Wednesday, May 18, 2011

अध्यात्मिक दृष्ट्या रोग म्हणजे काय?

एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राणी निर्माण होत गेले ते जास्तीत जास्त सुख मिळवण्यासाठी व त्यात वाढ करण्याच्या "हेतुने" ! निसर्गनियमाप्रमाणे आज सुख संवेदना घेतली की त्याचे मूल्य म्हणून दु:ख संवेदना येणारच आहे. ती जीवाला टाळता येत नाही पण मनुष्याला जास्तीत जास्त लांबवता मात्र येऊ लागली. त्यामुळे कर्म आणि त्याचे फळ यात वेळेचे अंतर निर्माण होऊ लागले. कर्माचे फळ जेवढे जास्त वेळ लांबवले तेवेढे चक्रवाढ व्याजाने अधिक मिळू लागले त्यातून माणसाला आपले कर्म व त्याचे फळ यातील कार्यकारणभाव समजेनासा झाला. म्हणून आपल्यावर होणार्या प्रत्येक परिणामाचे कारण आपल्या आतच आहे हे त्याला कळेनासे झाले आहे. कर्माचा परिणाम शरीरात साठून राहतो.

उदा. दारुचा परिणाम शरीरात साठून राहतो. कालांतराने त्याचे दुष्परीणाम होतात. जेव्हा माणूस संतापी असतो त्याचे परिणाम साठून राहतात ते रक्तदाब ,ह्रुदयविकाराच्या रुपाने कालांतराने दिसतात. खूप चालून आल्यावर पाय लगेच न दुखता दुसर्या दिवशी दुखु लागतात.आपल्या प्रत्येक भावभावनांचे ,विकारांचे परिणाम सूक्ष्मपणे साठत राहतात.

हि साठवण्याची क्रिया शरीरबाहेर इतरांवरही आपण घडवून ठेवतो.उदा. आपल्या चुकीच्या वागण्याने जेव्हा इतरांना दुखावतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या मनात किंवा मेंदुच्या पेशीत साठतो कालांतराने तो व्यक्त होतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की हा माणूस माझ्याशी असा का वागला मी किती चांगला आणि मला असे फळ का मिळाले?

आपले शरीर म्हणजे अनेक पेशींनी बनलेले असून त्या पेशींना स्वतंत्र अस्तित्वहि असू शकते प्रत्येक पेशीला मनही असते. स्वार्थासाठीच त्या एकत्र आलेल्या असतात. मनुष्य जेव्हा अहंकाराने सुखाच्या लालसेने अतिरेक करतात ,स्वत:च्या शरीराच्या विविध अवयवातही असमान दृष्टिने वागतात (जिभेसाठी पोटावर अन्याय) तेव्हा या पेशी दुखावल्या जातात व बंड करतात. शरीरात राहून किंवा शरीराबाहेर जाउन त्या व्यक्तीचा सूड घेतात. व्यक्ती स्वत:च्या सुखासाठी गरजेचा विचार न करता अन्न घेते तेव्हा या पेशींवर त्याचा ताण येतो मर्यादेबाहेर गेले की त्या बंड करतात संप करतात. मेडीकल सायन्स म्हणज्ते की लाखो पेशी दर सेकंदाला शरीराच्या आत येतात व बाहेर जातात. दुखावल्या गेलेल्या पेशी सूड घेतात त्या अर्थातच स्वरुप बदलून मनुष्याला हानीकारक रुप धारण करतात (जेनेटिक संरचना बदलून) व रोग जंतु म्हणून व्यक्तीच्या शरीरात रोग उत्पन्न करतात.

मंत्र म्हणजे मनाला त्राण देणारे. आपल्या चुका समजावून घेऊन त्यात बदल करण्याचे आश्वासन मनाने शरीराला देणे यात अपेक्षित आहे. आपल्या आचरणात ज्ञानपूर्ण बदल असायला हवा. औषधांचा उपयोग या शत्रू पेशींना दडपण्यासाठी नसून त्यांच्यातली आपल्याविषयी सूडाची भावना काढून टाकण्यस मदत म्हणून असायला हवी. या पेशींना औषधे म्हणजे कारवाईसाठी आलेले पोलिस किंवा शत्रु सैंन्य वाटता कामा नये. मंत्र हे मनाला त्राण देऊन संयम शिकवणारे असावेत. स्वयंसूचनेत खूप मोठी ताकद असते तीच मंत्रावरील श्रद्धेने जागृत होईल पण त्याबरोबर आचरणात बदलहि अपेक्षित असतात, नुसते मंत्र म्हणून काय होणार? व्यायाम करावा हे कळून ,नुसते ज्ञान होऊन शरीर बळकट होत नाही तर त्या ज्ञानाचे रुपांतर कर्मात म्हणजे प्रत्यक्ष व्यायाम करण्यानेच शरीर बळकट होते.

वार्धक्‍य म्हणजे जनुकांचे बंड

http://72.78.249.125/esakal/20100210/5565832334145012434.htm

The Selfish Gene

http://docs.google.com/fileview?id=0Bx8R3NkOLSmBZTQ5OWU0MGMtMTNiYy00YTNlLTlhNmMtM2I0ZmRlMmE4NWU0&hl=en

पूर्वकर्मदोष हा रोग.संकटे,अपघात यांचे एक कारण आहे. हि पूर्वकर्मे म्हणजे चालु जन्म किंवा पूर्व जन्म यातली असणार हि शक्यता तर्काने सिद्ध होते.पण केवळ पूर्वकर्म जर मानले तर माणसाच्या प्रयत्नांना खीळ बसेल. मनुष्याला इच्छास्वातंत्र्य आहे. माणसाच्या आयुष्यातील सुख-दु:खांचे अचूक मापन Quantum Mechanics प्रमाणेच अशक्य आहे कारण मन - आत्मा हे सूक्ष्म आहेत , मापनीय नाहीत. मात्र सरासरीने मापनीय होतात. कारण-परिणाम साखळी चे सूत्र मनशक्तीच्या तत्वज्ञांनी पुढील प्रमाणे मांडले आहे.

