देसाई ऍंड कं.च्या ऑफिस मध्ये बसून काम करता करता सबनीसांचे विचारचक्र चालू होते.आपण असे का केले? सबनीसांचे विचार घाण्याच्या बैलाप्रमाणे पुन: पुन: याच प्रश्नाशी येऊन थांबत होते.या प्रश्नाचे उत्तर मिळणे अशक्य आहे हे सुद्धा सबनीसांना समजून चुकले होते.नेहमीच्या सवयीने ते काम करीत होते एवढेच! कामात चुका झाल्या तरीही त्यांच्या दॄष्टीने काहीच फरक पडत नव्हता.मेलेले कोंबडे आगीला भीत नाही म्हणतात ना तसे.
सबनीसांची मन:स्थिती आज सकाळपासूनच ठीक नव्हती.आधीच मुंबईतील गिरगावच्या चाळीतील वातावरण.त्यात सकाळी सकाळीच त्यांच्या बायकोचे,कुंदाचे व त्यांचे कशावरून तरी बिनसले आणि तिचा भोंगा सुरू झाला. नेहमीप्रमाणेच सबनीस ओठ आवळून गप्प झाले.पण कुंदा शेवटी त्यांच्या काकांचा उद्धार करू लागली आणि सबनीस वैतागले.काका म्हणजे त्यांच्या कंपनीचे मालक देसाई! ते त्यांचे सख्खे काका नव्हते.त्यांचे व सबनीसांचे नाते तसे दूरचेच. देसाई सबनीसांच्या वडीलांचे मावसभाऊ! तसे पाहता देसाईंचे त्यांच्यावर फार उपकार होते.नुसते उपकारच नाहीत तर सबनीसांचे सारे आयुष्यच त्यांनी उभारून दिले होते.
सबनीस आयुष्यात तसे दुर्दैवीच होते.आई-वडील लहानपणीच गेलेले.भाऊ-बहीण कोणीच नव्हते.जे थोडेफार नातेवाईक होते त्यांना सबनीसांची जबाबदारी नको होती.पण त्याचवेळी कसे कोण जाणे पण देसाईंना पत्ता लागला आणि त्यांनी या पोरक्या पोराला आपल्या घरी आणले.सबनीसांना त्यांनी सख्ख्या मुलासारखे वागवले.शिक्षण दिले, त्यांचे लग्न करून दिले आणि नंतर खटपट करून पैसा खर्चून गिरगावातल्या चाळीत का होईना पण जागा घेऊन दिली.या काळात कोण कोणाचे एवढे करतो?पण देसाईंचे मनच उदार आणि उमदे! त्यात त्यांना आर्थिक दॄष्ट्याही काही कमी नव्हते. केमिकल्स सप्लायरचा त्यांचा मोठा धंदा होता. मुख्य ऑफिस मुंबईला आणि त्यांच्या शाखा महाराष्ट्रात चारपाच मुख्य शहरातून होत्या. देसाई ऍंड कं.ला बाजारात पत होती. सबनीसांनी या सर्वांचे चीज केले. धोपट मार्गाने जाऊन बी.एस.सी.झाले आणि काकांना त्यांच्या धंद्यात मदत करू लागले. सबनीसांचा वंश सावरल्याचे समाधान देसाईंना मिळाले.
पण हा सर्व इतिहास माहीत असूनही कुंदा काकांचा द्वेषच करीत असे.तिचा स्वभावही हातात दोन रूपये असले तर त्यावर वीस रूपये उधारी करणाऱ्यातील होता.सुरूवातीला ती सबनीसांना म्हणालीही होती ,"तुमचा पगार आपल्याला दोन दिवसही पुरणार नाही.माझ्या माहेरी आमचा रोजचा खर्चच तुमच्या महिन्याच्या पगारएवढा असे."
सबनीस त्यावर म्हणाले ,"माझे आतापर्यंत सर्व काही काकांनी केले आहे. आताही ते मला पुरेसा पैसा देत आहेत.मी काही त्यांच्याकडे अधिक मागणार नाही."
"पण मला एवढ्यात संसार करणे जमणार नाही."कुंदा म्हणाली होती.
"तुझ्या माहेरीही आता पूर्वीसारखी स्थिती नाहीच.पूर्वी तुमची श्रीमंती ऊतु जात असली तरी गेली सहा वर्षे तुझ्या माहेरची स्थिती...."
