Wednesday, February 1, 2012

सावरकरांची धोरणे आणि आझाद हिंद सेना-लेखांक दोन

मागील लेखातून सिद्ध होते कि सावरकरांचे व सुभाषचंद्र बोस यांची सैनिकीकरण , सशस्त्र क्रांती व परराष्ट्र धोरण या विषयात परतंत्र भारतचे धोरण काय असावे यात सहमती होती. इतकेच नव्हे तर आझाद हिंद सेनेचे मूळ संस्थापक "रासबेहारी बोस" हे सावरकरांच्या बर्‍याचशा धोरणांना अनुकूल होते. जपानमध्ये हिंदु महासभा सुद्धा त्यांनी स्थापन केली होती व सावरकरांची हिंदू व हिंदुत्वाची व्याख्याही त्यांनी मान्य केली असावी असा सहज निष्कर्ष निघतो.सुभाषांबद्दल मात्र ती परिस्थिती नाही

नेताजी बोस : सन १९०८ चे सावरकर ?

"राजनीतीचे हिंदूकरण व हिंदूंचे सैनिकीकरण " हे सावरकरांनी युद्धकालातील महत्वाचे धोरण हिंदूमहासभेला दिले. ब्रिटीशांच्या अडचणीचा फायदा घेणे ,शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मानणे , प्रत्येक राष्ट्राला आपल्या हिताचे काय ते ठरवण्याचा अधिकार असून कोणत्या धोरणाचा स्वीकार राष्ट्राने करावा हे सापेक्ष असते. जर्मनीला नाझीवाद योग्य असला किंबा रशिया बोल्शेव्हिक असला तर तो त्यांचा प्रश्न असून आपले हित आपण साधले पाहिजे हि परराष्ट्रनीती सावरकरांनी - स्थूलमानाने- हिंदुमहासभेला दिली.

नेताजी बोस व गांधी प्रणित कॉंग्रेस यांच्यात मुख्तत: याच मुद्द्यांवर मतभेद होते व सुभाषचंद्र बोस यांना बाहेत्र पडावे लागले होते. सावरकर-बोस यांच्या दोन दिवसात मिळून सहा तास झालेल्या गुप्त भेटीत या मुद्द्यांपुरती सहमती झाली असावी. मात्र हिंदु-मुस्लीम प्रश्नावर र्त्यांची सहमती झाली नसावी.बंगाल हिंदूमहासभेचे व सुभाषचंद्रांचे त्यावेळी पटत नव्हते. सावरकर-बोस भेटीच्या वार्ता ऐकून बंगालचे नेते अस्वस्थ झाले. त्यांनी सावरकरांकडे यासंबंधी विचारणा केली असता ,सावरकांनी आपण कोणताही धोरणात्मक बदल केलेला नसून आपली धोरणे तशीच राबवावीत अशी सूचना दिली. मात्र बोस सीमेवर आले की बंगाल हिंदूसभेने अखिल भारतीय हिंदूसभेशी फारकत घेऊन बोसांना मिळावे असे धोरण हिंदूमहासभेच्या पुढील गुप्त बैठकीत ठरवले गेले होते.

सावरकर सन १९३८ मध्ये बिनशर्त मुक्त होऊन राजकारणात आले तेव्हा त्यांच्या हिंदू-मुस्लीम धोरणाबद्दल बहुतेक राजकिय नेत्यांमधे नाराजी होती.आम्हाला १९०८ चे सावरकर मान्य आहेत १९३८ चे मान्य नाहित असे बोलले जाई. यामागे सन १९०८ च्या सावरकरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार केला होता, सन १८५७ च्या लढाईत मुसलमान देशभक्तांची मुक्त कंठाने त्यांनी प्रशंसा केली होती, त्यांच्या क्रांतीकार्यात सिकंदर हयातखान सारखे मुसलमानही सहभागी होते हि सर्व कारणे या मागणीमागे होती. सन १९३८ ला हिंदुराष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे सावरकर अंदमानातून आल्यावर बदलले आहेत व संकुचित भूमिका घेत आहेत असा समज पसरला होता. यातच सुभाषचंद्र बोस यांचाही समावेश होता. सावरकर व जीना यांना बोस सारखेच जातीयवादी मानत होते. सैनिकीकरण,सशस्त्र क्रांती यात बाबत सावरकरांसारखेच विचार असणारे बोस सन १९०८ च्या सावरकरांसारखेच होते मात्र तेवढेच नव्हते तर ते मुस्लीम प्रश्न उदारपणे पहाण्यात महात्मा गांधींचाही पेक्षा दहा पावले जास्त पुढे गेले होते. बंगालमध्ये विधीमंडळ व नोकर्‍या यात मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जास्त प्रमाणात वाटा मान्य करणार्‍या चित्तरंजन दास यांचे ते शिष्य होते. खरेतर त्याहीपुढे जाऊन हिंदु-मुस्लीम अशी काही समस्याच अस्तित्वात नसून इंग्रज जाताच हिंदु-मुस्लीम प्रश्न सहजी सुटेल असे त्यांना वाटत होते. हिंदु-मुस्लीम हे एकजीव राष्ट्र झालेच आहेत असे त्यांना सन १९४४ ला सुद्धा वाटत होते.