कारण ---> पूर्वकर्म + मूळ स्वभाव + इच्छा + कृती ---> परिणाम

उदा.एखाद्याची रक्त शर्करा (Blood Sugar ) हे कारण झाले व परीणामी तातडीची डॉक्टरी ट्रिटमेंट घ्यावी लागली हा परिणाम झाला तर ते वरील सूत्राने सोडवता येईल.

रक्तशर्करावाढ(कारण)----> मधुमेह(पूर्वकर्म) + ताण घेण्याचा स्वभाव (मूळ स्वभाव)+ गोड खाण्याची इच्छा + मनाला न जुमानता खाणे (कृती)-----> डॉक्टरी उपाय (परिणाम)

वरील कार्यकारण साखळीत पूर्वकर्म याचा परिणाम सध्या विचारात न घेता अन्य ३ कड्या पूर्ण पणे किंवा काही अंशी तरी दुरुस्त करता येतील. मूळ स्वभाव बदलायला थोडा कठीण असले तरी प्रयत्नांच्या कक्षेत आणता येईल. मनाला इच्छा होणे हे टाळता येणार नाही कारण भोग-उपभेगासाठीच मनाने जन्म घेतलेला असतो. पण साखरेने त्रास होतो हे ज्ञान झाल्यावर गोड न खाणे हि कृती करण्याचा अधिकार माणसाला आहे.ताण व्यवस्थापनाने (Stress Management) साखर वाढण्याला प्रतिबंध करता येइल.

आता मधुमेह हा जर जन्मत:चा नसेल तर तो याच जन्मातील पूर्व कर्माशी संबंधित असू शकेल. मूळातच इंन्शुलीन निर्मिती होत नसेल तर (A Type) तर तो बहुतांशी पूर्वजन्माशी निगडीत ठरणार.जोपर्यंत विज्ञानाने तो पूर्ण बरा करता येण्याचा शोध लागत नाही तोपर्यंत त्या परिणामाला दैवाच्या हवालीच ठेवावे लागेल.

अनेकदा "वातावरण परिणामाने सवयसहजता" (Conditional Reflex) या मुळे मनस्ताप टाळायला अवघड जाते. या क्षणी क्रोध आवरला पाहिजे, भय वाटत असेल तर निर्भयता आणली पाहिजे, हे समजत असूनही एखाद्या व्यक्ती वा घटनाविषयक Conditioning मुळे कळते पण वळत नाही अशी स्थिती होते. म्हणून अशा प्रसंगातून जाण्यापूर्वीच जी सदोष विचारसरणी निर्माण होऊन रोग-संकटे-अपघात यांना कारणीभूत झाली आहे ती सदोषता तत्वचिंतन , स्वयंसूचना इ. द्वारे बदलता येते. पूर्वीच्या कर्मातून झालेले परिणाम टाळता येत नाहीत व त्या परिणामांमुळे पुन्हा पुन्हा नविन कर्मदोष कारण-परिणामा यांची दुष्टचक्रे आहेत ती बदलण्याचे कर्मस्वातंत्र्य माणसाच्या आधिन आहे.

कारण ---> पूर्वकर्म + मूळ स्वभाव + इच्छा + कृती ---> परिणाम (Ref: मनशक्तीi-दिवाळी अंक)

वर वर पाहता सुखाला कारण मी आणि दु:खाला कारण मात्र इतर जण अशी धारणा करण्याची मनाची प्रवृत्ती असते, पण आत्मचिंतन करताना अत्यंत तटस्थ राहून ते केल्यास त्या त्या घटनांमधे आपले वागणे -बोलणे - वर्तन लक्षात घेतले. आपण जे वर्तन केले त्याऐवजी वेगळे वागलो असतो तर नकोशा असलेल्या घटना टाळू शकलो असतो हे ही ल्क्षात आले. तसे वर्तन घडले याचे कारण आपला स्वार्थ -लायकीपेक्षा जास्त मिळवण्याचा स्वार्थ- हेच असल्याचे लक्षात आले. एखादा रोग झाला तर रोगजंतु हे शरीरांतर्गत कारण आणि अपघात झाला तर बाह्य कारण , पहिली घटना हि नैसर्गिक व दुसरी हा योगायोग - अपघात - अन्याय असे मानतो. वस्तुत: रोग-संकट-अपघात यांना शरीरांतर्गत वा बाह्य घटक केवळ निमित्त मात्र असतात खरे कारण आपल्या मनातच वसलेले असते हे दिसून येते.खरे तर अपघाताची जी लक्षणे डॉ.मेनिंजर यांनी सांगीतली ती रोगालाही लागू पडतात. तरिही एखाद्याचा मृत्यु रोगाने झाला तर तो नैसर्गिक आणि मोटारीच्या टकरीने झाला तर तो अपघात-योगायोग असे म्हटले जाते.

Law of compensation

http://www.crcsite.org/karma.htm

डॉ.xxx हे अ‍ॅनॉटॉमी चे तत्ज्ञ आहेत त्यांनी माझ्या दोन प्रश्नांना पुढील उत्तरे दिली ती येथे नोंदवून ठेवत आहे.

Q.1 एखाद्या पेशीसमूहाची वारेमाप वाढ होण्याची कारणे काय असू शकतात?

