Tuesday, March 21, 2017

मोदींच्या मर्यादा

वृत्तवाहिनीवरच्या चर्चेत काल कोणीतरी "मोदीवाद" निर्माण झाला आहे असा दावा केला. दावा करणारा मोदी भक्त नव्हता विरोधकच होता असे मला वाटते. तो नमोभक्त असो वा नमोरुग्ण, पण "मोदीवाद" हा शब्द अतिरंजित आणि निरर्थक आहे. आज फेसबुक वर पण याच शब्दाचा उल्लेख केला गेला आहे.

मोदीवाद निर्माण करायला मोदींना बरच लेखन व चिंतन करण गरजेच आहे. कोणाचाही स्वत:चा एक वाद , विचार शाखा निर्माण होताना त्याने विशिष्ट तत्वज्ञान मांडाव लागत. बोलताना होणाऱ्या तपशीलातल्या चुका क्षमेस पात्र नसतात. स्वत:च्या चिंतनातून जे तत्वज्ञान तयार होते त्याच्या व्याख्या पक्क्या असाव्या लागतात व सहसा त्या निरपवाद कराव्या लागतात. आपल्या तत्वज्ञानाची सुत्रबध्द पध्दतीने मांडणी करावी लागते. आयुष्यात एक सुसंबध्दता असावी लागते. उलटसुलट भूमिका मांडणारे व परस्परविरुध्द वागणारे गांधींसारखे नेते विरोधकांनाच काय पण प्रामाणिक अनुयायांनाही गोंधळात टाकत असतात.

मोदी तपशीलात अनेक चुका करतात. त्यांचे व्यावहारिक चातुर्य खूप असले तरी त्यात व्यासंग आणि पांडीत्य नाही. आदित्यनाथ योगी असोत बाळासाहेब ठाकरे असोत वा मोदी असोत ते हिंदुत्ववादाचे सैनिक होऊ शकतात, सेनापती होऊ शकतात, उद्गाते नाहीत.

मोदींच यश त्यांच्या पांडीत्यात अथवा ज्ञानात नाही. संघ परिवाराच्या बौध्दीकातुन व संस्कारातुन त्यांची जडणघडण झाली आहे. त्यामुळे त्यात सावरकरांपासून गांधीं-पटेलां पर्यंत सर्व विचार कमी अधिक प्रमाणात समाविष्ट आहेत. त्यांचे यश लोकांमध्ये त्यांच्याविषयी विकासाची भाषा करणारा, रिझल्ट्स देणारा, आपल्यासाठी काहीतरी करु इच्छीणारा , हिंदुत्वनिष्ठ नेता अशा असलेेल्या विश्वासात आहे.

मुळात कोणीही व्यक्ती अस बसुन ठरवुन स्व-वाद निर्माण करतच नाही. तो हळु हळु प्रकट होत जातो, त्याचे अनुयायी तयार होतात, त्याच्या मांडणीची चिकित्सा होते, टिकाकार व भाष्यकार निर्माण होतात आणि मग त्या विचारधारेस त्या व्यक्तीचे वा मुख्य सुत्राच्या नावे अमुक-तमुक वाद असे नाव प्राप्त होते.

मोदी किंवा कोणीही कितीही आवडत असले (किंवा आवडत नसले) तरी उपाध्या काळजीपुर्वकच द्यायला हव्यात.

© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...