देशाच्या इतिहासामध्ये अनेक राजकारणी,नेते, देशभक्त होत असतात परंतु त्यांच्यामध्ये राष्ट्रहिताचा, केवळ वर्तमानाच्याच नव्हे तर भविष्याच्या दृष्टीनेही विचार करणारे फारच थोडे असतात. अशा द्रष्ट्या नेत्यांमध्ये स्वा.सावरकर अग्रगण्य होते.
स्वा.सावरकरांचा इतिहासाचा अभ्यास सखोल होता.इतिहास म्हणजे गत पिढ्यांचे सामुहीक अनुभव! त्यांचा साठा ज्या समाजापाशी असतो त्यांनी पुन्हा ‘पहिले पाढे पढ पंचानन्न’ करणे म्हणजे अक्षम्य चूक ठरते.
१९१० चे सावरकरांचे अटकेनंतरचे छायाचित्र
अहिंसा, ह्रदयपरिवर्तन इ. उपायांनी युद्धे जिंकता येत नाहित आणि भारताच्या स्वातंत्र्याला सशस्त्र क्रांतीवाचून पर्याय नाही असा इतिहासाभ्यासक सावरकरांचा ठाम विश्वास होता.त्यांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ व ‘मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना’ म्हणजे क्रांतीकारकांच्या तीन पिढ्यांची गीता झाली होती. आझाद हिंद सेनेच्या पुढे सुभाषबाबूंनी केलेल्या भाषणांमधील उतारेच्या उतारे १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथामधील असत. मॅझिनीच्या चरित्राच्या प्रस्तावनेत सावरकर लिहीतात, ‘मोठमोठ्या क्रांत्या या तत्वांनीच घडवून आणलेल्या असतात पण तलवारीवाचून तत्वांचा विजय होत नाही व म्हणूनच इटलीने तलवार उपसली.’
इंग्रजांना अहिंसक चळवळींपेक्षा सशस्त्र क्रांतीकारकांचीच अधिक भीती वाटत असे.तत्कालिन पंतप्रधान ऍटली यांचे वक्तव्य म्हणजे सावरकरांच्या धोरणाला मिळालेली पोच आहे. ऍटली म्हणतात,‘ महायुद्धानंतर ब्रिटीश सैंन्य हिंदुस्थानावर जास्त पाठवणे शक्य होणार नाही व देशी सैंन्यावरील आमची पकड सुटली आहे.’
यावरुन स्पष्ट आहे की सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणामुळे व आझाद सेनेच्या सशस्त्र क्रांतीमुळे इंग्रजांची भारतावरील पकड सुटली व त्यांना स्वातंत्र्य देणे भाग पडले. सावरकरांनी १९३७ सालापासून राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदुंचे सैनिकीकरण हे धोरण स्वीकारुन आणि लेखण्या मोडा व बंदुका घ्या असा संदेश देऊन सैंन्यातील हिंदुंची संख्या तीसावरुन साठ टक्क्यांवर नेण्यात यश मिळवले. परंतु अनेकांना त्यांचे हे धोरण समजलेच नाही काहींना समजूनही त्यांनी तेथे दुर्लक्ष केले व सावरकरांना रिक्रुटवीर म्हणून हिणवण्यात धन्यता मानली.परंतु इंग्रजांना मात्र सावरकर आपल्या महायुद्धात झालेल्या अडचणींचा लाभ उठवत असल्याची पूर्ण जाणीव होती. पण त्यांना निरुपायाने सावरकरांचे सहकार्य घ्यावेच लागले.
सुभाष बाबू सावरकर भेट
सावरकरांच्या धोरणाचा परिणाम म्हणूनच सैंन्यातील हिंदुंची संख्य़ा साठ टक्क्यांवर गेली. तसे न होते तर स्वातंत्र्य मिळवण्यास विलंब झाला असताच पण त्यावाचून हिंदुस्थानचे अधिक तुकडे पडले असते. स्वत: सुभाषचंद्र बोस यांनीच रंगुन आकाशवाणीवरुन जाहीर आभार मानले व मान्य केले की त्यांच्यामुळेच आझाद हिंद सेनेला स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्दीष्टासाठी अधिकाधीक देशभक्त सैनिक मिळू शकले.
