Wednesday, April 5, 2017

सावरकरांचे चारित्र्य : समज-अपसमजकोणत्याही महान व्यक्तीच्या खाजगी चारित्र्याविषयी, त्यांच्या वर्तनाचा राष्ट्रिय हितावर दुष्परिणाम झाल्याचा पुरावा सापडत नाही तोपर्यंत इतिहासकाराने टिकाटिप्पणी करु नये. चरित्रकारांना मात्र चरित्रात त्या कथित कथांची दखल घ्यावी लागते. पाश्चिमात्य चरित्रकार खूप मोकळेपणे या विषयाची चर्चा करतात. त्याने कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत किंवा नाही टिकाकारांनाही ते एक विरोधासाठी उपलब्ध झालेले शस्त्र वाटत नाही. थोर/महान/इतिहासावर ठसा उमटवणार्‍या व्यक्ती तीव्र कामवर्तनाच्या असल्या किंवा समलैंगिक प्रवृत्तीच्या असल्या तरी पाश्चिमात्य जगात त्यांचे मोठेपण कमी होत नाहि. कामवासना हि सर्व जीवांची मूलभूत प्रेरणा असते. महात्मा गांधी यांच्या सत्याच्या प्रयोगात त्यांनी निर्भयपणे त्यांच्या खाजगी आयुष्याची चर्चा केली आहे. सेनापती बापट यांची रशियन मैत्रिण होती. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मन स्त्री शी विवाह केला होता तर रासबेहारी बोस यांनी जपानी स्त्री शी विवाह केला. मात्र ते रितसर विवाह होते. त्यामुळे त्याविषयी कसलेच लोकापवाद नाहीत. नेहरुंच्या आयुष्यातील स्त्रियांविषयीही बरेच बोलले जाते. त्याचप्रमाणे सावरकरांच्या आयुष्यातील स्त्रियांपासून त्यांच्या समलैंगिकते विषयी एका परकिय लेखकद्वयीच्या निराधार उल्लेखावरुन बोलले जाते.

सावरकर दोन अटींवर दोन जन्मठेपींच्या शिक्षेतून सुटले. एक रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही व राजकारणात पाच वर्षे भाग घेणार नाही या त्या दोन अटी होत्या. हि बंदी पुढे सतत २ - २ वर्षांसाठी वाढवण्यात आली. ब्रिटीशांना सावरकरांची सतत भीती वाटत असून सावरकरांवर रत्नागिरीतील या स्थानबद्धतेत अत्यंत कडक नजर ठेवली जात असे. आपल्यावर अटक वॉरंट निघाले आहे हे माहित असूनही पॅरीस हून लंडनला जाण्याचा निर्घणय सावरकरांनी घेतल्याने सावरकरांना अंदमानात खितपत पडावे लागून त्यांच्या क्रांतीकारी चळवळीची वाताहत झाली. याच अटींचा दुसरा भाग होता सावरकरांना अभिनव भारतच्या कटाविषयी व सहकाऱ्यांविषयीची गुप्त माहिती विचारली जाऊ नये व सावरकरांकडून ती सांगितली जाणार नाही.

पॅरिसहुन लंडनला जाण्याचा निर्णय हा बुद्धी व भावना यांच्यातला खेळ होता असे सावरकरांनी नमूद केले आहे. स्थानबद्धतेत परत ती चूक होऊन तुरुंगवास होऊ नये यासाठी सावरकर आपले क्रांतीकार्य अतिशय गुप्तपणे करत असत जेणेकरुन इंग्रजांना कोणताही पुरावा त्यांना अटकाव करण्यासाठी राहू नये.

सावरकरांनी आपल्यावर अटक वॉरंट निघाले आहे हे माहित असतानाही लंडनला परतण्याचा निर्णय अशाच प्रकारच्या भावनिक उमाळ्याने घेतला. आपले भाऊ व सहकारी अटकेत अत्यंत भयानक छळ सोसत असताना आपण मागे राहीलो हे त्यांना असह्य झाले. शिवाय लोक काय विचार करतील हि शंका ही त्यांच्या मनाला आलीच.नुसती शंकाच नाही तर नाशिकच्या काही सहकार्‍यांच्या मनात त्यांच्याविषयी किंतु निर्माण झाला होता. नेत्याने स्वत:च उडी मारली की तो पराक्रमी अन्यथा भित्रा असे खरे तर नसते.

