गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949
No comments:
Post a Comment