सावरकरांना अंदमानात मुसलमानी आकांक्षांचा , त्यांच्या धार्मिक मानसिकतेचा परिचय झाला. अंदमानात इतर अनेक ग्रंथांबरोबर कुराणही त्यांनी नीट अभ्यासले. अशिक्षीतातही अशिक्षीत अशा मुस्लीम धर्मातील अपराध्यांचाही राजकिय व धार्मिक दृष्टीकोन त्यांअन अंदमानातच कळला. तो पर्यंत सन १८५७ मधील हिंदु-मुस्लीम ऐक्याचे गोडवे गाणारे सावरकर फार मोठ्या प्रमाणात बदलले. सन १९२४ सालापर्यंत त्यांची या संबंधातील एकही मत शिल्लक राहिले नाही.

याउलट सन १९४० पर्यंत नेताजी बोस यांना खर्‍या अर्थाने मुस्लीम मनच समजले नव्हते. आझाद हिंद सेना स्थापन झाली व तिचे नेतृत्व रासबेहारींकडून त्यांच्याकडे गेले. सावरकरांचे "राजनीतीचे हिंदुकरण व हिंदूंचे सैनिकीकरण " या धोरणाला काही प्रमाणात यश मिळून सैन्यातील हिंदूंची संख्या वाढली असली तरी मुसलमानांचा भरणा होताच. निदान ४० ते ५० % मुसलमान त्यावेळी सैन्यात असावेत असा

कयास केला जातो. त्यामुळे आझाद हिंद सेनेचे सैन्य हे निर्भेळ, सैनिकीकरण झालेल्या हिंदूंचे, नव्हते. सन १८५७ च्या संघर्षाला सावरकरांनी स्वातंत्र्यसमर म्हणून गौरवले असले तरी त्यातील मुस्लीमांचा सहभाग जिहादी स्वरुपाचाच होता हे अनेक उदाहरणांवरुन दिसून येते. हिंदू नेते या धार्मिक आक्रमणांपुढे अनेकदा हतबल होत.नेताजींच्या मते देशात मुस्लीम समस्याच अस्तित्वात नव्हती तर मग आझाद हिंद सेनेत संपूर्ण पणे हिंदु-मुस्लीम ऐक्य झाले होते असे समजायचे का?

हिंदुमहासभा व फॉरवर्ड ब्लॉक

ज्या ज्या कारणांसाठी गांधीजींवर मुस्लीम अनुनयाचा आरोप होतो ती सर्व कारणे नेताजींनाही लागू होतात. किंबहुना नेताजी मुस्लीमांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेले हिंदू नेते होते. ज्या वंदे मातरम्‌ ला हिंदु राष्ट्रवादी आग्रही असतात ते गीत नेताजींना पसंत नव्हते कारण मुसलमानांना ते आवडत नव्हते.म्हणून जन-गण-मन हेच त्यांनी अधिक स्वीकारले होते असे कॅप्टन लक्ष्मी म्हणतात.

सावरकर बंधमुक्त झाले तेव्हा नेहरु, मानवेंद्र रॉय, राजगोपालाचारी आदी इतर नेत्यांप्रमाणे नेताजींनीही त्यांना कॉंग्रेसमध्ये यायचे आमंत्रण दिले. आपले विचार गांधीप्रणित कॉंग्रेसशी जमणार नाहीत हे ओळखून सावरकरांनी तेथे न जाणेच पत्करले.

