Thursday, January 19, 2017

अभिनव भारत मंदिर

सशस्त्र क्रांती च्या उद्देशाने सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संघटनेचे काम पुर्ण झाले असे जाणून त्यांनी हि संघटना विसर्जित केली व अभिनव भारत संघटनेचा १९५२ साली समारोप केला.(याचे अध्यक्षपद स्वत: न भुषवता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र अध्यक्षांच्या खुर्चीवर ठेऊन त्यांनी बोसांविषयी आदर व्यक्त केला )

पुढे १९५३ साली या निमित्ताने ते नासिक जिल्हा व त्यांच्या मुळ जन्मगावी भगुर येथे गेले. त्या प्रसंगी नाशिक जिल्ह्यात स्मारक म्हणून अभिनव भारत मंदिर उभारले गेले.

सावरकरांना स्वत:ला कोणतेही वैयक्तिक स्मारक नको होते त्यामुळे त्यांनी तेव्हा ब्रिटिश सरकारने जप्त केलेले स्वत:चे जन्मघर त्यावेळेच्या बाजारमूल्यानुसार सुमारे रु. ५०००/- किमतीत घेणे शक्य असुनही तसे न करता, अभिनव भारत मंदिराला रु. १५०००/- ची देणगी दिली.

त्यांनी स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्याचा मोह टाळला. पण आपणास मात्र कृतज्ञता बुध्दी नसल्याने अजूनही या घराचे स्मारक होऊ शकलेले नाही , ते घर हे राष्ट्रिय स्मारकाचा विषय आहे.


Friday, January 13, 2017

सावरकर आणि खादी

स्वदेशी , खादी यांचा आणि हिंदुत्ववाद्यांचा फार जुना संबंध आहे. परकिय कपडयांची पहिली होळी सावरकरांनी पुण्यात केली , गांधीजींनी त्याचा धिक्कार केला, पण पुढे स्वत:च अशी होळी केली, Better late than never.

 लंडनमध्ये असताना आपल्या बातमीपत्रातून (१९०५-१९१०) सावरकरांनी स्वदेशीचे महत्व शिकवणारे व स्वदेशीच्या प्रचाराचा ब्रिटीशांच्या व्यापारावर होत असलेल्या प्रतिकुल परिणामांची आकडेवारी देणारे २-३ लेख लिहिले आहेत.

एका प्रसंगी सावरकरांचे धाकटे बंधु डॉ. नारायणराव सावरकर संपुर्ण खादीच्या वेषात अन्य दोन सावरकर बंधुंना भेटायला तुरुंगात आले असता तुरुंगधिकाऱ्यांनी त्या वेषावरुन अटकाव केला. डॉ.सावरकरांनी न्यायालयात जाऊन संघर्ष करुन, खादीच्या वेषातच तुरुंगात भेटीसाठी जाण्याची परवानगी मिळवली.

स्वा. सावरकर रत्नागिरीत स्वदेशी मालाची विक्री करत. स्वत: गाडीत स्वदेशी माल भरुन तिची विक्री करत. स्वदेशी माल व कापड यावर त्यांनी काही कविता रचल्या व प्रचारल्या.

पुढील फोटो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोकणातील राजापुरच्या खादी भांडाराचे उद्‌घाटन करतानाचा आहे. राष्ट्रप्रेम, देशहित आणि स्वदेशी यावर कोणाचा एकाधिकार असतो का काय? मोदींच्या चरखा छायाचित्रावरुन जो गदारोळ माजवत आहेत त्यावरुन फुरोगामी दिवसेंदिवस संकुचितपणाचा कळस गाठत आहेत ते स्पष्ट होतय.

सावरकर आणि गांधी यांच्यात अनेक मतभेद होते , दोन धृवांवरचे महापुरुष. पण सावरकरांचा स्वदेशीला विरोध नव्हता. आधुनिकता व यंत्रयुग यांचा स्वीकार केला तरी स्वदेशीचे महत्व होतेच. खादी गांधीजींची म्हणून विरोध अशा वैयक्तिक रागलोभाला त्यांच्या आयुष्यात नव्हते. जे जे देशाच्या हिताचे ते ते त्यांनी स्वीकारले. लंडनमध्ये असताना त्यांनी स्वदेशी चळवळीचा ब्रिटीशांच्या व्यापारावर कितपत व कसा परिणाम झाला आहे यावर एक बातमीपत्र आकडेवारी सहित लिहिले होते.परदेशी कपड्यांची होळी तर त्यांनी गांधीजी राजकिय जीवनात येण्याच्या कितीतरी आधी केली होती. ते खादीचाही प्रसार करत असत. स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी एका खादी भांडाराचे उद्‌घाटन सुद्धा केले यात सावरकर खादी पेहेरावात आणि गांधी टोपि घातलेले दिसतात, जे जे हिताचे ते ते त्यांनी अंगिकारले, राष्ट्रहित पहिले वैयक्तिक अहंकार नंतरचा. नुसत्या मजकुराने काम होते त्याच्या दहापट काम एका छायाचित्राने होते म्हणून फोटो शेअर करतोय या मजकुरासोबत. मिळालेले छायाचित्र खूप जुने आणि आकाराने छोटे आहे, त्यास उपाय नाही.

No automatic alt text available.

