Friday, March 31, 2017

मानससरोवर यात्रा

हज यात्रेला मिळत असलेली सबसिडी बंद करण्याचा निर्णय परस्पर घेणे योगी आदीत्यनाथांच्या हाती नसला तरी मानस सरोवरासाठी सबसिडी देण्याची त्यांनी घोषणा केली आहे, हि एक चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकारने काही वर्षांनी योग्य वेळ येताच वाटल्यास सर्वच बंद करावे. पण आता मानस सरोवर यात्रेला जास्तीत जास्त हिंदुंनी जावे.
अर्थात हि यात्रा काही सोपी नाही. हि यात्रा करण्यास फिटनेस अर्थातच महत्वाचा असतोे, त्या वाचून यात्रेकरु होण्यास परवानगीच मिळत नाही. मानस सरोवराचे सौंदर्य अप्रतिम आहे. आपला एक सांस्कृतिक , धार्मिक आणि राष्ट्रिय सीमावर्ती विभागातला ठेवा, स्वातंत्र्यानंतर आपणास लाभलेल्या व आपण निवडलेल्या ढिसाळ नेतृत्वामुळे आपल्या हातातुन गेल्याचे दु:ख होते.
या यात्रेचा आणि सबसिडिचा काही हिस्सा चीनला जात असला तर ते पाप जुन्या राज्यकर्त्यांचे आहे. ज्यांना हा हिस्सा चीनला जातो आहे म्हणून दु:ख होते त्यांनि चीनी मालावर बहिष्कार घाला म्हणुन प्रचार करणे , व स्वत:ही तो अमलात आणणे हे जास्त व्यावहारीक आहे. चीनला यात्रेतुन जाऊ शकणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा चीनी मालामुळे जातो आणि देशी उद्योगांवर मंदीची सावट येते ते वेगळेच. यात्रेविरुध्द बोलणाऱ्या बुध्दीवाद्यांनी जरा तिकडे लक्ष द्यावे ! काही खर्च हे आवश्यक असतात. यात्रेवर खर्च होणारा पैसा हा वाटल्यास संरक्षणासाठी असलेल्या बजेट मधला एक भाग समजावा.
मुळात मानस सरोवर हा केवळ धार्मिक उपचार नाही. धर्मा बरोबर संस्कृती व राष्ट्रिय विचार सुध्दा त्यामागे आहे. केवळ हज यात्रेला counter attack एवढ्याच परिप्रेक्षात त्या कडे पाहु नये. हाज ला जाऊन आला की हाजी हि उपाधी मिळते तस काही मानस सरोवर यात्रेला धार्मिक महत्व नाही. हि यात्रा मुख्यत: सांस्कृतिक आहे हे लक्षात ठेवावे. तसेच ते आपल्या मुळ व प्राचीन सीमांची स्मृती जपणे पण आहे. अशा महत्वाच्या जुन्या सांस्क्रुतिक ठेव्यांना हिंदु समुहाने भेटी दिल्याने हिंदुंची तिथे वहिवाट रहाण्यास सहाय्य होते. किंबहुना अशा प्रकारे सीमांवर हेतुत: यात्रा व देवस्थाने बांधली जातात, याने तो भाग दुर्लक्षित होत नाही. बहुदा आपल्या जुन्या कौटील्यादी राजनीतीचा हा एक भाग आहे, जास्त शोध घ्यावा लागेल.
सीमेवरची देवस्थाने आणि यात्रा या आपल्या सीमांवर नागरीक व शासन दोघांचे लक्ष व टेहेळणी करण्यास उपयोगी पडतात. तीर्थयात्रांच्या निमित्ताने होणारे दळणवळण शत्रूच्या हालचालींवर दृष्टी ठेवते. कारगीलच्या वेळी ये जा करणाऱ्या मेंढपाळांमुळेच पाकिस्तानच्या हालचाली कळल्या. तीर्थयात्रा या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व राष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा असतात.नुसतच बुध्दीवादाची टिमकी वाजवून इहवादी राष्ट्रवाद सिध्द होत नाही. इहवादाचा अतिरेक हा एकांगी विचार आहे हे सावरकरांना चांगलेच माहीत होते.
सावरकरांनी मानससरोवर यात्रेला नेहरुंनी जो काही अटकाव केला होता, व एकुणच सीमाभागाकडे जे दुर्लक्ष केले होते त्यावर आपल्या स्वत:च्या शेवटच्या जाहीर भाषणात टिका केली होती. आज सावरकर हयात असते तर त्यांना योगींच्या निर्णयाचा एक पहिल सकारात्मक पाऊल म्हणुन आनंदच वाटला असता.
समग्र सावरकर साहित्य खंड ८ प्रकाशन वर्ष १९९३ स्फुट लेख पृ. ६२ ची ही छायाप्रत

 © चंद्रशेखर साने

"...नेहरुंनी चीनला सांगितल की, त्या टोकापर्यंत तुम्हाला काही त्रास देणार नाही. म्हणून चीनने आज मानस सरोवर घेतल. या मानससरोवरावर कालिदासान कविता लिहील्या, ज्यात आमच्या देवांगना न्हाल्या त्या मानससरोवराची यात्रा करु नका म्हणतो. कारण नेहरु सांगतो, तिकडे दंगल आहे आणि हजची यात्रा सोपी जावी म्हणून त्याचे पैसे आमच्या राज्यातून दिले जातात. तुमच्या आमच्या करातून त्यांच्या हज्जच्या यात्रा होतात आणि मानस सरोवराची यात्रा करु नये कारण तिकडे दंगल आहे. अरे ! दंगल आहे तर इथुन सैन्य पाठवून दे. काय करताहेत या ठेवलेल्या सेना? पण तुम्हाला सांगतो, सेनेला दोष देऊ नका ! अगदी योग्य आहे आजची सेना...."

- स्वातंत्र्यवीर सावरकर पुणे येथील भाषण मे १९६१
समग्र सावरकर खंड ८, स्फुट लेख पृ . ६२

 

Thursday, March 30, 2017

आज कै. श्री. ग.वा.बेहेरे यांचा स्मृतीदिन

माझी बेहेरेंबरोबर दोनदा भेट झाली. माझे काही लेख / पत्रे त्यांनी छापलीही होते. सोबत मधुनच माझा सावरकर सिनेमाच्या संदर्भात श्री. सुधीर फडक्यांशी थोडासा वादविवादही झाला होता. मी बेहेऱ्यांची एकदा त्यांच्याच कार्यालयात भेट घेतली होती. मी ज्यांच्या ओळखीने आणि ज्या संदर्भात त्यांना प्रथम भेटलो होतो, त्यांच्याशी बेहेऱ्यांचा विसंवाद होता. ते मला त्यावेळी माहीत नव्हते. त्यामुळे आमची भेट फारशी सुखावह झाली नाही. मला लेखनाला फारसे प्रोत्साहनही त्यांनी दिले नाही. पण माझा बेहेऱ्यांविषयी आदर कायमच होता. पण त्यावेळी मी दिलेला लेख काही सोबत मध्ये छापुन आला नाही, पण नंतरचे छापुन आले.

दुसऱ्यांदा भेट झाली ती सातारच्या सावरकर साहित्य संमेलनात. ती भेट ५-१० लोकांच्या गराड्यातली होती. साताऱ्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबरोबर एकाच व्यासपीठावर भाषणे केली होती. संमेलनात आणि नंतर सार्वजविक सभेत. सातारचे दैनिक "ऐक्य" बहुदा त्याच दिवशी सुरु झाले होते. महाराष्ट्रातले वातावरण हिंदुत्वाने भारले जाऊ लागले होते.

त्यांची भाषणं लेखणीप्रमाणेच प्रभावी वाटलीे. संमेलनात जेव्हा थोडी बेशिस्त माजली तेव्हा त्यांनी माईक हातात घेतला आणि एकाच मार्मिक वाक्याने सुव्यवस्था केली होती. सगळे लोक विस्कळीत कसेही बसले होते. वारंवार आवाहन करुनही लोक अधल्या मधल्या जागा, खुर्च्या मोकळ्या सोडुन बसले होते. बेहेरे माईक हातात घेऊन , "एकंदर हिंदु समाजप्रमाणे विस्कळीत होऊन बसु नका" अशा स्वरुपाचे कोणतेतरी वाक्य बोलले. इतका वेळ न ऐकणारे कार्यकर्ते व श्रोते ताबडतोब उठुन शिस्तीने बसले होते.