भारताच्या इतिहासातील बहुतेक लढायात मुख्य सेनापती पडला की सैन्यात पळापळ होऊन पराभवाला सामोरे जावे लागल्याचे चित्र वारंवार दिसते.परंतु त्या काळात किंवा आज सावरकरांनी स्वत: काय केले हा प्रश्न विरोधक विचारतात त्याला एक प्रकारचे भावनिक उत्तर सावरकरांनी आपल्या या लंडनमध्ये परतण्याच्या निर्णयाने दिले आहे. लाला हरदयाळ,कामा बाई , व्हि.व्हि.एस.अय्यर यांच्या सारखे सहकारी काकुळतेने लंडनला परतु नका असे सांगत असतानाही आपण क्रांतीकार्यात मागे राहू नये अशा भावनेने सावरकरांनी हा आत्मघातक धोका पत्करला. हि चूक पुढच्या आयुष्यात मात्र त्यांनी केली नाही. त्यांनी अंदमानातून सुटल्यावर अनेक उलाढाली केल्या पण ते गुप्तचरांशी पाचपेच खेळताना सतत सावध असत असे श्री.य.दी.फडके यांनी नोंदवून ठेवले आहे. त्या वेळी ही सावरकर लंडनला आपल्या मार्गारेट नामक गौरकाय प्रेयसीला भेटण्यासाठी परतले असा प्रवाद निर्माण झाला होता. तथापि या सर्वात कोणतेही तथ्य नसल्याचे सर्व संशोधकांनी लिहून ठेवले आहे.

पुढे अंदमानात बंदिपालाने कशाला मार्सेलिसला पळून जाण्याचा प्रयत्न केलात असा प्रश्न विचारला असता उत्तर देताना स्वत: सावरकरांनीच , "मी जाणून बुजुन अटक ओढावून घेतली ते माझे मी कर्तव्यच समजलो व मार्सेलिसला सुटुन जाण्याचा प्रयत्न करणे हेही माझे कर्तव्यच होते" असे सांगितले. (माझी जन्मठेप) देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्रासाअत पडणे हे ही कर्तव्यच आणि पुन्हा शत्रूच्या अहतुन सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करणे हे ही कर्तव्यच.

स्थानबद्धतेच्या काळात सावरकर शत्रूच्या सीमेवर जात हल्ला करत आणि शत्रू जागा होण्याच्या आतच पटकन आपल्या सीमारेषेचे आत परतत कित्येकदा ते सीमा पार करुनही शत्रूच्या सीमेत घुसुन हल्ला करत पण परत ब्रिटीशांच्या तावडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची दक्षता घेत असत असे वर्णन कै.य.दी.फडके यांनी केले आहे.

ब्रिटीश गुप्तचरांचे अहवाल हॉटसन-गोगटे, वीर वामनराव चव्हाण ,लॅमिंग्टन रोड गोळीबार या सर्व प्रकरणात यात सावरकरांचा हात व प्रेरणा आहे पण आमच्या कडे पुरावा नाही, मात्र ब्रिटीश राजवटीला हे गृहस्थ अत्यंत धोकादायक असून त्यांच्या वरील स्थानबद्धता उठवू नये असाच अंतिम निर्णय देणारे असत.
दर दोन वर्षांनी असा घटनाक्रम होत असे व सावरकरांची स्थानबद्धतेची मर्यादा वाढत असे. यासंबंधी एका अहवालात पोलिस अधिक्षकांनी His Moral character is very Bad" अशी टिप्पणी केली असून दुसर्‍या एका अहवालात "या कारणाने रत्नागिरीच्या ब्राह्मणांनी सावरकरांना शेजारच्या खेड्यात राहणे भाग पाडले आहे असे म्हटले आहे."

