Wednesday, April 12, 2017

हिंदुत्ववाद आणि हिंदुधर्मवाद

हिंदुत्व हि राजकीय आणि इहवादी संकल्पना आहे. हिंदुत्व आणि हिंदुधर्म अथवा हिंदुइझम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोहत्याबंदी हिंदुधर्माचा भाग असू शकेल मात्र हिंदुत्वाचा तो भाग नाही. हिंदुधर्माच्या अभिमानात कदाचीत गोहत्या, मुर्तीपुजा, आरती, जन्म पुनर्जन्म, उपासना येत असेल, हिंदुत्वाच्या अभिमानासाठी मात्र या गोष्टी पाळण्याची अट लागु नाही. एखादा बुध्दीवादी किंवा नास्तिक सुध्दा हिंदुत्वाचा अभिमानी असू शकतो. हिंदु समाजाचे न्याय्य हक्क जोपासणे आणि ऐहिक हित जपण हाच हिंदुत्वाचा अर्थ आहे. पारलौकिक बाबींसाठी हिंदुत्व नाही. हिंदुधर्मातील मूल्यांची चिंता हिंदुत्व करत नाही, पण ज्या हिंदुंना हिंदुधर्मातील मूल्ये पाळायची इच्छा असेल आणि जर अन्य लोकांकडून त्यावर आक्रमण होत असेल आणि ते नैसर्गिक हक्कांवर आक्रमण असेल तर तिथे हिंदुत्व नक्कीच दखल घेते.
हिंदु धर्म व हिंदुत्व यातील शब्दसाधर्म्यामुळे खूप घोळ झालेत. अगदी न रुचणार सांगायचे तर संघ व गांधी यांच्यात समानता आहे तिचे नाव हिंदु धर्माचा अभिमान हे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हा हिंदुसमाजाचा स्वाभिमान व इहवादी दृष्टीकोन आहे.
संघाला गांधींचे हिंदुपण सावरकरांच्या हिंदु पणा पेक्षा जास्त जवळ वाटत. मुस्लीमांचे तुष्टीकरण हा भाग सोडला तर गांधीजींचे रामराज्य, गोरक्षण, स्वदेशीे संघाला मान्य आहे. गांधी आणि सावरकर दोन्ही स्वदेशी चे पुरस्कर्ते पण सावरकरांचे स्वदेशीला यंत्रयुगाचा स्वीकार मान्य आहे तर गांधींच स्वदेशी यंत्रयुगाचा धिक्कार आणि मानवी श्रम वापरण्यावर भर देत. संघ स्वदेशीचा पुरस्कार करणारी शाखा उघडतो पण प्रत्यक्ष सत्तेत मात्र जागतिकीकरणालाच महत्व देतोय, तिथे तो गांधींपासून लांब गेलाय.
सावरकरांची पारतंत्र्यातली सशस्त्र क्रांती व समर्थ भारत हे संघाला तत्वत: मान्य आहे, पण संघ संघश: सशस्त्र क्रांतीत पण नव्हता आणि सत्याग्रहात पण नव्हता. संघ स्वयंसेवक वैयक्तिक रित्या स्वातंत्र्य लढ्यात असतील ते असतील.
सत्याग्रह , अहिंसेचा अतिरेक याविषयी संघ गांधींपासून दुर आहे.
दोन्ही बाजूंनी जे जे रुचेल ते ते घेतल जात. जे संघाच तेच इतरांच, एरवी सावरकर या नावाचा द्वेष करणारे सावरकरांचा बुध्दीवाद आणि गायीविषयीची भूमिका हटकुन संघपरीवाराच्या तोंडावर मारतात. इथे सावरकरांच नाव घेणारे सावरकरांच हिंदुत्व सुध्दा इहवादी आणि बुध्दीवादी आहे हे सोयीस्कर पणे विसरतात. दोन्ही बाजू विविध विचारसरणीच्या लोआकांच्या मार्गदर्सनातील आपल्या मूळ मूळ प्रेरणेला आणि राजकारणाला अनुकूल अशा गोष्टींचा फक्त स्वीकार करत असतो. इतर गोष्टींवर मौन बाळगण पसंत करतो.
सारांशाने व स्थुलमानाने जिथे जिथे हिंदुधर्माच्या अंतर्गत प्रश्न येतात तिथे तिथे संघ हा सनातनी गांधींच्या जवळ जातो आणि जिथे जिथे हिंदुधर्माबाहेरच्यांशी संवाद साधायचा मार्ग असतो वा हिंदुधर्माबाह्य राष्ट्रीय प्रश्न सोडवायचे असतात तिथे तिथे संघ सावरकरांच्या हिंदुत्वाच्या जवळ जातो.
© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...