सोबत हे केवळ साप्ताहिक नव्हते तर वैचारीक व्यासपीठ होते जिथे सगळ्या विचारांना मुक्त संचार होता. अनेक वेगवेगळ्या विचारांचे लेख वाचण आणि मनसोक्त वादविवाद होण हे त्या व्यासपीठावर होत. अर्थात स्वत: बेहेरे हिंदुत्ववादी असल्याने साप्ताहिकावर छाप हिंदुत्वाचीच होती, पण इतरांचा आवाज कधीच दाबला गेला नाही. विरोधी टिका सर्रास पणे सोबत मध्ये छापुन यायची. शुध्दलेखनातल्या चुका सोडल्या तर श्री. बेहेरे यांनी कोणाचे विचार संपादीत केले असतील याची शक्याताच नाही. साप्ताहीक ९० % वाचक/वर्गणीदारांवर चालायचे. एखादीच जाहीरात मिळायची.

हिंदुत्व , बाळासाहेब आणि शिवसेना यांच्याशी जवळीक त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी चांगलीच भोवली. महात्मा फुले यांच्यावर दोन लेख चुकीच्या पध्दतीने छापले गेल्याने पवारांना संधीच मिळाली. हे असे लेख छापल्याबदाल मी गांगल - बेहेऱ्यांचे आभारच मानतो असे छद्मी उद्गार काढुन पवारांनी बेहेरे-गांगलांवर विधानसभेत हक्कभंग ठराव आणला व त्यांना माफी मागायला लावली होती. त्यावेळी बेहेरे हॉस्पिटल मध्ये आजारीच होते. प्रकरणावर माफीने पडदा पडला व पुढे लवकरच बेहेरे गेले.

ते गेल्याची बातमी सकाळ ने सविस्तर दिली होती. पण महाराष्ट्र टाईम्स ने अक्षरश: दोन ते तीन ओळीत कुठेतरी आतल्या पानावर छापून आल्या मनाचा हिमटेपणा दखवुन दिला होता.

साप्ताहीक सोबत हि एक विचारांची सोबत होती. अंक हातात पडल्यावर प्रथम बेहेरे यांचे संपादकिय वाचायचे. एका बैठकित संपुर्ण अंक कधीच वाचून व्हायचा नाही. किमान तीन ते चार दिवस तरी लागायचे. कारण सगळेच लेख वैचारीक आणि वाचनीय. कम्युनिस्ट, सोशॅलिस्ट सगळ्याच प्रकारचे लेखन त्यात येई.
विचारांचे बळ, सर्व विचारांना व्यासपीठ देणारे, उजव्या विचारसरणीचा द्वेष करणाऱ्या तथाकथित विचारवंतांनी अनुल्लेखाने मारले तरी सातत्याने लिहिणारे, विना जाहीराती, केवळ वर्गणीदारांच्या बळावर, एकहाती साप्ताहिक चालवणारे पत्रकार आता होणे शक्य नाही.

 © चंद्रशेखर साने

March 30 at 9:57am
 

Wednesday, March 29, 2017

सरसंघचालक का राष्ट्रपती?


सामनाचे पत्रकार व कार्यकारी संपादक राऊतांनी भागवतांचे नाव राष्ट्रपती पदा साठी सुचवणे किंवा परवा माझ्या फेसबुक वॉल वर येऊन ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश अकोलकर यांनी येऊन असंबध्द पध्दतीने मूळ विषयाचे विषयांतर करुन "मग करा ना भागवतांना राष्ट्रपती" हे पालुपद वारंवार आळवणे या सगळयाची मजा वाटते.

ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि त्यांच्या कार्यपध्दतीचे कणभरही ज्ञान आहे, त्यास, भागवतांना संघाने राष्ट्रपतीपदासाठी निवडणे अथवा भागवतांनी ते स्वीकारणे अथवा या सुचनेमुळे सर्वसामान्य संघस्वयंसेवक सुखावला असेल अस वाटण हे सगळच असंभव होते.

संघस्वयंसेवकाला भागवत राष्ट्रपती होणे अथवा न होणे यावर विशेष काही स्वारस्य असेल अस कुठेही जाणवल नाही. त्यांनी तशा काही भावना प्रकट करण हा त्यांचा स्वभावही नाही.

ज्यांच सगळ राजकारण आणि आयुष्यच पदांभोवती फिरत असत , त्यांची विचारांची झेपच मुळात तितकी तोकडी आहे , ज्यांना संघाचा राजकारणात सहभाग नाही हेच मान्य नाही ते असे तारे तोडत असतात. त्यात राऊत काय अकोलकर काय पत्रकारच, तेव्हा सध्याच्या पत्रकारांची पत्रकारीता पहाता जिथे ते जनमताचा अंदाज घेण्यात ते वारंवर असफल रहात आहेत तिथे त्यांना संघ स्वयंसेवकांच्या मनाचा अंदाज यशस्वीपणे बांधण्याचा प्रश्नच येत नाही.

हे असे पत्रकार वगळता, भागवत राष्ट्रपती होणार का वगैरे चर्चा सोशल माध्यमांवर पण अजिबात रंगली नाही.
संघाची सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणारी माणस घडवण्याची शाळा आणि सेवाकार्य हे अखंड चालत राहील. तो समाजाचा गोड्या पाण्याच्या तळ्याचा किंवा मनुष्यवस्तीतून प्रवाहित होणाऱ्य महानदीचा एक शुध्द पाण्याचा नैसर्गिक झरा बनावा अशी त्याची स्थापना करणाऱ्यांची इच्छा होती. संघटना कशासाठी याचे उत्तर संघटनेसाठी संघटना असे रुढ झाले. क्रांतीकारक अथवा क्रांतीकारी संस्था नष्ट होऊ शकतात. उत्क्रांतीकारी शिकवण आणि संस्था किंवा व्यक्ती काम करत रहातात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही समाजमनाला धक्का लावणारे क्रांतीकारी कार्य करणार नाही. संघटना कशासाठी? माणस घडवण्यासाठी. माणस घडवताना ज्या समाजातुन माणस येतात, मिळवायची असतात, संघकार्याशी जोडुन घ्यायची असतात, त्या समाजाला क्रांतीकारी धक्के द्यायचे नसतात हे अगदी साध गणित आहे. धक्का देताना आपली ताकद किती याच अचुक अंदाज घ्यावा लागतो. नाहितर क्रांतीच्या त्या नुसत्याच वल्गना ठरतात. व्यक्तीची वल्गना व्यक्तीची प्रतिमा उध्वस्त करते तर संस्थेच्या वल्गनांनी समाजात संस्थेची पत खालावते.

संघ कधीही राजकारणात येईल अशी शक्यता नाही. संघ ही एक अखंड चालणारी माणसे घडवणारी प्रक्रिया आहे. यात माणसे घडतील , वेगवेगळ्या क्षेत्रात जातील, क्वचित बंगारु लक्ष्मणांसारखे काही नापासही होतील तर काही वाजपेयी मोदींसारखे काही खूप मोठया भराऱ्या घेतील आणि संघाचा ठसा समाजावर ठाशिव पणे उमटवत जातील.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघ कधीही स्वत:च्या अंगाला राजकारणाचा चिखल लावुन घेणार नाही असा माझा विश्वास आहे.

 आज श्री. भागवतांनीच स्पष्टपणे या अनावश्यक व कोणी फारशी दखल न घेतलेल्या चर्चेवर पूर्ण पडदा टाकला हे बरे झाले.

© चंद्रशेखर साने

Tuesday, March 28, 2017

हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा

हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा असा मुद्दाम हिंदु शब्दाचा उल्लेख करावा का न करावा? जर आपण १ जानेवारीला ख्रिश्चन नव-वर्षाच्या शुभेच्छा असा उल्लेख करत नसु तर मुद्दाम हिंदु नववर्ष असा उल्लेख का करायचा? नुसताच नववर्षाच्या शुभेच्छा एवढच का म्हणु नये, असा काहिंचा प्रश्न आहे . गुढी पाडवा हे नुसत मराठी नववर्ष म्हणण तर त्याहून जास्त चुक आहे. मराठी असण्या नसण्याशी याचा संबंध नाही. १ मे हा महाराष्ट्र दिन (किंवा जागतिक कामगार दिन) तस गुढी पाडवा फक्त महाराष्ट्राशी संबंधित नाही.

