बखरी,तवारिखा या खोटया असतात असे कोणताच शहाणा इतिहासकार म्हणत नाही. हि साधने दुय्यम असतात एवढेच त्यांचे म्हणणे असते. वि.का.राजवाडे हे सुद्धा बखरींना दुय्यम मानतात. एखाद्या अस्सल कागदपत्राच्या चिटोर्याचा पुरावा बखरीला खोटे पाडू शकतो असे ते म्हणतात. पण त्यासाठी आधी अस्सल कागदपत्राचा चिटोरा मिळावा लागतो व नंतरच बखरीतील काही भाग चुकीचा ठरु शकतो.पण त्या टाकाऊ असतात असा त्याचा अजिबात अर्थ नाही.
बखरी ,तवारिखा दुय्यम असतात याची वेगवेगळी कारणे आहेत. तो दरबारी खुषमस्कर्या असू शकतो, वैयक्तिक रागलोभ, विचारधारा इ.त्याच्यात असू शकतात, त्याला त्याच्या वर्तमानातील एखादा पक्ष असू शकतो, काही वेळा तो आठवणींवर लिहित असतो व त्याची स्न्मरणशक्ती त्याला दगा दिलेली असू शकते. पण याचा अर्थ असा समजता कामा नाही कि त्याचे मोलच नाही किंवा त्यातली प्रत्येक गोष्ट हेतुत: किंवा मुद्दाम खोटी लिहिलेली असते. अन्यथा सर्व इतिहास ज्यावर सजलेला असतो त्याचा आधारच नष्ट होईल. इतिहास, इतिहास म्हणून फार काही शिल्लकच रहाणार नाही. कारण अस्सल क्कागदपत्रे मिळण्याचे प्रमाण दुय्यमच असणार हे उघड आहे. आज केवळ ३५० वर्षे होऊनही शिवाजी महाराजांच्या स्वहस्ताक्षरातील अस्सल कागद सापडलेला माझ्या ऐकिवात नाही.
मात्र बखरी ,तवारीखा यांचे वास्तव तपासून घ्यावे लागते. एकमेकांशी त्या पडताळून त्यातील चुकीचा मजकुर बाजूला काढावा लागतो.बखरीतला इतिहास गाळला व केवळ समकालिन पुराव्यांवर इतिहास रचला तर किती तरी इतिहास गाळावा लागेल. म्हणून बखरी ,तवारिखात ज्या घटना उल्लेखित आहेत व त्या एकमेकांविरुद्ध जात नाहीत असे असले व अन्य एखादा अस्सल विरोधी पुरावा सापडत नाहीत तोपर्यंत तवारिखा व बखरीतील पुरावा विश्वासार्ह मानावा.
इतिहास हा २+२ = ४ असा गणितासारखा किंवा प्रयोगशाळेत प्रयोग करण्याचा नसतो. दोन ऐतिहासिक घटनांमधील संबंध इतिहासकार स्वत:च्या प्रतिभेने जोडतो व त्याला तर्कशुद्ध पुरावे(युक्तीवाद) देतो.अशी सांगड घालण्याचा अधिकार इतिहासकारांना नसेल तर तो कधीच उजेडात येणार नाही, कारण शेवटी इतिहास हा विषय कलाविभागात येतो विज्ञान विभागात नाही.ख्ररा इतिहासकार हा कित्येकदा आपल्या प्रतिभेने घटना प्रत्यक्ष पहातो जणु काही तो त्या इतिहासाचा साक्षी आहे. ती एक सूक्ष्म मानसिक प्रक्रिया असते.पण जो इतिहास तो साक्षीभावाने पाहतो त्याला ते इतरांना पुरावे व तर्क यांनी पटवुन द्यावा लागतो त्या अर्थाने ते एक विज्ञानही आहे.
