड जपणेही महत्वाचे हे ओळखून ते तरुणांना सतत सैन्यात शिरा, सबल व्हा. दुर्बल राष्ट्रांना जगात न्याय मिळू शकत नाही असे सांगत. परंतु स्वतंत्र भारताचे धोरण अहिंसा, ह्रुदय परिवर्तन, विश्वशांती, अलिप्तता चळवळ यांच्या जंजाळातच अडकले होते. या धोरणांना सावरकरांचा विरोध नव्हता, पण आधी बलवंत व्हा मगच तुमच्या धोरणांना मान मिळेल असे त्यांचे म्हणणे होते. स्वातंत्र्य मिळूनही आपण सीमाविभागाकडे दुर्लक्ष केले, तर याउलट पन्नास वर्षांच्या काळ्यापाण्याची भयाण शिक्षा समोर उभी असूनही, अंदमानला पोचताच सावरकरांच्य्या दृष्टीपुढे उभे ठकले ते अंदमानचे सामरीक महत्व! धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरते हे जाणून त्या विवशतेतही त्यांनी शुद्धी कार्य चालु ठेवले. तेथील हिंदुंमधे तेथेच स्थायिक होण्याचा प्रचार केलाव अंदमानात हिंदुंची बहुसंख्या कायम केली, व भारताला एक प्रबळ नाविक केंद्र मिळवून दिले. असे असूनही आपण मात्र सैनिकीकरणाकडे, लष्करी सामर्थ्याकडे पोकळ तत्वज्ञानाने दुर्लक्ष केले. परिणामी भारतावर केवळ अठरा वर्षांत तीन आक्रमणे झाली, १९६२ च्या युद्धात तर भारताची जगात नाचक्की झाली, विश्वशांतीचा बोजवारा उडाला आणि अलिप्तता हास्यास्पद ठरली. दोन लढाया जिंकूनही ह्र्दय्परिवर्तनावर विश्वास ठेऊन तह मात्र हरलो.

असे असले तरी अलिकडे मात्र सावरकरवादाचा स्वीकार करावा लागत आहे,केला जाणे भाग पडत आहे. १९७१ मध्ये आक्रमक धोरण स्वीकारुन भारताने पाकिस्तानावर मोठा विजय मिळवला. तीनही सेनादले आज आपण खूपच सुसज्ज केली आहेत, अण्वस्त्रे तयार करण्यातहि आपले धोरण नकाराय्मक नाही. हा सावरकरवादाचा, सावरकरांच्या द्रष्टेपणाचा विजय आहे. स्वतंत्र भारताचे सैंन्य नि:शस्त्र होऊन शत्रुसैंन्यापुढे सत्याग्रह करेल या टोकाचा गांधीवाद आज कोणी विचारात सुद्धा घेणार नाही. यापुढेही शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा स्वीकार करून इस्रायल, अरब राष्ट्रे व पी. एल्‌.ओ सारख्या दहशतवादी संघटना यांच्या संबंधातील धोरण आपणास बदलावे लागेल यात शंका नाही. अंतर्गत एकात्मतेच्या विषयी मात्र आपण अजूनही सावरकरांचा द्रष्टेपणा मान्य करुन सावरकरवाद स्वीकारलेला दिसत नाही. तसे नसते तर पंजाब प्रश्न एवढा चिघळला नसता आसामी हिंदुंना चाळीस वर्षांपूर्वीच सावरकरांनी दिलेले इशारे व संदेश त्यांनी मानले असते तर आसाम समस्या रक्तपाताविना सुटली असती. त्यावेळेस बांगला देश नसला तरी मुस्लीम घुसखोरांच्या वृत्ती आताच्या घुसखोरांप्रमाणे होत्या. १९८२ साली निर्माण झालेल्या स्फोटक आसामचे भविष्य सावरकरांनी १९४१ मध्येच वर्तवले होते. पण तरिही परकीय मुस्लीमांना आश्रय देऊन आपण आपल्या पदरात निखारे बांधून घेत आहोत याचे कोणासही भान नव्हते.

