***** अस्मितेच "भांडवल" व्यापारी व व्यावसायिक होण्यासाठी पुरत नाही ****
१९४७ ते १९७१ पर्यंत हिंदुमहासभा शिल्लक होती व क्रमाक्रमाने कमकुवत होत गेली. या काळात सावरकर जवळपास निवृत्त झाले होते. आपण हिंदुहिताचे राजकारण करतो ,आपल्या नावात हिंदु शब्द आहे तरी हिंदुमहासभेला यश का मिळत नाही, हिंदु माणस आपल्याला मते का देत नाहीत याची उमज हिंदुमहाभेला पडत नव्हती. आपल्याला संपवत आहेत म्हणून वैचारीक दृ्ट्या सर्वात जवळ आलेल्या संघ परिवार, जनसंघ, गोळवलकर गुरुजी यांच्या नावे बोटे मोडणे, तळतळाट करणे या शिवाय अन्य उद्योग हिंदुमहासभेला राहिले नाहीत. मूळ वैचारीक शत्रू बाजूलाच राहिले.आज हिंदुमहासभा या पक्षातला आधीचा "अखिल भारतीय" हा शब्द अक्षरश: केविलवाणा वाटतो. हा पक्ष अधुनमधुन दिसतो ते मूठभर कार्यकर्ते आणि अन्य कोणाही पक्षाकडे नाही एवढ्या मोठया "अ.भा.हिंदुमहासभा भवन" या दिल्लीतल्या वास्तुच्या आधारावर.
महाराष्ट्रात दोन पक्ष मराठी माणसाच नाव घेतात. तामिळनाडु प्रमाणे महाराष्ट्रात पण दोनच स्थानिक पक्षांना स्थान रहावे आणि आलटुन पालटुन आपल्याच घराण्याचीच सत्ता महारष्ट्रात असावी अशी स्वप्ने त्यांना पडत असतात. स्वप्न पहायलाच हवित. पण थोड वस्तुस्थितीच भान सुध्दा त्यांनी ठेवाव. तामिळनाडु सारखी भाषिक अस्मिता महाराष्ट्रात नाही. इतर कोणाही प्रांतापेक्षा मराठी माणूस हा जास्त राष्ट्रिय वृत्तीचा आहे. महाराष्ट्रापेक्षा भारत त्यांना मोठा वाटतो. वडापाव विकुन मराठी माणसाच हित कस होणार हे त्यास कळत नाही. कोणत्याही भांडवली व्यवसायात निव्वळ अस्मितेच भांडवल करुन मराठी माणूस कसा उंची गाठणार हे त्याला कळत नाही. हिंदुसभेने हिंदुंसाठी राजकारण केल म्हणजे नक्की काय हित साधल हे जस त्याला कळत नाही तसच मराठीचा मुद्दा घेऊन मराठीच राजकारण करणाऱ्यांनी, गेल्या ५० वर्षात, मराठी माणसाच अस नेमक कोणत व किती हित साधल हे त्यास कळत नाही. खळ्ळ-फटाक् करुन नवनिर्माण झाल्याचीही कुठली नवि दृष्ये अद्याप त्यास दिसली नाहीत.
शेवटी शेवटी ज्या हिंदुंना हिंदुसभा साद घालत होती त्याच हिंदुंना स्वत:च हित कळत नाही, आम्हाला टाळ्या देता पण मते देत नाही, हिंदुंच्याच सर्वात मोठया संघटनेने पाठीत खंजिर खुपसला, म्हणून बोल लावु लागली. पण शेवटपर्यंत आपण हिंदुंची महासभा असून पण हिंदु आपल्याला मत का देत नाहीत, आपणच तर कुठे चुकत नाही ना, या गोष्टींच आत्मपरिक्षण त्यांनी केल नाही. अजुनही संघ , जनसंघ आणि आता भाजपा कसे वाईट आहेत यावरच विविध जहरी भाष्य करण्यातच त्यांचा वेळ जात असतो.
याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असे वाटत असेल तर , मराठी लोक आपणाला मराठीच्या मुद्द्यावर मत का देत नाहीत यावर मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करायची वेळ आली आहे, एखाद्या घराण्याची अस्मिता म्हणजे मराठी अस्मिता नाही. हिंदुत्व आणि मराठीत्व यांचे एकत्रीकरण हाच मराठी माणसाचा स्थायीभाव आहे.
जो विचारप्रवाह विकासाच्या साथीने या दोन्ही अस्मितांचे एकत्रिकरण, त्यातल्या त्यात जास्त करेल (हे नेहमी तुलनात्मक असते, दगडापेक्षा वीट मऊ हा मोजण्याचा काटा) व बेरजेचे राजकारण करुन वाटचाल करेल तोच महाराष्ट्रात यश मिळवेल.
-चंद्रशेखर साने
No comments:
Post a Comment