"पेशीकेंद्रा मध्ये जे DNA असतं त्यामध्ये काही बदल घडून येणं" असं एका वाक्यात उत्तर देता येईल. (अर्थात हे उत्तर सुद्धा सर्वंकष किंवा समर्पक नाही, पण प्राथमिक उत्तर म्हणून चालेल).पण मग प्रश्न उद्भवतो, असं बदल घडण्याची कारणं काय? ह्या प्रश्नाचा उत्तर अतिशय व्यापक आहे. आणि असं असण्याचं कारण हे, की निरनिराळ्या कॅन्सर मागची कारणं वेगवेगळी असू शकतात. इथे केवळ काही उदाहरणं देता येतील!१. काही कॅन्सर मागे आनुवंशिक पार्श्वभूमी असू शकते. पण ह्याचा अर्थ असा नाही, की असे कॅन्सर आनुवंशिक असतात! अशी पार्श्वभूमी असल्यामुळे पेशींमध्ये घातक बदल होण्याची शक्यता जास्त एवढंच म्हणता येईल.२. काही पेशींमध्ये असे बदल पर्यावरणीय कारणांमुळे होऊ शकतात. उदाहरणार्थ, asbestos शी प्रदीर्घ संपर्क आल्यास फुफ्फुसाच्या आवरणामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते. सूर्यकिरणामधल्या अल्ट्राव्हायोलेट मुळे त्वचेच्या पेशींमध्ये असे बदल होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते.३. काही कॅन्सरच्या मागे व्हायरस असण्याची शक्यता असते.४. बऱ्याच वेळा असे बदल अचानक होणाऱ्या अपघातांमुळे (ज्याला अनुवंश शास्त्रामध्ये - genetics - mutation असं म्हणतात) घडू शकतात.

शेवटी, एक सच्चा डॉक्टर आणि शास्त्राचा (सायन्स) विद्यार्थी म्हणून मला हे मान्य करावाच लागेल, की अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मानवाला अजून समजलेली नाहीत! पुढेमागे मिळतील ह्यात शंका नाही, पण आपल्या हयातीत मिळतील की नाही हे सांगणं कठीण आहे!

Q 2.पेशींना स्वतंत्र अस्तित्व किंवा मन असू शकत् का?

Ans. from Dr. Avinash xxx to me.

पेशींना स्वतंत्र अस्तित्व ... हो आणि नाही!हो अशा अर्थाने, की प्रत्येक पेशी हे एक स्वतंत्र विश्व आहे - तिच्या केंद्राकामध्ये तिला आवश्यक ती सर्व माहिती आहे, प्रत्येल पेशी, आपली नित्याचे व्यवहार (भक्षण, उत्सर्ग, पुनरुत्पादन) स्वतंत्रपणे करते.नाही अशा अर्थाने, की बहुतेक पेशी एकमेकांशी जैविक अणूंच्या (molecules ) सहाय्याने संपर्क ठेवून असतात. शिवाय, काही बाबतीत पेशींना एकमेकांशी संपर्क ठेवणं आवश्यक असतं. बहुपेशीय प्राण्यामध्ये, ह्याची नितांत गरज असते. बहुतेक पेशींच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवावं लागतं. "The whole is more than te sum of its parts" हे बहुपेशीय जीवांबद्दल तंतोतंत खरं आहे.२अ . पेशींना 'मन' असतं की नाही हा खरं तर तात्विक प्रश्न आहे! (Philosophical ). 'मन' शब्दाच्या व्याख्येवर हे अवलंबून आहे. वर म्हटल्याप्रमाणे, पेशी एकमेकांशी संवाद साधू शकतात - एवढंच, की हा संवाद biological molecules च्या माध्यमातून होत असतो. सभोवतालच्या परिस्थितीमध्ये बदल होतात तेव्हा पेशी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात! पण ह्या प्रतिक्रिया विद्युतभाराच्या रूपाने दिसून येतात (पेशींच्या आवरणामध्ये अतिशय सूक्ष्म प्रमाणात वीज खेळत असते! - ती संवेदनशील यंत्रांच्या सहाय्याने मोजता पण येते.) तर कधी इतर मार्गाने.असं असून सुद्धा, आपल्या शरीरातल्या पेशी जर शरीराबाहेर काढल्या तर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड तंत्रज्ञानाची आवश्यकता असते! आणि एवढं करून सुद्धा, त्यांना जिवंत ठेवण्यावर मर्यादा आहेत.

...........................

लोकमान्य टिळक, छत्रपति आणि वेदोक्त प्रकरण

कोल्हापुरचे शाहूमहाराज यांच्या कारकिर्दित सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका ब्राह्मणाने (राजोपाध्ये नव्हेत)स्वत: अंघोळ न करताच मंत्र सांगण्याचे ठरवले यावरुन वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झाला. राजोपाध्याय स्वत: आजारी असल्याने ते तिथे हजर नव्हते. या ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणावयास सुरुवात केली. जाणकारांनी शाहु महाराजांच्या लक्षात हि गोष्ट आणून देताच त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या ब्राह्मणाने "छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, पण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!" असे उद्धट उत्तर दिले. पण छत्रपती शाहु महाराज हे वेदांचे प्रचंड अभिमानी होते. त्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारण करा असे सांगितल्यावरही तो ब्राह्मण ऐकेना, त्यातुन त्याने स्वत: शुचिर्भूत न होता हे मंत्र सांगितले होते. कोल्हापुरच्या ब्राह्मणांनीही या महामूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केला. मात्र हा विधी पण संस्थानचे रेव्हेन्यु अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला व वाढवला, त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे स्वरुप आले.

स्वत: शाहू राजांना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरुपाची समाजरचना मान्य होती का नाही? त्यांचे एक पत्र यावर प्रकाश टाकते. कोल्हापुरच्या विद्याविलास च्या संपादकांना लिहिलेले हे पत्र,

"माझ्या मतासंबंधि बराच गैरसमज करण्यात येत आहे म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरता पाठवत आहे.सत्यशोधक, समाजिस्टांचा हलल माझेवर का? ज्याप्रमाणे ख्रिस्त ,बुद्ध ,थिऑसफी इ. पंथांची काही तत्वे मला मान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची काही तत्वे मला मान्य आहेत. मी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो व नाही. हुबळीस ब्राह्मणेतर समाजाची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून तसा येईल असे सांगितले .मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते? मला वेद मान्य असून ,मी वेदास चिकटून रहाणारा आहे असे असता माझ्यावर हल्ला का?

कळावे,

शाहू छत्रपती

मुंबई , ता २३ मार्च १९२१

अशा विचांरांचे हे छत्रपती या वेदोक्त वादात कसे फसले वा इंग्रजांच्या राजकारणाने फसून व काही लोकांच्या सल्ल्याने का वागले, लोकमान्यांची भूमिका काय होती याचा हा इतिहास!