पण व्यवहारात जोपर्यंत १ जानेवारी हा नविन वर्षाचा प्रारंभ मानला जातो तोपर्यंत आणि त्यामुळे हा हिंदु नववर्षाचा म्हणावे लागेल. वस्तुत: निसर्गचक्राप्रमाणे सुर्याचा मेषेतला प्रवेश, वसंत संपात हेच वास्तविक नववर्ष मोजण्यास प्रारंभ करायचा दिवस. त्यामुळ गुढी पाडवा हा अगदी शास्त्रशुध्द नैसर्गिक दिवस.

अगदी जगभर हिच नैसर्गिक पध्दत नववर्षारंभासाठी होती. कारण पुर्वी म्हणजे १६ व्या किंवा १७ व्या शतकापर्यंत चैत्र गुढीपाडव्याच्याच सुमारास येणारा १ एप्रिल हाच नविन वर्षारंभ युरोपचाही होता. नंतर एका राजाने तो बदलुन १ जाने वारी केला.पण या बदलानंतर सुध्दा जुन्या पध्दतीने १ एप्रिल हा नववर्षदीन म्हणून साजरा करणाऱ्या युरोपिअन लोकांना व त्यानिमित्ताने एकमेकांना भेटवस्तु देणाऱ्या लोकांना "एप्रिल फुल" म्हणजे १ एप्रिल ला नववर्ष साजरा करणारे मुर्ख म्हणवले जाऊ लागेल.

आजही एकमेकांना १ एप्रिल ला मुर्ख बनवण्याचा उपक्रम गमतीचा भाग म्हणून साजरा होतो. मात्र १ एप्रिल अजून तरी नविन आर्थिक वर्ष म्हणून आहेच.

हा तिथी , दिनांक , वेगवेगळी पंचांगे, वेगवेगळ्या कालगणना यांचा घोळ कधीही संपेल असे वाटत नाही. टिळक पंचांगवाले गुढी पाडवा कधी साजरा करत आहेत हा अजुन एक घोळ. बहुतेक येत्या १५ दिवसात कधीतरी त्यांचा गुढी पाडवा साजरा होईल. कारण टिळक अयनांश आणि चित्रापक्षाचे अयनांश यात चार अंशांचा फरक आहे.

व्यवहारातले १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हे कालमापन आता बदलले जाईल असे वाटत नाही. तस बदल, तशीच काही मोठी, विश्वव्यापी घटना घडली तरच संभवतो.

© चंद्रशेखर साने
Like
C

गुढी पाडवा प्राचीन उत्सव


गुढी पाडवा काश्मिरात हिंदुंच्या तुर्कांवरिल विजयाप्रीत्यर्थ साजरा होई असा स्पष्ट उल्लेख अल्‌बेरुनी हा अरबी प्रवासी , लेखक आपल्या प्रवासवर्णनात सन १००० ला इतक्या जुन्या कालात करतो . "अगडुस" असा शब्द वापरलेला दिसतोय त्याला उच्चार करता आला तसा. तरीही जो अपप्रचार होतो त्याविषयी काय बोलायच कप्पाळ. सण जुना तर आहेच पण अगदी काश्मिरात पण साजरा केला जाई. महाराष्ट्राबाहेर हा सण साजरा होतो आजही.

अल्‌ बेरुनी चा जीवनकाल 4 September 973 ते 9 December 1048
म्हणजे किमान १००० वर्षे हा सण साजरा होत असल्याचा ऐतिहासिक पुरावा सिध्द झाला.
महाराष्ट्राबाहेर काश्मिरलही होत असल्याचे सिध्द झाले
तुर्कांवरील म्हणजे मुसलमानांवरील विजयाचे प्रतिक असल्याचे सिध्द झाले.

अगुडस हा शब्द नेमका कळत नाही पण गुढीशी साधर्म्य आहे. कर्नाटक, तामिळनाडु इ/ ठिकाणि उगडी या नावे हा साजरा करतात,

अर्थात शब्द काय हा विषय इथे गौण आहे. कारण मुट्टाई राजा या उच्चारालाही काही अर्थ नाही. लेखक परकिय असल्याने चुकिचे उच्चार सर्रास आढळतात. (तपशील राजतरंगिणीत शोधावा लागेल . राजतरंगिणी हा काश्मिरचा अधिकृत व समकालिन इतिहा स आहे. कल्हण पंडीत , जोनराज असे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या काळात हा इतिहास लिहिला आहे. )

मी हा स्क्रीन शॉट त्याच्या online उपलब्ध असलेल्या पुस्तकातुनच घेतलाय.

इतरांनीही इतके वेगवेगळे पुरावे दिलेत कि हिंदुद्वेष्ट्यांचा हा हिंदुद्रोही कार्यक्रम संपुर्ण गाडला गेला आहे. परत पुढच्या वर्षी पाडव्याला या अपप्रचाराने डोके वर काढता येऊ नये.

शहाण्याला शब्दाचा मार....

एखाद्या थोरामोठ्याचे, व्यक्तीचे चार-दोन शब्द पकडुन त्याच्या समग्र विचारविश्वाच आकलन किंवा चरित्र वा कार्य यांचा निष्कर्ष काढायचा नसतो.

विशिष्ट वाक्य अथवा वाक्यांचा समूह पकडुन आकलन करताना, ती वाक्ये कोणत्या संदर्भात आहेत कोणाला उद्देशुन आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत त्याचा विचार करायचा नाही आणि त्या व्यक्तीवर आपल्या सोयीचा शिक्का मारायचा, सोयीप्रमाणे वापरायचे किंवा वैचारिक प्रतिस्पर्ध्याला आपण कसे नामोहराम केले अशा आविर्भावात ती वाक्ये फेकत रहायची हा पायंडा पडत चालला आहे.

आपण साधी माणस सुध्दा प्रसंगानुरुप बोलतो. मुलांना तु लहान आहेस तुला नाही कळायच अस एका प्रसंगात म्हणतो आणि कदाचित तासाभरातच अरे तु मोठा झालास जबाबदारीने वागायला हवस असही म्हणतो. कारण देश - काल- परिस्थिती चे संदर्भ असतात. तो दुटप्पीपणा नसतो. मोठ्या व्यक्तींना तेच लागु आहे. विभिन्न परिस्थिती आणि विभिन्न माणसे हाताळताना त्यांच वागण , विचार व उपदेश वेगवेगळे असतात.

थोरा मोठ्या व्यक्तींना आपल्या पेक्षा कितीतरी मोठ्या प्रसंगांना , विविध वयोगटांना, विचारगटांना अथवा समाजगटांचे भान ठेवायचे असते. वाचकांचे वा श्रोत्यांचे वय लक्षात घेऊन बोलायचे असते. एकच विषय मांडताना तो शालेय विद्यार्थ्यांसमोर मांडतोय ,समोर महाविद्यालयीय विद्यार्थी आहेत, स्त्रियांसमोर आहे, परत त्या स्त्रिया कोणत्या समस्या घेऊन समोर मार्गदर्शनाच्या अपेक्षेने उभ्या आहेत, का परधर्मिय अनुयायी वा समर्थक समोर असून असून त्यांचे शर्करावगुंठीत प्रबोधन करायचे याचा विचार करावा लागतो.

शहाण्याला शब्दाचा मार व मुर्खाला काठीचा मार अशी एक म्हण आहे. वैचारीक विश्वात अशा स्वरुपाच्या अभ्यासाचे भान मोठमोठ्या विचारवंतांकडुन सुटत चालले आहे. अशावेळी अजेंडा सत्यशोधनाचा नसून वादात जिंकुन प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबून करायचे हा त्यांचा हेतु असतो हे उघड आहे. अशाने विचारवंताचे रुपांतर विचारजंतात झाले असे म्हटले जाते.

© चंद्रशेखर साने

Monday, March 27, 2017

जीना हाऊस: द्विराष्ट्रवादाचे स्मारक

खरतर कोणतीही ऐतिहासिक वास्तु ची नासधुस करण, तिच्यावर राग काढण मला योग्य वाटत नाही. त्यामुळे जीना हाऊस ला धक्का पोचवु नये अस तात्विक मत आहे.

