Sunday, March 13, 2016

आझादीचे स्त्रोत आणि स्तोत्रकार

मोक्ष मुक्ती हि तुझीच रुपे तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती ।।

स्वातंत्र्याच , मुक्तीच आणि उर्दुतल्या "आजादी" शब्दाच स्तोत्र लिहिणारे आणि गाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आज मरु घातलेली कॉंग्रेस आणि मेलेल्या लाल बावटयांचे मुख्य शत्रु झाले आहेत. सर्व पातळी सोडुन ते सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, वर्तमानकाळात सावरकर हे त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे शत्रु ठरलेत हि मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्या सावरकर द्वेषाला वैचारिक प्रत्युत्तर देण्यास महाराष्ट्रातले व बाहेरचे अभ्यासक समर्थ आहेत, कारण हे सर्व आरोप मुख्यत: वस्तुस्थितीपेक्षा द्वेषावर आधारित आहेत. असे आरोप खोडणे फार सोपे असते. मग हे विरोधक असे का करत आहेत? त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडॆ हिंदुत्ववादी अथवा भाजपा अथवा मोदी सरकार विरुद्ध फारसे विरोध करण्यास हातात काही उरलेले नाही. काही घटना वा कमी वकुबाच्या व्यक्तींचा वापर करुन अकांडतांडव करुन मोदी व भाजपा यांची लोकप्रियता घटल्याचे भ्रामक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करुन स्वत:च निर्माण केलेल्या आनंदवनभुवनी गुंगीत रहाणे हेच त्यांना सध्या शक्य आहे व तेच ते करत आहेत. मुख्य विषयांकडचे लक्ष भलतीकडे वळवणे हे खरतर सत्ताधारी पक्षाच्या फायद्याचे असते त्या ऐवजी हे काम विरोधक करत आहेत हि आश्चर्याचीच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या कही अंशी असलेल्या यशाची पावती आहे.

सावरकरांची प्रतिमा मलिन करुन त्यांना काहीही हातात लागणार नाही, सावरकरांवर आचरट आरोप करुन मोदी वा भाजपा चिडेल, हिंदुत्ववाद्यांना चिडवुन त्यांच्या कडून काही आततायी कृत्य घडेल असे त्यांना वाटत असेल तो शुद्ध राजकिय़ मुर्खपणा आहे. कारण कॉंग्रेसने जसे ५०-६० वर्षे गांधीजींचे नाव वापरुन त्यांच्या महात्मेपणाचा सत्ता मिळवण्यासाठी दुरुपयोग केला तसा सावरकरांच्या नावावर अथवा विचारांवर मोदी वा भाजपा सत्तेवर आलेलीच नाही. त्यांना सावरकर हे गांधीजीं इतपतच आदरणीय आहेत, अनुसरणीय आहेतच असे नाही. त्यामुळे सावरकरांची प्रतिमा मलिन करुन उद्रेक वगैरे काही होण्याची शक्यता नाही. मागच्या वेळी कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने अंदमानात सावरकरांचे स्मृतिचिन्हाबाबत तालिबानी वृत्तीचे प्रदर्शन घडवले होते तेव्हा अगदी पुण्यात कै.श्रीमती हिमानी सावरकर लोकसभा निवडणुक लढवली होती, त्यांनाही साधारण दोन वेगवेगळ्या आकड्यांनुसार १००० किंवा ५००० इतकीच मते मिळली होती. त्यावेळी कै.प्रमोद महाजनांनी स्पष्टपणे सांगितले होते की सावरकरांचे नाव वापरुन मते मिळत नाहीत त्यामुळे त्यांच्या नावावर मते मागण्याचा प्रश्नच येत नाही किंवा सावरकर कुटुंबातल्या व्यक्तीला ही पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही.
तरिही हा सावरकर द्वेष का होत आहे? तर याचे एकमेव कारण कॉंग्रेस व साम्यवादी सटपटले आहेत हे एकमेव कारण आहे. सावरकरांवर पातळी सोडून आणि खोटी व वाह्यात टिका करणे हे त्यांचे नैराश्य आणि दिवाळखोरी या व्यतिरिक्त काही नाही. महाराष्ट्रात तर या यामुळे यांना मतांसाठी फायदा न होता उलट लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा जास्त मलिन होत आहे. कारण गांधीजींवर हिन पातळीवर टिका करुन नथुरामवाद्यांचे जे नुकसान झाले तेच सावरकरांवर हिन पातळीवर टिका करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
सावरकरांना भारतरत्न देणे न देणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. शिवसेनेची मागणी या व्यतिरिक्त तसा कोणताही प्रकारे या गोष्टीचा मागमुसही प्रत्यक्षात दिसत नाही. अंदमानातले सावरकरांचे माजी उद्धट पेट्रोलियम मंत्र्याने उखडलेले स्मरणपट्टीका दोन वर्षे झाली तरी निर्माणाचे काम आरामात चालु आहे. भारतात स्वच्छता अभियान ते अमेरिकेत ओबामांना गांधीगीता देण्यापर्यंत मोदी सर्वत्र गांधीनामच जपत आहेत. अशावेळी सावरकरांविषयी द्वेष या तथाकथित पुरोगामी व धर्मनिरपेक्षतेचे नाव घेणाऱ्यांच्या मनात उफाळुन येणे हे अतिशय केविलवाणे चित्र आहे. ज्या पातळीचे पोरकट आणि उडाणटप्पु नेतृत्व त्यांना लाभले आहे त्याचा हा दृष्य परीणाम आहे.

सावरकरांची केली जाणारी बदनामी आणि आक्षेप यांना वेळोवेळी अभ्यासु व तथ्यांवर आधारीत उत्तरे सावरकरांच्या चाहत्यांनी वेळोवेळी दिली आहेत व पुढेही देत रहातील. शत्रू याबाबत अत्यंत कमकुवत असल्याने हे फारच सोपे काम आहे. प्रश्न फक्त प्रचारतंत्राचा आहे. त्यात मोदी वाकबगार आहेत. असल्या घटनांचे संधीत रुपांतर कसे करायचे ते त्यांना चांगले माहित आहे. गांधी, पटेलांच्या प्रतिमेचे त्यांनी कॉंग्रेसकडून स्वत:कडे हस्तांतरण करुन घेतलेच आहे, पण ज्या सावरकरांच्या नावावर मत मिळत नाहीत त्यांच्या बदनामीचा एक अदृष्य फायदाच त्यांना मिळणार आहे. सावरकर हे भारतीय राजकारणात रसायनशास्त्रातल्या उत्प्रेरकासारखे (Catalyst) आहेत. उत्प्रेरकाचा रासायनिक प्रक्रियेत सहभाग नसतो तसाच रासायनिक घडामोडींचा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही, पण प्रक्रीया घडवुन आणण्यात मात्र तो सहाय्यकारी होतो. उत्प्रेरक एकतर रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवतो अथवा कमी करतो पण स्वत: मात्र निर्लेप रहातो. सावरकरांचे विचार हे प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होताना दिसत नाहीत, त्यांचे नावही देशात सरसकट माहित नाही , १०० हून जास्त वर्षे त्यांच्या नावाचा व विचारसरणीचा विरोध , द्वेष आणि गैरसमज करुन देणे चालु आहे पण तरिही सावरकरांचे नाव मिटवणे विरोधकांना शक्य झाले नाही. उत्प्रेरक (Catalyst) म्हणून भारतीय राजकारणात सावरकरांचे असलेले अस्तित्व अढळ आहे.

- लेखक चंद्रशेखर साने
.......................xxx..........................

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...