बोस कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा अकोल्याचे एक कार्यकर्ते श्री. चितळे यांनी सावरकरांना पत्र लिहून बोसांची भेट घेण्यास सुचवले. तर हिमालय प्रदेश हिंदुसभेचे कार्यवाह स्वामी सच्चिदानंद यांनी बोसांना पत्र लिहून कळवले की कॉंग्रेस जिनांच्या मागण्या मान्य करणार असे दिसते. आपण तसे न करता हिंदूंचे विशेषत: पंजाब व बंगाल मधील हिंदूंचे अधिकार सुरक्षिउत ठेवण्याकडे लक्ष द्यावे. तसेच आपण हिंदूसभा अध्यक्ष वीर सावरकर यांना भेटावे अन्यथा हिंदूंची सहानुभूती आपण गमावून बसाल. याच सुमारास सेनापती बापट आपण व सावरकर दोघेही कॉंग्रेसमधे जाणार आहोत व सावरकरांचे मन वळवणार यासाठी प्रयत्न करत आहोत असे एक समारंभात म्हणाले.

त्यावेळी सावरकर बोसांना उद्देशून म्हणाले की जातीय संस्थेच्या सभासदाला कॉंग्रेसमधील कोणत्याही पदावर बसण्याची बंदी केली असल्याने कॉंग्रेसमध्ये जाऊन मतप्रचार करणे अवघडाहे. कँग्रेसमधे शिरतानाच हि बंदी असल्याने मतप्रचाराची संधीच उरलेली नाही.

याला सुभष बोस यांनी उत्तर दिले की असा निर्बंध व्यक्तीशा मला पसंत नाही. यानंतर बापट यांना एक सविस्तर पत्र पाठवून आपण कॉंग्रेसमधे प्रवेश का करत नाही याची कारण मिमांसा दिली आहे. ती सविस्तर वाचण्यासारखी आहे. (यात त्यांनी जी कारणे दिली त्यातील आंदोलनाचे मार्ग, परराष्ट्रनीती याच मुद्द्यांवर नेताजींनाही पुढे कॉंग्रेस सोडावी लागली व स्वतंत्र पक्ष काढावा लागला.)

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षिय भाषणात सावरकरांनी भाषा व भाषाशुद्धी या वर नेताजी बोस यांच्यावर टिका करताना म्हणाले, ..मागची दोन वर्ष्रे पं.नेहरु कॉंग्रेद्सचे अध्यक्ष होते. हिंदु-मुस्लीम ऐक्यास्तव त्यांनी हिंदूंना आज्ञा सोडली की उर्दुच राष्ट्रभाषा करा. आता सुभाषबाबू सवाई अध्यक्ष झाले. त्यांनी नेहरुंवर कडी करण्यासाठी सांगितले की आपली लिपी सोडून रोमन लिपी स्वीकारा ! याच्या उलट आयर्लंड चा डी व्हॅलेरा ,जर्मनीचा हिटलर ,इटालीचा मुसोलिनी आणि तुर्कस्थानचा केमाल पाशा यांनी आपली राष्ट्रभाषा आपली राष्ट्रलिपी प्रगत कशी होईल याचा प्रयत्न केला म्हणून ते देश स्वतंत्र आहेत. आणि हिंदूस्थान ,पाकिस्तान व आंग्लदेश होऊ घातला आहे.

दि. २० नोव्हे. १९३८ ला बोस यांच्या नावे सावरकरांनी एक पत्रक काढले त्याचा भावार्थ असा की सध्याच्या परिस्थितीत एखादी वर्तुळ परिषद (Round Table conference ) भरण्याची शक्यता असून हिंदुस्थानच्या वतीने केवळ कॉंग्रेसलाच बोलवावे हि आपली मागणी अयोग्य आहे. एकतर जिना कॉंग्रेसला मुस्लीम लीग चे प्रतिनिधित्व करु देणार नाही व दुसरे म्हणजे कॉंग्रेस जरी हिंदू मतांवर निवडून येत असली तरी ती हिंदूहितरक्षण करण्याची हमी घेत नाही. उलट मुसलमानांच्या अनेक अन्यायी मागणुआ मान्य करणारी कॉंग्रेस हिंदूंची एकही न्याय्य मागणी मान्य करत नाही.म्हणून आपणास स्पष्ट पणे सांगतो ब्रिटीश ,मुस्लीम लीग व कॉंग्रेस हे मिळून जे करार करतील ते हिंदूंना बंधनकारक नाहीत.म्हणून हिंदुमहासभेला परिषदेला बोलावले जावे व ती मान्य करेल तेवढेच ठराव हिंदूंना बंधनकारक असतील.