Wednesday, January 4, 2017

गडकऱ्यांचा कच्चा खर्डा "राजसंन्यास"

संगीत राजसंन्यास या नाटकाच्या खर्ड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जी चुकीची प्रतिमा रंगवली आहे त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. अशा हिन गैरसमजुती अशा वीर पुरुषाविषयी पसराव्यात हे दु:खद आहे. शिवाजी महाराज असोत वा संभाजी महाराज वा इतर सर्व ऐतिहासिक पुरुष . त्यांच्याविषयी आदर बाळगण्यास व सिद्ध करण्यास कोणाच्याही प्रशस्तीपत्रकाची वा जाती प्रमाणीकरणाची गरज नाही.
मात्र राम गणेश गडकऱ्यांनी मुद्दाम बदनामीच्या हेतुने हे नाटक किंवा नाटकाचा खर्डा लिहिला हे ही मला मान्य नाही.
ही निव्वळ एक कलाकृती आहे व होती. तो इतिहास नाही. त्या काळात गडकरी यांना जो इतिहास उपलब्ध होता तो खूप अपुरा व मोडकातोडका होता. या साधनांत कृष्णाजी केळुस्कर या अतिशय विद्वानाने लिहिलेले शिवचरित्र समाविष्ट असून त्यातही केळूस्करांना जी तत्कालिन कागदपत्रे उपलब्ध झाली त्यात त्यांनाही संभाजी महाराजांची प्रतिमा वाईटच आढळली व केळूस्कारांनीही तशिच रंगवली. केळूस्करानां पण इतर सर्व इतिहासकारांप्रमानेच आपण लिहितो तोच इतिहास अंतिम नाही याची जाणीव होती. केळुस्कर हे जातीने मराठा. बखरी या इतिहासात दुय्यम तिय्यम साधने मानली असतात, पण जो पर्यंत इतर साधने उपलब्ध नसतात तो पर्यंत त्यावर भर देण्यावाचून पर्याय नसतो.
इतिहासाकार्य वि.का.राजवाडे म्हणतात अस्सल कागदाचा एक चिठोरा सुध्दा बखरी पेक्षा कितीतरी जास्त पटीने महत्वाचा असतो. तेव्हा त्याविषयी सद्हेतू च्या शंकेला जागा नाही. पारतत्र्याच्या व गुलामीच्या काळात इतिहास लेखन अपुरेच असते , लोकांना रोजच्या जगण्यात सुध्दा अनेकदा परतंत्र अवस्था असते, साधने परकियांच्या ताब्यात असतात ति सहजासहजी पहाण्यास पण मिळतातच असे नाही. खाजगी कागदपत्रे लोक देण्यास नाखूष असतात. वि.का. राजवाडे यांनी किती कष्टाने जुने कागद ऐतिहासिक नोंदी सनदा, पत्रे मिळवून मराठ्यांच्या इतिहासाची साधेने शोधली याचा राजवाडे यांचे कॅरीत्र वाचल्यावर प्रत्यय येईल. अशा प्रतिकूल परिस्थितीत जो काही इतिहास सादर केला जातो तो त्या वेळेपुरता प्रामाणिक असतो. नंतर त्यात नवीन पुराव्यांच्या उपलब्धते प्रमाणे भर पडते, सुधारणा होते. जुन्यांना दोष न देता केलेल्या कामाचे श्रेय व कृतज्ञता व्यक्त करून पुढे जायचे असते . त्यांनी यथाशक्ती केले आपल्याला अजून मेहेनत घेऊन पुढे जायचे आहे याची जाणीव ठेवून चांगली भर टाकायची असते.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांवर अधिक संशोधन झाले त्यात श्री बा.सी. बेंद्रे व डॉ. कमल गोखले व यांनी अपार परिश्रम करुन संभाजी महाराजांवर संशोधन केले व महाराजांचे तेजस्वी रुप समोर आणले, सत्यस्वरुप पुढे आले. त्याआधी ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराज नाटक-कथा-कादंबरी वा इतिहास परिक्षणात्मक लेखन केले त्यात संभाजी धर्मवीर पण चारित्र्याच्या बाबत मात्र चुकीचेच रंगवले. यात त्यांचा कसलाही वाईट हेतु नव्हता तर केवळ इतिहासाची अपुरी साधने हे त्या मागचे कारण होते.
एकदा हे निश्चित झाल्यावर या सर्व लेखनाला बाजूला सारुन आपण आपली दृष्टी स्वच्छ केली पाहिजे. हे सर्व छत्रपती कोणाही एका जातीच्या मालकीचे नाहीत. तो आपला सगळ्यांचा वारसा आहे, स्फुर्तीस्थान आहे आणि ठेव आहे. त्याच्यावरुन राजकारण करणे, जाती मध्ये अडकवुन पुर्वी जे चुकीचे लेखन झाले त्यांची जात शोधणे व या महापुरुषांना जातीचे ठिगळ लावुन त्यावर आपलीच एकाधिकार शाही असल्याचा आविर्भाव आणणे हे सर्व अयोग्य आहे. यातुन कोणाचेच हित साधले जाणार नाही.
उपलब्ध इतिहासाप्रमाणे नाटके , कथा कादंबऱ्या लिहिल्या जातात. नाट्य, कथा वा कादंबरी लेखक हे इतिहास संशोधक नसतात. आणि बराच काळ गेल्यावर आज त्या कलाकृतींचे महत्वच काय? अनेक पुस्तक वा कलाकृतीत आक्षेपार्ह काहीना काही सापडु शकतेच, कधी ना कधी कोणाला ना कोणाला, कोणत्या ना कोणत्या काळात, काही तरी आवडत नाही,रुचत नाही.
प्रत्येक जणच स्वत: किंवा झुंडीने सेन्सॉर बोर्ड होऊन नासधुस करु लागला तर ती तालिबानी वृत्तीच असते. महात्मा फुले यांचे लेखन असो किंवा आंबेडकरांचे रिडल्स असो. मी नथुराम बोलतोय असो किंवा विजय तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल !
कोणीच कोणाचे जाळु नये नष्ट करु नये. एकाने मनुस्मृती जाळली की दुसरा रिडल्स जाळतो. समाजाने सर्वच प्रकारच्या  अभिव्यक्तींना शांतपणे आणि वैचारीक प्रत्युत्तर देऊन पचवले पाहिजे. हिच माणुसकी आहे.

