माझ्या लहानपणी दारासिंग या नावाची प्रचंड धुम असे. दारासिंग विषयी अचाट कल्पना मनात असत. त्याची कोणाशी लढत प्रत्यक्ष मात्र कधी पाहिली नव्हती. सगळ ऐकिव आणि वाचीव.
दुसरा त्याचा धाकटा भाऊ रंधावा. तो म्हणजे अफाटच पण दुय्यम.
त्यावेळी परदेशातून कोणीतरी अन्य एक पहेलवान आणि रंधावा यांच्यात लढत ठरल होती. हा पहेलवान खूप आक्रमक भाषा बोलत होता. वृत्तपत्रातून त्याची लागोपाठ वेगवेगळी निवेदन व फोटो येत असत. रंधावाला दोन मिनिटात असा चीत करतो रंधावाला दोन मिनिटात तसा चीत करतो.
आम्हाला अर्थातच रंधावा जिंकावा असे वाटत होते, पण त्या पहेलवानाची ( नाव लक्षात नाही पण तो किंगकॉंग नावाचा पहेलवान नसावा, वेगळा कोणीतरी होता बहुदा) आक्रमकता आणि धिप्पाड शरीराचे फोटो पेपर मध्ये छापुन येत तेव्हा मनात भीती दाटुन येई की आता रंधावाचे काही खरे नाही.
त्या पहेलवानाला रंधावा किरकोळ उत्तरे देत होता, पण त्या उत्तरांचा आमच्यावर फारसा प्रभाव पडत नव्हता. मग त्या पहेलवानाची हिंमत अधिकच वाढली. तो थेट बोलु लागला की दारासिंग मला घाबरतो आहे आणि म्हणूनच त्याने रंधावाला बळीचा बकरा बनवायला त्याची माझ्याशी लढत ठेवली आहे. हिंमत असेल तर त्यानेच माझ्याशी लढावे. मी त्याला सुद्धा मी लोळवु शकतो.
त्याची आक्रमकता इतकी जबरदस्त होती, आत्मविश्वास इतका प्रचंड होता की वाटल यापुढे तर तो दोघेही या, दोघांनाही एकाच वेळी लोळवतो अस आव्हान देणार आणि ते खरही करुन दाखवणार अस वाटु लागल.
सलग तीन दिवस तो पेपरमधुन दारासिंगला आव्हाने देत होता. आमची मने काळजीने व्यापुन गेली कारण तेव्हा अमिताभचा ऍंग्री यंग मॅन तयार व्ह्यायचा होता, दारासिंग हे भारतीयांच्या शूरतेचे प्रतिक होता.
दारासिंगाने त्या पाहुण्या पैलवानाला एकही तोंडी प्रत्युत्तर दिले नाही. तो गपगुमान राहिल्याने तर आमचा धीरच सुटला होता. चौथ्या दिवशी बातमी आली की रंधावाची त्या पहिलवानाशी कुस्ती रद्द करुन दारासिंगाने स्वत:च ते आव्हान घेतले आहे. पण पहिलवानाची आक्रमकता काहि थांबत नव्हती. बहुतेक दारासिंग हरणार आणि आपले भारतीयांचे नाक कापले जाणार याच कल्पनेने आमची मने निराश झाली
फ्रिस्टाईल कुस्तीचा दिवस उजाडला. दारासिंग आणि त्या पहेलवानाची जुंपली आणि अक्षरश: पाच-दहा मिनिटात त्या पहिलवानाने माती खाल्ली.
गर्जेल तो पडेल काय? या उक्तीचा आम्हा सर्वाना डोळ्यादेखत अनुभव आला.
©चंद्रशेखर साने
टिप: हि पोस्ट राजकीय नाही, कोणास तसे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
No comments:
Post a Comment