याचवेळी म्हणजे सन १९३८ साली हिंदुमहासभेने निजामाच्या हद्दीतील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी एक नि:शस्त्र प्रतिकाराचा लढा उभारला होता. त्याच्या अधिवेशनात सावरकर म्हणाले, कॉंग्रेस त्यागाच्या गप्पा मारते पण तसा गर्व त्यांनी करु नये. हिंदूमहासभेच्या या अधिवेशनात उपस्थितात पंचवीस एक जण तरी अंदमानात १०-१०, २०-२० शिक्षा भोगून आलेले आहेत.त्यापैकी एकाचा त्याग एका बाजूला व गांधी,नेहरु,सुभाष व कार्यकारी मंडळाचा त्याग एकत्रित केला तरी अंदमानात कष्ट भोगलेल्या क्रांतीकारकाची ते बरोबरी करु शकणार नाहीत.

सुभाषांचे क्रांतीकार्य त्यांना कॉंग्रेस बाहेरुनच करावे लागले. सावरकरांना कॉंग्रेसमध्ये बोलावणार्‍या बहुतेकांना कॉंग्रेसमधून बाहेर पडावे लागले. त्यात नेताजींबरोबरच वीर नरिमन,डॉ.ना.भा.खरे,रॉय, द्वारकाप्रसाद मिश्रा ,प्र.के.अत्रे यांचाही समावेश होता.

कॉंग्रेसमध्ये गांधी-सुभाष वाद रंगत असतानाच सावरकरांनी अमेरिकेचे प्रेसिडेंट रुझवेल्ट यांना तार पाठवली. दि. २३ एप्रिल १९३९ ला पाठवलेली तार अशी: आपण हिटलरला पाठविलेल्या पत्रांमागे सैनिकी आक्रमणापासून स्वातंत्र्य नि लोकशाही यांचे संरक्षण करण्याची खरी निरपेक्ष्मानवतेच्या चिंतेची प्रेरणा असेल तर कृपया ब्रिटनलाही आपली हिंदुस्थानावरील सत्ता संपुष्टात आणण्यास सांगा आणि हिंदुस्थानला घटना बनवण्याचे स्वातंत्र्य द्या. हिंदुस्थानसारख्या महान राष्ट्राला लहान राष्ट्राइतका तरी आंतरराष्ट्रिय न्याय मागण्याचा अधिकार निश्चितपणे असावा."

सावरकरांची हि सूचना अमेरिकन वृत्तपत्रातून छापून आली. सावरकरांना या संबंधात काही अमेरिकन नागरीकांची शुभेच्छा पत्रेहि आली. राशबेहारींप्रमाणेच कॅलिफोर्नियात रहाणारे खैरातीराम समरस यांनीही एक पत्र पाठवून लिहिले, "...बॅ.सावरकरांचे चरित्र वाचून हृदय भरुन आले. गेल्या वर्षी मी पहिल्या महायुद्धातील हिंदु-जर्मनी यासंबंधी तीनशे पृष्ठांचे पुस्तक लिहिले आहे. त्यावरुन पुढील पिढीला स्फुर्ती मिळेल अशी आशा आहे." या प्रकारे सावरकर अमेरिकेपासून जपान पर्यंत संबंध जोडत होते व भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रचार कार्य करीत होते.

१ ऑगस्ट १९३९ ला सवरकरांचे एक महत्वाचे भाषण झाले. त्यात त्यांनी युद्ध परिस्थिती विस्ताराने वर्णन केली आहे.या भाषणात मुख्यत: शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हि नीती विशद केली. या नंतर सायंकाळी सावरकरांचे भाषण झाले त्यात त्यांनी गांधीवाद, सुभाषचंद्र बोस यांचा पुरोगामी वाद (फॉरवर्ड ब्लॉक) व मानवेंद्र रॉय यांचा नवसमाजवाद या तिन्ही तील साम्य व भेद सांगून आपल्या हिंदूत्ववादाची वैषिष्ट्ये कोणती ते ही श्रोत्यांच्या मनावर ठसवले.