"तुम्ही मला हिणवता आहात?"एकदम उसळून कुंदा म्हणाली,"आता अशी स्थिती असली तरी आमचे घराणे पूर्वी पिढीजात श्रीमंत होते."
"पण आता नाही ना?तुला त्या स्थितीचीही सवय झालीच होती तर आताच तुझा एवढा अट्टाहास का?"
"म्हणूनच मला सासर श्रीमंत हवे होते."
"पण जे नाही त्याचा हव्यास का? "सबनीस तिची समजूत घालत म्हणाले,"सत्य परिस्थिती तुला मान्य केलीच पाहीजे.तुझ्या उधळेपणाला थोडा आळा घाल."
"काय बाई माझं नशीब कुठे माझे......" रागाच्या भरात कुंदा बोलून गेली होती,
या क्षणीही सबनीसांचा चेहरा शरमेने काळाठीक्कर पडला.(त्यामुळे त्यांचा मूळचा रंग अधिक गडद झाला.) पण कुंदा म्हणाली ते खरेच होते.सबनीसांचे मित्रमंडळ उघडपणे सबनीस दांपत्याला अमावस्या पौर्णिमेचा मिलाफ म्हणत असे.
नशिबाने खुडल्या गेलेल्या कुंदाच्या आशाआकांक्षेचे भूत होऊन तेच त्यांच्या घराला ग्रासून टाकत होते.दहा-बारा वर्षे तिने कशीतरी काढली.त्या अवधित तिलाही देसाईंच्या उदारपणाचा पुरेपूर प्रत्यय आला. सबनीसांच्या कोणत्याही घरगुती वा आर्थिक अडचणीमध्ये देसाई त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असत.पण कुंदाची हाव फारच मोठी होती. तिची नजर देसाई ऍंड कं.च्या पार्टनर्शिप कडे होती.सतत आपली तुलना देसाई कुटुंबाशी करीत राहिल्या मुळे तिला त्यांचे उपकारकर्ते असूनही देसायांचाच मत्सर वाटू लागला.त्याचवेळी त्यांचा एकुलताएक मुलगा बारावी पास झाला.त्या उत्साहात आपल्या स्वभावाप्रमाणे मोठ समारंभ करून तिने दिड-दोन हजाराचा खुर्दा केला.पण तिच्या महत्वाकांक्षेप्रमाणे त्याला त्याच्या गुणांच्या आधारावर मेडीकल ला प्रवेश मिळाला नाही आणि सबनीस त्याच्या गुणांची कमतरता पैशाची बेरीज करून भरू शकले नाहीत.तेव्हा कुंदा ‘माझ्या मुलाच्या आयुष्याची तुम्ही नासाडी केलीत’ असे सबनीसांना म्हणू लागली.तिची मते त्या मुलाच्याही डोक्यात शिरली.आपली कमतरता झाकायला त्याला ती बरी वाटली आणि तोही बापावर राग काढीत हिंडु लागला.सबनीसांचे मत वेगळे होते.त्यांच्या मते आपल्या मुलाने बी.एस्.सी. ,पुढे एम्.एस्.सी.व्हायला हरकत नव्हती.पुढे आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना आपल्या मुलाच्या मदतीने काकांसारखाच स्वतंत्र व्यवसाय सुरू करता आला असता आणि त्यासाठी काकांनीही मदत केली असती.आता उगाच पात्रता नसताना त्याला मेडीकलला प्रवेश घ्यायला लावायचा आणि तेही तेवढा पैसा नसताना-हे व्यवहार्य वाटत नव्हते.पण कुंदाला ते पटले नाही.तिला पटवून घ्यायचे नव्हतेच आणि एक दिवस या साऱ्याचा स्फोट झाला होता.
ती तावाताचाने म्हणाली,"मला आता हा दरिद्रीपणा सहन होणार नाही.मी हप्त्याने बऱ्याच वस्तूंची ऑर्डर दिली आहे.पहिल्या प्रथम तीन हजार रूपये भरायचे आहेत."
"अग पण मला न विचारता....."
"तुम्हाला काय विचारायचे?आता कॄपा करून घरात येणाऱ्या वस्तु परत पाठवायला लावू नका."
यावर सबनीस काहीच बोलले नाहीत.पण तिचे डोळे पाहून आता आपणास काहीतरी करणे भागच आहे हे त्यांना पटले आणि त्या दिवशी मेल्या मनाने ऑफिसचे व्यवहार करताना देसाईंनी त्यांना हाक मारली होती.तो दिवस सबनीसांना आजही आठवत होता.देसाईंनी हाक मारताच सबनीस त्यांच्या जवळ गेले.आपल्या बाजूला उभ्या असलेल्या एका रूबाबदार माणसाची देसाईंनी सबनीसांशी ऒळख करून दिली होती.