हि माहिती य.दी.फडके यांनी शोध सावरकरांच्या या त्यांच्या संशोधनपर पुस्तकात दिलेली असून त्याचा आज गैरवापर करुन सावरकरांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. य.दी.फडके यांच्या संशोधनाचा अर्धवट वापर एक शस्त्र म्हणून वापरुन य.दी.फडके व अन्य विचारवंत साक्षेपी लेखकांच्या या प्रकरणातील अन्य विचारांचा व पुराव्यांच्या त्रोटकपणा व अनिश्चितता या विषयक लेखन हे अपप्रचारक सोयीस्कर पणे दुर्लक्षित करत असतात, कारण त्यांचे हेतु शुद्ध नाहीत.

कै. श्री. .दी.फडके गुप्तचर अधिकार्‍यांच्या या टिप्पण्णी विषयी लिहितात,
" तात्यांसंबंधीचे आरोप कितपत खरे होते किंवा खोटे होते हे निश्चित दुजोरा देणार्‍या पुराव्यां अभावी सांगणे कठीण आहे. एकतर चारित्र्यहनन करण्यासाठी पुढार्‍यांच्या लैंगिक जीवनाची अशी खाजगी कुजबुज आणि सुरस ,चमत्कारिक गोष्टी सांगण्याचीआपल्याकडे अनेकांना खोड असते. राजकिय विरोधक नेहमीच अशा खमंग कथा पदरचा मालमसाला मिसळून सांगतात. त्यात तथ्य किती व कल्पनाविलास किती हे ठरवणे जिकीरीचे असते."

सावरकरांच्या समाजकार्याने चिडलेल्या लोकांनी सावरकरांच्या कार्याल मर्यादा याव्यात म्हणून अशा प्रकारे त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करणे हि सुध्दा एक शक्यता संभवते.

नेत्याने जर अशी उडी घेतली तर संघटनेचे नुकसान होते. सावरकरांची शक्ती हि त्यांचे प्रभावी व्यक्तीमत्व, अप्रतिम वक्तृत्व , धारदर लेखन हि होती. त्याद्वारे अनेक लोकांना त्यांनी आपल्या क्रांतीकार्याशी जोडले. नंतरच्या आयुष्यातही त्यांनी वेगवेगळी आंदोलने केली. क्रांतीकारकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रेरणा दिल्या काही प्रसंगी तुरुंगवासही भोगला पण सहसा आपल्याविरुद्ध पुरावे न राहू देण्याची काळजी घेतली.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्वत:च काश्मिर मुक्ती लढ्यासाठी शेख अब्दुल्लांच्या तुरुंगात जाऊन फसले व त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला तेव्हाही सावरकरांनी असाच विचार मांडलेला आहे तो त्यांच्या अनुभवातून आलेला होता.हैदराबाद (भागानगरच्या ) लढ्यात सावरकरांनी निजामाच्या तुरुंगात जाऊन पडण्याची चूक केली नाही. मात्र भागानगरच्या ब्रिटीशांविरुध्दच्या लढ्यात त्यांना गया स्थानकावर अटक झाली व आठ दिवस त्यांना तुरुंगात पडावे लगले होते.

सावरकरांनी लंडनला परतण्यात भावनिकतेला किंवा टिकेला शरण जाऊन चूक केली त्याचा उच्चार त्यांनी सुटका झाल्यावर पुढे लाला हरदयाळ यांच्या चरित्रावर व्याख्यान देताना केला , अध्यक्षपदी त्यांचे लंडनमधील सहकारी सेनापती बापट होते.

यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, " मी जे बोलणार आहे ती कल्पित कादंबरी नाही. त्यात चूक झाली तर त्यात सुधारणा करणारे व भर घालणारे बापट येथे आले आहेत. नाशिकच्या खटल्यामधे माझे बंधु ,मित्र,माझ्याबरोबर ज्यांनी शपथा घेतल्या त्यांचे हाल होत होते.हे जेव्हा कळून आले तेव्हा माझ्या मनाला स्वस्थ बसावे हे योग्य कि अयोग्य असे वाटु लागले. हरदयाळ याने मला सांगितले की मी पॅरिस मधुन गेलो तर चळवळ मरेल...माझी बुद्धी (ही)मला सांगत होती की मी चुकतो आहे. मी निश्चय केला काय होईल ते होईल,लंडनमध्ये जायचेच. पं.श्यामजी कृष्न वर्मा म्हणाले लंडनमधे काहि व्हायचे नाही ते (ब्रिटीश) कायदा पाळतील. मी म्हणालो की इंग्रज माणसे त्यांच्या साम्राज्यावर संकट आले की ते लोकांना फाशी दिल्याशिवाय रहाणार नाहित...माझा धाकटा भाऊ व मामेभाऊ पकडले गेले त्यात त्यांचे (confession) व्हावे म्हणून त्यांचेवर अत्याचार चालला आहे असे वाचले.पंडितजींच्या म्हणण्याप्रमाणे ते माझे एक्स्ट्रॅडिक्शन करणार नाहित तर मी जातो असे मी म्हणत होतो. मला पकडून घ्यायचे होते.हरदयाळने डोळ्यात पाणी आणून सांगितले तू जाऊ नको,माझ्या बरोबर रहा....मला ते पटले नाही..श्यामजींच्या कल्पना खुळया ठरल्या, सर्व (संघटनेची) वाताहत झाली. "

सावरकरांचे मामेभाऊ व अभिनव भारत चे इतिहासकार वि.म.भट यांनी म्हटले आहे की, "त्यांना (सावरकरांना) दुर्बुद्धी होऊन ते लंडनला परतले."
http://www.savarkar.org/…/pdfs/mr/abhinav_bharat_mr_v001.pdf

या वर य.दी.फडके टिप्पणी करतात सावरकरांचे लंडनला परतण्यामागे बंधु व सहकारी व अनुयायांवरचे प्रेम समजण्यासारखे असले तरी त्यांनी हाती घेतलेल्या चळवळीला ते मारक ठरले हि वस्तुस्थिती आहे.
हे सर्व सांगण्याचे कारण सावरकर क्रांतीकार्यात मागे रहात नसून भावनेच्या आहारी जाऊन व लोकांनी भित्रे म्हणू नये या कारणाने संकटात स्वत:हून पडले. क्रांतीकार्यात कृतीशील रहाण्याएवढे , बंधुप्रेम ,मित्रप्रेम जाणण्याएवढे कृतज्ञ व चारित्र्यवान होते.

सावरकरांवर त्यांच्या अतिरिक्त कामवर्तनाविषयक आरोपांविषयी त्यांचे चरित्रकार शि. ल. करंदिकर लिहितात ते य.दी.फडके यांनी नोंदवले आहे,

"अशा भानगडींचा गाजावाजा केला जातो आणि अशा क्षुद्र मुंद्यांवर लक्ष देऊन थोरथोर माणसांच्या कतृत्व कलंकित करण्याचा उपद्व्याप केला जातो हि गोष्ट सामाजिक मन:प्रवृत्तीचे गमक या दृष्टीने फार अनिष्ट आहे. आपल्या या परतंत्र देशांत राजकारणी कतृत्ववान माणसांची अतिशय वाण आहे्. त्यांच्या कतृत्वाचा विचार करतांना कांहीतरी आगंतुक भानगडी पुढ ढकलून, त्या कतृत्वाकडे कानाडोळा करण्याला चांगलीं विचारवंत माणसेही प्रवृत्त होतात, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. राजकारणी नेत्यांना जी मान्ययता मिळते ती त्यांच्या राजकीय शहाणपणामुळ मिळते. ते वसिष्ठ – वामदेवाचे अवतार आहेत या बुद्धीने कोणी त्यांना आदरणीय समजत नाही. राजकिय शहाणपण असूनही एकादा नेता प्रति – शुकाचार्य असेल तर त्यामुळ त्याच्या विषयींचा लोकांचा आदर ‘ अधिकस्य याधिकं फलं ’ या न्यायान वाढेल, ही गोष्ट खरी ; पण, राजकारणी शहाणपणाची कसोटी गौण लेखून, भलत्याच गोष्टींवर भर देण्यात येऊ लागला म्हणजे तो प्रकार विवेकहीनतेच्या सदरांत जमा होऊं लागतो !
http://www.savarkar.org/…/pdfs/mr/savarkar_biography_mr_v00…

सावरकर क्रांतीकार्यात पडले ते सर्व ऐहिक सुखांना तिलांजली देण्याची तयारी ठेवूनच.अंदमानात असताना सावरकरांवर करडी नजर असे. अंदमानातील कैद्यांना एकमेकांना भेटणे,बोलणे, पत्र लिहिणे यांचीही परवानगी नसे.