Sunday, January 1, 2017

We all born Free

"स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "
लोकमान्य टिळकांच्या या उद्गारांना शंभर वर्षे पुर्ण झाली , त्या निमित्ताने काही कार्यक्रम पार पडले. हे उद्गार टिळकांनी नेमके कधी काढले, स्वराज्याची त्यांची कल्पना नेमकी काय होती. स्वातंत्र्य व स्वराज्य यात नेमका काय फरक आहे? का दोन्ही समानार्थी यावर काही उद्बोधक चर्चा पण सुरु आहेत.
जहाल मतवादी लोकमान्य हे सशत्र क्रांतीकारी पक्ष आणि सनदशीर मार्गाने प्रयत्न करणारा नेमस्त कॉंग्रेस पक्ष यातला सुवर्णमध्य होता. सावरकरांनी वर्णन केल्याप्रमाणे क्रांतीकारक पक्ष हा तलवारीचे पाते असेल तर टिळक त्या तलवारीची मूठ होती. टिळकांना गांधी (महात्मा) प्रमाणे सशस्त्र क्रांती हे कधी पाप वाटले नाही. योग्य वेळ आणि एकुण शक्ती यांचा मात्र ते विचार करत होते.
१९१६ च्या होमरुल चळवळीचा एक टप्पा आला आणि त्यावेळी लोकमान्यांनी हे प्रसिध्द सुत्र सांगितले. या आधी पर्यंत ब्रिटीशांच्या आधुनिक तंत्रामंत्राने भारावलेला नेमस्त कॉंग्रेस वर्ग ब्रिटीशांचे राज्य म्हणजे ईश्वरी वरदान समजत असे. लोकहितवादी देशमुख, रानडे, गोखले हे त्याचे वाहक! ब्रिटिश म्हणत, काय करणार हो आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ इच्छीतो पण तुम्ही त्यास पात्र नाही. रानडे व गोखले (जे गांधींचे गुरु) यांना ते मनापासुन पटे की होय हो, तुम्ही आम्हाला शिकवा , आम्ही स्वातंत्र्यास पात्र नाही, तुम्हीच आमचे तारणहार.
पण टिळकपक्षाने मात्र सांगितले अहो आमची पात्रापात्रता ठरवणारे तुम्ही कोण? स्वराज्य हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे. तुम्ही देणारे दाते नाहीत आणि आम्ही ते घेणारे याचक नाही, तो आमचा जन्मजात हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. तथापि १९१६ नंतरही कॉंग्रेसला संपुर्ण स्वातंत्र्याचा ठराव करता आला तो एकदम १९२९ सालीच. पण त्या ठरावानेही गांधी संतप्त झाले. टिळकांपेक्षा गोखले हेच त्यांचे गुरु. त्यामुळे या ठरावानंतर संपुर्ण स्वातंत्र्याचा अर्थच मला कळत नाही असे उद्गार त्यांनी काढले.
या व्यतिरिक्त देशात तिसरा पक्ष होता तो तेजस्वी सशस्त्र क्रांतीकारक पक्ष. त्यांना हे असल मागण, अर्ज करण हेच अमान्य होत. सन १९१६ वा सन १९२९ च्या कितीतरी आधि त्यांनी स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी शस्त्रे उचलली होती. स्वातंत्र्य हा आमचा हक्क आहेच We all born free यावर त्यांची अतुट श्रध्दा होती. १९०२ सालाच्या अभिनव भारताच्या शपथेतच संपुर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा होती.
अभिनव भारताचे कवि गोविंद उर्फ आबा दरेकर गर्जुन म्हणाले,
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले॥
"स्वराज्येच्छुने" पाहिजे युध्द केले.............स्वराज्याच्या इच्छेने युध्द केले पाहिजे कारण युध्दात जिंकल्याविना स्वातंत्र्य मिळत नाही.
-चंद्रशेखर साने

Wednesday, December 28, 2016

सावरकरांनी काय केले? गोव्याच्या कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे, त्यास अल्प शब्द मर्यादेत उत्तर देणारे माझे संकलन दि. २८-१२-२०१६ ला दैनिक गोमन्तक मध्ये मुद्रित झाले.

Image may contain: 1 person



Saturday, December 24, 2016

अस्मितेच "भांडवल" मराठी माणसाला व्यावसायिक बनवंयास अपुरे !

