मी परंपरावादी सुधारक आहे. परदेशी संस्कृती आयात करुन इथे जे निर्माण झालय ते नष्ट करण्यापेक्षा आहे तीच संस्कृती , प्रथा व परंपरा यात कालानुरुप सुधारणा करण्याच्या मताचा मी आहे.
भारतीय संस्कृतिच्या वटवृक्षाची पाळेमुळे या मातीत खोल अशी हजारो वर्षे रुजलेली आहेत. या महावृक्षाखाली अनेक पिढ्या उत्तम व सुखी आयुष्य जगत आल्या आहेत. अशा सांस्कृतिक वृक्षाच्या छायेत बांडगुळे , परजीवी तयार झाली असेल तर ती निपटुन काढण, तण माजले असेल ते साफ करणे , झाडाला किड लागलेली असेल तर योग्य ती औषध फवारणी करण हे जास्त मान्य आहे.
पण आहे ते सगळच वाईट, आमचा प्रत्येक सण वाईट , आमची प्रत्येक गोष्ट पर्यावरणाला हानीकारक मानून हवामानाला न मानवणाऱ्या परकिय रोपट्यांची हट्टाने लागवड करण, आमचे पूर्वज मुर्खच , त्यांना काहीच कळत नव्हत अस मानून आयात केलेल्या विचारांना समाजावर थोपवण आणि स्वकियांची निंदा आणि पुर्वजांची नालस्ती करण यात काही पुरुषार्थ आहे अस मला वाटत नाही. व्यक्तीगत आयुष्यात मी नास्तिक आहे, मी स्वत:ला पुरोगामी विचारांचाच मानतो. विवेकवाद व बुध्दीवादाचा मी चाहता आहे.
माझा हा विवेकवाद मला स्वत:च्या संस्कृतीचा विध्वंस करायला शिकवत नाही तर विधायक विचार करायला शिकवतो.
©चंद्रशेखर साने
No comments:
Post a Comment