आपले संपूर्ण आयुष्य केवळ समाजासाठी वाहून घेतलेल्या स्वा.वि.दा.सावरकर यांनी २६ फेब्रुवारी १९६६ ला प्रायोपवेशनाच्या साधनाने आत्मार्पण केले. सर्व आयुष्यभर त्यांनी एकच ध्येय जपले ते म्हणजे भारतीय समाजाची पारतंत्र्यातून मुक्ती ,देशस्वातंत्र्य! त्यासाठी त्यांनी स्वत"चे स्वातंत्र्यही पन्नास वर्षांसाठी पणाला लावले.
स्वा.सावरकर हे विज्ञाननिष्ठ व नास्तिक होते. जास्त अचूक शब्द वापरायचा तर अज्ञेयवादि होते. कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध होत नाही तोपर्यंत सिद्धांत म्हणून त्यांनी कधीच स्वीकारली नाही. भारतीय योगशास्त्र मात्र त्यांनी विज्ञाननिष्ठ मानले. "कुंडलिनी" ही भारतीय मानसशास्त्राने जगाला दिलेली देणगी आहे असे त्यांचे मत त्यांनी मांडले.आपल्या मनोबलाच्या आधारे त्यांनी अचाट अशी कृत्ये केली. "कि न घेतले व्रत अम्ही अंधतेने, बुद्ध्याची घेतले म्या वाण करी हे सतीचे" या काव्यपंक्ती त्यांच्या नि:स्वार्थ त्यागाच्या प्रेरणेतूनच स्फुरलेले आहे. देशस्वातंत्र्यासाठी लढताना अगदी जाणूनबुजून ,डोळसपणे दु:खाचा- सतीच्या वाणाचा स्वीकार त्यांनी केला."माझी जन्मठेप" या आपल्या आत्मचरित्रातून त्यांनी स्वीकारलेल्या त्यागी जीवनाचा व दु:ख स्वीकाराचा प्रत्यय ठायी ठायी येतो.माझी जन्मठेप मधे ते म्हणतात, "माझ्या या कष्टमय हेतुपूर्वक स्वत:वर कोसळून घेतलेल्या संकटांचे पर्वताखाली चिरडलेल्या आयुष्यात जर कोणता एखादा नियम अतिशय कडु पण अतिशय हितपरिणामी झाला असेल तर तो सदोदित प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरुन त्यास मनाची सिद्धता करुन ठेवणे हाच होय." (पृ. १७ समग्र सावरकर वाड्मय खंड-२ )
पृ.८२ वर तुरुंगाधिकार्याशी झालेल्या संवादात ते म्हणतात, "या त्रासात मी स्वत:हून पडलो हे खरे आहे. कारण त्या त्रासात तसे स्वत:हून पडणे हे मला माझे कर्तव्य वाटले तसेच या त्रासातून शक्यतर सुटणे हे ही कर्तव्यच वाटले. ( समुद्रात उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न)
सावरकर अज्ञेयवादि होते.त्यामुळे यातनांनी खचलेल्या मनाला आत्महत्येपासून परावृत्त करताना सूक्ष्म गोष्टींसंबंधी ते जर-तर च्या भाषेत ते लिहीतात,(पृ. १४०) "...पण अशा रितीने जेथे इतर भक्कम यंत्रे चुरून जातात तेथे गुप्त, अज्ञात यातनांचा मार सहन करण्यात उपयोगी पडावे, ते कार्य त्याचेकडून करुन घ्यावे म्हणूनच हे कर्तृत्वशक्तीचे यंत्र केले नसेल कशावरुन?" गुप्त,अज्ञात यातनांचा उपयोग काय याविषयी ते लिहीतात, "...तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल..." पुढे त्यांच्यातला अज्ञेयवादी लिहीतो, "परंतु ते जर तुला खरे वाटत नसेल आणि हि बातमी देखील (स्वत:च्या मृत्युची) देशास कळणार नाही मग त्याचा नैतिक परिणाम कोठला होणार?...त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्याकरता स्वत:च्या हाताने करुन आपल्या पक्षाचे हानीत आणि अपजयात भर का घालतोस? " बुद्धीने दिलेले हे कारण मनाला पटल्यावर याच पृष्ठावर सावरकर म्हणतात,"...त्या वेळेस काही घटिका ज्या कार्याचा निदिध्यास लागल्याने मनाने संसाराच्या सर्व सुखांवर लाथ मारली त्या उदात्त कार्याची चर्चा मोकळेपणाने करता आल्याने मन पुन: चैतन्ययुक्त होई. सुप्त तेज पुन: जागे होऊन उठे. सोसले ते अपमान सन्मानच वाटू लागत. भोगलेल्या यातना काहीच नव्हत. भोगावयाच्या आहेत त्याही कर्तव्यच होत हा निर्धार पुन: सबळ होई. ह्या घटिका म्हणजे त्या कोलूच्या कठोर शापातील वरच होत्या."
अंदमानात सावरकरांनी यातनांच्या भीषण कचाट्यातही बंदिवानांमधे शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणाचे व्यावहारीक फायदे राजाबंद्यांना पटवून देतानाच ते म्हणत ,"नुसते ज्ञान लंगडे तर नुसते कर्म अंधळे. धर्मकारणाप्रमाणेच राजकारणातही ज्ञानयुक्त कर्म हेच समाजास हितकारक होणारे आहे. तुम्ही सध्या एक सेवात्यागाची, यातना सहन करण्याची निष्क्रीय सेवा करताच आहा. त्याचे जोडीस ....तिला आता ज्ञानदृष्टीचीही जोड देऊन दुहेरी योग्यता अंगी बाणवू."