***** अस्मितेच "भांडवल" व्यापारी व व्यावसायिक होण्यासाठी पुरत नाही ****
१९४७ ते १९७१ पर्यंत हिंदुमहासभा शिल्लक होती व क्रमाक्रमाने कमकुवत होत गेली. या काळात सावरकर जवळपास निवृत्त झाले होते. आपण हिंदुहिताचे राजकारण करतो ,आपल्या नावात हिंदु शब्द आहे तरी हिंदुमहासभेला यश का मिळत नाही, हिंदु माणस आपल्याला मते का देत नाहीत याची उमज हिंदुमहाभेला पडत नव्हती. आपल्याला संपवत आहेत म्हणून वैचारीक दृ्ट्या सर्वात जवळ आलेल्या संघ परिवार, जनसंघ, गोळवलकर गुरुजी यांच्या नावे बोटे मोडणे, तळतळाट करणे या शिवाय अन्य उद्योग हिंदुमहासभेला राहिले नाहीत. मूळ वैचारीक शत्रू बाजूलाच राहिले.आज हिंदुमहासभा या पक्षातला आधीचा "अखिल भारतीय" हा शब्द अक्षरश: केविलवाणा वाटतो. हा पक्ष अधुनमधुन दिसतो ते मूठभर कार्यकर्ते आणि अन्य कोणाही पक्षाकडे नाही एवढ्या मोठया "अ.भा.हिंदुमहासभा भवन" या दिल्लीतल्या वास्तुच्या आधारावर.
महाराष्ट्रात दोन पक्ष मराठी माणसाच नाव घेतात. तामिळनाडु प्रमाणे महाराष्ट्रात पण दोनच स्थानिक पक्षांना स्थान रहावे आणि आलटुन पालटुन आपल्याच घराण्याचीच सत्ता महारष्ट्रात असावी अशी स्वप्ने त्यांना पडत असतात. स्वप्न पहायलाच हवित. पण थोड वस्तुस्थितीच भान सुध्दा त्यांनी ठेवाव. तामिळनाडु सारखी भाषिक अस्मिता महाराष्ट्रात नाही. इतर कोणाही प्रांतापेक्षा मराठी माणूस हा जास्त राष्ट्रिय वृत्तीचा आहे. महाराष्ट्रापेक्षा भारत त्यांना मोठा वाटतो. वडापाव विकुन मराठी माणसाच हित कस होणार हे त्यास कळत नाही. कोणत्याही भांडवली व्यवसायात निव्वळ अस्मितेच भांडवल करुन मराठी माणूस कसा उंची गाठणार हे त्याला कळत नाही. हिंदुसभेने हिंदुंसाठी राजकारण केल म्हणजे नक्की काय हित साधल हे जस त्याला कळत नाही तसच मराठीचा मुद्दा घेऊन मराठीच राजकारण करणाऱ्यांनी, गेल्या ५० वर्षात, मराठी माणसाच अस नेमक कोणत व किती हित साधल हे त्यास कळत नाही. खळ्ळ-फटाक्‌ करुन नवनिर्माण झाल्याचीही कुठली नवि दृष्ये अद्याप त्यास दिसली नाहीत.
शेवटी शेवटी ज्या हिंदुंना हिंदुसभा साद घालत होती त्याच हिंदुंना स्वत:च हित कळत नाही, आम्हाला टाळ्या देता पण मते देत नाही, हिंदुंच्याच सर्वात मोठया संघटनेने पाठीत खंजिर खुपसला, म्हणून बोल लावु लागली. पण शेवटपर्यंत आपण हिंदुंची महासभा असून पण हिंदु आपल्याला मत का देत नाहीत, आपणच तर कुठे चुकत नाही ना, या गोष्टींच आत्मपरिक्षण त्यांनी केल नाही. अजुनही संघ , जनसंघ आणि आता भाजपा कसे वाईट आहेत यावरच विविध जहरी भाष्य करण्यातच त्यांचा वेळ जात असतो.
याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असे वाटत असेल तर , मराठी लोक आपणाला मराठीच्या मुद्द्यावर मत का देत नाहीत यावर मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करायची वेळ आली आहे, एखाद्या घराण्याची अस्मिता म्हणजे मराठी अस्मिता नाही. हिंदुत्व आणि मराठीत्व यांचे एकत्रीकरण हाच मराठी माणसाचा स्थायीभाव आहे.
जो विचारप्रवाह विकासाच्या साथीने या दोन्ही अस्मितांचे एकत्रिकरण, त्यातल्या त्यात जास्त करेल (हे नेहमी तुलनात्मक असते, दगडापेक्षा वीट मऊ हा मोजण्याचा काटा) व बेरजेचे राजकारण करुन वाटचाल करेल तोच महाराष्ट्रात यश मिळवेल.
-चंद्रशेखर साने