बोसांच्या पक्षाविषयी सावरकर म्हणाले," दुसरा पक्ष सुभाषचंद्र बोस यांचा "फॉर्वर्ड ब्लॉक". या पक्षाची काही तत्वे व कार्यपद्धती आमच्या कार्यपद्धतीशी जुळण्यासारखी आहेत आणि तेवढयापुरते त्यांच्याशी सहकार्य करावयास देखिल आमची सिद्धता आहे. परंतु कॉंग्रेसमधील हिंदू-मुसलमानांच्या एकीचे वेड त्यांच्याही डोक्यातून निघालेले दिसत नाही. सुभाषबाबू गांधीजींप्रमाणेच जिनांच्य भेटिला जाऊन आले व गांधींपेक्षा अधिक गोष्टी त्यांनीही मुसलमानांना देऊ केल्या असतील. तथापि मुसलमानांचे समाधान गांधीजींना जसे करता आले नाही, तसेच ते सुभाषबाबूंनाही करता येणे शक्य नाही.

आम्हाला "फॉर्वर्ड ब्लॉक" वावडा का ? सुभाषबाबूंच्या पक्षासंबंधाने माझे त्यांच्याशी बरेच बोलणे झाले आहे. त्यांच्या कर्यक्रमातील बर्‍याचशा गोष्टी आम्हाला मान्य आहेत. तथापि फॉर्वर्ड ब्लॉकचा सभासद होणारा, कॉंग्रेसचा सभासद असलाच पाहिजे ही जी त्यांची अट आहे ती आम्हाला मुळीच मान्य नाही. कारण कॉंग्रेसचा सभासद होणार्‍यास हिंदुसभा सोडावी लागेल. हिंदुसभावाले लोक हिंदूंकरता म्हणून कोणत्याही सवलती मागत नाहीत. तथापि आपले योग्य अधिकार सोडण्यास किंवा कमी करण्यास कधीही तयार होणार नाहीत. फॉरवर्ड ब्लॉकला हेही तत्व मान्य होण्यासारखे नाही. त्यामुळे हिंदुत्वाभिमानी माणसाला फॉर्वर्ड ब्लॉकमध्ये सामिल होता येणे शक्य नाही कारण याच सुभाषबाबूंनी कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना हिंदुसभेला जातीय ठरवली होती."

गांधीजी व नेताजी वाद विकोपाला गेला असतानाच वीर सावरकरांचा प्रभावही सर्वत्र वाढत चालला होता. बंगालमधील क्रांतीकारक व अंदमानचे सावरकरांचे सहयोगी आशुतोष बानर्जी हे आधीपासूनच हिंदुसभेत होते त्यांनी सर मन्मथनाथ मुखर्जी व बॅ. निर्मलचंद्र चटर्जी ( भुतपूर्व लोकसभा अध्यक्ष व कम्युनिस्ट नेते सोमनाथ चटर्जी यांचे वडील) यांना बंगाल हिंदुमहासभेत आणण्यात यश मिळवले. तसेच हिंदुमहासभेतील दोन गटांनी सावरकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काम करायचा निर्णय घेतला.

निर्मलकुमार चटर्जींनी सावरकरांना पत्र लिहिले त्यात बोस यांच्यासंबंधाने कॉंग्रेसने जी हुकूमशाही दाखवली त्याचा धिक्कर करत आहोत असे लिहून यापुढे बंगालने कोणत्याही अखिल भारतीय पक्षात आंधळे पणे भाग घेऊ नये अशा विचाराने डळमळीत झाल्याने हिंदुसभेत येण्यास मागेपुढे पहात असल्याचे लिहिले. पुढे चटर्जी लिहितात," परंतु या सर्व पुढार्‍यांचा तुमच्यावर व तुमच्या कर्तुत्वावर विश्वास असल्याने बंगाली हिंदूंची एकजूट शक्य झाली आहे."

या प्रमाणे सुभाषबाबूंच्या बंगाल मध्येच हिंदूमहासभेची पाळेमुळे खोलवर जात चालली. पण या संबंधीचा सर्व इतिहास देणे हा या लेखाचा विषय नाही.