यातून सावरकरांचा द्रष्टेपणा सिद्ध होतो. पण असे असूनही आजही आपण रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळवल्याचा घोष करतो. अनेक स्वकीयांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करतो. सावरकरांची भूमिका मात्र सर्वांना यथायोग्य श्रेय देणारी होती. त्यांनी सशस्त्र क्रांती व अहिंसक चळवळ यांना यथायोग्य श्रेय देऊन म्हटले, मला सत्तेची हाव नाही. मातृभूमि तीन-चतुर्थांश का होईना याची देही याची डोळा स्वतंत्र झाली यातच आम्ही कृतार्थ झालो.
स्वातंत्र्य मिळाल्यावर ते जीवापाड जपणेही महत्वाचे हे ओळखून ते तरुणांना सतत सैन्यात शिरा, सबल व्हा. दुर्बल राष्ट्रांना जगात न्याय मिळू शकत नाही असे सांगत. परंतु स्वतंत्र भारताचे धोरण अहिंसा, ह्रुदय परिवर्तन, विश्वशांती, अलिप्तता चळवळ यांच्या जंजाळातच अडकले होते. या धोरणांना सावरकरांचा विरोध नव्हता, पण आधी बलवंत व्हा मगच तुमच्या धोरणांना मान मिळेल असे त्यांचे म्हणणे होते. स्वातंत्र्य मिळूनही आपण सीमाविभागाकडे दुर्लक्ष केले, तर याउलट पन्नास वर्षांच्या काळ्यापाण्याची भयाण शिक्षा समोर उभी असूनही, अंदमानला पोचताच सावरकरांच्य्या दृष्टीपुढे उभे ठकले ते अंदमानचे सामरीक महत्व! धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरते हे जाणून त्या विवशतेतही त्यांनी शुद्धी कार्य चालु ठेवले. तेथील हिंदुंमधे तेथेच स्थायिक होण्याचा प्रचार केलाव अंदमानात हिंदुंची बहुसंख्या कायम केली, व भारताला एक प्रबळ नाविक केंद्र मिळवून दिले. असे असूनही आपण मात्र सैनिकीकरणाकडे, लष्करी सामर्थ्याकडे पोकळ तत्वज्ञानाने दुर्लक्ष केले. परिणामी भारतावर केवळ अठरा वर्षांत तीन आक्रमणे झाली, १९६२ च्या युद्धात तर भारताची जगात नाचक्की झाली, विश्वशांतीचा बोजवारा उडाला आणि अलिप्तता हास्यास्पद ठरली. दोन लढाया जिंकूनही ह्र्दय्परिवर्तनावर विश्वास ठेऊन तह मात्र हरलो.
असे असले तरी अलिकडे मात्र सावरकरवादाचा स्वीकार करावा लागत आहे,केला जाणे भाग पडत आहे. १९७१ मध्ये आक्रमक धोरण स्वीकारुन भारताने पाकिस्तानावर मोठा विजय मिळवला. तीनही सेनादले आज आपण खूपच सुसज्ज केली आहेत, अण्वस्त्रे तयार करण्यातहि आपले धोरण नकाराय्मक नाही. हा सावरकरवादाचा, सावरकरांच्या द्रष्टेपणाचा विजय आहे. स्वतंत्र भारताचे सैंन्य नि:शस्त्र होऊन शत्रुसैंन्यापुढे सत्याग्रह करेल या टोकाचा गांधीवाद आज कोणी विचारात सुद्धा घेणार नाही. यापुढेही शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा स्वीकार करून इस्रायल, अरब राष्ट्रे व पी. एल्.ओ सारख्या दहशतवादी संघटना यांच्या संबंधातील धोरण आपणास बदलावे लागेल यात शंका नाही. अंतर्गत एकात्मतेच्या विषयी मात्र आपण अजूनही सावरकरांचा द्रष्टेपणा मान्य करुन सावरकरवाद स्वीकारलेला दिसत नाही. तसे नसते तर पंजाब प्रश्न एवढा चिघळला नसता आसामी हिंदुंना चाळीस वर्षांपूर्वीच सावरकरांनी दिलेले इशारे व संदेश त्यांनी मानले असते तर आसाम समस्या रक्तपाताविना सुटली असती. त्यावेळेस बांगला देश नसला तरी मुस्लीम घुसखोरांच्या वृत्ती आताच्या घुसखोरांप्रमाणे होत्या. १९८२ साली निर्माण झालेल्या स्फोटक आसामचे भविष्य सावरकरांनी १९४१ मध्येच वर्तवले होते. पण तरिही परकीय मुस्लीमांना आश्रय देऊन आपण आपल्या पदरात निखारे बांधून घेत आहोत याचे कोणासही भान नव्हते.
