Tuesday, September 22, 2009

वृत्तविचार

वृत्तविचार
मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न !
काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत
१. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद
.
१. अक्षरगणवृत्ते:-
.
प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात.
१. लघु किंवा ऱ्हस्व व
२. दीर्घ किंवा गुरु
लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत.
"ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील,
ख,खि व खु ही लघु अक्षरे तर खा, खी, खू , खे, खै, खो, खौ , खं व ख: ही गुरु अक्षरे होत.
.
लघु अक्षर गुरु कधी होते?
.
१. अनुस्वार किंवा विसर्गाने युक्त असल्यास
.
२. लघु अक्षरापुढे जोडाक्षर असल्यास आणि ते उच्चारताना आघात द्यावा लागल्यास
.
३. ते लघु अक्षर चरणातील शेवटचे अक्षर असल्यास.
.
अक्षरगणवृतातील काव्यरचनेतील क्रमाने येत जाणाऱ्या तीन अक्षरांच्या प्रत्येक गटाला गण म्हणतात. गुरु अक्षर व लघु अक्षर यांच्यातील वेगवेगळ्या रचनेप्रमाणे एकूण आठ गण पडतात. ते य र त न भ ज स म असे. ते लक्षात रहाण्यासाठी त्याची मांडणी पुढील कोष्टकाप्रमाणे लक्षात ठेवता येईल.

१. य = आद्य लघु ( U _ _ )
२. र = मध्य लघु ( _ U _ )
३. त = अन्त्य लघु ( _ _ U )
४. न = सर्व लघु ( U U U )
५. भ = आद्य गुरु ( _ U U )
६. ज = मध्य गुरु ( U _ U )
७. स = अन्त्य गुरु ( U U _ )
८. म = सर्व गुरु ( _ _ _ )
.
अक्षर गण वृत्त्तात गण कोणते या बरोबर यती महत्वाचे आहेत.
.
उदा. शार्दुलविक्रीडिताचे नियम ,
अक्षरसंख्या = १९
यति = १२
गण - म स ज स त त ग
.
म्हणजे प्रत्येक ओळीत १९ अक्षरे असतात. यती १२ व्या अक्षरावर यावा व अक्षरांचा संच म स ज स त त ग असा असावा. पहिल्या सहा गणांची १८ अक्षरे व शेवटचे ग म्हणजे गुरु अक्षर.
.
यती म्हणजे काव्य गाताना येणारे विश्रांती स्थान.शब्द किंवा चरण संपताना तो यावा. क्वचित यतीभंग होतो. मात्र तो चुकीच्या ठिकाणी येऊन हास्यास्पद होणारा नसावा. कवितेतील भाव ही नित्य रहावा.
.
शार्दुलविक्रीडीत ची एक ओळ घेऊन उदाहरण स्पष्ट करु. ( चाल मंगलाष्टकांची)
.
चाले ज्या वरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी
.
चालेज्या / वरती / अखंड / स्तुतिचा / वर्षाव / पत्रातु/ नी
म / स / ज / स / त / त / गुरु
.
चाले ज्या वरती अखंड स्तुतिचा येथे "चा" या बाराव्या शब्दावर यती आला आहे.
शार्दुलविक्रिडीत चे एक माझे स्वरचित उदाहरण पाहू,
.
"तारे पाहुनिया नभी मन कथी, ते रत्नभांडारही ।
देवाचे विखरे सुवैभव खरे, माना कुबेरागृही ॥ "

