Tuesday, March 28, 2017

शहाण्याला शब्दाचा मार....

एखाद्या थोरामोठ्याचे, व्यक्तीचे चार-दोन शब्द पकडुन त्याच्या समग्र विचारविश्वाच आकलन किंवा चरित्र वा कार्य यांचा निष्कर्ष काढायचा नसतो.

विशिष्ट वाक्य अथवा वाक्यांचा समूह पकडुन आकलन करताना, ती वाक्ये कोणत्या संदर्भात आहेत कोणाला उद्देशुन आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत त्याचा विचार करायचा नाही आणि त्या व्यक्तीवर आपल्या सोयीचा शिक्का मारायचा, सोयीप्रमाणे वापरायचे किंवा वैचारिक प्रतिस्पर्ध्याला आपण कसे नामोहराम केले अशा आविर्भावात ती वाक्ये फेकत रहायची हा पायंडा पडत चालला आहे.

आपण साधी माणस सुध्दा प्रसंगानुरुप बोलतो. मुलांना तु लहान आहेस तुला नाही कळायच अस एका प्रसंगात म्हणतो आणि कदाचित तासाभरातच अरे तु मोठा झालास जबाबदारीने वागायला हवस असही म्हणतो. कारण देश - काल- परिस्थिती चे संदर्भ असतात. तो दुटप्पीपणा नसतो. मोठ्या व्यक्तींना तेच लागु आहे. विभिन्न परिस्थिती आणि विभिन्न माणसे हाताळताना त्यांच वागण , विचार व उपदेश वेगवेगळे असतात.

थोरा मोठ्या व्यक्तींना आपल्या पेक्षा कितीतरी मोठ्या प्रसंगांना , विविध वयोगटांना, विचारगटांना अथवा समाजगटांचे भान ठेवायचे असते. वाचकांचे वा श्रोत्यांचे वय लक्षात घेऊन बोलायचे असते. एकच विषय मांडताना तो शालेय विद्यार्थ्यांसमोर मांडतोय ,समोर महाविद्यालयीय विद्यार्थी आहेत, स्त्रियांसमोर आहे, परत त्या स्त्रिया कोणत्या समस्या घेऊन समोर मार्गदर्शनाच्या अपेक्षेने उभ्या आहेत, का परधर्मिय अनुयायी वा समर्थक समोर असून असून त्यांचे शर्करावगुंठीत प्रबोधन करायचे याचा विचार करावा लागतो.

शहाण्याला शब्दाचा मार व मुर्खाला काठीचा मार अशी एक म्हण आहे. वैचारीक विश्वात अशा स्वरुपाच्या अभ्यासाचे भान मोठमोठ्या विचारवंतांकडुन सुटत चालले आहे. अशावेळी अजेंडा सत्यशोधनाचा नसून वादात जिंकुन प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबून करायचे हा त्यांचा हेतु असतो हे उघड आहे. अशाने विचारवंताचे रुपांतर विचारजंतात झाले असे म्हटले जाते.

© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...