अभावाचा पुरावा मानणे किंवा अपवाद हाच प्रघात समजून तो ऐतिहासिक पुरावा मानणे याने इतिहासकार खर्या नि:ष्कर्षांना पोचु शकत नाही.आपल्या पूर्वजांनी हे जे इतिहास लिहिले त्याचे स्वरुप सांस्कृतिक इतिहासाचे असून घटनात्मक पद्धतीने लिहिलेले नाहित. सांस्कृतिक इतिहासाचे आधुनिक पद्धतीने परिक्षण करणे मूळातच चूक आहे. जीवशास्त्रातले प्रश्न पदार्थविज्ञानाने सोडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे हे आहे.एखाद्या पुस्तकात अभावाचा मुद्दा आला की लगेच घटनात्मक चिकित्सा करणारे संशोधक ती गोष्ट त्याकाळि अस्तित्वातच नसल्याचा शोध लावतात. उदा. पाणीनीच्या व्याकरणात स्त्रियांच्या नाकातील दागिन्यांचा उल्लेख नसला तर त्याकाळी नाकात दागिने घालण्याची प्रथाच नव्हती असे विचित्र अनुमान हे लोक काढतात. त्यांची बुद्धी भारतीय संस्कृती हिन ठरवण्यासाठी इतकी व्याकुळ असते की मुळात पाणीनी चा हा ग्रंथ दागिने किंवा अलंकार या विषयावर नसून व्याकरणावर आहे याचाही त्यांना विसर पडतो.रुपक कथा उलगडताना त्याचे तारतम्य ठेवावे लागते.परंपरांचा विचार करावा लागतो.
बरेचदा इतिहासकारावर आरोप होताना दिसतात की तो विशिष्ट विचारसरणीतून इतिहास लिहितो हे काहि अंशी खरेच असते. आर्थिक पद्धतीने इतिहास मांडणे किंवा धर्म,जात,भाषा पद्धतीने इतिहासाची मांडणी केली जाते पण ते अपरिहार्यच असते. कारण अर्थ,सत्ता,धर्म,जात,भाषा व संस्कृती याशिवाय माणूस असूच शकत नाही. केवळ आहार,निद्रा,भय आणि मैथुन एवढीच मानवी प्रेरणा धरली तर ते इतिहासलेखन पशुंच्या इतिहासापेक्षा भिन्न असणार नाही. इतिहासलेखक हा १००% निष्पक्ष असायला हि अपेक्षा अवास्तव आहे. वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेशन द्यायला तो मोकळा असतो. मात्र पुराव्यांनिशी त्याची छाननी व्हायला हवी. इतिहासाच्या वाचकावर ती जबाबदारी येते. खोटे पुरावे देणे किंवा अर्धवट वाक्ये सांगून दिशाभूल करणारे लोक इतिहासकार नसून पावसाळी छत्र्या असतात. त्यांचे लेखन काळाच्या ओघात नष्ट होणारे असते. अर्थात त्यांचा हेतु तत्कालिन सामाजिक्क ,राजकिय फायदा घेणे हाच असतो. त्याला बळी पडायचे का नाही हे ठरवण्याची जबाबदारी वाचकाच्या सुसंस्कृतपणावर अवलंबुन असते.
1 comment:
चंद्रशेखर साने,
तुमचा लेख आवडला. इतिहासाचा अभ्यास करण्याचे मार्ग सामान्य जनांना फारसे ठाऊक नसतात. जमल्यास या मार्गांची तोंडओळख करून द्यावी ही विनंती.
इतिहासाबाबत एक गोष्ट नीटपणे समजून घ्यायला पाहिजे की, इतिहास नेहमी सत्ताकेंद्राचा लिहिला जातो. तसेच या इतिहासापासून काहीतरी बोध घ्यायचा असतो. इतिहासाच्या उपयुक्ततेच्या या दोन कसोट्या आहेत.
इतिहासाची फोड करायची झाली तर मला एक समीकरण मांडावंसं वाटतं :
इतिहास = तथ्ये (facts) + दृष्टीकोन (perspective)
तथ्ये म्हणजे वस्तुस्थिती असते, जिच्याबद्दल विद्वानांत (जवळजवळ) एकमत असतं. याउलट दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. अशा प्रकारे फोड केल्याने इतिहासाच्या वाचकाला बोध घेण्यास मदत होईलसं वाटतं.
आपला नम्र,
-गामा पैलवान
Post a Comment