नागा बंडखोरांविषयी कडक धोरण आखण्याची मागणी सावरकर सतत करत होते पण भारताची भूमिका बोटचेती होती. जशी अलिकडे पंजाबसंबंधी होती. १९६० मध्ये दिलेल्या भाषणात सावरकर म्हणतात, ‘नागभूमिविषयी नेहरुंनी पहिली आज्ञा दिली ‘सैनिकहो गोळी खा पण उलट गोळी मारु नका! ते आपले लोक ना? ’या आदेशामुळे नागा बंडखोर प्रबळ होत गेले. रोज आपले सैनिक मरु लागले. आमची मान लाजेने खाली जाऊ लागली. विमाने पाठवून चार दिवसात बंडखोरांचा निकाल लावत आला असता. पण नेहरुंचा विश्वास ह्रुदयपरिवर्तनावर!’
पंजाबमध्येही असेच घडत होते; शेवटी मात्र सावरकरवाद स्वीकारुन सैंन्याच्या सहाय्याने सुवर्णमंदीर देशद्रोह्यांपासून मुक्त केले गेले.
सावरकरांचे द्रष्टेपण भल्याभल्यांना कळू शकले नाही. सावरकरांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या हिंदु संघटनेच्या चालकाचाही अगदी १९४६ च्या अंतापर्यंत गांधीजींवर विश्वास होता. गांधीजी व कॉंग्रेस देशाची फाळणी स्वीकारण्याच्या दिडेने प्रवास करत आहे या १९२७ पासून सावकरांनी सांगीतलेल्या भविष्याची सर्वांनी टवाळी केली. मुस्लीमांच्या अरेरावी मागण्या, मोपल्यांचे भीषण अत्याचार, मुस्लीम नेत्यांच्या देशात अराजक माजवण्याच्या प्रकट प्रतिज्ञा, सर्व देशभर होणाऱ्या हिंदुंच्या कत्तली तर याउलट सावरकरांचे हिंदुसंघटन, हिंदुंना सशस्त्र अ सावध होण्याचे इशारे,शुद्धीकार्य, धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरणार असा गंभीर इशारा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुंनी आत्मघात करुन घेतला.सावरकरांचे भविष्य कोणाला पटतच नव्हते.ज्यांनी सावरकरांना जातीयवादी ठरवून वाळीत टाकले त्यांनीच जीनांच्या घराचे उंबरठे झिजवण्यात मात्र कमीपणा मानला नाही. १९४० च्या नवयुगच्या एका अंकात आचार्य अत्रे लिहीतात," मुस्लीम लीगशी, लीगच्या अटींवर समेट करण्यास, कॉंग्रेस कधीही राजी नसता, कॉंग्रेस लीग करार हिंदुंवर बंधनकारक नाही असे,सावरकर कॉंग्रेसला दर महिन्यातून बजावत असतात. पुन्हा पुन्हा तेच तेच दळण ते दळीत असून वाचकांच्या तोंडाला अगदी चिकटा आला आहे." याच अत्र्यांनी कॉंग्रेसने फाळणी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस सोडली.(त्यांनी निदान झालेली चूक मान्य करण्याचा मोठेपणा तरी दाखवला इतरांना तेही जमले नाही.)