पण ज्या प्रकारे भारतात ढिलाई चालते ती पहाता हा कळीचा मुद्दा नक्कीच बनतो. शिवाजी महाराजांनी मरणान्तानी वैराणी या हिंदु धर्मनीतीस अनुसरुन, रावणाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या आदर्श श्रीरामाच्या पावलावर पाऊल टाकून अफजलखानाचे त्याच्या त्याच्या धार्मिक कल्पने प्रमाणे योग्य ते विधी करवुन घेतले. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे थडगे बांधले का नाही हा मुद्दा तर ऐतिहासिक दृष्ट्या वादग्रस्तच आहे. तसा समकालिन पुरावा उपलब्ध नाही.

१९३५ पर्यंत ती एक साधी कबरच होती असे उपलब्ध छायाचित्रावरुन दिसते. पण आता त्याचे फार मोठेे अवडंबर झाले आहे. एका किरकोळ झोपडिवजा थडग्याचे प्रचंड मोठ्या दर्ग्यात रुपांतर झाले आहे. कोर्टाने आदेश देऊनही हे अधिक झालेले बांधकाम अद्यापही पाडले गेलेले नाही.
मरणान्तानी वैराणि इ. आदर्श कल्पना न बाळगता ब्रिटीशांनी शनिवारवाडा अथवा गडकिल्ले यांना भारतीयांना प्रेरणा ठरतील अशी स्मारके बनवु दिले नाही. उलट अशा स्मारकात पण जातीवाद आणणारे घटक पेरुन ठेवले जेणे करुन हिंदु एकत्र येऊन आपल्या सत्तेस आव्हान देऊ नयेत. अर्थात सजग झालेल्या भारतीयांनी त्याची स्मारके बनवण्याचे कार्य सुरु ठेवले.

नथुराम गोडसे यांच्या अस्थी सिंधु नदीत विसर्जनासाठी राखून ठेवाव्यात अशी त्याची अंतिम इच्छा होती. पण हि इच्छा म्हणजे मोस्ट फेव्हर्ड नेसन शी द्रोह. त्यामुळे नथुरामच्या बाबतीत मरणांतानी वैराणि वगैरे न मानता भारत सरकारने अस्थी काही नातेवाईकांना दिल्या नाहीत. ( काही जणांनी बुड्या मारुन त्या काढल्या व त्या कलाशात ठेवुन त्यांचे स्मरण केले जाते व त्या अस्थि कलशाचे पुजन केले जाते असे म्हटले जाते) त्या विरुध्द अधुन मधुन गदारोळ उठतो.

सर्वात गमतीच भाग म्हणजे नथुरामच्या इच्छे मागचे कारण पाकीस्तानने गांधीजींच्या अस्थि सिंधु नदीत विसर्जित करु देण्यास दिलेला नकार हे आहे. गांधींच्या , एका काफीराच्या अस्थि आपल्या पाक झालेल्या "दारुल इस्लाम" च्या भूमित सामावुन घेणे हि कल्पनाच पाकड्यांना घ्रूणास्पद वाटली असावी. गांधींच्या अपमानाचे जे दु:ख त्यांच्या मारेकऱ्याला झाले त्याच्या शतांशने ही दु:ख, त्यांच्या नावाची शिदोरी पुरवुन खाणाऱ्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारला झाले नाही. त्यांनी निमुट अन्यत्र अस्थि विसर्जित केल्या.
ओस्मा बिन लादेन ला अमेरिकेने ठार मारल्यावर त्याच्या शवाचा कसलाच माग न राहील याची व्यवस्था केली. म्हणजे पुढे मागे तो प्रश्नच उद्भवु नये हा बोध आजवर्रच्या इतिहासातून अमेरिकेने घेतला.
एकुण सर्व प्रकार पाहता जीना हाऊस चे रुपांतर एखाद्या सरकारी कचेरीत करावे हे व्यावहारीक दृष्ट्या योग्य ठरेल. जीनाने डायरेक्ट ऍक्शन चे निर्देश देऊन हिंदुंच्या कत्तली घडवुन आणल्या होत्या, तेव्हा त्याची स्मृती भारतात जपणे यात इतिहास प्रेम असले तरी ते राष्ट्रप्रेमाला आड येणारे आहे. हिंदुच्या सहनशील संस्कृतीची ओळख म्हणून हे ठिक असले तरी हिंदुत्वाला पोषक नाही.

जीनांच्या क्रुरतेच्या, फाळणीच्या जखमा , सिंध, पंजाब व बंगाल मधील हिदुंचा आक्रोश याचे जनकत्व जाणाऱ्या जीना हाऊस चे स्वतंत्र भारतातून नाव मिटवुन टाकले पाहिजे हे भाजपा नेत्याची कल्पना अवाजवी म्हणता येत नाही. प्रत्यक्ष इमारत न पाडता सुध्दा हे काम कसे केले जाईल याची चाचपणी केली जावी.
वरवर पाहता हि एक ऐतिहासिक वास्तु असली तरी भावनिक दृष्ट्या जीना हाऊस हे द्वीराष्ट्रवादाचे व पाकिस्तान निर्मितीचे धोकादायक स्मारक भारतात उभे आहे, ती केवळ एक वास्तु नसून द्वीराष्ट्रवादाचे प्रतिक आहे. त्याचे प्रतिकात्मक नष्टीकरण करण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे.

© चंद्रशेखर साने

Sunday, March 26, 2017

राशबेहारी बोस यांचे महत्व

राशबेहारी बोस यांचे आझाद हिंद सेनेतले महत्व वादातीत आहे. तथापी त्यांनी सावरकरांचे हिंदुत्व मान्य केल्याने आणि जपान हिंदुमहासभेचे ते अध्यक्ष असल्याने, गांधी कॉंग्रेस चे कट्टर विरोधी असल्याने व सावरकरांशी त्यांच्या असलेल्या जवळीकी मुळे एकुणच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांना गौणत्व आले आहे. आझाद हिंद सेनेचे संस्थापकच मुळात हिंदुमहासभेचे अध्यक्ष राशबेहारी बोस असून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेया ४५००० ते ५०००० सैन्याचे नेतृत्व सुभाषचंद्रांकडे, त्यांचे तरुण वय आणि तडफ यामुळे चालुन आले.

राशबेहारींचे महत्व वादातीत आहे, लॉर्ड हार्डींग्ज वर बॉम्ब टाकून पळून जाणारे राशबेहारी वृध्द झाल्याने नियतीने हे काम सुभाषचंद्रांवर सोपवले व राशबेहारी हे आझाद हिंद चे प्रमुख आजीवन सल्लागार झाले.
सुभाषचंद्रांचे कर्तुत्वाचा अभिमान बाळगत असतानाच जपान हिंदु महासभेचे अध्यक्ष राशबेहारींनी त्यांच्या
साठी ५०००० सैन्याची बेगमी आधीपासूनच करुन दिली होती ही नाकारायचे कहीच कारण नाही.

राशबेहारी हे कट्टर हिंदुत्ववादी होते , सावरकरांशी झालेल्या पत्रव्यवहारमुळे त्यांच्या हिंदुत्वाविषयी कल्पना अधिक स्पष्ट झाल्या. श्री. देशपांडे नामक तरुण मराठी सहकारी युवकामुळे त्यांचा सावरकरंच्या विचारांशी परिचय होते होता. हे देशपांडे सावरकरांचे लेखन व भाषणातील विचार राशबेहारींना भाषांतरीत करुन सांगत. राशबेहारींना सावरकर ही हिंदुस्थाना अंतर्गत असलेली महत्वाचा दुरदृष्टीचा व आंतरराष्ट्रिय राजकारणाचे सखोल ज्ञान असलेला मुत्सद्दी नेता वाटत होता.

वृत्तपत्रातून त्यांनी सावरकरांवर जपानी भाषेत लेखही लिहिला. त्याचा मथळा सावरकर- रायजिंग लिडर इन इंडीया असा होता. उठसुट हिंदुत्ववाद्यांनी काय केले असे विचारणाऱ्या बिनचड्डीवाल्यांना राशबेहारी हे नाव पुरेसे आहे. आणि हिंदुत्ववादी परिवारासाठी पण हे अभिमानास्पद नाव आहे.

