प्रिय श्री. शरद पोंक्षे
नाटक सादर करण्याचा कायदेशीर हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन्ही आपणास आहे. मी तुमच्या त्या हक्का विरुध्द नाही.
मात्र आता त्या नाटकाचा विषय असलेल्या फाळणीच्या व गांधी हत्येच्या दुर्दैवी घटनांपासुन सत्तर वर्षे भविष्यात आपण आलो आहोत.
गांधी हे नाव सोडल तर आज व्यवहारात गांधीवाद शिल्लक नाही. आपण अणुशक्ती धारक व अण्वस्त्रधारी देश आहोत, सैन्य व शस्त्र सज्ज आहोत. आंतरराष्ट्रिय संबंधात कणखर धोरण असल्याचा दावा करणार, हिंदुत्ववादाला तुलनेने का होईना. जास्त जवळ असलेल सरकार केंद्रात आहे. गांधीवाद तोंडी लावण्यापुरताही अस्तित्वात नाही.
नथुराम गोडसे यांनी कोर्टात साक्ष देताना म्हटले कि गांधीवाद रक्तबंबाळ होऊन मृत्युशय्येवर तळमळत पडलाय पण गांधीजी अमर आहेत. हे शब्द तंतोतंत खरे झालेत. त्या इतिहासाची पाने आज सर्व अभ्यासकांना उपलब्ध आहेत. देशातला बराच मोठा वर्ग नथुरामची बाजु समजुन घ्यायला तयार आहे. नथुराम ला माथेफिरु ठरवुन झटकुन न टाकता इतिहास विषय म्हणुन समजुन घेण्यास सिध्द आहे.
गांधीहत्येमुळे हिंदुत्ववादाचे नुकसान झाले, हिंदुमहासभा आणि सावरकर दोघांचे नाव बदनाम झाले. विरोधकांना एक हत्यार उपलब्ध झाले. गांधीवाद नाही तर गांधी हत्या हे त्यांच्या सत्तासोपानाची शिडी झाली.
याव्यतिरिक्त मराठी ब्राह्मण समाजाला पण गांधीहत्येच्या कृतीने बरच काही भोगाव लागल आहे.
अशा परिस्थितीत हे नाटक करण्याने नक्की कोणत हित साधणार आहे? आजचे सत्ताधारी काही गांधीवादी नाहित. हिंदुसमाज पण गांधीवादाच्या प्रभावाखाली नाही. ठोशास ठोसा द्यायला तो शिकला आहे. धार्मिक अन्यायाचा प्रतिकार करण्यास तो कुठे कमी पडत असेल तर तो स्वत:च्या अंगभुत दुर्गुणांनी, गांधी विचारांनी नाही. हिंदुहिताचे शत्रु आता गांधीजी नाहित, गांधीवाद हा एक भूतकाळ आहे व गांधी हे नाव फक्त देव्हार्यात ठेऊन पुजा करण्यापुरते व त्यांच्या समोर नैवेद्य दाखवून, स्वत: च प्रसाद खाण्यापुरते राहिले आहे.
अशा परिस्थितीत आपण या नाटकाचे प्रयोग करुन असे नेमके कोणाचे राजकिय वा सामाजिक हित साधत आहेत? जगात महात्म्यांची नावे घेतली जातात व्यवहारात कोणी आणत नाही. नाव मात्र वापरुन घेतात.
ज्या नथुरामने आपण गांधींना मारले नसुन गांधीवादाला मारले म्हटले त्या गांधींच्या नावाचा गैरफायदा मात्र तुमच्या नव्या नाटकामुळे हिंदुत्व द्वेष्ट्यांना नव्याने मिळवुन देत आहात. तुमचे कणकवली संदर्भातले पत्र वाचले त्यात तुम्ही लिहिताय कि आलेले विरोधक तुमच्या नावाबरोबर ब्राह्मणांच्या नावे पण शिमगा करत होते. याचा अर्थ तुमच्या बरोबर आजचा ब्राह्मण वर्गही फरफटला जात आहे. आणि हे सर्व कशासाठी? मेलेला गांधीवाद पुनरुज्जिवित करण्यासाठी का शिल्लक असलेल्या गांधीनामाविषयी लोकांच्या मनात द्वेष वाढवण्यासाठी? काय साधणार आहे त्यातुन? राष्ट्र आणि देश गांधींचा आदर करत चालत आहे का सावरकर मार्गावरुन चालत आहे? माझ्या मते बहुसंख्य हिंदुमत गांधीवादाच्या ओझ्यातुन मुक्त झालय ! समर्थ, शस्त्रसज्ज, अण्वस्त्र सज्ज, आधुनिक, संगणक युग स्विकारलेला समाज ! विचार करा.
कशासाठी विरोधकांना बळ देणारा हा अट्टाहास? तुम्ही ठामपणे व निर्भयपणे प्रयोग करुन तुमच अभिव्यक्ती स्वातंत्र्य सिध्द केलेच आहे. पण आता इथेच थांबा ! यातून कोणाचेच कसले भले होणार नाही. केवळ समाजात वाद माजेल.
कला व राष्ट्रप्रेम दाखवायचेच असेल तर नथुरामवर नाही तर सावरकरांचे विचार मांडणारे नाटक करा, त्याचे प्रयोग वाढवा, त्यातच खरी सकारात्मकता आहे . सावरकरांचे अंधश्रध्दा निर्मुलनाचे व विवेकवादाचे कार्य अधिक महत्वाचे. सावरकर म्हणाले तस त्यांची समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण रत्नागिरीतले समाजकार्य अधिक महत्वाचे. गांधीभक्तांच्या गांधीवादाचा आधार फक्त नथुराम आहे , नथुरामशिवाय गांधींवर एकही शब्द त्यांना बोलता येत नाही. निदान हिंदुत्ववाद तरी नथुराम मुक्त असु द्यात. सावरकरांनी इतके विचार मांडलेत आणि कार्य केलय कि त्यातला एक एक पैलु घेऊन काम केल तरी सुध्दा जन्म अपुरा पडेल.
धन्यवाद !
-चंद्रशेखर साने
( सावरकर विचारांचा एक अभ्यासक )
( सावरकर विचारांचा एक अभ्यासक )
No comments:
Post a Comment