Wednesday, December 21, 2016

मराठे शाहिची १२८ वर्षे

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अधिकृत काळ म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकापासून ( १६७४) ते पेशवाईच्या अंतापर्यंत म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह करुन ब्रिटीशांची तैनाती फौज स्वीकारली तोपर्यंत १८०२ पर्यंत. १८१८ ची लढाई हि केवळ एक दिवा विझतानाची फडफड होती,सेनापती बापु गोखले यांचा आदरच आहे पण... खरा शेवट १८०२ ला दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटीशांचे मांडलिकत्व स्वीकारले तेव्हाच झाला.
या १२८ वर्षात अनेक चढ उतार व संकटे आली. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या संकटात, महाराष्ट्र धर्माला जागून मराठी हिंदुंनी २७ वर्षे कडवी झुंज देऊन औरंग्याला गाडला.
बाजीरावांनी भारतभर मुलुखगिरी केली तर नानासाहेब पेशव्यांच्या काळात, रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी हिंदुंनी पार अटकेपर्यंत झेंडे रोवले.
पुढे पानीपतचे संकट आले. मराठी हिंदुंची अपार हानी झाली, पण तो जेत्यांना जिंकणारा पराभव होता. त्यानंतर काही काळातच थोरल्या माधवराव पेशव्यांनी हा पानीपतचा पराभव धुवुन काढला.
सवाई माधधवरावांच्या काळात खर्डयाला निजामाला धुळ चारली तो मराठी हिंदुंच्या ताकदीचा सर्वोच्च बिंदु समजला जातो. नंतर मात्र उतरती कळा लागली.
पेशवाई हि राजकिय दृष्ट्या प्रगत असली तरी सामाजिक दृष्ट्या मात्र अप्रगत होती. याचा अर्थ असा नाही की सर्व काळ ती पोथी निष्ठ व अप्रगत होती, एकुण समाजात जेवढी परंपरागत सामाजिक गुलामी होती तितकीच पेशवाईत होती. पेशव्यांनी ती कमी केली नाही तशी वाढवली पण नाही.
चिमाजी अप्पा व थोरले माधवराव हे वैयक्तिक पातळीवर नैतिक सामर्थ्य असणारे व शूर पेशवे पण अल्पायु. थोरले माधवराव क्षयाने गेले नसते तर त्यांनी कदाचित काही सुधारणावादी योजना आखण्याला वाव दिला असता. पण त्या जरतर च्या गोष्टी.
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशव्यांचे व एकुण सर्वच समाजाचे लाजिरवाणे अध:पतन झाले होते. हे अध:पतन थांबवणारी संत परंपराही खंडीत झाली होती. हे अध:पतन चारित्र्याच्या दृष्टीनेच केवळ नाही तर राष्ट्रिय दृष्टीकोनातून होते. परिणामी ब्रिटीशांचे फावले. ब्रिटीशांच्या राष्ट्रिय नैतिक सामर्थ्यापुढे भारतीय समाजाचे राष्ट्र म्हणून ढासळलेले नैतिक अधिष्ठान फार मोठे कारण आहे, केवळ लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे नाहीत, हे कारण नव्हते.
शिवाजी महाराजांच्या काळात हे नैतिक अधिष्ठान अत्युच्च पातळीवर होते म्हणून ते राष्ट्रनिर्माते होते.
अशा प्रकारे मराठा साम्राज्य त्यातील गुणदोषांसहित १२८ वर्षे टिकले.यावेळी राष्ट्रवादाची रितसर मांडणी हिंदुस्थानात नसली तरी या साम्राज्यात राष्ट्रीय दृष्टीकोन व भारतीय सीमांविषयी जाणीव पुरेपुर होती. पण ब्रिटीश राष्ट्राच्या शक्तीसमोर ते निर्बल ठरले.
आजही हिंदु एकता व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हे दोनच गुणच सध्याचे हिंदवी स्वातंत्र्य बळकट करतील. जातीविद्वेष हा सध्या प्रस्थापित असलेल्या हिंदवी राष्ट्राचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रत्येक हिंदुने याविरुध्द लढणे हे कर्तव्य आहे.
-चंद्रशेखर साने

निरंजन पाल

खुर्चीवर बसलेल्या सावरकरांच्या शेजारी उभे असलेले गृहस्थ श्री. निरंजन पाल-
त्यांची थोडक्यात ओळख
पहिल्या पिढीतल्या लाल-बाल-पाल या त्रि-नेत्यांमधील श्री. बिपिनचंद्र पाल यांचे ते सुपुत्र-सावरकरांचे अनुयायी-अभिनव भारत चे सदस्य- ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ते सावरकरांसमवेत उपस्थित होते व "सागरा प्राण तळमळला" या काव्याचे प्रथम उमटलेले शब्द सावरकरांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकुन कागदावर लिहुन घेणारे.
अभिनव भारतच्या पतनानंतर चित्रपट क्षेत्रात प्रवेश, लंडनमध्ये चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी- भारतात आल्यावर चित्रपट उद्योगातच प्रवेश केला.
निरंजन पालांनी "अछुत कन्या" या गाजलेल्या हिंदी सिनेमाचे पटकथा लेखन केले ( श्री. गांधी (महात्मा) ) यांनी पाहिलेला एकमेव हिंदी सिनेमा "अछुत कन्या" हाच होता बहुतेक -
१९५२ ला निरंजन पालांनी सावरकर भवनात येऊन सावरकरांच्या १८५७ चे समर या जगद्‌विख्यात ग्रंथावर चित्रपट काढण्यासंबंधी सावरकरांशी चर्चा केली, मात्र तो चित्रपट माहीत नसलेल्या कारणांनी प्रत्यक्षात आला नाही.
Image may contain: 2 people, people standing and suit

Tuesday, December 20, 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोयी सोयीचे