लोकमान्य टिळक विरुध्द चिरोल

चिरोलच्या ’दि अनरेस्ट एन इंडिया’ या लोकमान्यांवर आणि चित्पावन ब्राह्मणांवर गरळ ओकणारे पुस्तक त्याचे मराठी भाषांतर भास्करराव जाधव व अण्णासाहेब लठ्ठे व प्रो.म.गो.डोंगरे या तिघांनी केले व ते पुस्तक स्वखर्चाने छापून शाहूमहाराजांनी फुकट वाटले. महाराजांनी सर व्हलेंटाईन चिरोलच्या पुस्तकाच्या लेखनासाठी दरबारी पाहुणा म्हणून ठेऊन घेतले. कागदपत्र परवले, पैसा दिला. महाराजांचे ॠण चिरोलने स्वत: प्रस्तावनेतच मान्य केले आहे. मंडालेहून आल्यावर टिळकांनी चिरोलवर अब्रुनुकसानी चा दावा दाखल केला. या खटल्यात भास्करराव जाधव आणि डोंगरे चिरोल साहेबाचे साक्षिदार म्हणून उभे राहिले. शाहु महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात टिळकांनी विरोध केला असे चिरोलने म्हंटले होते त्यासंदर्भात टिळकांच्या वकिलांनी १९०१ ते १९०८ या काळातले केसरीचे अंक समोर ठेऊन प्रश्न केला की "टिळकांनी शाहुमहाराजांच्या वेदोक्ताच्या अधिकाराला कोठे विरोध केला ते दाखवा." कारण काहीजणांनी तसा लेखी व तोंडि प्रचार केला होता. तेव्हा या दोघांनीही टिळकांनी वेदोक्ताच्या संबंधात लोकमान्यांनी शाहूमहाराजांना कधिही विरोध केला नाही हे कबूल केले. डोंगरे म्हणाले वेदोक्त "प्रकरणात व्यक्तीश: छत्रपतिंविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखवता येणार नाही. किंबहुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहेच असे टिळक म्हणत होते असे मला वाटते."

याच केस मधे सत्यशोधक भास्कररावांची जी साक्ष झाली ती त्यांची मनोवृत्ती स्पष्ट दाखवतात. जाधव म्हणाले , "मला या वेदोक्तामधे काहिहि अर्थ दिसत नाही ब्राह्मण विरोधी जातात म्हणून आम्ही हा हक्क मागतो. हिंदुंनाच काय पण मुसलमान ख्रिस्ती यांनाहि हा अधिकार असावा असे मला वाटते!" तेव्हा वकिलांनी प्रश्न केला कि मग तुमच्या मागणीप्रमाणे मुसलमान व ख्रिश्चनांनिही वेदोक्ताची मागणी केली असेल. त्यावर जाधवांनी उत्तर दिले. अद्याप त्यांनी ती मागणी केली नाही. जाधवांनी हे प्रकरण कसे रंगवले असेल याचा अंदाज करता येईल.

भास्करराव जाधव यांची कार्यशैली

राजोपाध्ये यांची भूमिका मांडणारे पत्र पुढे देतो पण हे सविस्तर पत्र ५ मे १९०२ ला पाठवले त्यावर दुसर्‍याच दिवशी महाराजांच्या खाजगी कारभार्‍याचे उत्तर आले व त्यात राजोपाध्यांना बडतर्फ केले गेले व जप्तीचा हूकूम दिला. १३ मे ला शाहू लंडनला निघाले व १५ मे ला मुंबईला बोटित बसले. त्यांच्या पाठीमागे सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी राजोपाध्ये यांची उत्पन्ने जप्त केली पण ती केवळ उपाध्येपणाशी संबंधित न करता खाजगी मालकिची उत्पन्नेसुद्धा जप्त केली . एवढेच नव्हे तर या वादाशी संबंध नसलेल्या छोट्या गावातील शेकडो ब्राह्मणांना च्या लहानसहान जमिनी जप्त करून त्यांना देशॊधडिला लावले. हि सर्व उत्पन्ने मंदिरांची व्यवस्था लावण्यास पूर्वापार या मंडळिंना दान म्हणून मिळाली होती हि सर्व ब्राह्मण परागंदा होऊन ब्रिटिश हद्दीत निघून गेली. मूळ प्रश्न होता केवळ क्षत्रियत्वाचे संस्कार लोप पावल्याने छत्रपतींनी प्रायश्चित्त घेण्याचा होता. त्यांचे क्षत्रियत्व ब्राह्मण समाजाला मान्यच होते. जाधवांनी खुनशिपणाने राजोपाध्येंवर जप्तीचा हुकूम बजावण्याची वेळ राजोपाध्यांच्या मुलाच्या लग्नघडीलाच काढली. या सत्यशोधक जाधव यांनी ६ मे १९१९ ला एक व्याख्यान दिले त्यात कुणबई वैदिक वर्ग निर्माण करु नये असे उद्गार काढले. वेदपठ्ण करण्यातच पुरुषार्थ नाही असे म्हटलाने वेदाभिमानी असल्याने छत्रपति शाहू संतापले मग जाधवांनाच सपशेल माफी मागावी लागली.