सावरकरांवर अविश्वास दाखवणाऱ्यांनी गांधीजींच्या १९४० मधील पत्रकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्या पत्रकात गांधीजी म्हणतात,"मुसलमानांना स्वयंनिर्णयाचा हक्क आहे व तो बजावण्याचे त्यांनी ठरवले तर त्यांना कोण रोखू शकेल?"
अनेक शतकांचा इतिहास दृष्टीपुढे असूनही सावरकर सोडून इतर सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मुस्लीम-अनुनयाचे धोरण स्वीकारले.सावरकरांनी दुरदर्शीपणे हिंदुंचे मोठया प्रमाणात सैनिकीकरण घडवले नसते तर हिंदुंची स्थिती काय झाली असती याची कल्पनाच करवत नाही.हे सर्व स्वातंत्र्यापूर्वी घडूनही स्वातंत्र्यानंतरही सावरकरवाद दुर्लक्षितच राहिला. फाळणीचा अनुभव लक्षात घेऊन हिंदु-मुस्लीमांची अदलाबदल केली असती तरी अर्धी लढाई आपण जिंकली असती. पण ते न होता पाकीस्तानच्या उदकावर पंचावन्न कोटींची दक्षिणा दिली गेली व त्यातून काश्मिरचा अर्धा भाग भारतापासून ओरबाडला गेला. हिंदुराष्ट्रवादाचा धिक्कार केला गेलाच पण निधर्मी राष्ट्रात अत्यावश्यक असलेली समान नागरी संहिताही स्वीकारली गेली नाही. स्वातंत्र्यानंतरही सहस्त्रावधी निरपराध्यांचे बळी जात राहिले. द्रष्टया देशभक्ताची उपेक्षा केल्याने दुसरे काय होणार?
स्वराज्यासाठी लढताना सुराज्याचे भानही द्रष्टया सावरकरांना होते. रोटीबंदी,स्पर्शबंदी यासारख्या सात बेडयांनी हिंदुस्थानचा ऱ्हास झाला असे ते म्हणत. या सप्तबेडया त्यांनी स्वत: तोडल्या होत्या. व्यवसायबंदी तोडण्यास स्वत: विविध व्यवसाय करुन लोकांनाही त्यांनी त्यासाठी उत्तेजन दिले, सहभोजनांचा धुमधडाका उडवून दिला.अस्पृश्यता गाडण्यासाठी त्यांनी जे अविश्रांत प्रयत्न केले त्याचे पतितपावन मंदिर हे स्मारक होय. मात्र त्यांच्या सुधारणा एकांगी नव्हत्या. स्त्रीसंघटन,स्त्री-शिक्षण,स्त्री-पुरुष समानता त्यांना मान्य होते पण स्त्रियांचे पुरुषीकरण अमान्य होते.
पतितपावन मंदीर
अस्पृश्यतेचा दोष सर्वांचा आहे,कोणा एका जातीच्या माथ्यावर त्याचे खापर फोडून इतरांची या पापातून सुटका होणार नाही. अस्पृश्य समाजातही उच्चनीचता व सप्तबेडया आहेत. या रोगाने सर्वांनाच ग्रासले आहे व सर्वांनी मिळूनच या रोगाचा निःपात करायचा आहे असा पुरस्कार त्यांच्या लेखनातून आढळतो. याच दृष्टीकोनातून त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतराला व त्यांनी मनुस्मृती जाळण्याच्या घटनेला प्रखर विरोध केला. अन्य धर्मांतही हे दोष आहेतच तेव्हा धर्मांतराने प्रश्न सुटणार नाहीच पण आणखी बिकट होईल असे त्यांनी आंबेडकरांना बजावले. कोणतेही धर्मग्रंथ जाळण्यास त्यांचा विरोध होता. धर्मग्रंथामधील जेवढे कालानुरुप असेल तेवढेच घ्यावे,असे ते म्हणत. काळाची पावले ओळखूनच ते वागत म्हणून तर सावरकर द्रष्टेपदाला जाऊन पोहोचले. सप्तबेडया तोडण्यासाठी रत्नागिरीमधे त्यांनी जे उपाय करून सुधारणा केल्या ते फार महत्वाचे आहे. धर्मांतराने प्रश्न न सुटता बिकट होतील हे त्यांचे म्हणणे खरे ठरलेच आहे. हे प्रश्न सोडनण्यासाठी विज्ञानबळाचे सहाय्य होईल हे त्यांनी ओळखले, व २१ व्या शतकातील विज्ञाननिष्ठा त्यांनी २० व्या शतकाच्या पूर्वार्धातच दाखवली.देशाची प्रगती व्हावी म्हणून भाबडया समजूतींवर प्रहार करुन समाजाचा रोष ओढवून घेतला पण आपली मते सोडली नाहीत, यंत्रयुगाला अव्हेरले नाहीत."जर का आज पेशवाई असती" या लेखातून त्यांनी विज्ञानाने बलवान झालेल्या भारताचे स्वप्न रंगवले आहे.