पुढे सेलम च्या दौर्‍यात मद्रासच्या "हिंदू" या प्रख्यात पत्राच्या पत्रकाराने सावरकरांना प्रश्न केला की जर कॉंग्रेसने जर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली तर आपला पाठिंबा असेल का? सावरकर उत्तरात म्हणाले ,जर हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हाच हेतू ठेऊन चळवळ असेल तर अवश्य पाठिंबा असेल पण हिंदूहिताचा बळी पडेल अशी शंका आली तर आमचा पाठींबा असणार नाही. मागे जसे मुसलमानांना कोरे चेक दिले तसच आत्मघातकीपणा असेल तर आमचा कधीही पाठींबा असणार नाही. सुभाषचंद्र बोस यांनी एखादी चळवळ सुरु केली तरी आमचे धोरण तेच राहील.

याप्रमाणे सुभाषचंद्र व सावरकर यांच्यातील सहकार्य व मतभेद नेमके कुठे होते ते लक्षात येईल.

आझाद हिंद सेनेत निर्भेळ रष्ट्रियत्व (हिंदू-मुस्लीम ऐक्य) झाले होते का?

महानायक हि कादंबरी विश्वास पाटलांनी खूप मेहनत करुन लिहीली आहे त्यांनी नेताजींच्या या चरित्रात्मक कादंबरी लेखनात ५ हस्तलिखिते २७ जपानी पुस्तके, २३ बंगाली पुस्तके ३ जर्मन , १५ मराठी ,८ हिंदी तर २११ इंग्लिश पुस्तकांचा आधार घेतला आहे. एवढा प्रचंड व्यासंग करुन लिहिलेली हि कादंबरी असली तरी यातील काही प्रसंगांचा थोडक्यात आढावा घेतला तर वावगे होणार नाही.

प्रसंग एक महानायक पृ. ६६०

आझाद हिंद सेनेतील कॅप्टन महंमद दुराणी हे फार मोठे देशभक्त होते.महानायक च्या पृ. ६६० वर त्यांचा एक संवाद असा आला आहे.

"माझ्या हिंदुस्तानला आझादी मिळाल्याशिवाय मला शांत झोप मिळण शक्य नाही नेताजी." कॅप्टन दुराणींचे डोळे ओलावले.प्राचार्य कोयामा म्हणाले," आमचाही एकदा कॅप्टनबाबत गैरसमज झाला होता. हे पक्के ब्रिटीश एजंट आहेत अस समजून यांना आम्ही अंधारकोठडीत फेकल,....."

"शेवटी आली ना प्रचिती?" कॅ.दुराणी.

"मातृभूमिच्या सेवेसाठी तुमच्यासारखे इमानी आणि सच्चे सेवक क्वचितच मिळतात कॅप्टन" कर्नल भोसले बोलले.

"बॅ.जिनांसारखा दगाबाज मनुष्य आम दुनियेत नाही.ही तर ब्रिटीशांची विषपेरणी ! जातीय तेढ्याच किती विदारक चित्र उभ राहत आहे! माझा निश्चयच समजा. हिंदू-मुस्लीम जर एकमेकांपासून दूर होणार असतील, तर मी जिवाच बरवाईट करुन घेईन! मला जगायचा कसा हक्क उरेल,नेताजी?" कॅप्टन महंमद दुराणी गहिवरुन विचारु लागले.

प्रसंग दोन महानायक पृ.८३९

तितक्यात नेताजींचा व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी कुंदनसिंग पुढे होऊन अडखळत बोलला; नेताजी आपल्या आझाद हिंद फौजेतच कोणीतरी फूटनीतीचा डाव खेळतो आहे. पाकिस्तानचा प्रचार करतो आहे."

"कशावरुन"

हि पत्रके पहा-"

कुंदनसिंगने पत्राची प्रत नेताजींच्या हतात दिली. नेताजी मोठम्मोठयाने वाचू लागले; "आःआद हिंद फौजेतील मुस्लीम अधिकार्‍यांनो,वरिष्ठ पदे भोगण्याच्या पापी लालसेने तुम्ही आपली जात-धर्म विसरुन गेला आहात.....तो ढोंगी गांधी आणि हा सुभाष दोघेही संधिसाधू असून हिंदू जातीचे पक्के नेते आहेत.गांधीप्रमाणे सुभाषलाही हिंदूंचेच राज्य हवे आहे.हिंदूंचे दास बनु नका.पाकिस्तानचा ध्यास घ्या. जिनासाहेबासाठी आपले प्राण अर्पण करा"

" थांबा नेताजी .त्या पत्रकातला एकही विषारी शब्द ऐकून घ्यायची माझ्या मनची तयारी नाही" ताडताड महंमद दुराणी धाडकन जागेवर उभे राहीले....पाकिस्तान हा शब्दोच्चार सहन करण्याऐवजी मरण पत्करले....."