अंदमानाच्या अंधेर कोठडीत उपयुक्ततावादी सावरकरांनी योग, कुंडलिनी, वेदान्त यांचा उपयोग करुन घेतला.मार्सेलिसला समुद्रातून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यावर मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी आत्मबल नावाचे काव्य रचले आहे. त्यात "अनादि मी अनंत मी" असे स्वत:च्या आत्म्याचे वर्णन करुन घोर निराशेतून मनाला पुन्हा बळ प्राप्त करुन दिले.अंदमानात केलेल्या योगाभ्यासाविषयी सप्तर्षी या महाकाव्यात ते लिहीतात,
‘तो दिवस मावळू ये, मग ज्या होतो धरुनि नियमासी ।
चित्तैकाग्र्यासी मी साधित एकान्त विगत षण्मासी ॥
नियमानुरुप त्या मी चित्तैकाग्री करावया प्रगती ।
पुरती सक्त मजूरीहोतांची की धुवोनि कर मग ती ॥
योगीराजाचा त्या ग्रंथ ‘श्री राजयोग’ मी उघडी ।
शान्त रसाचा पेला दूर करावा गमेचि जो न घडी ॥’
सुरुवातीला मन एकाग्र करणे कठीण. सावरकर म्हणतात,
‘ मन हे चंचल भारी ! दुर्निग्रह भासलेचि साधुजनां ।
जड जीव, अनभ्यस्तचि त्यात अम्ही, आवरेचि ते मज ना ॥’
पुढे चित्त एकाग्र होऊ लागले तेव्हा,
‘ घेता घेता ऐशा वृत्ती ध्यानस्थ चित्ती विलयते ।
ये सुखद अनुभवाया ‘आत्म-रती’चा प्रसाद तिल याते ॥’
अन्तर्जोतीवर चित्त स्थिर झाल्यावर अंधार कोठडिला काय घाबरायचे?
‘तूं अन्तर्ज्योति ! तुला या अंधारात घाबरा? पाहे ।
सुख-दु:खाचे साधन बाह्य न, परि मनात बापाहे ॥
अंदमानातून सुटून आल्यावर "कुंडलिनी व हिंदुधज" या विषयावर त्यांनी रत्नागिरीत तीन व्याख्याने दिली.विज्ञाननिष्ठ सावरकरांनी भाषण करताना म्हटले," बंदिवासात असताना एकट्याची एकांतातली करमणूक म्हणून या संबंधाने मी थोडासा अनुभव घेतला आहे." सावरकरांना योगविद्या अवगत होती. त्यांना काही मंत्रही येत असत. रोज काही वेळ ते ध्यान करत असत याला बर्याच जणांनी दुजोरा दिला आहे. योगशास्त्राला सावरकरांनी संपूर्ण विज्ञानावर आधारीत एक प्रत्यक्ष, प्रयोग,अनुभव व पडताळा घेता येणारे शास्त्र मानले आहे.
धर्मातील कर्मकांडाचे प्रतिक असणारी कुंडलिनी हिंदु ध्वजावर अंकीत करणे ही अंधश्रद्धा नाही काय, या प्रश्नावर बुद्धीवादी सावरकर म्हणाले," हे म्हणणे योग्य नाही. योग ही भारताने सर्व जगाला दिलेली देणगी आहे.आपल्या पूर्वजांनी शरीर आणि मानसशास्त्र याचा सहस्त्र वर्षांपूर्वी एवढा खोल विचार केला होता की, अगदी परमावधी चे आश्चर्य वाटते. योगसाधनेचा विचार हा अगदी विज्ञाननिष्ठ आहे. बंदीशाळेत मी कुंडलिनीचा उबारा अनुभवला आहे."
मात्र आपल्या योगसामर्थ्याविषयी सावरकर फारसे बोलत नसत. हा चर्चेचा विषय नाही असे सांगून याविषयीचे प्रश्न टाळत. आपल्या अनुयायांनी व समाजाने जास्तीतजास्त विज्ञानाभिमुख व्हावे आपल्या बोलण्यातून गैर अर्थ निघु नयेत म्हणून या विषयी मौनच पाळणे त्यांना जास्त पसंत होते.सावरकरांनी आपले सर्व आयुष्य समाजासाठी वेचले. समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर, साहित्यिक, नाटककार,महाकवी ,उत्कृष्ट वक्ता, अनेकांना क्रांतीकार्यात प्रेरक शक्ती ठरलेला अशा विविध भूमिका पार पाडल्यावर वयाच्या ८२ व्या वर्षी सावरकरांनी आत्मार्पणाचा निर्णय घेतला. आता आपली काही कर्तव्ये राहिली नाहीत. केवळ जगाला व स्वत:ला हा देह भारभूत होऊ नये म्हणून हा बुद्धीने घेतलेला निर्णय होती. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी "आत्महत्या आणि आत्मार्पण" हा लेख त्यांनी प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी संत रामदास, ज्ञानेश्वर, एकनाथ इ. ची ठळक उदाहरणे दिली. सुरुवातीला समुद्रात देह समर्पित करण्याची त्यांची इच्छा असावी (महायोगी सावरकर : ले. बाळाराव सावरकर) पण आपल्या बरोबर असलेल्यांवर दोष येऊ नये , कायद्याचा त्रास त्यांना होऊ नये या हेतूने तो विचार त्यांनी रद्द केला व अन्न त्याग करुन म्हणजे प्रायोपवेशन करुन आत्मार्पण केले. एका तेजस्वी त्यागमुर्तीचा शेवट दि. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी झाला.
प्रथम प्रकाशन
: मनशक्ती पाठ ऑगस्ट २००९