"भारत पुन्हा जागृत झाला आहे,वैज्ञानिक प्रगतीने सर्व जगात एक महासत्ता बनला आहे.हिंदु फौजा लंडन,फ्रान्स,अमेरीका गाठत आहे.क्रीडा व कला क्षेत्रांमधे भारतीय उच्चांक करत आहेत" अशा भारताचे चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे होते. "कोटी कोटी हिंदु जाती चालली रणाला,होऊनिया मुक्त स्वतः करील मुक्त ती जगता" हे त्यांचे,त्या महान द्रष्टयाचे भविष्य होते. ते प्रत्यक्षात आणण्याचे उत्तरदायित्व आता स्वतंत्र भारतावर आहे.
पारीतोषीक विजेता लेख
प्रथम प्रकाशन:
मासिक वीरवाणी
२६ फेब्रुवारी १९८७
3 comments:
नमस्कार !!
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराला उजाळा "स्वातंत्र्यसमर १८५७ चा" http://swatantrasamar1857cha.blogspot.com/,
त्यात तुम्हाला बघायला मिळेल दुर्मिळ चित्र आणि त्यांची संक्षिप्त माहीती - १८५७ च्या समराला सुरुवात करणारे विवादीत काडतुस, बंडात वापरलेली पी-५३ रायफल, मंगल पांडेंच्या फाशीचा हुकुमनामा, समरातील काही आठवणी - क्रुरपणे दिली जाणारी फाशी, काश्मिरगेट वरील रणसंग्रांम (दिल्ली), बराखपुर येथील छावणी, शिपायांची कैद, तोफेच्या तोंडी सैनिक, लखनव येथील इंग्रजावर हल्ला, इंग्रज अधिकारी हॅवलॉक यांनी केलेली कत्तल, मंगल पांडे, तात्या टोपे, बहादुरशाह जफर, बेगम हज्ररत महल, कुंवरसिंह, नाना साहेब, राणाबेनी माधवसिंह, १८५७ काळातील इंग्रज अधिकारी - ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरीया, गर्व्हर्णल जनरल भारत, हेंन्री हॅवलॉक, झाशीच्या राणीचे पत्र, समरातील योध्यांवरील टपाल टिकीटे, ब्रिटीशांची शौर्य पद्क, १८५७ काळातील महत्वपुर्ण नकाशे , १८५७ च्या कालखंडातील चलन, १८५७ सालातील घटनाक्रम इ.
तर मग तुम्ही जरुर भेट द्या, आणि तुमचा अभिप्राय ब्लॉग वर द्या !!
प्रशांत - नाशिक
कदाचित आपण अजुनही तो उठाव म्हणजे एक बंड होते आणि अपराधी सैनिकांना तशी कठोर शिक्षा देणे योग्यच होते असे मानाल,
पण आम्ही भारतीय लोक ते केवळ शिपायांचे बंड होते असे मानत नाही, आम्ही ते आमचे पहिले राष्ट्रीय स्वातंत्र्यसमर मानतो.
--स्वामी विवेकानंद--
खूप छान आहे लेख. हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा म्हणजे सावरकरांचे महत्व लोकांना कळेल.
चांगला लेख, अतिशय वास्तववादी.
कृपया उस्फुर्त हा शब्द उस्फूर्त असा लिहावा. प्रत्येक रफारापूर्वीचा वर्ण दीर्घ असतो.
Post a Comment