टिळकांची भूमिका

शाहु छत्रपतीं प्रकरणाचा फायदा घेऊन सत्यशोधकांनी ब्राह्मण -क्षत्रिय समाज सोडून सर्वच हिंदु समाजाला,- परधर्मियांनाहि- वेदोक्ताचा अधिकार मिळाव म्हणून प्रचार करत होती. यासंबंधि टिळकांनी लिहिलेले शब्द, " जातिभेद हा हिंदु समाजाच्या हाडीमासी खिळलेला आहे. .... हे परंपरागत किंबहुना रचनासंगत भेदाभेद अजीबात सोडून टाकून सर्व हिंदुस्थानातील जातींचा सबगोलंकार करणे इष्ट असले तरी शेकडो वर्षे ते शक्य नाही हे कोणासहि मान्य केले पाहिजे व आम्हि आजच्या प्रश्नांचा जो विचार करणार आहोत तो याच धोरणावर करणार आहोत. समाजाच्या स्थितीत जो काही पालट कोणास करावयाचा असेल तो व्यवस्थेने बेताबेतानेच केला पाहिजे व तोही असा असला पाहिजे कि त्याची उपयुक्तता लोकांच्या चटकन लक्षात येईल. हल्ली जी वेदोक्ताची चळवळ सुरू झाली आहे ती त्या प्रकारची नाही...मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे त्यांचा हात धरणारा या काळात कोणी राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणानेच तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही.... निरनिराळ्या जातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हास पाहणे आहे व तशा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहीले आहेत."

वेदोक्ता बाबत टिळकांचे जाहिर मत

५-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात " कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."

लोकमान्य टिळक यांना विद्धंसक सुधारक होण्यापेक्षा विधायक सुधारणावादी व्हावेसे वाटत होते हे स्वच्छ दिसते. आधी राजकिय स्वातंत्र का आधी सामाजिक सुधारणा हा वाद प्रसिद्ध आहेच. पण या प्रकरणात त्यांची अकारण बदनामी केली गेली.

टिळक विधायक सुधारणावादी होते. जातीभेद मोडणे त्यांना इष्ट ही वाटत होते पण क्रमाक्रमने. खुद्द शाहु राजांनी तंजावर प्रकरणात मराठा समाजातील भोसले, घोरपडे,पवार ,जाधव आदि केवळ १२ मराठा घराण्यांतच वेदोक्ताचा अधिकार आहे असे सांगीतले. म्हणजे खुद्द छत्रपतींनीही सर्व मराठा समाज किंवा सर्व ब्राह्मणेतरांना वेदोक्ताचा अधिकार आहे किंवा हवा असे १९१७ पर्यंत म्हटले नव्हते.

टिळक हे हिंदुसंघटक असून सर्व जाती एकत्र याव्यात असेच त्यांना वाटत होते. शिवजयंती व गणेशोत्सव यांना राष्ट्रीय स्वरुप देण्याच्या त्यांच्या चळवळीमागे सर्व जातींचे एकत्रीकरण हाच उद्देश होता.शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव या आपल्या लेखात टिळक सारांशाने म्हणतात,"...राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे.एकराष्ट्रीयत्व म्हणजे काही दृष्य पदार्थ नव्हे......सर्व लोकांच्या आदरास पात्र असलेल्या जितक्या अधिकाधिक वस्तु असतात त्या मानाने एकराष्ट्रियत्वाची कल्पना अधिकाधिक दृढ होत जाते हे तत्व सर्वमान्य आहे. ... अशा गोष्टी अद्याप दुर्दैवाने आम्हास फारशा उपल्ब्ध नाहीत.गाई आणि ब्राह्मण यांचा प्रतिपाळ अशा दोन गोष्टी एकेकाळी होत्या...पण याहीपेक्षा आजचा काळात सर्वांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रपुरुषांचे स्मरण होय.त्यातूनही ज्या शूर पुरुषांनी मरठे ,ब्राह्मण ,परभू,शेणवी वगैरे कोणताही भेद मनात न आणता "गुणा: पुजस्थानं गुणिषु नच लिंगम्‌ नच वय:" या न्यायाने ज्याचा जो गुण आढळण्यात आला त्याचा सारवजनिक कार्यात उपयोग करुन सर्वांस राष्ट्रीय एकत्वाच्या जाळ्यात आणले त्याचे स्मरण सर्वांस श्रेयस्कर होईल. श्री शिवछत्रपतींचे चरित्र अशाच प्रकारचे आहे....शिव छत्रपतींचा उत्सव करणार्‍यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. या उत्सवात मराठे आणि ब्राह्मण, अगर ब्राह्मण आणि परभु अशा प्रकारचा कोणताही भेद करणे अतिशय गैरशिस्त आहे.....शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करण्यात एक प्रकारची कृतज्ञता बुद्धी आमच्या मनात आहे त्याव्यतिरिक्त अशी जयंती साजरी करण्याने एकराष्ट्रीयत्वाचा उदय होईल हा फायदा लहान सहान नाही."

सयाजी महाराजांची भूमिका

सयाजीराव महराजांनी या प्रकरणात विधायक भूमिका घेऊन हा वाद कोल्हापूरप्रमाणे बडोदे संस्थानात माजू दिला नाही. त्यांनी १८९६ ला एका पत्रात म्हंटले आहे की "मला पुराणोक्त आणि वेदोक्त यात स्वत:ला काही कमी जास्त श्रेष्ठ वाटत नाही. मात्र सामाजिक दृष्ट्या वेदोक्त श्रेष्ठ पद्धत मानली जाते. पण अशा रितीने लोक केवळ विधी आणि कर्मे यातच बुडुन धर्माची तत्वे विसरुन गेली आहेत ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून मी सुधारणा हाती घेतली आहे."

राजोपाध्यांची भूमिका

शाहु महाराजांना अंघोळ न करता पूजा सांगू पहाणार्‍या मूर्ख ब्राह्मणाला शासन केल्यावर जे मुख्य राजोपाध्ये त्यांना दरबारातर्फे काही विचारणा झाली.त्यात त्यांना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याची आपली इच्छा आहे किंवा कसे असे विचारले गेले ते पत्र किंवा यादी ७ - १० - १९०१ चे आहे.

