एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन हिंडत असताना त्यास एक मेलेला हत्ती दिसला. तो बेहद्द खुष झाला. मेलेल्या हत्तीचे मांस आता त्याला खूप दिवस पुरणार होते. त्यास जिवंत ठेवणार होते.
पण तेवढ्यात त्यास सिंहाची डरकाळी ऐकु आली. कोल्हा चतुर होता. सिंहाला पाहताच तो नम्रपणे म्हणाला, या या महाराज आपलीच वाट पहात होतो, आपल्या साठीच मी या हत्तीची राखण करत थांबलो होतो. आपण जंगलाचे राजे, आपलाच या मांसावर हक्क !
वनराज खुष झाले, म्हणाले, तू माझा खरा नागरीक. पण आत्ता माझे पोट भरले आहे व तशीही मी दुसऱ्याने केलेली शिकार खात नसतो, तेव्हा तुझ्या एकनिष्ठेचे बक्षिस म्हणून हि शिकार मी तुला देऊन टाकतो.
कोल्हाने वाकुन नमस्कार केला आणि सिंह तेथून निघुन गेला.
कोल्ह्याने हत्तीचे निरिक्षण सुरु केले. हत्तीच कातड जाड आणि काळ केसाळ होत. कोल्ह्याच्याने ते एकट्याच्याने फाडणे अशक्य प्राय होते.
तेवढयात तिथे एक वाघ आला आणि त्याने डरकाळी फोडली.
कोल्हा हुशार होता, अजिबात न घाबरता तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अरे वाघोबा, हि शिकार वनराज सिंहांनी केली आहे आणि मला ते राखण करण्यास सांगुन नदीवर स्नानास गेले आहेत, त्यांनी मला जो कोणी या शिकारीस तोंड लावेल त्याचे नाव सांगण्यास सांगितले आहे, विशेष करुन ते मला म्हणाले होते की त्यांना वाघाची फार चीड आहे, तु दिसलास तर मला लगेच सांगायला ये. तेव्हा तुला जर प्राणाची काळजी असेल तर त्वरित निघुन जा. ते ऐकताच वाघ सिंहाच्या भीतीने घाबरुन पळुन गेला.
आता हत्तीला कसे फाडावे याचा कोल्हा विचार करत असतानाच एक चित्ता तेथे आला. कोल्ह्याने विचार केला की श्रेष्ठास नैवेद्य दाखवुन, शूर पण दुष्ट वाघास श्रेष्ठाची भीती दाखवुन आपण काम साधले. आता आपल्यास वरचढ पण अन्य दोघांच्या तुलनेने शक्तीत कनिष्ठ अशा या चित्त्यास थोडी लालुच दाखवावी, हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे काम याच्याकडून करुन घ्यावे, कारण याचे दात व नखे फार अणकुचीदार आहेत.
असा विचार करुन तो चित्त्यास म्हणाला अरे भावा, हि शिकार सिंह महाराजांनी केली आहे व मला राखण करण्यास बसवले आहे.
चित्ता म्हणाला असे असेल तर येथुन पळुन जाणेच बरे.
कोल्हा म्हणाला, तू असा घायकुतीला येऊ नकोस, तू माझा भाऊ आहेस, तू फार भुकेलेला दिसतोस. मी असे करतो , एका बाजूला जाऊन मी सिंह येत नाही ना पहातो तोपर्यंत तू पोटभर खाऊन घे.
चित्ता भुकेला होताच, त्याने कोल्ह्याचे हे म्हणणे मान्य करुन हत्ती ला फाडण्यास सुरुवात केली. हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे आपले पुरेसे काम होताच कोल्हा ओरडला, अरे मुर्खा पळ पळ, महाराज येत आहेत. चित्ता घाबरुन पळुन गेला.
आता कोल्हा निवांत पणे चित्त्याने फाडलेल्या भागाचे मांस खाऊ लागला. तेवढयात दुसरा एक भुकेलेला आणि संतापलेला कोल्हा हत्तीचे मांस खाण्यासाठी धावुन आला.
कोल्ह्याने विचार केला श्रेष्ठास सामाने, दुष्टास भेदाने , कनिष्ठ चित्त्यास दामाने म्हणजे लालच दाखवुन त्यांच्यावर आपण मात केली.
पण हा कोल्हा आपल्याला तुल्यबळ आहे, नीतीशास्त्राप्रमाणे आपण याच्याशी संघर्ष आणि लढाई करणेच शौर्याचे लक्षण आहे. असा विचार करुन त्यानेही त्या कोल्ह्यावर उलट चढाई करुन त्यास पळवुन लावले.
अशा प्रकारे चतुर कोल्ह्याने राजनीतीशास्त्राने सांगितलेल्या साम, दाम, भेद व दंड अशा चारही युक्त्यांचा वापर करुन आपले अन्न स्वकष्टाने प्राप्त केले व बराच काळ आपला चरितार्थ सुखाने चालवला.
-चंद्रशेखर साने
पंचतंत्र कथा
No comments:
Post a Comment