सावरकरांसारखे राजकैदी हे अन्य राजबंद्यांसाठी आदर्श होते याची जाणीव स्वत: सावरकरांना होती. त्यांच्या हक्कांसाठी ते लढत होते. उल्हासकर दत्त सारखे क्रांतीकारी आपल्या आत्मचरित्रात त्यांनाच आपला नेता किंवा क्रांतीकार्याचे प्रतिनिधी मानत होते असा उल्लेख माझी जन्मठेप मधे आहे.

अंदमानात काही वर्षांनी कुटुंबियांना आणण्याची व त्यांच्या बरोबर रह्जाण्याची परवानगी मिळत असे, सावरकरांना आपली पत्नीही पुढेमागे अंदमानात आपल्याबरोबर राहू शकेल अशी आशा होती. सावरकरांच्या कवितांमधुन श्रुंगारीक काव्ये आहेत. अशा परिस्थितीत समलैंगिकता सारख्या गोष्टीत वा मनोवृत्तीत सावरकर अडकले असतील अस वाटत नाही व तसा कोणताही पुरावा नाही.

अंदमानातील खोल निराशेतून बाहेर पडण्यास सावरकर वेदान्त व राजयोगाचा आधार घेत होते. कुंडलिनी जागृतीचा अनुभवही त्यांना अंदमानात आला असे त्यांनी नमूद केले आहे.सुटुन आल्यावर सावरकरांना मुलेबाळे होऊन त्यांचा संसार फुलला.

तथापि स्वातंत्र्यानंतर दोन ब्रिटिश लेखकांनी लिहिलेल्या "फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट" मध्ये सावरकर समलैंगिक असल्याचा उल्लेख आला. पाश्चिमात्य जगात या गोष्टींना फारसे महत्व दिले जात नाही. त्यांना त्या स्वाभाविक वाटतात. त्यांच्या चारित्र्य , नितीमत्ता याविषयी कल्पना आपल्याहून काहिशा भिन्न आहेत. अशी प्रकरणे व उल्लेख वारंवार हे परदेशी लेखक करत असतात असा अनुभव सर्वांनाच आहे. अहिवचरित्राविषयीही असे प्रवाद परकिय लेखक निर्माण करुन भारतीय समाजमन ढवळून काढतात व क्षुब्ध करत असतात. सावरकरांबाबतही त्यांनी तोच प्रयत्न केला. सावरकरांबाबत या आरोपांना तथ्य नसल्याने किंमत देण्याचे कारण नाही. पण हिंदुत्व विचारांचे सर्वात मोठे आव्हान समोर आहे असे समजणार्‍या राजकारणी लोकांनी हे मुद्दे पुन: आपल्या हस्तकांद्वारे उकरुन काढायचा प्रयत्न सुरु केला आहे. तथापि या सर्वाला वस्तुस्थितीचा आधार नाही व पुरावेही नाहित. राजकिय विरोधक व शत्रू पक्षाने ऐकिव माहिती एवढाच आधार घेऊन समलैंगतेचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सावरकरांविषयीचा आदर -प्रेम - भक्ती किंवा त्यांच मोठेपण व थोरपण या गोष्टींवर अवलंबुन नाही तर त्यांच्या स्वातंत्र्यप्रेमात, देशभक्तीत, राष्ट्रहिताच्या विचारात, त्यागात, महान प्रतिभेत आणि अनेक अन्य सद्गुणांच्या विविध पैलुंमधे आहे. त्यांच्या विचारांना विरोध केला तर त्यास उत्तर देता येईल अपप्रचार व निराधार आरोप व खाजगी जीवनावर चिखल फेक याला अजिबात महत्व नाही.

