Wednesday, February 8, 2017

सावरकरांना मिळणारे तथाकथित पेन्शन

सावरकरांना रत्नागिरीत असताना ब्रिटीशांकडून निर्वाहभत्ता मिळत होता या विषयी जणु काही ते ब्रिटीशांचे पगारी नोकर होते अशा प्रकारचा समज करुन दिला जातो. यावरची वस्तुस्थिती अनेकदा सांगितली आहे. पण तरिही बऱ्याचजणांकडुन अद्यापही हा प्रश्न विचारला जातो. काही प्रामाणिक कुतुहलाने विचारतात तर काही लबाडी म्हणून विचारतात ! त्यामुळे त्यावर परत एक कायमस्वरुपी लेखन व संपादन करुन ठेवतो आहे.
* इंग्लंडमध्ये सावरकरांची आर्थिक स्थिती कशी होती *
सावरकरांना उच्च शिक्षणासाठी पं. शामजी कृष्णवर्मा यांनी शिष्यवृत्ती दिली होती. तिची रक्कम दर सहामाहीसाठी ४०० रू. अशी होती. प्रत्येकी ४०० रू. चे पाच हप्ते याप्रमाणे एकंदर २ हजार रू.ची ही शिष्यवृत्ती होती. त्यावेळी विनिमयाचा दर, १५ रू. = १ पौंड असा होता. याचाच अर्थ सावरकरांना सुमारे १३३ पौंड मिळणार होते. (दरवर्षी सुमारे ४४ पौंड). इंडिया हाऊसमध्ये राहण्याचा खर्च आठवडयाला १ पौंड होता असे सावरकरांनी १९ मार्च १९०९ च्या आपल्या वार्तापत्रात नमूद केले आहे. (सावरकरांनी ‘दर आठवडयाला’ असे वेगळे नमूद केलेले नाही. परंतु त्याकाळी सर्व जमाखर्च साप्ताहिक कोष्टकानुसार होत असे त्यावरून हे अनुमान आम्ही केले आहे.) याप्रमाणे एका वर्षाचा खर्च ५२ पौंड होतो परंतु सावरकारांना सुमारे ४४ पौंडच शिष्यवृत्ती मिळत असे. उरलेला खर्च त्यांना त्यांचे श्वशुर श्री. चिपळूणकर यांचेकडून मिळत असे. या नित्य खर्चाव्यतिरिक्त सावरकरांना खालीलप्रमाणे अन्य खर्च आला होता.
१) मुंबई – लंडन जहाज प्रवास – १७ पौंड (सुमारे)
२) कपडे
३) शिक्षणाचे शुल्क
४) परीक्षा शुल्क
५) पुस्तके
६) इंग्लंडमधील प्रवास
आपल्या श्वशुरांच्या सहाय्यामुळेच सावरकर हा खर्च करू शकले. याप्रमाणे इंग्लंडमधील त्यांची आर्थिक स्थिती जितक्यास तितकीच होती.
* काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतरची आर्थिक परिस्थिती *
पन्नास वर्षे काळे पाण्याची शिक्षा होण्याबरोबरच सावरकरांची सर्व मालमत्ता जप्त झाली होती. त्यांचा चष्मा सुध्दा आणि कपडे सुध्दा सरकारी मालमत्ता झाली होती. त्यांना अंदमानात जो चष्मा वापरायला मिळाला तो व गीतेची एक प्रत बाळगण्यास मान्यता मिळाली ती सुध्दा सरकारी मालमत्ता म्हणूनच.
६ जाने १९२४ ला रत्नागिरिच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर तुरुंगातील कपडे बदलण्याचा प्रश्न समोर आला कारण तुरुंगातले कपडे घातल्यावर जे आधी चे कपडे होते ते सरकार दरबारी जमा झाले होते ते सापडेनात, म्हणून एका स्नेह्याची कपडे उसने घालावे लागले.
या मधल्या काळात सावरकरांच्या पत्नीला व वहीनीला काही नातेवाईक गुपचुप मदत करत असावेत , त्याव्यतिरिक्त मॅडम कामा काही आर्थिक मदत पॅरिस हून करत होत्या. सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकरांवर सर्व मुख्य भार पडत असे. दोन्ही मोठ्या सावररकरांना शिक्षा झाली तेव्हा त्यांचे शिक्षण चालु होते.
* सावरकरांची सुटका माफीन्वये नाही तर तहाद्वारे *
१९१० ते १९२१ अंदमानात व पुढे तीन वर्षे रत्नागिरीच्या तुरुंगात सजा काटल्यावर, कोणत्याही माफी अर्जाशिवाय पाच वर्षे राजकारणात भाग घेणार नाही व रत्नागिरिच्या बाहेर न पडण्याची अट मान्य करुन सावरकरांनी सुटका करुन घेतली.
याच अटींचा दुसरा भाग होता की ब्रिटीश सरकारने जुन्या गोष्टी उगाळायच्या नाहीत, अभिनव भारत व सावरकरंचे सहकारी व कटाची माहिती सावरकर सांगणार नाहीत, जुने गेले ते परत काढायचे नाही.
राजकारणात भाग न घेणे आणि स्थानबध्दता या अटींवर केवळ सावरकरच सुटले असा समज पसरला आहे पण ती खोटी गोष्ट आहे. केवळ सावरकरच नाहीत तर शेकडो राजबंदी याच अटींवर सुटले होते. सशस्त्र क्रांतीचा गुन्हाच ब्रिटीशांच्या दृष्टीने एवढा भयंकर होता की तह केल्यावाचून सुटका शक्यच नव्हती. या सर्वांची सुटका एक प्रकारे तह म्हणता येते, माफी नाही.
*सुटका झाल्यानंतरची रत्नागिरीतली आर्थिक स्थिती*