कला, अभिव्यक्ती यांवर पुरोगामी दहशत आणि मुस्लिम तुष्टीकरणात्मक धोरण ठेवणे याचा आधुनिक भारताचा इतिहास खूप मोठा व खेदजनक आहे. मी वाचलेली दोन उदाहरणे ,
कै.श्री.विश्राम बेडेकर यांचा शेजारी हा चित्रपट खुप गाजला. ग्राऊंड लेव्हलला हिंदु-मुस्लीम कसे एकत्र रहातात वगैरे सांगणारा आणि फाळणीच्या असपासच्या काळातला हा प्रबोधनपर चित्रपट. मला पण आवडला. धर्माच्या पलिकडे जाऊन मानवता जपावी, परस्परांत सौदार्ह जपावे आणि ते दुतर्फा असावे याचा मी पुरस्कर्ता आहे.
पण यात एक मेख अशी आहे, की या दोन हिंदु व मुस्लिम शेजाऱ्यात भांडण होऊन दुहीचे बीज पेरले जाते त्यात चुक दाखवली गेली ती हिंदु शेजाऱ्याची. यावर लेखक कै.विश्राम बेडेकर यांची त्यांच्याच एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्रात आलेली टिपण्णी अशी की, हिंदु शेजाऱ्याची चुक दाखवणे योग्य होते कारण हिंदु हे सहनशील असल्याने ते त्यांना कमीपणा दर्शवणारी पटकथा सहन करु शकतात पण मुसलमान समाजाला ते रुचले नसते. म्हणुन त्यांनी पटकथेत हिंदु व्यक्तीचीच चूक दाखवणे आवश्यक व चित्रपटाच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे ठरवले व तसेच लेखन केले.
दुसर उदाहरण कै. सुधीर फडके यांच. फार पुर्वी त्यांना सावरकरांच्या "काळे पाणी " या कादंबरीवर एक चित्रपट काढायचा होता, व त्याची जुळवाजुळवही त्यांनी सुरु केली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने अट घातली की सावरकरांनी या कादंबरीतले रफीउद्दीन हे खलपात्र बदलुन ( सावरकरांनी रंगवलेले रफीउद्दीन हे पात्र ७००-७५ % माधव काझी उर्फ लखोबा लोखंडे प्रमाणे वागणारे आहे, हा योगायोग की सावरकरांचा भविष्यवेध , सत्यघटेनेचा व कादंबरीचा नेमका काळ तपासावा
लागेल) हिंदु नामक करावे, अन्यथा त्याच्याच सारखे दुसरे एक हिंदु खल पात्र पटकथेत सामिल करावे. लेखकाने काय लिहावे याचे दिग्दर्शन , निर्देशन व अटी सावरकर मान्य करणे शक्यच नव्हते व हा चित्रपटच बारगळला.( माझा व कै. सुधीर फडके यांच्यात सावरकर चित्रपटासंबंधात काही वाद १९८९ साली उद्‌भवला होता, आधी माझा लेख व त्यावर प्रतिवाद करणारा कै.श्री. फडके यांचा लेख "साप्ताहिक सोबत" मध्ये प्रसिध्द झाला, त्यात कै. फडके यांनी वरील दोन्ही हकीकतींना दुजोरा दिला होता.)
-चंद्रशेखर साने
संदर्भ:-
एक झाड दोन पक्षी- विश्राम बेडेकर
काळे पाणी आवृत्ती १९८४ - प्रस्तावना