सावरकरांचे तुरुंगातील वर्तन नेत्याला साजेसे असेच होते. सावरकरांविषयीचा आदर सर्व सह-बंदिवान क्रांतीकारकांच्या मनातून ढळला नाही. सावरकरांनी तुरुंगातून सुटल्यावर "माझी जन्मठेप" लिहिले. त्याचप्रमाणे विविध प्रांतांमधुन वेगवेगळ्या वेळी सावरकरांच्या बंदिवासाच्याच कालावधीत अंदमानात आलेले सुमारे २०० क्रांतीकारक होते. अंदमानच्या कोठडीतील अत्यंत अमानुष अशा छळांमुळे काही जण मोडून पडल्यासारखे झाले होते. काही जणांनी आत्महत्या केल्या. पहिली आत्महत्या क्रांतीकारक इंदुभूषण रॉय यांची. काही जणांना अनन्वित छळामुळे वेड लागले. अशा व अन्य काही क्रांतीकारकांनीही आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. बारिंद्र घोष (अरविंद घोष यांचे बंधु), भाई परमानंद, उल्लासकर दत्त,उपेंद्रनाथ बंदोपाध्याय यासारख्यांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. अन्य काही जणांची मने एकमेकांविषयी कलुषित झाली होती. पण सावरकरांविषयी तसे घडले नाही.कोणीही सावरकरांच्या चारित्र्याविषयी ,वर्तनाविषयी वावगे लिहिलेले नाही. उल्लासकर दत्त यांना सावरकर आपल्या बाजूने लढणारे आपले प्रतिनिधी वाटत होते. भाई परमानंद यांनी सावरकर बंधु हे अंदमानातील असंतोषाला जबाबदार असल्याचे बंदिपालाला वाटत असल्याचे नमूद करुन "माझी जन्मठेप" ला दुजोरा दिलेला आहे. सावरकर बंधु तुरुंगतील अन्य क्रांतीकारकांना मिळत असलेल्या सवलतींना वंचित रहात असल्याचे बारिंद्र नाथ घोष नमुद करतात. सावरकर अंदमानातून सुटल्यावर कोणीही त्यांच्या वर्तनासंबंधी आक्षेपार्ह लिहिलेले नाही. रत्नागिरिला सावरकर स्थानब्वद्ध असताना अंदमानात असलेले सह क्रांतीकारी श्री.नानी गोपाळ, लंडनमधील सहकारी व्हि.व्हि.एस्‌. अय्यर,शचींद्र संन्याल आदी मंडळी त्यांना आदराने भेटुन गेली तर भाई परमानंद, आशुतोष लाहिरि यांच्यासारखे काही जण हिंदुसभेत सावरकरांचे सहकारी म्हणून सामिल झाले. सावरकरांच्या पंजाब दौर्‍यात त्यांचे लंडनमधील एकेकाळचे सहकारी व पंजाबचे राज्यपाल झालेले शिकंदर हयातखान यांनी सावरकरांची हत्तीवरुन मिरवणुक काढली. सेनापती बापट सुद्धा सावरकरांबरोबर वेगवेगळ्या प्रसंगी उपस्थित राहीले. कोणालाही सावरकरांचे कोणतेही वर्तन वा चारित्र्य आक्षेपार्ह वाटत नव्हते. बॅ. असफ अल्ली सावरकरांमध्ये शिवाजी आणि मॅझिनी सारखी पात्रता होती हे १९४६ ला सुध्दा लिहित होते.

अंदमानातून सुटल्यानंतर रत्नागिरित स्थानबद्धतेत असताना सावरकरांचे वर्तन आक्षेपार्ह होते यसविषयी काही गुप्तचरांनी केलेली नोंद हि पुराव्यावाचून व सावरकरांच्या सुधारणावादी कार्यक्रमाणी चिडलेल्या काही सनातनी वृत्तीच्या सवर्ण लोकांनी केलेल्या आरोपांवर आधारित आहे. य.दी.फडके हे सावरकरांविषयी बरेचदा आकसाने लिहित असले तरी त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नंतर एका मराठी लेखकाने काल्पनिक कथांमधे रत्नागिरीत इंग्रजांनी सावरकरांवर ज्या दोन महिला गुप्तचर नेमल्या होत्या त्या सावरकरांवर लुब्ध झाल्या व त्यांना समर्पित झाल्याचा उल्लेख केला आहे. व त्यांची कामभावना तीव्र असल्याचा व ते स्त्रियांविषयी जास्तच प्रेमळ असल्याचा उल्लेख केला आहे. हे सर्व काल्पनिक व नाव न घेता लिहिलेल्या कथेचा भाग आहे. अन्य एका प्रख्यात मराठी लेखकाने त्याची दखल घेऊन कडक टिका केली व त्या कथेला उलट नसती प्रसिद्धी मिळवुन दिली. तसे परत होऊ नये म्हणून मी त्या कथेचे नाव व संबंधित लेखकांची नावे येथे देत नाही.