इंद्रवज्रा हे अन्य एक वृत्त पाहू.
चरणसंख्या - ४
अक्षरसंख्या - १२
यति - ५ व्या अक्षरावरगण - त त ज ग ग
.
दु:खी जगा दूखुनिया द्रवे ते
सच्चीत माते नवनीत वाटे
अन्याय कोठे दिसता परी ते
त्या इंद्र वज्रासहि लाजवीते
.
भुजुंगप्रयात या वृत्तप्रकाराचे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे मनाचे श्लोक. रामदास स्वामींच्या काळी पीर,तकियांचे व फकीरांचे प्रस्थ माजले होते. त्यांच्या करीमांना तोडीस तोड उत्तर म्हणून रामदासांनी भुजंगप्रयात मधे मनाचे श्लोक रचले व त्याचा खेडोपाड्‌यातील समाजमनावर फार अनुकूल परिणाम झाला.पीर फकिरांचे करीमा व मनाचे श्लोक यांचे यथायोग्य तुलना होऊन महाराष्ट्र धर्माचे रक्षण झाले.करीमा मधे भुजंगप्रयात चे "य" गणातील शेवटचे गुरु अक्षर नाही एवढाच दोन्हीत फरक.
.
भुजुंगप्रयात:-
चरणसंख्या - ४
यति - ६,१२
गण - य य य य
.
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघू नायका मागणे हेचि आता

* उपजाती :- हे नाव दोन वृत्तांच्या मिश्रणास देतात. पुढे इंद्रवज्राउपेंद्रवज्रा चे उदाहरण आहे,
.
हा जातिविध्वंसन काल आला (इंद्रवज्रा)
समानतेच्या उभवा ध्वजाला (उपेंद्रवज्रा)
राष्ट्रीय जो सर्व जनाभिमानी (इंद्रवज्रा)
न जाति तो वा उपजाति मानी (उपेंद्रवज्रा)

इंद्रवज्रा - त त ज ग ग यति ५ अक्षरसंख्या ११
उपेंद्रवज्रा - ज त ज ग ग यति ५ अक्षरसंख्या ११
.
मात्रा किंवा जातिवृत्ते :-

मात्रा वृत्त या प्रकारात लघु व गुरु अक्षरांचे गण न पाडता त्यांच्या मात्रा मोजून त्या मात्रांच्या संख्येचे गट पाडले जातात. लघु अक्षरासाठी एक मात्रा तर गुरु अक्षरासाठी दोन मात्रा मोजल्या जातात.उदा. पादाकुलक या मात्रावृत्तामधे आठ + आठ असे गट केले जातात.
हिरवे हिरवे / गार गालिचे १+१+२ १+१+२ / २+१+२+१+२हरित तृणांच्या / मखमालीचे
पतितपावन किंवा चंद्रकांत मात्रावृत्त :-
यात ८ + ८ + ८ + २ = २६ अशा एकूण २६ मात्रा असतात .
पतीतपावन / नाम ऐकुनी / आलो मी द्वा/ रा
१ +२+१+२+१+१ / २+१+२+१+२ / २+२+२+२/ २
पतीतपावन / नव्हेसि म्हणुनी /जातो माघा/रा
२. सुनील नभ हे, सुंदर नभ हे, नभ हे अतल अहा
सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलचि हा
.
चरणामधे दोन,चार,पाच,आठ इ. मात्रांचे गट पाडल्यामुळे लयबद्ध अशी आवर्तने निर्माण होतात. अशा गटांना खालीलप्रमाणे नावे देण्यात आली आहेत.
.
१. पद्मावर्तनी - आठ मात्रांचा गट
२. अग्न्यावर्तनी - सात मात्रांचा गट
३.भृंगावर्तनी - सहा मात्रांचा गट
४.हरावर्तनी - पाच मात्रांचा गट
५. कवठ निंब - चार मात्रांचा गट
.
फटका :- ८ + ८ + ८ + ६
उदा.
१. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको ॥
.
२.हिंदूनृपती सिंधूनृपती पराजीत तो दाहीर
परसत्तेचा कलंक माथी सर्वै वदती शाहीर ॥
.
दोन चरणात भिन्न मात्रा असलेले एक उदाहरण

केशवकरणी :-
चरणसंख्या - २ पहिल्या चरणात मात्रा - २७ दुसऱ्या चरणात मात्रा - १६
.
१.केशवकरणी अद्भुत लीला नारायण तो कसा ।
तयाचा सकल जनांवर ठसा ॥
२.खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या ॥
.
अपूर्ण
क्रमश:

1 comment:

basEkPal said...

Could you post remaining info soon?

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...