Sunday, December 18, 2016

अख्खा हत्ती खाण्याची युक्ती

एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन हिंडत असताना त्यास एक मेलेला हत्ती दिसला. तो बेहद्द खुष झाला. मेलेल्या हत्तीचे मांस आता त्याला खूप दिवस पुरणार होते. त्यास जिवंत ठेवणार होते.
पण तेवढ्यात त्यास सिंहाची डरकाळी ऐकु आली. कोल्हा चतुर होता. सिंहाला पाहताच तो नम्रपणे म्हणाला, या या महाराज आपलीच वाट पहात होतो, आपल्या साठीच मी या हत्तीची राखण करत थांबलो होतो. आपण जंगलाचे राजे, आपलाच या मांसावर हक्क !
वनराज खुष झाले, म्हणाले, तू माझा खरा नागरीक. पण आत्ता माझे पोट भरले आहे व तशीही मी दुसऱ्याने केलेली शिकार खात नसतो, तेव्हा तुझ्या एकनिष्ठेचे बक्षिस म्हणून हि शिकार मी तुला देऊन टाकतो.
कोल्हाने वाकुन नमस्कार केला आणि सिंह तेथून निघुन गेला.
कोल्ह्याने हत्तीचे निरिक्षण सुरु केले. हत्तीच कातड जाड आणि काळ केसाळ होत. कोल्ह्याच्याने ते एकट्याच्याने फाडणे अशक्य प्राय होते.
तेवढयात तिथे एक वाघ आला आणि त्याने डरकाळी फोडली.
कोल्हा हुशार होता, अजिबात न घाबरता तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अरे वाघोबा, हि शिकार वनराज सिंहांनी केली आहे आणि मला ते राखण करण्यास सांगुन नदीवर स्नानास गेले आहेत, त्यांनी मला जो कोणी या शिकारीस तोंड लावेल त्याचे नाव सांगण्यास सांगितले आहे, विशेष करुन ते मला म्हणाले होते की त्यांना वाघाची फार चीड आहे, तु दिसलास तर मला लगेच सांगायला ये. तेव्हा तुला जर प्राणाची काळजी असेल तर त्वरित निघुन जा. ते ऐकताच वाघ सिंहाच्या भीतीने घाबरुन पळुन गेला.
आता हत्तीला कसे फाडावे याचा कोल्हा विचार करत असतानाच एक चित्ता तेथे आला. कोल्ह्याने विचार केला की श्रेष्ठास नैवेद्य दाखवुन, शूर पण दुष्ट वाघास श्रेष्ठाची भीती दाखवुन आपण काम साधले. आता आपल्यास वरचढ पण अन्य दोघांच्या तुलनेने शक्तीत कनिष्ठ अशा या चित्त्यास थोडी लालुच दाखवावी, हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे काम याच्याकडून करुन घ्यावे, कारण याचे दात व नखे फार अणकुचीदार आहेत.
असा विचार करुन तो चित्त्यास म्हणाला अरे भावा, हि शिकार सिंह महाराजांनी केली आहे व मला राखण करण्यास बसवले आहे.
चित्ता म्हणाला असे असेल तर येथुन पळुन जाणेच बरे.
कोल्हा म्हणाला, तू असा घायकुतीला येऊ नकोस, तू माझा भाऊ आहेस, तू फार भुकेलेला दिसतोस. मी असे करतो , एका बाजूला जाऊन मी सिंह येत नाही ना पहातो तोपर्यंत तू पोटभर खाऊन घे.
चित्ता भुकेला होताच, त्याने कोल्ह्याचे हे म्हणणे मान्य करुन हत्ती ला फाडण्यास सुरुवात केली. हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे आपले पुरेसे काम होताच कोल्हा ओरडला, अरे मुर्खा पळ पळ, महाराज येत आहेत. चित्ता घाबरुन पळुन गेला.
आता कोल्हा निवांत पणे चित्त्याने फाडलेल्या भागाचे मांस खाऊ लागला. तेवढयात दुसरा एक भुकेलेला आणि संतापलेला कोल्हा हत्तीचे मांस खाण्यासाठी धावुन आला.
कोल्ह्याने विचार केला श्रेष्ठास सामाने, दुष्टास भेदाने , कनिष्ठ चित्त्यास दामाने म्हणजे लालच दाखवुन त्यांच्यावर आपण मात केली.
पण हा कोल्हा आपल्याला तुल्यबळ आहे, नीतीशास्त्राप्रमाणे आपण याच्याशी संघर्ष आणि लढाई करणेच शौर्याचे लक्षण आहे. असा विचार करुन त्यानेही त्या कोल्ह्यावर उलट चढाई करुन त्यास पळवुन लावले.
अशा प्रकारे चतुर कोल्ह्याने राजनीतीशास्त्राने सांगितलेल्या साम, दाम, भेद व दंड अशा चारही युक्त्यांचा वापर करुन आपले अन्न स्वकष्टाने प्राप्त केले व बराच काळ आपला चरितार्थ सुखाने चालवला.
-चंद्रशेखर साने
पंचतंत्र कथा

Saturday, December 17, 2016

थोडा वेळ लागेल पण नोटाबंदीला यश १००%

********** थोडा वेळ लागेल पण यश १००% ************
मी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचा समर्थक आहे हे माझ्या कपाळावर लिहिले आहे का काय कळत नाही, पण मला आतापर्यंत एकाही बॅंकेत पैसे काढायला त्रास झाला नाही. सर्वत्र सुटे पैसे मिळत राहीले, cash counter असो वा ATM अर्ध्या तासा पेक्षा अधिक काळ कोठेही थांबावे लागले नाही.
जनता सहकारी बॅंकेत १०००, ३०००, ५००० अशा पधतीने रक्कम काढता येते आहे. त्यात नेहेमी एक हजार रुपये १०० च्या नोटात व बाकीचे दोन हजाराची नोट मिळाली. हे दोन हजार सुध्दा अगदी सहजी सुटे होत गेले. काही छोटे वा मध्यम व्यापारी लोक जेव्हा क्रेडीट/डेबिट कार्ड घ्या म्हटल्यावर नाही म्हणाले, तेव्हा त्यांच्यापुढे मी २००० ची नोट पुढे करत होतो, ते निमुट पणे मला सुटे देत होते. Pay tm* चे खात आहे व त्याच्या wallet मध्ये पण पैसे भरुन ठेवले आहेत , पण त्याचाही वापर करायची अद्याप एकदाही वेळ आली नाही.
रोकड सुलभता कायम राहिली आहे. अगदी घरकाम करणारे, भाजीवाले, फळवाले रिक्षा इ. बरोबर लहान लहान व्यवहार करताना कसलीही अडचण आली नाही adjust करावे लागले नाही. ATM वरच्या रांगा दिसल्या ते रांगेत का उभे रहातात हे पण कळले नाही, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थीच ८०% जास्त प्रमाणात रांगेत का दिसतात हे कोडे पण उलगडलेले नाही.
L.I.C., M.S.E.B. , Internet, Share Market, Telephone इ. बाबबत डीजिटल होऊन मला किमान पाच पासुन ते पंधरा वर्षे होऊन गेली. तीही अडचण नाही. ग्राहक पेठ गेली काही वर्षे कसलाही अधिक सरचार्ज न घेता क्रेडीट कार्ड accept करते आहे, त्यामुळे महिन्याच्या किराणा मालाचा प्रश्न नाही.
काही तथाकथित विद्वान, सुत्रसंचालकांसह, बकवास चर्चा करणाऱ्या न्युज चॅनेलवर १ दिनांकेपासुन परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी आक्षेपार्ह विधाने सर्रास करत आहेत, हि त्यांची चिंता नसून दंगली व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे, का मोदी आल्यापासून व नोटाबंदंच्या निर्णयानंतर पाण्याविना मासोळी सारख्या तडफडणाऱ्या अस्वस्थ लोकांच्या वतीने चर्चात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातुन दिल्या जाणाऱ्या या धमक्या आहेत यावर प्रशासन व पोलिस खात्याने विचार करायला हवा. कारण असे बडबडणाऱ्यांत मनात विष-भरलेले अराजकतावादी व नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक सुध्दा आहेत. मोदी आले तर देश सोडुन जाऊ म्हणणारे, पुरस्कार वापसी करणारे, भारत के तुकडे होंगे हजार म्हणणारे अस्वस्थ आहेत. मोदी आल्यावर दंगली होऊन अमुक एक हजार लोक मरतील वगैरे वाचाळपणा करणारे सुध्दा हतबल झालेत. आपल्या थयथयाटाने भूकंप होईल अशी आशा बाळगुन आहेत. पण मोदींची प्रशासनावर उत्तम पकड आहे याची खात्री आहे. त्यामुळे या धमक्या प्रत्यक्षात उतरावयाला गेले तर त्यांचे काळे चेहरे जगापुढे उघडे पडतील.