ज्येष्ठ मित्रवर्य लेखक व वक्ते श्री. सच्चिदानंद शेवडे यांनी अंदमान द्वीपसमुहातील दोन बेटांना १८५७ ला भारतीयांशी कठोरपणे वागलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांची नावे आहेत ती बदलावीत अशी एक चळवळ / प्रचार सुरु केलाय. या बेटांपकी एका बेटाला राशबेहारींचे नाव द्यायची मागणी करावी असे मी सुचवतो आहे. तसच अंदमान- निकोबार या बेटांना नेताजींनी शहिद , स्वराज्य असे नाव दिले होते. ते बदलावे का नाही यावर माझे काहीच मत नाही.

 © चंद्रशेखर साने

आपली धर्मनिरपेक्षता : मौलाना चालतात , योगी नाही

मौलाना आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबेअर १८८८ या दिवशी मक्का, सौदी अरेबिया येथे झाला. संपुर्ण मूळ नाव सय्यद अबुल कलाम घुलाम मुहियुद्दून अहमेद संक्षेपाने मौलाना आझाद म्हणून ओळखले जाऊ लागले.

आझादांचे वडील हे बंगाली मौलाना सय्यद मुहम्मद खैरुद्दीन अहमेद अल्‌ हुसैनी. आझादंनी हनाफी मझहिब, मलिकी. शफी आणि हनबाली फिक्‌ह, शरियत, गणित, तत्वज्ञान, जगाचा इतिहास आणि विज्ञान आदी विषयात त्यांच्या साठी खास नेमलेल्या शिक्षकांकडे शिकुन  प्राविण्य मिळवले होते.
वयाच्या तेराव्या वर्षी. झुलेखा बेगम नामक मुस्लिम मुलीशी त्यांचा विवाह झाला. कुराण ब हदीस चा अन्वयार्थ लावणारे विपुल लेखन मौलानांनी केले आहे.

भारतात ज्यांचा जन्मही झाला नाही असे, जन्माने निसर्गत: मिळणाऱ्या नागरीकत्वाचा विचार करता अरबस्थानचे (मक्केचे) नागरीक असलेले, मुस्लिम धर्माचे मौलवी भारताचे पहिले केंद्रिय शिक्षण मंत्री होते.

योगी आदित्यनाथ हे गणिताचे पदवीधर आणि हिंदु तत्वज्ञानाचे अभ्यासक असुन नाथपंथी आहे. उत्तर भारतातलेे रहिवासी आहेत. तन मनाने हिंदुस्थानी आहेत.

मौलाना आझाद फाळणी संबंधात व हिंदु - मुस्लिम प्रश्नात किती कुटील होते त्यावर प्रा. शेषराव मोरे यांचा एक समग्र लेख आहे, म्हणजे मौलानांची तीही बाजू लंगडी आणि वादग्रस्तच आहे.

अशा मौलाना आझादांना नेहरु भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री करु शकतात तरी ते सेक्युलर आणि मोदींनी भारतातच जन्मलेल्या गणित व हिंदु धर्माचे अभ्यासक असलेल्या सलग ४-५ वेळा खासदार म्हणुन निवडुन आलेल्या हिंदु संन्यासाला मुख्यमंत्री केले तर ते मात्र भगवीकरण?

मग नेहरु धर्मनिरपेक्ष कसे अणि मोदी का नाहीत?

© चंद्रशेखर साने

Saturday, March 25, 2017

महाराष्ट्र कोणाचा? शिवाजी महाराज, आगरकर आणि सावरकरांचा !

महाराष्ट्र हा शाहु,फुले, आंबेडकरांचा असे वाक्य सुमारे १९९५ ते २०१४ पर्यंत वारंवार ऐकु यायचे. या मागचा नेमका विचार काय? मी यावर एक सविस्तर लेखन करणार आहे, पण त्यापुर्वी थोडी चर्चा करता येईल का?
माझ्या डोक्यातले मुद्दे साधारण असे होते व काल रात्री मनात सविस्तर लेखही तयार होता.
(रात गयी बात गयी म्हणून सध्या त्याचे ठळक मुद्दे मांडतो. काही स्मृतीतून निसटुन गेलेत. चर्चेच्या ओघात मांडतो, सध्या हा कच्चा लेख समजावा. तसच शाफुआ म्हणजे शत्रू नव्हेत पण त्यांच्या त्यांच्या जागी व काळाच्या गरजेप्रमाणे ते ठिक असतील काही प्रमाणात, पण महाराष्ट्राची आताची गरज शि.आ.सा.)

१. या तीनही नावात शिवाजी महाराजांचे नाव समाविष्ट का नाही?
२. या तिन्ही नावांचा भारतीय राजकिय स्वातंत्र्य लढ्याशी का संबंध नाही?
३. हे तिनही जण साधारणत: परकिय व परधर्मिय ब्रिटीश सत्तेशी चांगले संबंध राखून होते.
४. शाहुंचा अपवाद वगळता (ते हिंदु धर्मचे व वेदांचे अभिमानी) फुले यांचे हिंदु धर्माीविषयीचे लेखन आक्षेपार्ह आहे , ती आगरकर वा सावरकरांच्या हिंदुंचे हित साधणाऱ्या टिकेसारखी नाही तर त्यात ख्रिश्चॅनिटी वा इस्लामचा जास्त गौरव व प्रचार आहे.

आंबेडकरांनी हिंदु धर्माचा धि:कार करत बौध्द स्वीकारला. नुसत जात पात तोडण नाही तर हिंदुधर्माचे विध्वंसन व विनाश हा त्यांचा खरा हेतु होता. पुर्वायुष्यात आंबेडकर हे हिंदुसंघटनाच्या बाजूचे होते हे मी नाकारत नाही पण त्यांच्या त्या भूमिकेत पुढे सातत्य राहिले नाही. हिंदुंचा तेजोभंग होईल असे वर्तन व विचार त्यांच्या उत्तर आयुष्याचा महत्वाचा भाग बनला.

५. शिवाजी महाराज, आगरकर व सावरकर यांची पंगत शाफुआ पेक्षा शिआसांचा महाराष्ट्र अशा नावे अधिक उपयुक्त आहे का?

कारण,

५ अ. शिवाजी महाराज हिंदु धर्माचे अभिमानी तरीही प्रागतिक विचारांचे, ब्राह्मणांसहित सर्व जातीजमाती व गटांना घेऊन सर्वजनहिताय अशी भूमिका घेणारे. हिंदुंना राजकिय व सामाजिक असे दोन्ही स्वातंत्र्याचा त्यांच्या त्यांच्या काळाच्या चौकटीत अधिकार देणारे. हिंदु धर्म राखणारे , हिंदु संस्कृतीचा, महाकाव्ये यांचा प्रभाव असणारे. मंदीरांचे पुनर्निर्माण करणारे थोर राष्ट्रनिर्माते. रयतेच्या हितासाठी झटणारे महापुरुष. शुध्दीकरणे करणारे, घरवापसी पासुन भाषाशुध्दीपर्यंत बारीकसारीक विचार करणारे.

५ ब. आगरकर सुधारक तरिही सर्वसमावेशक. सनातनी समजल्या गेलेल्या टिळकांना विरोध करणारे तरिही त्यांच्या लेखनातून प्रगतीशील हिंदुत्वाचा अभिमान डोकावत रहातो.

५ क. सावरकरांचे व्यक्तीमत्व तर अष्टपैलु. राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक स्वातंत्र्य दोन्हीचे प्रत्यक्ष कान करणारे व तत्व ज्ञानही देणारे. बेरजेचे गणित मांडण्यऱा सर्वसमावेशक हिंदुत्वाचे उद्गाते. शिवाजी महाराजांची धर्मशुध्दी (घरवापसी) भषाशुध्दी, सोसाळु नीती नाही तर ठोसाळु नीती आत्मसात करणारे.
देशाची परदास्यातून मुक्ती साठी लढणारे स्वातंत्र्यवीर आणि त्याचबरोबर सामाजिक स्वातंत्र्याचा लढा देणारे समता वीर अशा दोन्ही गौरवास प्राप्त.

