माझ्या परिचयाचे एक गुजराथी गृहस्थ आहेत. माझे मराठीत आणि त्यांचे गुजराथी मिश्रित मराठीत बोलणे चालते.असेच एकदा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, "मुंबईत प्रत्येकाला गुजराथी आलीच पाहीजे."
मी त्यांना विनोदाने म्हणालो," तुमच्या वाक्यात चुका आहेत. मुख्य म्हणजे त्यातील "च" काढून टाका. तो आमचा आहे."
त्यावर ते गृहस्थही हसले.पण त्यांच्य चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते.मी स्पष्टिकरण करीत म्हटले," गुजराथमध्ये गुजराथी आलेच पाहिजे किंवा महाराष्ट्रात मराठी आलेच पाहीजे असे म्हणणे ठीक आहे.पण तोही भाषिक दुराभिमान म्हणून नाही तर साध्या व्यवहाराच्या सोयीच्या दृष्टीने ! अनेक वर्षे एकाच प्रांतात राहिल्यावर प्रांतिक भाषा सहजच येऊ लागते. पण मुंबईतील लोकांचे गुजराथीवाचून काहिही अडणार नाही. त्यांच्यावर सक्ती तर करताच येणार नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. सर्व व्यवहार मराठीतूनच व अपवादात्मक परिस्थितीत हिंदीतून व्हावेत."
ते गृहस्थ म्हणाले," रागावू नका अण तुम्ही गुजराथी भाषेचा द्वेष करता का?"
मी उद्गारलो ," यात द्वेषाचा प्रश्न आलाच कुठे? मुंबईत गुजराथी बरेच आहेत म्हणून गुजराथी भाषेच्या सक्तीची गरज आहे असे म्हणता त्या न्यायाने वडोदऱ्यात मराठीची सक्ती करायची का?"
यावर त्यांच्या कडे उत्तर नव्हते. नंतर आमच्या बोलण्याची गाडी अन्य विषयाकडे वळली. परंतु या गुजराथी माणसाच्या अशा विचाराचे मला आश्चर्य वाटले नाही त्याहून जास्त दुसऱ्या एका मराठी भाषिकाचे बोलणे ऐकून वाटले.
आपण म्हणजे असेच !
हे मराठी गृहस्थही माझ्या बऱ्याच वर्षांच्या परिचयाचे आहेत. बोलता बोलता ते एकदा फटकन उद्गारले," आपल्या मराठी लोकांना दुसऱ्यांच्या भाषा शिकायला नको असतात. आता हेच बघाना! मुंबईतील गुजराथी लोकांना मराठी येते पण आपल्याला मात्र गुजराथी येत नाही."
मी त्यांना सबुरीचा सल्ला देत म्हटले, " असा ठाम निष्कर्ष काढु नका.मुंबईत ज्या ज्या लोकांचा गुजराथी लोकांशी संबंध येतो त्यांना उत्तम गुजराथी बोलता येते.दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई गुजरात मधे नसून महाराष्ट्रात आहे आणि गुजराथी लोक येथे आले आहेत.त्यांना मराठी भाषा येणे अगदी साहजिक आहे. आपणासही त्यांची भाषा आली तर वाईट नाही. पण जर आली नाही तर मराठी लोकांना दुसरी भाषा शिकायलाच नको असते असा ठपका ठेवणे अन्यायकारक आहे.
"मला तुमचे म्हणणे पटत नाही " ते अट्टहासपूर्वक म्हणाले.
"थांबा माझे बोलणे पूर्ण झालेले नाही. मी तुम्हाला असे विचारतो की जे मराठी वडोदऱ्यात आहेत त्यांना गुजराथी येतेच ना? ते काही बोलण्याच्या आत मी पुढचा प्रश्न विचारला, "वडोदऱ्यातील कमीत कमी शेकडा नव्वद टक्के मराठी लोकांना गुजराथी येते.पण तेथील किती गुजराथ्यांना मराठी येते?