यावर राजोपाध्ये ते मुंबईला एका परिक्षेसाठी निघाले होते त्यांनी राजांची समक्ष भेट घेऊन परत आल्यावर शास्त्राप्रमाणे विचार करण्यासाठी बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील याच्या विचारविनिमयासाठी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो असे सांगीतले . छत्रपती शाहू राजांची मान्यता मिळाल्यावर ते मुंबाईला निघून गेले. शंकराचार्य ,काशी ,वाई इ, स्वखर्चाने घेऊन येतो असे राजोपाध्ये यांनी राजांना लेखी कळवले होते. त्यास मूक संमती मिळाली. राजोपाध्ये परतल्यानंतर मधल्या ८-१० दिवसात कोणीतरी शाहू राजांचे कान भरले व राजोपाध्यांना काशी आदी हून शास्त्री लोकांना आणण्यास मनाई करण्यात आली. वर उल्लेखलेले पत्र हि राजोपाध्यांना ७-१० ऐवजी १ महिना १० दिवस एवढे उशीरा म्हणजे १८-११-१९०१ ला मिळाले.

५- मे १९०२ ला राजोपाध्ये यांनी महाराजांना पाठवलेल्या पत्राचा सारांश,

१. रा.ब.दिवाण यांस कळवले ते असे का कळवले ते समजत नाही. आपण वस्तुस्थिती सोडून कळवले हे माझे दुर्दैव आहे. ....

२.सरकरवाड्यातील हव्यकव्य कृत्ये वेदोक्त वा पुराणोक्त करायचे काम माझे नाही तर सरकारास जे विधि असतात ते सरकार नसताना मी करायचे असतात.विशेष प्रसंगी सरकार असताना मी फक्त त्यांचे सन्निध असावे एवढेच माझे काम आहे.पद्धत कोणतीही असो.

३. आजपर्यंतची वहिवाट काहीही असो, येथून पुढे सर्व धार्मिकविधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारांची इच्छा आसल्यास तसे करण्यास माझी काहीही हरकत नाही.

४.मला नेहमीच्या वहिवाटिप्रमाणे सूचना मिळाली नाही म्हणून मी हजर झालो नाही. नेहमीप्रमाणेच सूचना मिळताच मी हजर झालो हि.यावरुन असे दिसेल कि मी उपाध्यायाचे काम सोडलेले नाही.

५. काशी,नाशिक इ.क्षेत्रांकडून निर्णय आणवले पाहिजेत त्यास हुजुरांची मान्यता पाहिजे.

६.शास्त्राची अनुज्ञा आणल्याशिवाय हे काम केले( संस्कार लोप पावल्याने प्रायश्चित्त करून पुन्हा वेदोक्त पद्धत सुरू करण्यासंबंधि) तर माझेवर येथील ब्रह्मवृंदाचा बहिष्कार पडेल. मजवर बहिष्कार पडल्यास माझी हरकत नाही पण मीच बहिष्ख्रुत झालो तर धार्मिक विधी करणार कोण?

७. १५ मे ला माझ्या मुलाचे लग्न बावड्याचे जहागिरदार यांचे मुलीशी ठरले आहे. ते झाले की मी शास्त्राच्या निर्णय मिळवण्याच्या उद्योगाला लागतो, व तसा निर्णय मिळवून मी जुलै १९०२ चे आत उत्तर देतो. एखादी वहिवाट बंद पडली कि नव्याने सुरू करताना शास्त्राचा निर्णय आणवण्याव्चा पूर्वापार चालत आलेला सामान्य नियम आहे. तो या बाबत सोडून एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक कृत्ये करण्याचा प्रारंभ केला गेला यामुळे हे प्रकरण या थरावर आले हे माझे दुर्दैव आहे.

८.सरकारांच्या परंपरागत उपाध्येपणावरुन मला दूर का करण्यात येऊ नये असा प्रश्न प्रस्तुत यादित मला विचारला आहे. या प्रश्नाला सध्या एवढेच उत्तर देतो कि शास्त्राज्ञेस व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वहिवाटिस अनुसरून मी आपले काम करण्यास सिद्ध आहे तोपर्यंत हा प्रश्नच उद्भवत नाहि.

पण यावर लगेच ६ मेला तुमचे उत्तर समाधनकारक नाही असे उत्तर आले व लगेच जप्तीचा हूकुम काढला जाउन राजोपाध्येंना काढून टाकण्यात आले व जोडीला त्यांच्यावर राजद्रोह आणि क्षत्रियत्वाचा वाद उकरुन काढला असा खोटाच आरोप केला गेला. वास्तविक राजोपाध्ये यांनी उत्तर दिले त्यात हुजुरांचे घराणे क्षत्रिय का शूद्र याचा प्रश्नच उद्भवत नाही असे लिहिले होते.

मधे ३०-३५ वर्षांच्या काळात अज्ञान छत्रपतिंच्या मुंजीही झाल्या नव्हत्या. कारण सर्व कारभार इंग्रजांच्या ताब्यात होता. पण स्वत: शाहु महाराज छत्रपती झाल्यावर याच राजोपाध्यांनी शाहूंना गायत्री मंत्र दिला होता. आणि हे स्वत: महाराजांनीच एका हुकुमात मान्य केले होते. पुढे महाराज श्रावणीही करत असत. जो श्रावणी करतो त्याला वेदोक्ताचाही अधिकार असतोच असतो हे जो धर्मशास्त्र जाणतो त्यालाच कळेल. महाराजांसाठीचे सर्व श्रावणीचे विधी स्वत: राजोपाध्येच करत. या श्रावण्या जुन्या राजवाड्यात भवानी देवीसमोर होत व १६ कायदेकरी म्हणजे धर्मपंडीतहि आपल्या श्रावण्या महाराजांच्या उपस्थितीतच करत.

याचा अर्थच असा होता कि , राजोपाध्ये व अन्य पंडीतांना राजांच्या क्षत्रीयत्वाची किंवा वेदोक्ताच्या अधिकाराची कधीही शंका नव्हती. मधल्या काळात ४० वर्षे संस्कार लोप पावला होता. तो प्रायश्चित्ताशिवाय सुरू करणे हे अशास्त्रीय एवढेच राजोपाध्ये व अन्य ब्रह्मवृंदाचे म्हणणे होते. आणि शास्त्राला ते धरुनच होते.