"हा माझा पुतण्या रमाकांत-रमाकांत सबनीस ! याच्यावर विसंबून मी कधीही कोठेही दौऱ्यावर जाऊ शकतो."देसाई त्यांची प्रशंसा करत म्हणाले,"आणि रमाकांत हे मि.अहलुवालिया! आपल्याला रॉ मटेरिअल सप्लाय करणाऱ्या एस्.के.एल्.चे नवे मॅनेजर!"
"ग्लॅड टु मीट यु मि.सबनीस."
"आय ऍम टू मि.अहलुवालिया."
"रमाकांत तू यांच्या बरोबर जा.ऑर्डरच देऊन ये.आणि हो,आपल्या नागपूर शाखेकडे वीस हजारांचा ड्राफ्ट पाठवायचा आहे ते काम परतल्यावर न विसरता कर."
सबनीस अह्लुवालियांबरोबर निघाले.जाताना अहलुवालिया आपल्या मटेरिअलची माहीती देत होते.बोलता बोलता मंद हसत ते म्हणाले," मि.सबनीस,आमच्याकडे दोन प्रकारचा माल विकला जातो."
"दोन प्रकारचा?" सबनीसांना उलगडा झाला नाही.
"मि.सबनीस ,हे अगदी उघड गुपित आहे.एक माल चंगल्या दर्जाचा असतो.दुसरा कमिशन देऊन विकतो.म्हणजे आमचाही फायदा आणि...ऑर्डर देणाऱ्याचाही फायदा!" क्षणभर थांबून मंद हसत अहलुवालिया म्हणाले, ,"प्लीज,गैरसमज करुन घेऊ नका सबनीससाहेब! बोलण्याच्या ओघात आले म्हणून सांगीतले. तुमच्या बाबतीत ही गोष्ट शक्य नाही. नाही का?"
सबनीसांच्या चेहेऱ्यावर चलबिचल दिसू लागली. मग थोडया वेळाने ते संथ स्वरात म्हणाले," मि.अहलुवालिया ,माझ्याविषयीही ते सहज शक्य आहे.मीही माणूसच आहे."
"इट्स एक्स्पेक्टेड सबनीससाहेब. तुम्ही मराठी मेंटॅलिटीचे नाही हे मी तुमच्या चेहेऱ्यावरुनच ओळखले. बाय द वे! तुमचा निर्णय चांगला आहे.आपण एकमेकांना सहकार्य करु."
आताही त्या आठवणीने सबनीस कासावीस झाले. तो दिवस उगवलाच नसता तर बरे झाले असते. पण त्यावेळी तरी आपण करतो आहोत ते योग्य की अयोग्य याचा निर्णय करायच्या पलिकडे गेलो होतो, हे त्यांना मनाशी मान्य करावेच लागले. नाही म्हणायला पहिल्यांदा कुंदाला पैसे देताना त्यांना थोडे धडधडत होते पण तिने हे पैसे कोठून आले याची एका शब्दानेही चौकशी केली नाही. नंतरही कधी या पैशाचा उगम शोधायचा प्रयत्न केला नाही. दिवस जात राहीले. पैसा येत असूनही तो पुरत नव्हता. पैसा साठवून ठेवायची कुवत कुंदात नव्हती. तिच्या उधळपट्टीविषयी शेजारी पाजारी, नातेवाईक चर्चा करीत. सबनीसांनी आपल्या एका जिवलग मित्राला बोलताबोलता कुंदाचा हा स्वभाव सांगीतला. तेव्हा त्याने उत्तर दिले की, कुंदावहिनी अपुऱ्या राहीलेल्या आपल्या महत्वाकांक्षा पुऱ्या करायचा हा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. स्वत:चा मोठेपणा मिरवण्यासाठी स्वत:चे गुण दाखवून मोठेपणा मिळवण्यापेक्षा पैशाने मोठेपणा गाजवण्याची त्यांची वृत्ती आहे.सबनीसांना ते मनोमन पटले होते. देसाईंनीही सबनीसांना एकदा याविषयी सुचनले होते. पण सबनीस आपल्या बायकोच्यापुढे काहीच बोलू शकणार नव्हते हे त्यांनाही माहीत होते. कुंदाच्या या वागण्याचा मुलावरही वाईट परिणाम होत होता. या साऱ्यांचा शेवट काय हे सबनीसांना कळेनासे झाले होते. पण आपल्या कृत्याचे परिणाम काय होणार आहेत ते त्यांना स्पष्टपणे माहित होते.
