"स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "
लोकमान्य टिळकांच्या या उद्गारांना शंभर वर्षे पुर्ण झाली , त्या निमित्ताने काही कार्यक्रम पार पडले. हे उद्गार टिळकांनी नेमके कधी काढले, स्वराज्याची त्यांची कल्पना नेमकी काय होती. स्वातंत्र्य व स्वराज्य यात नेमका काय फरक आहे? का दोन्ही समानार्थी यावर काही उद्बोधक चर्चा पण सुरु आहेत.
जहाल मतवादी लोकमान्य हे सशत्र क्रांतीकारी पक्ष आणि सनदशीर मार्गाने प्रयत्न करणारा नेमस्त कॉंग्रेस पक्ष यातला सुवर्णमध्य होता. सावरकरांनी वर्णन केल्याप्रमाणे क्रांतीकारक पक्ष हा तलवारीचे पाते असेल तर टिळक त्या तलवारीची मूठ होती. टिळकांना गांधी (महात्मा) प्रमाणे सशस्त्र क्रांती हे कधी पाप वाटले नाही. योग्य वेळ आणि एकुण शक्ती यांचा मात्र ते विचार करत होते.
१९१६ च्या होमरुल चळवळीचा एक टप्पा आला आणि त्यावेळी लोकमान्यांनी हे प्रसिध्द सुत्र सांगितले. या आधी पर्यंत ब्रिटीशांच्या आधुनिक तंत्रामंत्राने भारावलेला नेमस्त कॉंग्रेस वर्ग ब्रिटीशांचे राज्य म्हणजे ईश्वरी वरदान समजत असे. लोकहितवादी देशमुख, रानडे, गोखले हे त्याचे वाहक! ब्रिटिश म्हणत, काय करणार हो आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ इच्छीतो पण तुम्ही त्यास पात्र नाही. रानडे व गोखले (जे गांधींचे गुरु) यांना ते मनापासुन पटे की होय हो, तुम्ही आम्हाला शिकवा , आम्ही स्वातंत्र्यास पात्र नाही, तुम्हीच आमचे तारणहार.
पण टिळकपक्षाने मात्र सांगितले अहो आमची पात्रापात्रता ठरवणारे तुम्ही कोण? स्वराज्य हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे. तुम्ही देणारे दाते नाहीत आणि आम्ही ते घेणारे याचक नाही, तो आमचा जन्मजात हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. तथापि १९१६ नंतरही कॉंग्रेसला संपुर्ण स्वातंत्र्याचा ठराव करता आला तो एकदम १९२९ सालीच. पण त्या ठरावानेही गांधी संतप्त झाले. टिळकांपेक्षा गोखले हेच त्यांचे गुरु. त्यामुळे या ठरावानंतर संपुर्ण स्वातंत्र्याचा अर्थच मला कळत नाही असे उद्गार त्यांनी काढले.
या व्यतिरिक्त देशात तिसरा पक्ष होता तो तेजस्वी सशस्त्र क्रांतीकारक पक्ष. त्यांना हे असल मागण, अर्ज करण हेच अमान्य होत. सन १९१६ वा सन १९२९ च्या कितीतरी आधि त्यांनी स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी शस्त्रे उचलली होती. स्वातंत्र्य हा आमचा हक्क आहेच We all born free यावर त्यांची अतुट श्रध्दा होती. १९०२ सालाच्या अभिनव भारताच्या शपथेतच संपुर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा होती.
अभिनव भारताचे कवि गोविंद उर्फ आबा दरेकर गर्जुन म्हणाले,
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले॥
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले॥
"स्वराज्येच्छुने" पाहिजे युध्द केले.............स्वराज्याच्या इच्छेने युध्द केले पाहिजे कारण युध्दात जिंकल्याविना स्वातंत्र्य मिळत नाही.
-चंद्रशेखर साने
No comments:
Post a Comment