Skip to main content

मराठे शाहिची १२८ वर्षे

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अधिकृत काळ म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकापासून ( १६७४) ते पेशवाईच्या अंतापर्यंत म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह करुन ब्रिटीशांची तैनाती फौज स्वीकारली तोपर्यंत १८०२ पर्यंत. १८१८ ची लढाई हि केवळ एक दिवा विझतानाची फडफड होती,सेनापती बापु गोखले यांचा आदरच आहे पण... खरा शेवट १८०२ ला दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटीशांचे मांडलिकत्व स्वीकारले तेव्हाच झाला.
या १२८ वर्षात अनेक चढ उतार व संकटे आली. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या संकटात, महाराष्ट्र धर्माला जागून मराठी हिंदुंनी २७ वर्षे कडवी झुंज देऊन औरंग्याला गाडला.
बाजीरावांनी भारतभर मुलुखगिरी केली तर नानासाहेब पेशव्यांच्या काळात, रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी हिंदुंनी पार अटकेपर्यंत झेंडे रोवले.
पुढे पानीपतचे संकट आले. मराठी हिंदुंची अपार हानी झाली, पण तो जेत्यांना जिंकणारा पराभव होता. त्यानंतर काही काळातच थोरल्या माधवराव पेशव्यांनी हा पानीपतचा पराभव धुवुन काढला.
सवाई माधधवरावांच्या काळात खर्डयाला निजामाला धुळ चारली तो मराठी हिंदुंच्या ताकदीचा सर्वोच्च बिंदु समजला जातो. नंतर मात्र उतरती कळा लागली.
पेशवाई हि राजकिय दृष्ट्या प्रगत असली तरी सामाजिक दृष्ट्या मात्र अप्रगत होती. याचा अर्थ असा नाही की सर्व काळ ती पोथी निष्ठ व अप्रगत होती, एकुण समाजात जेवढी परंपरागत सामाजिक गुलामी होती तितकीच पेशवाईत होती. पेशव्यांनी ती कमी केली नाही तशी वाढवली पण नाही.
चिमाजी अप्पा व थोरले माधवराव हे वैयक्तिक पातळीवर नैतिक सामर्थ्य असणारे व शूर पेशवे पण अल्पायु. थोरले माधवराव क्षयाने गेले नसते तर त्यांनी कदाचित काही सुधारणावादी योजना आखण्याला वाव दिला असता. पण त्या जरतर च्या गोष्टी.
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशव्यांचे व एकुण सर्वच समाजाचे लाजिरवाणे अध:पतन झाले होते. हे अध:पतन थांबवणारी संत परंपराही खंडीत झाली होती. हे अध:पतन चारित्र्याच्या दृष्टीनेच केवळ नाही तर राष्ट्रिय दृष्टीकोनातून होते. परिणामी ब्रिटीशांचे फावले. ब्रिटीशांच्या राष्ट्रिय नैतिक सामर्थ्यापुढे भारतीय समाजाचे राष्ट्र म्हणून ढासळलेले नैतिक अधिष्ठान फार मोठे कारण आहे, केवळ लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे नाहीत, हे कारण नव्हते.
शिवाजी महाराजांच्या काळात हे नैतिक अधिष्ठान अत्युच्च पातळीवर होते म्हणून ते राष्ट्रनिर्माते होते.
अशा प्रकारे मराठा साम्राज्य त्यातील गुणदोषांसहित १२८ वर्षे टिकले.यावेळी राष्ट्रवादाची रितसर मांडणी हिंदुस्थानात नसली तरी या साम्राज्यात राष्ट्रीय दृष्टीकोन व भारतीय सीमांविषयी जाणीव पुरेपुर होती. पण ब्रिटीश राष्ट्राच्या शक्तीसमोर ते निर्बल ठरले.
आजही हिंदु एकता व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हे दोनच गुणच सध्याचे हिंदवी स्वातंत्र्य बळकट करतील. जातीविद्वेष हा सध्या प्रस्थापित असलेल्या हिंदवी राष्ट्राचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रत्येक हिंदुने याविरुध्द लढणे हे कर्तव्य आहे.
-चंद्रशेखर साने

Comments

Popular posts from this blog

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...