माझी वाचनयात्रा
वयाच्या साधारण ८ व्या वर्षापासून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग. पारायण करुन मनमुराद हसत असे. शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण कविता करण्याचा नाद फारसा टिकला नाही. मात्र दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते उदाहरणे म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच. समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि कुसुम अभ्यंकर, कुमिदिनी रांगणेकर, मंगला गोडबोले, शांता शेळके अशा अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. श्री. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. कुमार केतकर आल्यावर त्यांनी मटा चा सोटा म्हणजे सोनिया टाईम्स केला होता. मग आपोआप म.टा. हातातून सुटला.
मराठीची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी भाषा संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
-चंद्रशेखर साने
No comments:
Post a Comment