१९१२ ला तंजावरच्या वारसा हक्काबद्दल वाद निघाला असता शाहू राजांनी अर्ज केला. एकूण २४ हक्कदार होते. या खटल्यात खालच्या कोर्टाने तंजावर वंश हा धर्मशास्त्र दृष्ट्या संस्कार न केला गेल्याने (लग्न ,मुंज सारखे) शूद्र ठरवला व धर्मशास्त्र दृष्ट्या धर्मपत्नी नसलेल्या व्यक्तीचा अधिकार मान्य केला. यावर शाहु राजांनी अपिल केले व आपल्या घरात कित्येक वर्षे वेदोक्त विधी बंद होते म्हणून आपणही शूद्र आहोत असा मुद्द्दा मांडला. मद्रास हायकोर्टातून निकाल आला. कोल्हापुरचे वेदोक्त प्रकरणही हायकोर्टात निघाले.. ब्राह्मण ज्या पद्धतीने विधी करतात तोच महाराजांना हवा होता. शककर्त्या शिवरायांचाही तसा आग्रह नव्हता. क्षत्रियांस उचित असे विधी गागाभट्टांनी ठरवले त्या प्रमाणे विधी होत. त्यास व प्रायश्चित्तास कोल्हापुरचे महाराज तयार होते तर वाद तेव्हाच मिटला असता .

"तेव्हा क्षत्रिय संभाळणे हे मुख्यत: यजमानांच्याच हाती आहे.कोल्हापुरच्या महाराजांनी त्यात चूक करून पुन्हा उपाध्यायाला आपल्या म्हणण्याप्रमाणे वाकवण्यासाठी कामावरुन काढून टाकले व जप्ती आणण्याचा अन्याय केला " असा अप्रत्यक्ष शेरा मद्रास च्या हायकोर्टाने मारला. शिवरायांप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन वेदोक्त विधी सुरू करावेत काही काळ विधी केले नाहीत म्हणून त्यांचे क्षत्रियत्व रद्द होत नाहि व ते शूद्र ही ठरत नाहीत असे कोर्टाने सूचित केले.

मद्रास हायकोर्टाचा निकाल सुमारे २२५ पानांचा असून तो इंडियन लॉ रिपोर्टरच्या मद्रासच्या १९२५ च्या vol x L VIII मधे दिलेला आहे. सर्वांत गंमत हि की क्षत्रीयत्वासाठी भांडणार्य़ा महाराजांनी ब्राह्मणांप्रमाणे वेदोक्त विधी सुरू केले. ते अद्याप तसेच चालु आहेत. हायकोर्टात मधे काही काळ मुंजी वगेरे वेदोक्त विधी झाअले नव्हते असे पुराव्यातून निष्पन्न झाले त्यामुळे कोल्हापुर घराणे क्षत्रिय का शूद्र याचा निर्णय देऊ नये अशी विनंती राजांतर्फे करण्यात आली. तशी नोंद निकालात स्पष्टपणे करण्यात आली आहे. महाराजांच्या मृत्युनंतर धर्मविधींपुरते छत्रपती ब्राह्मण पद्धतीने वेदोक्त करतात व त्यापुरते ते ब्राह्मण झालेत आणि हे त्यांनी सुरू केलेले ब्राह्मण पद्धतीचे विधी मराठा पुरोहित करतात.

१९१८ ला युवराजांचे लग्न सयाजीरावांच्या नातीशी ठरले. त्यांनी आवश्यक असलेले प्रायश्चित्त घ्यावे असे सुचवले. ७५ वर्षात कोल्हापुरच्या औरस वारसाचा विवाह होणार तेव्हा परंपरेप्रमाणे पहिले केळवण राजोपाध्ये यांचे व्हायचे. त्याप्रमाणे राजोपाध्येंना राजांचा निरोप गेला. पण राजोपाध्ये यांनी मी आता राजोपाध्ये नसल्याने ते शक्य नाही असे कळवले. तेव्हा राजे स्वत: त्यांना भेटले.शेवटि केळवण हि झाले. रितसर प्रायश्चित्त ही राजांनी घेतले. राजोपाध्येंच्या व त्यांच्या मुलाच्या देखरेखीखाली सर्व विधी कोल्हापुर व बडोदे येथे झाले. त्यावेळी १६ कायदेकरी ब्राह्मणांपैकी एकाने आपले जप्त उत्पन्न सोडावे म्हणून अर्ज केला तो मन्य झाला. सर्वांची उत्पन्ने सोडण्याचे मान्य करून छत्रपतींनी आपल्या मनाचा थोरपणा दाखवला. मात्र राजोपाध्ये आणि अन्य ब्राह्मणांनी आमची चूक नसता आम्ही अर्ज का करावा अशी भूमिका घेतली व अर्ज केले नाहीत .पुढे महाराजही हि गोष्ट विसरले व कोणाचीही उत्पन्ने सुटली नाहित.

केसरीचा राजोपाध्येंना सल्ला काय होता?

"...कोल्हापुर येथले राजोपाध्ये यांच्या मूळ सनदा कशा आहेत ते आम्हाला बरोबर माहित नाही. - राजोपाध्ये यांना आमची सूचना आहे की महाराज परत आल्यावर त्यांचे पुढे हे प्रकरण पुन्हा मांडावे व निस्पृह रितीने त्यांची समजूत घालण्याची खटपट करावी आणि ते नच जुळले तर हे प्रकरण इंग्रज सरकार कडे न्यावे. दिवाणी किंवा फौजदारि हक्क देणे ही राजांच्या खुषीतील गोष्ट आहे. पण मामुल वहिवाटीप्रमाणे उपाध्येपण करण्यास तयार असता इनाम गाव काढून घेणे महाराजांच्या खुषीतील अधिकारातील गोष्ट नाही."

राजोपाध्ये हे नामदार गोखले यांचे वर्गमित्र असून राजकिय दृष्ट्याही टिळक पक्षिय नव्हते. टिळकांचा त्यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. केवळ जी माहिती उपलब्ध होत असे त्यातून टिळकांनी भूमिका मांडली. त्यात विधायक सुधारक आणि न्यायाची बूज राखणे एवढाच आधार होता.