आणि परवाच देसाईंनी सबनीसांना बोलून दाखवले,
"रमाकांत, यावर्षी आपल्याला प्रॉफिट कमी झालेला दिसून येतो आहे.पण त्याचे कारण मात्र कळत नाही." देसाई म्हणत होते, "मात्र मी ते शोधून काढल्याशिवाय राहणार नाही."
"पण कारण तर काही दिसत नाही." सबनीस गुळमुळीतपणाने म्हणाले.
"नाही खरे! पण आपल्या मालाच्या क्वालिटीविषयी तक्रारी आहेत आणि हिशोबातही बरीच तफावत आहे. तू आणि जगदिश नेहमी हे काम पहाता, तेव्हा तुला याविषयी काय वाटते?"
"सर्व अकाउंट्स पुन: बारकाईने पाहीले पाहिजेत."
"ठीक आहे. तू ये परवा रात्री, आपण ते काम करून टाकू."
आणि तो आजचा दिवस होता. त्यामुळे सबनीसांची मन:स्थिती चांगली असणे शक्यच नव्हते. ते उदासपणे स्वत:शीच हसले. काकांकडे जातांना हे आपण सारे का केले याचा शोध घेण्याचा पुन: निष्फळ प्रयत्न करु लागले. विचारांच्या नादात आपण केव्हा काकांसमोर येऊन उभे राहिलो ते त्यांना कळले नाही. पण तेथे फक्त काका नव्हते. देसाई ऍंड कंपनीचे पार्टनर्स तेथे उपस्थित होते.
"बैस रमाकांत!" देसाई थकल्या सुरात म्हणाले. इतर सर्वजण दुखावलेल्या नजरांनी सबनीसांकडे पहात होते.
"तू असे का केलेस, रमाकांत?" देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.
"मी कुठे काय? काही नाही."
"बस्! आम्हाला सारे काही कळले आहे. तुझे खोटे हिशोब, कमिशन खाणे सारे सारे. अरे, ज्या घरात तुला....." देसाई कडाडले. पण त्यांनी वाक्य अर्धवटच सोडून दिले. सबनीस कोणाच्याही नजरेला नजर न देता खालि पहात राहिले.
"अरे, तुला काय कमी पडले होते. पैसा मिळवायचे इतर मार्ग नव्हते का? आपले बोलणे सुद्धा व्हायचे. मी तुला स्पष्ट सांगीतले की, तुला स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल तरी सांग. मी तुला अडवणार नाही.मदतच करीन. असे असूनहि ही काय दुर्बुद्धी सुचली?"
सबनीसांच्या तोंशून शब्दच फुटत नव्हता. नुसतेच भ्रमिष्टाप्रमाणे ‘चुकले....चुकले...’ म्हणत राहिले.
"तुला माहीत आहे?, देसाई पुढे म्हणाले, " आपल्या साऱ्या व्यवसायात ही गोष्ट पसरली आहे. साऱ्या घरात पसरली आहे. प्रत्येकजण ऎकल्यावर धक्का बसून पहात रहातो,मग म्हणतो, काय रमाकांतने असे केले. छे छे, अगदी अशक्य! - साऱ्यांचा विश्वास मातीमोल केलास तू."
"आम्ही अर्थातच शक्यतोवर ही पोलीस केस करणार नाही." देसाई ऍंड कंपनीचे एक उद्गारले, "पण तू पुढे काय करायचे ठरवले आहेस?"
सबनीस अस्पष्ट स्वरात म्हणाले, "मी एक पोरका पोर म्हणून मुंबईत आलो, आता एक कृतघ्न चोर म्हणून मुंबई सोडून परागंदा होणार!"
यापुढे सबनीस काहीच बोलू शकले नाहीत. त्यांचे डोळे भरुन आले. त्यात त्यांना उध्वस्त झालेले आपले घरकुल दिसत होते आणि सबनीसांचा वंश सावरण्यात आपण अपयशी ठरल्याची काकांच्या चेहऱ्यावरची खंत तेवढी दिसत होती. हे दृश्यही अस्पष्ट होत नाहीसे झाले.
प्रथम प्रकाशन:
"साप्ताहिक विवेक दिवाळी १९८७"
प्रथम क्रमांक कथा
No comments:
Post a Comment