५ ड. माझ मत बहुजनांची वेगळी पंगत मांडणाऱ्या शा.फु.आं. पेक्षा सर्वजनांची पंगत मांडणाऱ्या शि.आ.सां. चा महाराष्ट्र घडणे अधिक महत्वाचे आहे. कोणत्याही जातीला न वगळता सबका साथ सबका विकास.

विरोध कोणत्याच महापुरुषांना नाही, पण समाजात फुट पाडण्यासाठी कोणाचीही नावे वापरली जात असतील तर सर्वसमावेशक नावांचा विचार अधिक व्ह्यायला हवा.

विषय संवेदनशील आहे. अचुक व मोजक्या शब्दात सामाजिक परिस्थितीचे भान राखून प्रतिक्रिया याव्यात.


"राष्ट्रीय वर्गहितांचा समन्वय" अर्थात कल्याणकारी अर्थव्यवस्था

लोकांच्या जीवनशैलीवर प्रभाव टाकुन नको असलेल्या गरजा निर्माण करुन जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या वस्तुंची निर्मिती, अव्वाच्या सव्वा नफा मिळवण्याची दारुण इच्छा, त्यापायी तयार केली जाणारी भ्रष्टाचारी यंत्रणा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अफाट गौरव करुन चंगळवादी जीवनशैली निर्माण करण हि सर्व भांडवलशाही ची काळी बाजू.

या उलट भांडवलदार हा उद्योगधंद्यांना चालना देतो, लोकांना रोजगार मिळववून देण्यास सहाय्यभूत होतो. आपली पुंजी मागणी/पुरवठा च्या दोलायामान स्थितीची जोखिम पत्करुन गुंतवत असतो, त्याला त्यासाठी अचुक अंदाज व बुध्दीचा वापर करावा लागतो. भांडवली विचारात गुणवत्तेचा अधिक विकास होतो. सततच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना निवडीचे जास्त जास्त पर्याय सतत निर्माण होत रहातात. इ. चांगली बाजू.

साम्यवाद आणि भांडवलशाही दोन्हीतला सुवर्णमध्य साधणारी आणि समाजवादाला प्राधान्य देणारी कल्याणकारी शासन ही आपली आर्थिक नीती जास्त चांगली आहे. सावरकरांनी हिच नीती हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरुन "राष्ट्रीय वर्गहितांचा समन्वय" या नावे मांडली होती .

जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आपली अर्थव्यवस्था भांडवलशाही कडे अधिक झुकत चालली आहे व त्यातून शेतकरी वर्गाचे प्रश्न व समस्या वाढत आहेत. मुख्य म्हणजे आपली शेती हि व्यावसायिक - प्रोफेशनल पातळीवर नसते, पाणी नियोजनात मार खाते, नैसर्गिक बेभरवशाचे हवामान, पावसावर अतिरिक्त अवलंबुन रहावे लागणे, बाजाराचा अंदाज घेण्यात शेतकरी वर्ग कमी पडणे , त्यास आवश्यक प्रशिक्षण न मिळणे, दलालांना व आडत्यांना आलेले सर्वात जास्त महत्वाचे स्थान हि सध्याची स्थितीआहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुवर्णमध्य गाठणे गरजेचे आहे. मुळ धोरणांचा फेरविचार व्हायला हवा, कर्जमाफी वगैरे ठीक आहे कारण मलमपट्ट्या सुद्धा महत्वाचा असतात, पण नुसत्याच मलमपट्ट्या म्हणजे रोगाचा समूळ नाश नाही. सरकार व विरोधक यांनी यावर पक्षिय राजकारण न करता एक होऊन दिर्घकालिन उपाययोजना करावी अशी एक भाबडी इच्छा !

© चंद्रशेखर साने

Friday, March 24, 2017

भाजपा आणि सावरकर

भाजपाने सावरकर गौरवासाठी केलेली कार्ये

१. लोकसभेत सावरकरांचे तैलचित्र लावले.
२. अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचे नाव दिले.
३. सावरकर चित्रपटासाठी सुधीर फडके यांना सहाय्य, निधि जमवण्यासाठी वाजपेयींची अमेरिकेत भाषणे. चित्रपट प्रदर्शित जाल्यानंतर ठिकठिकाणी प्रदर्शनासाठी प्रयत्न. 
४. अंदमानात एका गुंड आणि हिडीस अशा कॉंग्रेसी मंत्र्याने उखडलेले स्मारक परत बांधले.
५. सावरकर जयंतीला लोकसभेत श्रध्दांजली वहाण्याची पध्दत कॉंग्रेसने बंद केली ती मोदींनी २०१४ साली पंतप्रधान झाल्या झाल्या परत सुरु करुन सावरकरांना कृतज्ञता अर्पण केली.

यापुर्वी सावरकरांच्या विशेष टपाल तिकिटासाठी १९७१ साली जनसंघाच्याच खासदारांनी विशेष प्रयत्न केले. इंदिरा गांधींनी सुध्दा सावरकरांचे महत्व जाणुन सावरकरांचे विशेष टपाल तिकिट काढले. इंदिरा गांधींनी टपाल तिकिटाला हिरवा कंदील देण्याबरोबरच सावरकर स्मारकासाठी पण वैयक्तिक अशी रु. १००००/- ची देणगी दिली या दोन गोष्टींचा उल्लेख करण आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त सावरकरांचेच एकेकाळी सहकारी असणारे व खासदार झालेले राजा महिंद्रप्रताप यांनी  सन १९५७ ला एक विशेष प्रस्ताव लोकसभेत मांडुन सावराक्रांना स्वतंत्र भारत सरकार तर्फे रु. ६०००/- वर्षासन सुरु करण्यात पुढाकार घेतला होता. सावरकर राष्ट्रिय स्मारक, दार चे उद्‌घाटनाला तत्कालिन मुख्यमंत्री श्री. शरद पवारउपस्थित होते व  व राष्ट्रपती श्री. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. निधी जमवण्यात संघ परिवाराचा अर्थातच मोठा सहभाग होता.

कोणत्याही विचारप्रवाहात मवाळ, जहाल वा मध्यममार्गी असे गट असतातच. पण भाजपाने वा संघ परिवाराने सावरकरांचा टोकाचा व्यक्तीद्वेष कधीही केला नाही. वैयक्तिक पातळीवर काही नेत्यांची सावरकरांविषयी केलेली कुकर्मे माहीत आहेत पण त्याचे प्रायश्चित्तही परिवाराने घेतलेले आहे.

शिवसेनाही महाराष्ट्रात सावरकरांचा विशेष गौरव व सन्मान करत आलेली आहे. सध्याच्या सेना भाजपाच्या झगड्यात दोन्ही पक्षांनी यात सावरकरांना ओढले नाही, व त्यांच्याविषयी आदरभाव नेहमीच ठेवला याचा आनंद वाटतो. अंदमानात सावरकर स्मारक पुनर्स्थापित करण्यातही शिवसेना खासदारांचा हातभार/ पाठपुरावा आहे.

सावरकरांना भारतरत्न देऊन भाजपाने कळस चढवावा. भारत रत्न हे प्रतिकात्मक असेल. सावरकर मुळातच खूप मोठे होते व आहेत. पण कृतज्ञता व प्रतिकात्मक राजकारण दोनी साठी सावरकरांना भारत रत्न देणे आवश्यक आहे.
कदाचित मोदींनी ते पुढच्या टर्म साठी राखून ठेवले असले तरी चालेल पण ते दिले गेले जावेच असे माझे मत आहे. 

Tuesday, March 21, 2017

मोदींच्या मर्यादा

वृत्तवाहिनीवरच्या चर्चेत काल कोणीतरी "मोदीवाद" निर्माण झाला आहे असा दावा केला. दावा करणारा मोदी भक्त नव्हता विरोधकच होता असे मला वाटते. तो नमोभक्त असो वा नमोरुग्ण, पण "मोदीवाद" हा शब्द अतिरंजित आणि निरर्थक आहे. आज फेसबुक वर पण याच शब्दाचा उल्लेख केला गेला आहे.