नागा बंडखोरांविषयी कडक धोरण आखण्याची मागणी सावरकर सतत करत होते पण भारताची भूमिका बोटचेती होती. जशी अलिकडे पंजाबसंबंधी होती. १९६० मध्ये दिलेल्या भाषणात सावरकर म्हणतात, ‘नागभूमिविषयी नेहरुंनी पहिली आज्ञा दिली ‘सैनिकहो गोळी खा पण उलट गोळी मारु नका! ते आपले लोक ना? ’या आदेशामुळे नागा बंडखोर प्रबळ होत गेले. रोज आपले सैनिक मरु लागले. आमची मान लाजेने खाली जाऊ लागली. विमाने पाठवून चार दिवसात बंडखोरांचा निकाल लावत आला असता. पण नेहरुंचा विश्वास ह्रुदयपरिवर्तनावर!’

पंजाबमध्येही असेच घडत होते; शेवटी मात्र सावरकरवाद स्वीकारुन सैंन्याच्या सहाय्याने सुवर्णमंदीर देशद्रोह्यांपासून मुक्त केले गेले.

सावरकरांचे द्रष्टेपण भल्याभल्यांना कळू शकले नाही. सावरकरांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या हिंदु संघटनेच्या चालकाचाही अगदी १९४६ च्या अंतापर्यंत गांधीजींवर विश्वास होता. गांधीजी व कॉंग्रेस देशाची फाळणी स्वीकारण्याच्या दिडेने प्रवास करत आहे या १९२७ पासून सावकरांनी सांगीतलेल्या भविष्याची सर्वांनी टवाळी केली. मुस्लीमांच्या अरेरावी मागण्या, मोपल्यांचे भीषण अत्याचार, मुस्लीम नेत्यांच्या देशात अराजक माजवण्याच्या प्रकट प्रतिज्ञा, सर्व देशभर होणाऱ्या हिंदुंच्या कत्तली तर याउलट सावरकरांचे हिंदुसंघटन, हिंदुंना सशस्त्र अ सावध होण्याचे इशारे,शुद्धीकार्य, धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरणार असा गंभीर इशारा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुंनी आत्मघात करुन घेतला.सावरकरांचे भविष्य कोणाला पटतच नव्हते.ज्यांनी सावरकरांना जातीयवादी ठरवून वाळीत टाकले त्यांनीच जीनांच्या घराचे उंबरठे झिजवण्यात मात्र कमीपणा मानला नाही. १९४० च्या नवयुगच्या एका अंकात आचार्य अत्रे लिहीतात," मुस्लीम लीगशी, लीगच्या अटींवर समेट करण्यास, कॉंग्रेस कधीही राजी नसता, कॉंग्रेस लीग करार हिंदुंवर बंधनकारक नाही असे,सावरकर कॉंग्रेसला दर महिन्यातून बजावत असतात. पुन्हा पुन्हा तेच तेच दळण ते दळीत असून वाचकांच्या तोंडाला अगदी चिकटा आला आहे." याच अत्र्यांनी कॉंग्रेसने फाळणी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस सोडली.(त्यांनी निदान झालेली चूक मान्य करण्याचा मोठेपणा तरी दाखवला इतरांना तेही जमले नाही.)

सावरकरांवर अविश्वास दाखवणाऱ्यांनी गांधीजींच्या १९४० मधील पत्रकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्या पत्रकात गांधीजी म्हणतात,"मुसलमानांना स्वयंनिर्णयाचा हक्क आहे व तो बजावण्याचे त्यांनी ठरवले तर त्यांना कोण रोखू शकेल?"

अनेक शतकांचा इतिहास दृष्टीपुढे असूनही सावरकर सोडून इतर सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मुस्लीम-अनुनयाचे धोरण स्वीकारले.सावरकरांनी दुरदर्शीपणे हिंदुंचे मोठया प्रमाणात सैनिकीकरण घडवले नसते तर हिंदुंची स्थिती काय झाली असती याची कल्पनाच करवत नाही.हे सर्व स्वातंत्र्यापूर्वी घडूनही स्वातंत्र्यानंतरही सावरकरवाद दुर्लक्षितच राहिला. फाळणीचा अनुभव लक्षात घेऊन हिंदु-मुस्लीमांची अदलाबदल केली असती तरी अर्धी लढाई आपण जिंकली असती. पण ते न होता पाकीस्तानच्या उदकावर पंचावन्न कोटींची दक्षिणा दिली गेली व त्यातून काश्मिरचा अर्धा भाग भारतापासून ओरबाडला गेला. हिंदुराष्ट्रवादाचा धिक्कार केला गेलाच पण निधर्मी राष्ट्रात अत्यावश्यक असलेली समान नागरी संहिताही स्वीकारली गेली नाही. स्वातंत्र्यानंतरही सहस्त्रावधी निरपराध्यांचे बळी जात राहिले. द्रष्टया देशभक्ताची उपेक्षा केल्याने दुसरे काय होणार?