यावर ते निरुत्तर झाले तेव्हा मीच पुढे म्हणालो, "वडोदऱ्यात ज्या गुजराथी लोकांचा मराठी माणसांशी संबंध येतो त्यांनाच फारतर मराठी येईल. पण इतरांकडून तशी अपेक्षा करता येणार नाही. त्यांच्यावर मराठीची सक्ती करणेही अन्यायाचे होईल. त्याचप्रमाणे मुंबईतही सर्व मराठी बांधवांना गुजराथी आलेच पाहिजे अशी अपेक्षा करता येणार नाही वा तशी सक्तीही करता येणार नाही."
मग मराठी का नको?
गेल्या वर्षी रा.स्व.संघाने कोणत्यातरी सहाय्यक निधीसाठी पत्रक काढले होते. नेहमीप्रमाणे संघाचे एक कार्यकर्ते पत्रक घेऊन आले.सहाय्यक निधी विषयी माहिती देऊन त्यांनी मला पत्रक वाचण्याची विनंती केली. मी पत्रक वाचू लागलो.पत्रक हिंदीमधे होते. ते वाचल्यावर सहज मागील बाजू पाहिली आणि चकीत झालो.पण काही न बोलता त्यांना प्रथम पावती फाडण्यास सांगितली. काम झाल्यावर ते उठून जाऊ लागले. मी त्यांना म्हणालो, "काही वेळ थांबा.तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या हिंदी भाषेतील आवाहनापाठी गुजराथी मधेही आवाहनाचा मजकूर छापला आहे त्याचे कारण काय? गुजराथी बांधवांना हिंदी येत नाही का? "
ते म्हणाले,"तसे नाही पण....."
त्यांना अडवून मी माझा प्रश्न पूर्ण केला," तसे नाही तर मराठीमध्येही का आवाहन केले नाही ?" ( हे पत्रक बहुदा महाराष्ट्राच्या दुष्काळ निधी साठी व मुंबई शहरासाठी काढले होते.)
त्यांनी माझे बोलणे हसण्यावारी नेले व मलाच विचारले," यात काय बिघडले? अशा वादांनी कार्य अडते."
उलट कार्य अडतेच
मी त्यांना अडवले व म्हणालो, "तुम्ही चुकीचे बोलत आहात.तुमचे कार्य मी अडवलेले नाही. पण मला वाईट वाटते ते संघासारख्या स्वत:ला राष्ट्रिय म्हणवणाऱ्या संघटनेने मुंबई शहरात सहाय्य निधी साठी आवाहन केले ते हिंदी आणि गुजराथीतून! मग मग मराठीवर अन्याय होतो असे मराठी लोकांना वाटले तर त्यांचा दोष काय? हे पत्रक तर अगदी जाणूनबुजून काढल्यासारखे वाटते. एकतर केवळ हिंदीतून पत्रक काढायचे किंवा गुजराथीही हवी असेल तर मराठीतूनही काढले गेले पाहिजे होते. येथे तर सरळसरळ मराठीस हद्दपार केलेले दिसते."
"असे घडले आहे खरे" असे म्हणून ते निघून गेले. खरे तर अशा घोडचुकांनीच इतर प्रांतात कार्य अडले असते. पण मीही त्यंच्यासारखाच मराठी ! त्यामुळे "कार्य" अडले नाही इतकेच.
अनेक भाषा येणे हा सद्गुणच आहे. ती गोष्ट अभिमानास्पदही आहे.आज अनेक भारतीय परप्रांतीय भाषा आवडीने शिकतात. जर्मन, रशियन, फ्रेंच इ. भाषाही शिकतात. रशियन लोक मराठी शिकू लागले आहेत तर जर्मनीत संस्कृतचा अभ्यास होतो. पण त्यात सक्ती नसते. हटवादी पणा आला की सर्व बिघडते. महाराष्ट्रात राहून मराठीचा द्वेष, बंगालात राहून बंगाली चा द्वेष आणि भारतात राहून हिंदीचा द्वेष या गोष्टी भाषिक दुराभिमान दर्शवतात.
या वरील तिनही उदाहरणामध्ये मी भाषिक दुराभिमान दाखवत नव्हतो. या तिन्ही प्रकारात आलेल्या हट्टी भाषेमुळे निर्माण होणारा भाषिकवाद दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.
प्रथम प्रकाशन:
साप्ताहिक मार्मिक
१२ जुलै १९८७