मोदीवाद निर्माण करायला मोदींना बरच लेखन व चिंतन करण गरजेच आहे. कोणाचाही स्वत:चा एक वाद , विचार शाखा निर्माण होताना त्याने विशिष्ट तत्वज्ञान मांडाव लागत. बोलताना होणाऱ्या तपशीलातल्या चुका क्षमेस पात्र नसतात. स्वत:च्या चिंतनातून जे तत्वज्ञान तयार होते त्याच्या व्याख्या पक्क्या असाव्या लागतात व सहसा त्या निरपवाद कराव्या लागतात. आपल्या तत्वज्ञानाची सुत्रबध्द पध्दतीने मांडणी करावी लागते. आयुष्यात एक सुसंबध्दता असावी लागते. उलटसुलट भूमिका मांडणारे व परस्परविरुध्द वागणारे गांधींसारखे नेते विरोधकांनाच काय पण प्रामाणिक अनुयायांनाही गोंधळात टाकत असतात.

मोदी तपशीलात अनेक चुका करतात. त्यांचे व्यावहारिक चातुर्य खूप असले तरी त्यात व्यासंग आणि पांडीत्य नाही. आदित्यनाथ योगी असोत बाळासाहेब ठाकरे असोत वा मोदी असोत ते हिंदुत्ववादाचे सैनिक होऊ शकतात, सेनापती होऊ शकतात, उद्गाते नाहीत.

मोदींच यश त्यांच्या पांडीत्यात अथवा ज्ञानात नाही. संघ परिवाराच्या बौध्दीकातुन व संस्कारातुन त्यांची जडणघडण झाली आहे. त्यामुळे त्यात सावरकरांपासून गांधीं-पटेलां पर्यंत सर्व विचार कमी अधिक प्रमाणात समाविष्ट आहेत. त्यांचे यश लोकांमध्ये त्यांच्याविषयी विकासाची भाषा करणारा, रिझल्ट्स देणारा, आपल्यासाठी काहीतरी करु इच्छीणारा , हिंदुत्वनिष्ठ नेता अशा असलेेल्या विश्वासात आहे.

मुळात कोणीही व्यक्ती अस बसुन ठरवुन स्व-वाद निर्माण करतच नाही. तो हळु हळु प्रकट होत जातो, त्याचे अनुयायी तयार होतात, त्याच्या मांडणीची चिकित्सा होते, टिकाकार व भाष्यकार निर्माण होतात आणि मग त्या विचारधारेस त्या व्यक्तीचे वा मुख्य सुत्राच्या नावे अमुक-तमुक वाद असे नाव प्राप्त होते.

मोदी किंवा कोणीही कितीही आवडत असले (किंवा आवडत नसले) तरी उपाध्या काळजीपुर्वकच द्यायला हव्यात.

© चंद्रशेखर साने

Monday, March 20, 2017

मराठी भाषा संवर्धनार्थ

एखादी गोष्ट अतित असण म्हणजे विरहित असण, पलिकडे असण , टप्प्याबाहेर असण इ. आणि ग्रस्त असण म्हणत त्याने व्याप्य असण
उदा. वादातीत आणि वादग्रस्त

वादातीत म्हणजे वाद नसण, वादविरहित असण तर वादग्रस्त म्हणजे वाद असण
वृत्त वाहिन्यांवरच्या चर्चेत मगाशी काही पक्षांच्या प्रवक्त्यांना अतित आणि ग्रस्त या जोड शब्दांचा अर्थ माहीत नव्हता असे दिसले. ज्या विषयाला वादग्रस्त मुद्दा आहे म्हणायचे होते तिथे खुशाल वादातीत म्हणत होते. दुसराही एक शब्द अन्य प्रवक्त्या चुकीचा म्हणत होत्या याच प्रकारे अतित आणि ग्रस्त चा घोळ घालुन. आता तो शब्द विसरलो. आठवला कि देतो.
उपस्थित असलेल्या कोणालाच अर्थ माहीत नव्हता. आणि हे आज नाही बरेचदा घडलेले आहे.

कोकणातला एक माजी मंत्री शासकिय अधिकाऱ्यांसमोर आम्ही सर्व योजना सदोष करुन टाकणार आहोत असे म्हणायचा.एखाद्या शब्दामागे "स" लावला की काहीतरी भारी अशी त्यांची समजुत असावी. समृध्द , सधन, सखोल सारख सदोष.

एकुण मराठी भाषेचे अवघडच आहे

दशकाच्या कालगणनेचा घोळ
बरेच लेखक/स्तंभलेखक/पत्रकार दशकांची कालगणना मांडताना चुक करताना दिसतात. उदाहरणार्थ आजच्या म.टा. मध्ये ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय नायिका पुनम धिल्ला असा उल्लेख केला गेलेले छायाचित्र प्रकशित झाले आहे.
पुनम धिल्ला ऐंशीच्या दशकातली नसून एकोणीशशे नव्वदच्या दशकातील म्हणता येईल. १९७१ ते १९८० हे विसाव्या शतकातील आठवे दशक. किंवा १९८१ ते १९९० हे विसाव्या शतकातले नववे दशक अशी मोजणी हवी. पण काही जण पहिली दहा वर्षे त्याच दशकातील असतात हे लक्षात घेत नाहीत. ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहीती साठी


Monday, March 13, 2017

ब्राह्मण लक्षण

विचारी व विवेकी माणस हि मागचा पुढचा विचार करतात. पटकन असहिष्णु होत नाहीत. मागचापुढचा सारासार विचार करुन पावले उचलण , आपल्या आयुष्याच्या नफ्यातोट्याचा ताळेबंद मांडुन कोणत्या प्रसंगाला किती महत्व द्यायच, विचाराला प्राधान्य द्याव का विकाराला हे तो ठरवत असतो.
सर्वसाधारण ब्राह्मण माणूस हा विचारी असतो, विचारीपणा व विवेकासाठी फार मोठी बुध्दीमत्ता असायची गरज नसते. पण त्यात ब्राह्मण समाज हा सरासरीने जास्त बुध्दीवान सुध्दा असतो. जातपात तोडक मंडळासमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतात बुध्दीमत्ता याचेच समानार्थी नाव जणु ब्राह्मण असे आहे.
याच गुणांमुळे वैयक्तिक स्वार्थात ब्राह्मण माणूस हा नक्कीच भित्रा असल्याचा आभास निर्माण होतो. होता होईल तो तडजोड करणे आणि प्रगती करणे यास तो दुबळेपणा समजत नाही. भित्रेपणाचा शिक्का बसला तरी होता होईल तो, तो अन्य समाजाशी तडजोड करत असतो. समजुतीने रहात असतो. अल्पसंख्य असल्याने त्यास झुंडशाही माहित नाही. त्यामुळे तो रस्त्यावर उतरणारा नाही. वेगळ्याच लेव्हल वर तो आपले प्रश्न सोडवत असतो. तो सहसा कायदा हातात घेत नाही. कोणास त्यास भित्रेपणा म्हणायचा तर म्हणु देत.
पण हाच ब्राह्मण माणूस सामाजिक वा सार्वजनिक प्रश्नात सर्वस्व गमावायला सिध्द असतो असा ऐतिहासिक दाखला आहे. स्वत:च्या स्वार्थ पुर्ती साठी साधी टाचणी पण न उचलणारा ब्राह्मण समाज व स्वातंत्र्य यासाठी खुशाल शस्त्रे उचलतो, क्रांतीकारक होतो, निर्भयपणे समाजासाठी लढतो. याची यादी काढली तर पानेच्या पाने भरुन मजकुर लिहावा लागेल. तो लढतो कारण त्याला स्वार्थापेक्षा मोठा असा "सोशल कॉज" मिळालेला असतो. क्रांतीकारकांमध्ये ब्राह्मणांची संख्या लक्षणिय आहे. सैन्यात सुध्दा ब्राह्मण जातात आणि पोलिस खात्यात सुध्दा जातात. व्यापारात सुध्दा ब्राह्मण समाज धडाडीने उतरतो आणि जोखिम घेताना दिसतो.
श्री. दिलिप कांबळे या महाराष्ट्राच्या मंत्र्याने ब्राह्मण समाजाविषयी काही अनुद्गार काढले असे ऐकतो. प्रत्यक्ष भाषण ऐकल्याशिवाय नेमके काय म्हटले ते पाहिल्या वाचून निष्कर्ष काढता येत नाही. कारण जे छापुन येते जे वृत्तवाहिन्यांवर सांगितले जाते त्याविषयी विश्वासार्हता १०% पण उरलेली नाही. ९०% प्रकरणात अर्थाचा अनर्थ करुन वार्तांकन केले जाते. त्यामुळे कांबळे यांना असे काही म्हणावयाचे नसावे अशी शक्यता नाकारता येत नाही.
तरीही असे काही दिलिप कांबळे यांना म्हणायचे असेल तर त्यांनी समजुन असावे की ब्राह्मण माणूस हा क्रिमिनल / गुन्हेगारी दृष्ट्या कधीच धाडशी नाही व तो त्याविषयी भ्याडच राहील. पण जेव्हा देव धर्म किंवा राष्ट्र यांच्या साठी त्यागाची वेळ येईल तेव्हा ब्राह्मण वर्गा सारखा धाडसी व शौर्यवान दुसरा मिळणार नाही.
वरील विवेचन हे अर्थातच  लोकसंख्येच्या प्रमाणात केले आहे. तसेच  प्रत्येक ब्राह्मण त्यागी व शूर असतो किंवा इतर समाजात त्यागी किंवा शूर लोकांची संख्या कमी आहे असा याचा अर्थ अजिबात नाही. पण कोणाच्या मनात ब्राह्मण समाजाविषयी गैरसमज असेल तर तो राहु नये. ब्राह्मण हि सुध्दा राज्य केलेली आणि रणांगणात लढलेली जमात आहे. खरतर जातीगत गुण याला मुळातच अर्थ नाही, अनुवंश परंपरा केव्हाच मोडीत निघाली आहे, मात्र अजुन ती काहींच्या मनात दडुन राहिलेली असते तिला उत्तर देणे भाग पडते म्हणून जातीचा उल्लेख नाईलाजाने करावे लागतात.
© चंद्रशेखर साने