नोटाबंदीचा निर्णय हा दीर्घकालिन निर्णय आहे वार्षिक ताळेबंद मांडुन त्याचा परीणाम कळणार नाही.

पुर्वी पण रु. १००० च्या नोटा रद्द केल्या होत्या , आता वेगळा काय फरक पडेल अस वाटणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की आता मानसिकतेत फरक पडणार आहे.
पुर्वी खाल्लेला पैसा सुरक्षित असण्याचा फील असायचा करप्ट लोकांना !
आता कोणत्याही क्षणी वाममार्गाने मिळवलेला पैसा मातीमोल करण्याची ताकद सरकारी यंत्रणेत असल्याची खूणगाठ बांधली आहे भ्रष्टाचारी लोकांनी मनाशी.
सरकारने- शासनाने आपल कणखर अस्तित्व दाखवुन, आमच कोण काय वाकड करु शकणार आहे या भ्रष्टाचारी मानसिकतेवर केलेला आघात पण इतर फायद्यांप्रमाणेच कमी महत्वाचा नाही. निगरगट्ट कातडी असलेल्या लोकांच्या मनात सुध्दा या निर्णयाने धडकी भरवली आहे.
पुर्वीचे १००० रु कोणाला सहसा दिसायचे पण नाहीत. आता पाचशे नोटेचे पण अवमूल्यन झाले आहे. अगदी तळागाळाच्या व्यवहारात सुध्दा भ्रष्ट्राचार होतो त्यालाही हा दणका आहे. मोठे भ्रष्टाचार धोक्याचेच पण ते सर्वसामान्यांना प्रत्यक्ष भिडत नसतात, रोजच्या आयुष्यावर परिणाम दिसायला दिर्घकाल जात असल्याने जाणवत नाहीत. पण चतुर्थ श्रेणीतल्या भ्रष्टाचाराला सर्वसामान्य मनुष्याला प्रत्यक्ष भिडावे लागते व तो एकाच वेळी त्याचा शोषक आणि शोषित अशा दोन्ही भूमिका निभावतो, हि तर एक विलक्षण स्थिती आहे. मला भ्रष्टाचार्यांना पैसा द्यावा लागतो म्हणून मी पण दुसरी कडून पैसे खाणार असे हे दुष्ट चक्र भारतात तयार झाले आहे.
सरकारच्या या आणि येऊ घातलेल्या पुढील कडक पावलांनी हे दुष्टचक्राचा लवकरात लवकत भेद व्हावा, हि लढाई आपल्या सगळ्यांची आहे. तात्पुरत्या फायद्या तोट्यांकडे पाहुन रुसुन बसण्याची नाही.
अर्थक्रांतीमधले नोटाबंदी हे केवळ पहिल पाऊल आहे. मागचा काळा पैसा खणुन निघेल तेवढा निघेल पण यापुढे काळा पैसा निर्माणच होऊ नये या व्यवस्थेची बिजे या निर्णयात रोवली आहेत. दहशतवादाला आळा हा एक साईड इफेक्ट आहे. आत्मघातकी लोकांना केवळ नोटाबंदीने रोखता येत नाही हे लहान पोरांनाही कळते.
जर पुढची टर्म मोदींनाच मिळली तर हि लढाई अधिक प्रभावशाली होईल. दुसरे कोणी आले तर परत मंदावेल, पण अगदीच उलटे निर्णय घेतले नाही गेले तर थांबणार नाही आता. रोकडमुक्त व्यवहार ही २१ व्या शतकाची पाऊलवाट ठरेल.
पुढची टर्म पण मोदींना मिळाली (ती मिळेल याचीच जास्तीत जास्त शक्यता आणि अपेक्षा आहे) तर निवडुन आल्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे २०२२-२३ मध्ये रु. २०००/- ची नोट सुध्दा क्रमाक्रमाने रद्द केली जाईल यात शंका नाही. २०१९ ला सुध्दा मोदींकडेच नेतृत्व येणे देशाच्या व राष्ट्राच्या हिताचे असेल.

© चंद्रशेखर साने

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...