Skip to main content

माझी वाचनयात्रा

वयाच्या साधारण ८ व्या वर्षापसून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग.शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण तो फारसा टिकला नाही. दहावीच्घ्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच.समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. केतकर आल्यावर मटा चा सोटा म्हनजे सोनिया टाईम्स झाला होता. मग आपोआप मटा सुटला.
मराठिची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी दहा पुस्तके :
.
१. कर्मयोग - स्वामी विवेकानंद
२. सावरकरांचा बुद्धीवाद एक चिकित्सक अभ्यास- शेषराव मोरे
३. समग्र सावरकर
४. भ्रम आणि निरास- डॉ. नरेंद्र दाभोळकर
५. सावरकरांचे समाजकारण- सत्य आणि विपर्यास- शेषराव मोरे
६. शोध भानामतीचा- शाम मानव
७. स्वामी विज्ञानानंद यांची साहित्यसंपदा
८. वीरधवल- नाथमाधव
९. उष:काल- ह.ना.आपटे
१०. योगवासिष्ठ (३ खंड )
-चंद्रशेखर साने

Comments

Popular posts from this blog

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...

. लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळे , नागवेकर व सहकारी यांनी गायलेले हे काव्य ऐकताना मनात एक शांत भाव दाटुन येतो. या गाण्याचे शब्द मला ऐकु येतात ते असे, . रात्र काळी घागर काळी यमुनाजळेही काळी वो माय बुंथ काळी बिलवर काळी गळामोती येतावळी काळी वो माय... ॥ धृ ॥ मी काळी, कांचोळी काळी कासकासोनि ते काळी वो माय बुंथ काळी ... ॥ १ ॥ एकली पाण्याला, नव जाय साजणी सवे पाठवा मुर्ती सावळी वो माय बुंथ काळी... ॥ २ ॥ विष्णुदासनाम्याची, स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहु काळी वो माय बुंथ काळी.... ॥ ३ ॥ . विष्णुदासनामा हे एकनाथांच्या काळचे ! संत नामदेव महाराज वेगळे !! विष्णुदास म्हणजे विठ्ठलाचे दास. कृष्णाचे काळे रुप संतांना प्रिय होते. काळा रंग म्हणजे सर्व रंगांचे एकत्रीकरण. डांबर काळे असते त्यापासून सर्व रंग निर्माण करतात. सर्व मूळ रंग एकत्र केले की पुन: काळा रंग तयार होतो. यमुनेचे जळ काळे, घागर काळी. जे आणायचे ते काळे ज्यातून आणायचे ते काळे, जो आणतो आहे तोही आता काळाच. आता एवढे झाल्यावर वरपांगी रुप तरी व...