अशी सुटका झालेल्या सर्वांचीच आर्थिक स्थिती सहसा चांगली नव्हती. सावरकरांच्या बाबत तर फारच दारुण होती, कारण त्यांची सनद रद्द झाली होती , इतकेच नाही बॅरिस्टरी बरोबर B.A. ची पदवी सुध्दा रद्द झाली होती.
त्यांचे श्वशुर चिपळुणकर यांचीही सर्व मालमत्ता जप्त करुन ब्रिटीशांनी सर्व रसद तोडलेली होती. रत्नागिरीसारख्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळणे अवघड होते. सावरकरांशी संबंध ठेवण म्हणजे सरकारी अवकृपा ओढावुन घेणे असा अर्थ असलुयाने लोक त्यांच्यापसून अंतर राखत होते तिथे नोकरी मिळण्याची कल्पनाच शक्य नव्हती.
अगदी दुष्टातल्या दुष्ट कैद्यालाही तुरुंगात केलेल्या कामाचा मेहनताना मिळत असतो. स्थानबध्द केल्या गेलेल्या स्वातंत्र्य विराला उपजिविकेचे कोणतेही साधन नसल्याने तसा भत्ता मिळणे हा हक्क आहे. इथे प्रश्न होता तो देशस्वातंत्र्यासाठी सर्वस्व गमावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा !
सावरकरांच्या बरोबर सुटलेल्या बंगाली क्रांतीकारकांना सुटल्याबरोबर महिना रु. १००/- महिना निर्वाहभत्ता मिळत होता तर सावरकरांना रु. ६०/- मिळु लागला तोही पहिली साडे पाच वर्ष म्हणजे ६ जाने १९२४ ते ३१ जुलै १९२९ या कालावधीत मिळाला नाही.हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. पहिली पाच वर्षे सावरकरांनी कशी काढली असतील याची कल्पनाही करवत नाही. व नंतरही इतर राजबंद्यांपेक्षा कमी म्हणजे केवळ साठ % च निवृत्तीवेतन मिळणे हा ब्रिटीशांचा सावरकरांविषयीचा आकस दर्शवते, मेहेरबानी नाही.
सावरकरांना १ ऑगस्ट १९२९ पासून ब्रिटिश सरकारकडून दरमहा ६० रू. निर्वाह भत्ता मिळत असे. परंतु हा पैसा ब्रिटीशांचा नसून भारतीयांचाच होता. सावरकरांची मालमत्ता आणि देशाचीही मालमत्ता लुटुन ब्रिटीश सरकारने लुट चालवली होती तोच आपण मिळवुन देशासाठीच वापरत आहोत अशीच सावरकरांची भावना होती. कुटुंबाचा वाढता खरच असूनही अनेक सार्वजनिक कामात सावरकरांना खर्च येत असे.
क्वचित त्यांना जनतेकडून गौरव-निधी प्राप्त होत असे. सावरकरांनी ही रक्कम कंपनीत गुंतवली असती तर त्यांना त्यावर व्याज मिळाले असते. परंतु, त्यांनी तसे केल्याचे दिसत नाही. काही वेळा ते आपल्या काही परिचितांना व्याजाने कर्जाऊ रक्कम देत असत. परंतु, त्यांची ही बहुतेक सर्व कर्जे परत फेडण्यात आली नाहीत. त्यामुळे सावरकरांनी पुढे सर्व प्रॉमिसरी नोटा जाळून टाकल्या आणि स्वत:पुरता हा विषय संपवला !
रत्नागिरी येथे सावरकरांना तीन अपत्ये झाली. कन्या प्रभात – १९२५, (जन्म साता-याला) दुसरी कन्या शालीनी ही अल्पवयात गेली. पुत्र विश्वास – मार्च १९२८ (जन्म मुंबईत). एकुण रत्नागिरी येथील मुक्कामात सावरकरांची आर्थिक स्थिती बेतास बात होती आणि जमाखर्चाची जेमतेम तोंडमिळवणी होत असे.
* मात्र या स्थितीतही त्यांनी मांग जातीतील एका मुलीचे पालनपोषण - शिक्षण केले होते !* हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आणि त्यांचे कर्ते सुधारकपण दाखवणारा आहे.
सावरकरांच्या आयुष्यात वैयक्तिक स्वार्थाला आधी व नंतरही नगण्य स्थान होते. त्यांना मिळत असलेला निर्वाह भत्ता हा त्यांचा पुर्ण हक्क होता. त्यांची जप्त झालेली वडीलोपार्जित जहागिर/शेतीवाडिचे उत्पन्न कितीतरी पटीने अधिक मिळते. बॅरिस्टरी करते तर अन्य अनेक नेत्यांप्रमाणे सनदशीर मार्गाने देशसेवा करत खोऱ्याने पैसाही मिळवु शकले असते. तेव्हा रु.. ६०/- हि तूटपुंजी रक्कम म्हणजे जणुकाही ब्रिटीशांची मेहेरबानी , माफी व त्यातून सुटका करुन सावरकर देशाच्या विरुध्द कार्य करत होते असा अतिशय आचरट आणि हास्यास्पद भूमका समाजात पसरवण ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
पण एकंदर केवळ माहितीचा धबधबा आणि ज्ञानाचा अभाव आणि विरोधक व हिंदुत्वद्वेष्ट्यांचे प्रभावी अपप्रचार तंत्र या रगाड्यात सहज बुध्दीने (common sense) सुध्दा कळु शकणारी वस्तुस्थिती सुध्दा झाकोळली जाते.
© चंद्रशेखर साने

संदर्भ

१.शोध सावरकरांचा - य.दी.फडके
२. www.savarkar.org


No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...