Friday, January 20, 2017

सावरकर आणि टागोर

१९१३ साली रविंद्रनाथ टागोरांना नोबेल सन्मान मिळाल्यावर ती वार्ता अंदमानात शिक्षा भोगत असलेल्या सावरकरांना हस्ते परहस्ते मिळाली. ( अंदमानात बातम्या मिळण्याचे वेगवेगळे मार्ग कोणकोणते असत ती माहिती सावरकरांनी माझी जन्मठेप मध्ये दिली आहे. ) या वार्तेने आनंदित झालेल्या सावरकरांनी रविंद्रनाथांच्या अभिनंदनपर काव्य रचले. समग्र सावरकर साहित्यात ती कविता छापताना सावरकरांनी ती रविंद्रनाथांकडे धाडली असा उल्लेख आहे.
काल आमचे फेसबुकवरचे तरुण मित्र Ashish Khadye यांनी एक चित्ताकर्षक प्रश्न केला. हि कविता सावरकरांनी कशी पाठवली अणि त्यावर टागोरांनी कोणते उत्तर पाठवले. कारण सावरकरांना साधा कागदही मिळत नसताना हि कविता लिहिणार कशी , ब्रिटीश त्यांना पाठवु देणार कशी?
प्रश्न रास्त होता. इतर सर्व कविता सावरकरांचे एक सह कष्टभोगी राजबंदी प्राध्यापक रामहरी यांनी मुखोद्‌गत करुन सुटल्यावर सावरकरांच्या धाकट्या भावाकडे जाऊन त्यांना त्या हजारो ओळी म्हणून दाखवल्या व त्यांनी त्या उतरवुन घेऊन टोपण नावाने छापल्या हे माहित होते, पण या 1913 सालच्या कवितेचा प्रश्न सुटेना.
मग मी इमेल द्वारा आमच्या मित्रमंडळींकडे पृच्छा केली असता आमचे दुसरे तरुण मित्र Akshay Jog यांनी ससंदर्भ याचे उत्तर दिले.ते पुढील प्रमाणे,
**********************************************
नमस्कार,
शि ल करंदीकर लिखित सावरकर चरित्रात पृष्ठ क्रमांक ४४५-४४६ ह्याचा संदर्भ मिळतो.
१९०९ साली ५ वर्षांच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाल्यामुळे जे युक्तप्रांतीय राजबंदी अंदमानात धाडण्यांत आले होते त्यांच्यापैकी एकाबरोबर सावरकरांची ही १९१३ साली रचलेली कविता १९१४ साली केव्हांतरी बाहेर आली. या सज्जनाने ही कविता बहुधा कंठगत करूनच हिंदुस्थानात आणली असली पाहिजे. या सज्जानाने ह्या कविता नारायणराव सावरकरांना नेऊन दिल्या असाव्यात म्हणून सावरकरांनी १९१५ च्या पत्रात (Did you get the poems on Shri Guru Govindji & Ravindranath") ( /अंदमानच्या अंधेरीतून या पुस्तकात ही पत्रे समाविष्ट आहेत/) तसा प्रश्न नारायणरावांना विचारला आहे. ही कविता हिंदुस्थानात आल्यावर १९१५ सालच्या सुमारास ती रवींद्रनाथांना परिचित करून देण्यात आली होती.
वि श्री जोशींच्या 'क्रांतिकल्लोळ' ग्रंथात पृष्ठ क्रमांक ५१९ वर खालील उल्लेख मिळतो.
"त्यांची टागोरांवरील कविता टागोरांना धाडण्यात आली होती. पण सावरकर हे नाव असे दाहक होते की, तिची पोच देऊन, त्यासाठी ह्रद्य भरून आभार मानण्याचीही या कविवर्यांची छाती झाली नाही."
**************************************************
रविंद्रनाथांनी उत्तर पाठवले नाही यात आश्चर्य कही नाही. सावरकरांचे सन्मानाने नाव घेणे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संबंध जोडणे खरोखरच त्याकाळात सोपे काम नव्हते. त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे ब्रिटिश सरकारशी वैर घेणे, त्यामुळे कोणीच धजावत नसे हि वस्तुस्थिती होती. केसरी सारख्या वृत्तपत्राने सुध्दा त्यावेळी सावरकरांचा उल्लेख एकेरी केला असुन बहुतेक स्वदेशी वृत्तपत्रे त्यांचा उल्लेख रास्कल अस करत होते तर युरोपियन वृत्तपत्रे व स्वतंत्र देश त्यांना हुतात्मा, Martyr असा करत होती.
श्री. Ashish यांनी इतक्या बारकाईने वाचन करुन प्रश्न विचारला व श्री. Akshay यांनी कष्ट घेऊन उत्तर शोधले म्हणून दोघांचेही अभिनंदन !
****************************************
(प्रकाशकांनी जी तळटिप दिलेली आहे त्यावरुन जणु काही सावरकरांनीच रविंद्रनाथांना प्रत्यक्ष (डायरेक्ट) धाडली असा समज होतो, अशी अर्धवट तळटिप देण चुकीच आहे, एक ओळ कमी लिहिण हा संपादकाच्या आळसाचा भाग आहे)

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...