महानायक पृ. ९१९

नेताजींनी दार उघडले.तोच कुंदनसिंग उद्‌गारला,

’खालच्या दालनात आपल्याला भेटायला खुद्द राशबेहारी आलेत"

"राशबेहारी ? एवढ्या रात्री ? शुद्धीत आहेस का?"

....

तोच नेताजींच्या दिशेने सूंSS सूं SS करत पिस्तुलातून चार गोळ्या सुटल्या. अचानक हमल्याने नेताजी बावरले पण लगेच सावरले.

....

नेताजी पुढे धावले...

आश्चर्याने म्हणाले "शत्रूने अगदी हुबेहुब राशबेहारी उभे केले होते म्हणायचे.

...

पृ. ९२० वर पुढे...

नेताजी ,मला चांगल आठवल ह्या मारेकर्य़ाला प्रथम कुठे पाहिले...कॅप्टन दुराणींच्या खास सेवेतला इसम आहे तो.

...

रंगुनहून सर्वत्र संदेश गेले "पकडा. गद्दार कॅप्टन दुराणीला पकडा. त्याच्या मुसक्या बांधा" आझाद हिंद च्या मुसलमानात फुटीरतेचे विष दुराणीच कालवत होता.

मेजर सखर, मेजर डे,मेजर मुहंमद बक्ष ,मेजर रियाझ व मेजर मदान हे ऐनवेळी दगा करुन ब्रिटीशांना मिळाले. महानायक पृ. ९०७ वर नेताजींना या फुटिरता वृत्तीने भयंकर धक्का बसला.

नेताजी जर्मनीला पोचण्यापूर्वीच भारतीय मुसलमानांचा एक छोटा जिहादी गट कार्यरत होता. याचा नेता मुहंमद इक्बाल शेदाई हा भारताला दार-उल-हर्ब म्हणजे इस्लामची शत्रूभूमि मानत होता.याला मुसोलिनीचे समर्थन असून नेताजींना या पॅन इस्लामीझम मानणार्‍या जिहादी माणसाच्याच मदतीने आझाद हिंद रेडीओ ची स्थापना करावी लागली होती.त्यामुळे "मुस्लीम आझाद हिंद रेडीओ" सुद्धा चालवणे त्यांना क्रमप्राप्तच होते.या शेदाईंनी आझाद हिंद चे मुख्य कार्यालय रोमला हलवावे असा नेताजींकडे आग्रह धरला. नंतर हे शेदाई अलग होऊन मुस्लीम आझाद हिंद फौजेची स्थापना करते झाले.मुस्लीम अलगता वाल्यांच्या प्रभावातील नेताजी बर्लिन रेडीओ वरुन ही हिंदुमहासभा व अकाली शीखांची निर्भत्सना करीत असत.

एका भाषणात ते म्हणतात,

“Speaking over the Radio on Monday, the noted Indian Leader in Berlin, Subhas Chandra Bose … pointed out that the majority of the Muslims, except those in the Muslim League, had joined the Congress and fighting side by side their Hindu brethren for the emancipation of India. He condemned the Hindu Mahasabha and the Akali Sikh leaders for their selfish policy of ignoring the national cause and for trying to secure power and influence for themselves. He assured Mr. Jinnah that his Pakistan scheme will never materialize so long as the British were in India. He emphasized that Pakistan could be created only under a national government.”

(Berlin Radio, October 7, 1942, “Testament of Subhas Bose, 1946”)

या भाषणाचे दोन अर्थ निघतात. एक तर जीना यांनी पाकीस्तानची कल्पना ब्रिटीश जाईपर्यंत स्थगित ठेवावी व नंतर तिला नेताजींची सहमती असणार होती किंवा दुसरा अर्थ हिंदु-मुस्लीम समस्याच नाही असे मानणारे नेताजी एक राज्य व दोन राष्ट्रे या प्रकारच्या तोडग्यावर आले असावेत.

क्रमश:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...