संगीत राजसंन्यास या नाटकाच्या खर्ड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जी चुकीची प्रतिमा रंगवली आहे त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. अशा हिन गैरसमजुती अशा वीर पुरुषाविषयी पसराव्यात हे दु:खद आहे. शिवाजी महाराज असोत वा संभाजी महाराज वा इतर सर्व ऐतिहासिक पुरुष . त्यांच्याविषयी आदर बाळगण्यास व सिद्ध करण्यास कोणाच्याही प्रशस्तीपत्रकाची वा जाती प्रमाणीकरणाची गरज नाही.
मात्र राम गणेश गडकऱ्यांनी मुद्दाम बदनामीच्या हेतुने हे नाटक किंवा नाटकाचा खर्डा लिहिला हे ही मला मान्य नाही.
ही निव्वळ एक कलाकृती आहे व होती. तो इतिहास नाही. त्या काळात गडकरी यांना जो इतिहास उपलब्ध होता तो खूप अपुरा व मोडकातोडका होता. या साधनांत कृष्णाजी केळुस्कर या अतिशय विद्वानाने लिहिलेले शिवचरित्र समाविष्ट असून त्यातही केळूस्करांना जी तत्कालिन कागदपत्रे उपलब्ध झाली त्यात त्यांनाही संभाजी महाराजांची प्रतिमा वाईटच आढळली व केळूस्कारांनीही तशिच रंगवली. केळूस्करानां पण इतर सर्व इतिहासकारांप्रमानेच आपण लिहितो तोच इतिहास अंतिम नाही याची जाणीव होती. केळुस्कर हे जातीने मराठा. बखरी या इतिहासात दुय्यम तिय्यम साधने मानली असतात, पण जो पर्यंत इतर साधने उपलब्ध नसतात तो पर्यंत त्यावर भर देण्यावाचून पर्याय नसतो.
इतिहासाकार्य वि.का.राजवाडे म्हणतात अस्सल कागदाचा एक चिठोरा सुध्दा बखरी पेक्षा कितीतरी जास्त पटीने महत्वाचा असतो. तेव्हा त्याविषयी सद्हेतू च्या शंकेला जागा नाही. पारतत्र्याच्या व गुलामीच्या काळात इतिहास लेखन अपुरेच असते , लोकांना रोजच्या जगण्यात सुध्दा अनेकदा परतंत्र अवस्था असते, साधने परकियांच्या ताब्यात असतात ति सहजासहजी पहाण्यास पण मिळतातच असे नाही. खाजगी कागदपत्रे लोक देण्यास नाखूष असतात. वि.का. राजवाडे यांनी किती कष्टाने जुने कागद ऐतिहासिक नोंदी सनदा, पत्रे मिळवून मराठ्यांच्या इतिहासाची साधेने शोधली याचा राजवाडे यांचे कॅरीत्र वाचल्यावर प्रत्यय येईल. अशा प्रतिकूल परिस्थितीत जो काही इतिहास सादर केला जातो तो त्या वेळेपुरता प्रामाणिक असतो. नंतर त्यात नवीन पुराव्यांच्या उपलब्धते प्रमाणे भर पडते, सुधारणा होते. जुन्यांना दोष न देता केलेल्या कामाचे श्रेय व कृतज्ञता व्यक्त करून पुढे जायचे असते . त्यांनी यथाशक्ती केले आपल्याला अजून मेहेनत घेऊन पुढे जायचे आहे याची जाणीव ठेवून चांगली भर टाकायची असते.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांवर अधिक संशोधन झाले त्यात श्री बा.सी. बेंद्रे व डॉ. कमल गोखले व यांनी अपार परिश्रम करुन संभाजी महाराजांवर संशोधन केले व महाराजांचे तेजस्वी रुप समोर आणले, सत्यस्वरुप पुढे आले. त्याआधी ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराज नाटक-कथा-कादंबरी वा इतिहास परिक्षणात्मक लेखन केले त्यात संभाजी धर्मवीर पण चारित्र्याच्या बाबत मात्र चुकीचेच रंगवले. यात त्यांचा कसलाही वाईट हेतु नव्हता तर केवळ इतिहासाची अपुरी साधने हे त्या मागचे कारण होते.
एकदा हे निश्चित झाल्यावर या सर्व लेखनाला बाजूला सारुन आपण आपली दृष्टी स्वच्छ केली पाहिजे. हे सर्व छत्रपती कोणाही एका जातीच्या मालकीचे नाहीत. तो आपला सगळ्यांचा वारसा आहे, स्फुर्तीस्थान आहे आणि ठेव आहे. त्याच्यावरुन राजकारण करणे, जाती मध्ये अडकवुन पुर्वी जे चुकीचे लेखन झाले त्यांची जात शोधणे व या महापुरुषांना जातीचे ठिगळ लावुन त्यावर आपलीच एकाधिकार शाही असल्याचा आविर्भाव आणणे हे सर्व अयोग्य आहे. यातुन कोणाचेच हित साधले जाणार नाही.
उपलब्ध इतिहासाप्रमाणे नाटके , कथा कादंबऱ्या लिहिल्या जातात. नाट्य, कथा वा कादंबरी लेखक हे इतिहास संशोधक नसतात. आणि बराच काळ गेल्यावर आज त्या कलाकृतींचे महत्वच काय? अनेक पुस्तक वा कलाकृतीत आक्षेपार्ह काहीना काही सापडु शकतेच, कधी ना कधी कोणाला ना कोणाला, कोणत्या ना कोणत्या काळात, काही तरी आवडत नाही,रुचत नाही.
प्रत्येक जणच स्वत: किंवा झुंडीने सेन्सॉर बोर्ड होऊन नासधुस करु लागला तर ती तालिबानी वृत्तीच असते. महात्मा फुले यांचे लेखन असो किंवा आंबेडकरांचे रिडल्स असो. मी नथुराम बोलतोय असो किंवा विजय तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल !
कोणीच कोणाचे जाळु नये नष्ट करु नये. एकाने मनुस्मृती जाळली की दुसरा रिडल्स जाळतो. समाजाने सर्वच प्रकारच्या अभिव्यक्तींना शांतपणे आणि वैचारीक प्रत्युत्तर देऊन पचवले पाहिजे. हिच माणुसकी आहे.
No comments:
Post a Comment