Sunday, March 12, 2017

भाजपा पंजाबात का नाही?

पंजाबात शीखांची मनोभूमिका गुंतागुंतीची आहे. शीख आणि आर्य समाज यात फार मोठा विसंवाद होता. पंजाबची भाषा ठरवताना संघियांनी हिंदीला प्राधान्य दिले म्हणून शीख समाज संघपरिवारावर नाराज होता.

शीखांमध्ये काही फुटीर प्रव्रूत्ती फाळणीच्या काळात पण होत्या. शीख हे हिंदु नाहीत या समजाला आधी ब्रिटीशांनी व नंतर फुरोगाम्यांनी मनसोक्त खतपाणी घातले. वस्तुत: शीख पंथाची स्थापनाच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झाली मात्र हा वादग्रस्त मुद्दा आहे. काही शीख ही गोष्ट अमान्य करतात. माझ्या समजुतीप्रमाणे सहजधारी शीख हे स्वत:ला हिंदुत्वाचा भाग मानतात , केशधारी स्वत:ला स्वतंत्र धर्म मानतात. नेमकी माहिती नाही, माझा समज आहे. तात्विक दृष्ट्या विचाअर केला तर शीख तत्वज्ञान हे रामानुजांचे विशिष्टाद्वैती तत्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारे आहे. पुनर्जन्म, ८४ लक्ष योनी मधुन मोक्ष इ. कल्पना शीख पंथात आहेतच. गुरुग्रंथात संत नामदेवांसहित पंधरा हिंदु संत तर एका सुफी संताची वचने समाविष्ट आहेत. एक पोथी व दहा गुरु अशी शीखांची बांधणी आहे. इस्लामची शीखांकडे पहाण्याची दृष्टी एकच किताब, एकच ईश्वर पण प्रेषित दहा अशी काहीशी आहे. १८५० ला रणजितसिंगाचे राज्य इंग्रजांनी जिंकले असताही शीख समाजाचा आपपर भाव इंग्रजांविषयी झपाट्याने कसा काय मावळला हे एक आश्चर्यच होते कारण त्यानंतर केवळ सातच वर्षात म्हणजे १८५७ ला झालेल्य ब्रिटीश विरोधी उठावात शीख प्रामुख्याने ब्रिटीशांच्या बाजूनेच राहिला. १८५७ मध्ये मोंगल वंशाचा भर रस्सोत्यात झालेला वंश विच्छेद शीख मनाला सुखावुन गेला ज्या गुरुंच्या मुलांची हत्या चांदणी चौकात झाली तिथेच मोंगल वंशाच्या एकोणीस शहजाद्यांना ब्रिटीशांनी निर्दयपणे ठार केले होते. शीखांना तो अर्थातच काळाने उगवलेला सुड व स्तव:ला मिळालेला न्याय वाटला होता. असो.

तथापि तत्कालिन शीख नेते मास्टर तारासिंग यांचा कल हिंदुत्वाकडे होता. स्वा. सावरकरांना ते मानत असत. अन्य कोणाही नेत्याचा सत्कार झाला नसेल इतका भव्य सत्कार सावरकरांचा अमृतसरच्या सुवर्णमंदिरात केला गेला, त्यांस कृपाण भेट देण्यात आले होते. मास्टर तारासिंग विश्व हिंदु परिषदेचेही सदस्य होते.

१९९० च्या दशकात खलिस्तान चळवळीने प्रचंड मूळ धरले. त्यात इंदीरा गांधींची हत्या झाली. नंतर रिबेरोंनी वेचुन वेचुन दहशतवादी ठार मारले.

संघ परिवार शीख संगत सारख्या संकल्पना राबवत आहे, पण त्यास म्हणावे तितके यश मिळत नाही. अद्यापही अकाली दला बरोबरच जाण भाजपाला भाग पडते आहे. १९८४ च्या शीख विरोधी कत्तलींसाठी कॉंग्रेसला क्षमा मिळाल्याचे चित्र पंजाबात उभे राहीले आहे.

भाजपला पंजाबात फार मोठे काम करावे लागणार आहे. वैचारीक दृष्ट्या पंजाबच्या भूमिी परिवाराला फारशी अनुकूल नाही. खूप मोठी मशागत व नांगरणी करावी लागेल असे दिसते. तामिळनाडु एवढाच पंजाबही भाजपाला अवघड आहे.
© चंद्रशेखर साने

मोदी लोकप्रिय का ?

नेहरु प्रचंड लोकप्रिय होते असे म्हणतात. इंदिरा गांधी पण १९७१ ला लोकप्रियतेच्या चरमसीमेवर होत्या. राजीव गांधींवरचा लोकांचा विश्वास १९८४ ला वादातीत होता.

पण स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान नसताना, राजबिंडे व्यक्तीत्व नसताना, स्वातंत्रलढ्याची पार्श्वभूमि नसताना, घराणे पाठीशी नसताना, बांगला देश निर्मिती सारखी फार मोठी घटना घडलेली नसताना अथवा सहानुभूतीची लाट नसताना सुध्दा मोदींनी लोकांना मंत्रमुग्ध केले आहे हा चमत्कार आहे. अटलबिहारींना सुध्दा इतकी लोकप्रियता मिळाली असेल असे वाटत नाही. मोदींनी कॉंग्रेसी व कॉंग्रेसेतर सर्वच पंतप्रधानांना लोकप्रियतेत मागे टाकले असावे असा माझा अंदाज आहे.

भले भले जाणकार फक्त मोदींवर टिका करण्यात ते कसे हुकुमशहा होतील हे ठरवण्यात मग्न असताना जनता मोदींवर भरभरुन प्रेम करते आहे.

याचे कारण माझ्यामते असे आहे की मोदींची धोरणे व निर्णय यशस्वी ठरतील का नाही हे भविष्यात कळेल, पण मोदी हे एक नि:स्वार्थी आहेत आणि खरच आपल्यासाठी काही करु इच्छीत आहेत हे लोकांना पटले आहे. मोदींवर आगपाखड करणारे तोंडाळ नेते-प्रवक्ते-सूत्रसंचालक लोकांना फारसे आवडत नाहीत.

एकदा लोकांना नेत्याची कळकळ आणि नि:स्वार्थ बुध्दी पटली की विश्लेषकांना महत्वाच्या वाटणाऱ्या बाकीच्या सर्व गोष्टी निरर्थक ठरतात हे राजकीय पंडीतांना अजुनही कळत नाहीये. त्यांची मती गुंग झाली आहे.

© चंद्रशेखर साने

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...