इंग्रजांची भूमिका

परंतु राजोपाध्यायांनी टिळकांची सूचना न मानता छत्रपती येण्याअगोदरच राजांनी लंडनला जाण्यापूर्वी नेमलेल्या संस्थानाच्या काळजीवाहू कौन्सिल कडे जप्तीच्या फेरविचारासाठी अर्ज केला. कौन्सिल ने तो फेटाळला. त्यवर राजोपध्ये यांनी तो संस्थानच्याच पोलिटिकल एजंट कडे अपिल केले. एजंट ने महाराजांच्या अखत्यारीतला विषय म्हणुन नाकारले. शेवटि राजोपाध्ये यांनी मुंबईच्या गव्हर्नर कडे अर्ज केला. त्यावेळी लॉर्ड नॉर्थकोट हा गव्हर्नर होता. त्याने प्रथम राजोपाध्ये यांच्या बाजूने निकाल दिला. तेवढ्यात शाहु राजे लंडनहून परतले व त्यांनी गव्हर्नरची भेट घेऊन हा निकाल फिरवायला लावला. हा निकाल महाराजांच्या हुषारीमुळे फिरला असे त्यांचे पहिले चरित्रकार कोल्हापुरचे दिवाण लठ्ठे यांनी शाहू मेमॉयर्स भाग १ पृ २०८ वर दिलेल्या टिपात म्हटले आहे.

यानंतर राजोपाध्ये यांनी व्हाइसरोय लॉर्ड कर्झन कडे अर्ज केला. पण २-३ वर्षे फ्रेजरने तो दाबून ठेवला. ५-०१-१९०५ ला नामदार गोखले यांच्या सांगण्यावरुन उपाध्यायंनी पुन्हा अर्ज पाठवला. तेव्हा सर्वच कागदपत्रे मागवली गेली. त्यावर फ्रेजर ने एक टिपण करून पाठवले त्यावरुन इंग्रजांनी जातीय वाद वाढवणे , कर्झन विरुद्ध फाळणीविरुद्ध टिळकपक्षीयांनी उठवलेल्य रानाला खीळ घालणे व फॊडा आणि झोड या कुटिल राजकारणाचा डाव खेळणे कसे साध्य केले ते दिसेल.

या टिपणाच्या सुरुवातीला आलेल्या वाक्यांचा भावार्थ - " मी या केसचा विचार करताना मझे एकेकाळचे पाल्य म्हणून शाहू छत्रपतींकडे ओढा असल्याने त्यांचा पक्षपती म्हणून विचार करत आहे हे कबुल करतो."

याच टिपणात फ्रेजर म्हणतो, " सनदेच्या अर्थासंबंधि शंका असेल तर मला वाटत की राजकारणाच्या दृष्टिने आपण याचा विचार केला पहिजे. जर राजोपाध्येला पूर्ण चेचला नाही तर सरकारची इभ्रत जाईल आणि महाराजांचा पराभव होईल."

अशा प्रकारे हा न्यायाचा प्रश्न न रहाता इंग्रजांची इभ्रत व राजकारण यांचा प्रश्न झाला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला खतपाणी घालून ,फोडा अणि झोडा चे तंत्र येथेही इंग्रजांनी वापरायचे ठरवले.

राजोपाध्ये कर्झनला पाठवलेल्या पत्रात म्हणतात, "वेदोक्ताची चळवळ या नावाने काही उपद्य्वापी लोक समाजात विसरल्या गेलेल्या जातीय तेढी पुन्हा पेटवून स्वत:चा फायदा होतो का ते पहत आहेत. लावालाव्या करून चुकीचे अर्थ सांगून छत्रपतींचे मन कलुषित केले गेले आहे. राजांविषयी आदर राखुन मी सांगूतो की याने अन्यायकारक सामाजिक बिघाड झाला आहे."

"राजोपाध्यायांनी महाराजांना शूद्र म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हटले " असा खोटा प्रचार जाधव व अन्य सत्यशोधकांनी केला. ब्रिटिशांनी टिळक पक्षियांवर सूड उगवण्यासाठी त्यास उचलून धरुन ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वादाला खतपाणी घातले. ब्राह्मण वर्गाला अन्य समाजापासून फोडायचे त्यांना राजकारणास फायद्याचे होते. असे असले तरी इंग्रजांना हा वाद जातीय नाही हे माहित होते. याबाबत हिंदुस्तान सरकारच्या सेक्रेटरीला मुंबई सरकारचा सेक्रेटरी सी.एच.हिल याने ३ मार्च १९०५ ला एक पत्र लिहिले त्याच भावार्थ,

"कोल्हापुरचे महाराज हे क्षत्रिय आहेत हे राजोपाध्ये पत्रातच म्हणत आहेत.आणि ते तसे म्हणत नाहित असे म्हणण्याचा काहिंचा प्रयत्न या वादाच्या मूळाशी आहे. राजोपाध्ये ४ थ्या उतार्‍यात म्हणतात, मराठी राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या वेळेपासून कोल्हापुरचे राजघराणे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार आहे , त्यात कोणताही वाद नाही."

समाजात जातीय गैरसमज पसरवण्याचे कार्य त्यांनी पद्धतशीर पणे केले. आणि शाहू महाराज आणि त्यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांनाही या वादात काहीही संबंध नसताना गोवले गेले. मूळ काय आहे हे न वाचताच अद्यापहि या प्रकरणला जातीय रंग दिला जातो..भले भले लोक याला बळी पडतात तर सामान्यांची काय होत असेल अवस्था?.

संदर्भ :- वेदोक्त ,शाहूमहाराज आणि टिळक, लेखक: कै.ग.रं.भिडे (कोशकार भिडे)


संदर्भ :- वेदोक्त ,शाहूमहाराज आणि टिळक, लेखक: कै.ग.रं.भिडे (कोशकार भिडे)


मुखपृष्ठ
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-१

वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-२
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-३
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-४


टिळकांचा शाहूंच्या अभिनंदनाचा लेख: करवीर क्षेत्री राजकिय कपिलाषष्ठीचा योग


सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...