स्वराज्यासाठी लढताना सुराज्याचे भानही द्रष्टया सावरकरांना होते. रोटीबंदी,स्पर्शबंदी यासारख्या सात बेडयांनी हिंदुस्थानचा ऱ्हास झाला असे ते म्हणत. या सप्तबेडया त्यांनी स्वत: तोडल्या होत्या. व्यवसायबंदी तोडण्यास स्वत: विविध व्यवसाय करुन लोकांनाही त्यांनी त्यासाठी उत्तेजन दिले, सहभोजनांचा धुमधडाका उडवून दिला.अस्पृश्यता गाडण्यासाठी त्यांनी जे अविश्रांत प्रयत्न केले त्याचे पतितपावन मंदिर हे स्मारक होय. मात्र त्यांच्या सुधारणा एकांगी नव्हत्या. स्त्रीसंघटन,स्त्री-शिक्षण,स्त्री-पुरुष समानता त्यांना मान्य होते पण स्त्रियांचे पुरुषीकरण अमान्य होते.

पतितपावन मंदीरअस्पृश्यतेचा दोष सर्वांचा आहे,कोणा एका जातीच्या माथ्यावर त्याचे खापर फोडून इतरांची या पापातून सुटका होणार नाही. अस्पृश्य समाजातही उच्चनीचता व सप्तबेडया आहेत. या रोगाने सर्वांनाच ग्रासले आहे व सर्वांनी मिळूनच या रोगाचा निःपात करायचा आहे असा पुरस्कार त्यांच्या लेखनातून आढळतो. याच दृष्टीकोनातून त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतराला व त्यांनी मनुस्मृती जाळण्याच्या घटनेला प्रखर विरोध केला. अन्य धर्मांतही हे दोष आहेतच तेव्हा धर्मांतराने प्रश्न सुटणार नाहीच पण आणखी बिकट होईल असे त्यांनी आंबेडकरांना बजावले. कोणतेही धर्मग्रंथ जाळण्यास त्यांचा विरोध होता. धर्मग्रंथामधील जेवढे कालानुरुप असेल तेवढेच घ्यावे,असे ते म्हणत. काळाची पावले ओळखूनच ते वागत म्हणून तर सावरकर द्रष्टेपदाला जाऊन पोहोचले. सप्तबेडया तोडण्यासाठी रत्नागिरीमधे त्यांनी जे उपाय करून सुधारणा केल्या ते फार महत्वाचे आहे. धर्मांतराने प्रश्न न सुटता बिकट होतील हे त्यांचे म्हणणे खरे ठरलेच आहे. हे प्रश्न सोडनण्यासाठी विज्ञानबळाचे सहाय्य होईल हे त्यांनी ओळखले, व २१ व्या शतकातील विज्ञाननिष्ठा त्यांनी २० व्या शतकाच्या पूर्वार्धातच दाखवली.देशाची प्रगती व्हावी म्हणून भाबडया समजूतींवर प्रहार करुन समाजाचा रोष ओढवून घेतला पण आपली मते सोडली नाहीत, यंत्रयुगाला अव्हेरले नाहीत."जर का आज पेशवाई असती" या लेखातून त्यांनी विज्ञानाने बलवान झालेल्या भारताचे स्वप्न रंगवले आहे.
"भारत पुन्हा जागृत झाला आहे,वैज्ञानिक प्रगतीने सर्व जगात एक महासत्ता बनला आहे.हिंदु फौजा लंडन,फ्रान्स,अमेरीका गाठत आहे.क्रीडा व कला क्षेत्रांमधे भारतीय उच्चांक करत आहेत" अशा भारताचे चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे होते. "कोटी कोटी हिंदु जाती चालली रणाला,होऊनिया मुक्त स्वतः करील मुक्त ती जगता" हे त्यांचे,त्या महान द्रष्टयाचे भविष्य होते. ते प्रत्यक्षात आणण्याचे उत्तरदायित्व आता स्वतंत्र भारतावर आहे.


पारीतोषीक विजेता लेख

प्रथम प्रकाशन:
मासिक वीरवाणी
२६ फेब्रुवारी १९८७

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...