मुंबईत आल्यावर सावरकर अनेकांना भेटत असत पण काही वेळा महत्वाच्या लोकांनाही भेट नाकारत असत असा काही (धनंजय कीर यांसह ) जणांचा आरोप होता. पण आवरकरांचे स्वीय सचिव कै.बाळाराव सावरकर लिहितात की आधी वेळ ठरवली व भेट घेतली नाही असे कधीही घडले नाही. दुपारी २ ते ४ हि वेळ सावरकरांनी त्यांच्या भेटिसाठी येणार्‍या स्त्रियांसाठी ,स्त्री कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवलेली असे. आधी वेळ ठरवून नंतर सावरकरांनी ती पाळली नाही असा कोणाचाही आरोप नाही. इतर वेळी काही जण अचानक वेळ न ठरवत भेटायला आल्यास त्यांना सावरकरांनी भेट नाकारली होती हे मात्र खरे . अशा लोकांमध्ये भारताचे लष्कर प्रमुख मेजर जनरल करिअप्पा, गोळवलकर गुरुजी असेही लोक होते. त्यांनीही याचा विषाद न मानता नंतर वेळ ठरवून सावरकरंची भेट घेतली. सुभाषचंद्र बोस यांना मात्र ते अचानक येऊनही त्यांचे महत्व ओळखून सावरकर भेटले. एवढेच नव्हे तर चर्चा अपूर्ण राहिल्याने दुसर्‍या दिवशीही भेटले. दोन दिवस मिळून तब्बल सहा तास दोघांची चर्चा झाली.

अंदमानातील एकलकोंडीमुळे सावरकरांचा असा स्वभाव झाला होता असाच सर्वांचा अभिप्राय आहे. या सर्वात सावरकरांचे वर्तन आक्षेपार्ह असे म्हणता येत नाही. बहुतेक सर्व नेत्यांवर अशी चिखलफेक होते. जास्त करुन विरोधकांकडून होते, यातून कोणीच सुटलेले नाही. अन्य काही नेत्यांच्या धोरणांवर राष्ट्रहिताच्या दृष्टीने वाईट परिणाम झाल्याचे बोलले जाते, सावरकरांबाबत तर तसेही कधी घडले नाही. श्यामजी कृष्ण वर्मा हे लंडनमधे सावरकर एका गौरकाय मुलीच्या प्रेमात पडले आहेत अशा वार्ता ऐकून चिंतीत झाले, कारण सावरकरांवर लंडनमधील इंडिया हाऊसची जाबबदारी सोडून पॅरिसला जाण्याच्या विचारात ते होते.क्रांतीकारी ग्यानचंद वर्मा यांना याचा पाठपुरावा करायला सांगितला. सर्व तपास झाल्यावर वर्मांनी निर्वाळा दिला, "सावरकरांना जर सर्वात प्रिय स्त्री कोणी असेल तर ती फक्त त्यांची जन्मभूमी भारतमाताच आहे !"

संदर्भ:

माझी जन्मठेप - स्वा.सावरकर
शोध सावरकरांचा- य.दि.फडके
सावरकर चरित्र-शि.ल.करंदिकर
Tale of my Exile- Barindra Ghosh
Twelve Years of Prison Life -Ullaskar Dutt
The Story of my Life - Bhaai Paramaanand

 © चंद्रशेखर साने

1 comment:

Dinesh shinde said...

खूप छान लेखन with reference. सावरकरांच्या सामाजिक कार्याची अभ्यास करण्यासाठी उपयुक्त पुस्तके कोणती सर???????

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...